९: मरीन ड्राईव्हवरील पाठलाग

इन्स्पे० ज्योतिप्रसाद सकाळपासून तापला होता. भर रस्त्यात खून झाला होता आणि ज्या तरुणीचा खून झाला त्या तरुणीपासून तो अवघ्या हजार यार्डाच्या अंतरावर असून काहीही उपयोग झाला नव्हता. खुनी खून करून, एक गूढ वलय निर्माण करून सटकला होता.
दोन दिवसांत सर्व बाजूंनी प्रयत्न करूनही ज्योतिप्रसादची प्रगती शून्य होती. काहीतरी सुगावा लागेल म्हणून तो सर्व बदमाशांचे अड्डे पालथे घालून आला होता. अगदी कुलाब्यापासून सुरुवात करून भाईंदरपर्यंत येऊन तो थांबला होता, पण तरी तपास लागायच्या नावाने बोंब.
शिवाय गर्दीत फिरताना त्याच्या खिशातले पाकीट कुणीतरी उडवले होते. रात्री शेरे पंजाबमध्ये तो डिनर घ्यायला गेला. त्याने चक्क साठ रुपयांचे बिल केले होते, आणि बिल आल्यावर खिशात हात घातला तेव्हा त्याचा चेहरा फोटो काढण्यासारखा बनला होता. संपूर्ण दिवसभर तो इतका गडबडीत होता की पाकीट कधी मारले गेले हे त्याच्या लक्षातही आले नव्हते. केवळ मॅनेजर ओळखीचा होता म्हणून पुढची शोभा वाचली.
गेल्या दोन दिवसांत नुसती परवड झाली होती त्याची, आणि इन्स्पे० ज्योतिप्रसादला कशातच यश आले नव्हते. त्यात आता जास्त भर पडली होती. सकाळीच आय० जी० पी० रांगणेकरांचा निरोप आला होता आणि तो आता त्यांच्याच ऑफिसात शिरत होता… वैतागून. पण समोरचा साहेबांचा चेहरा ज्योतिप्रसादला बरेच काही सांगून गेला. आता तो तोफेला तोंड द्यायला तयार झाला.
“बसा!” त्याला आत आलेला पाहून रांगणेकर गुरगुरले.
“साहेब, मला जास्त वेळ थांबता येणार नाही. काय बोलायचं ते लवकर बोला.”
“का?”
“सध्या एक महत्त्वाची केस माझ्याकडे आहे!” साहेब जितके जास्त चिडतील, तितकेच लवकर शांत होतील याची त्याला कल्पना होती. म्हणून तो साहेबांना तापवत होता.
“इन्स्पेक्टर, आज तारीख किती?”
“तेरा.”
“किती दिवस ही केस हाताळताय?”
“नऊपासून.”
“म्हणजे चार-पाच दिवस झाले. प्रगती?”
“तपास चाललाय. केस पूर्ण निकालात निघाल्यानंतर फाईल समोर ठेवतो.”
“तोपर्यंत मी काय माश्या मारू? इन्स्पेक्टर, तुमचं ऑफीस खाली आहे. माझ्या डोक्यावर तो बडा साहेब बसलाय - कमिशनर. त्याला काय सांगू?” रांगणेकर उखडले.
“साहेब, माझा तपास सुरू आहे.”
“हे बघ ज्योती, तू केसबद्दल सांग,” तापलेले रांगणेकर क्षणात खाली आले. आणि ज्योतिप्रसाद हसला. आता साहेब गार झालेत हे त्याने ओळखलें.
“एका तरुणीचा खून झाला दादर भागात. खुनी सापडला नाही. आणि ज्या हत्याराने खून झाला ते अगदी चमत्कारिक आहे.” फ्रंटियर मेलसारखा धाडधाड, न थांबता, सर्व केसच त्याने एका तासात साहेबाच्या समोर मांडली. तेव्हा रांगणेकर काही न बोलता फक्त ऐकत राहिले.
“ज्योती, तू तपास घे…”
“हो, सर.”
***
इन्स्पे० ज्योतिप्रसाद खाली कॅबिनमध्ये आला तेव्हा सुदर्शन तोंडातून सिगारेटचा धूर सोडत त्याची वाट पाहत होता.
“ज्योती, तीन मोहरे आम्ही सांभाळतो, तू चौथा सांभाळ.”
“कोण?”
“शंभू भोसले.”
ते नाव कानावर पडले तेव्हाच इन्स्पे० ज्योतिप्रसादच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ह्या सुदर्शनने आपल्यापुढे आघाडी मारलीय याची त्याच क्षणी त्याला कल्पना आली.
“त्याचा इथे कुठे संबंध येतो?”
“ज्योती, तीरखांची एक संघटना होती, जीची आज चौकट झालीय.”
“सुदर्शन, म्हणतोस काय? तो यात आहे?” आश्चर्याने ज्योतिप्रसाद ओरडला.
“हो – राजसिंह, बच्चन आणि माजगे हेही त्याचंच काम करतात.”
“ही भानगड तरी काय?”
“साधं आहे. स्वतःला ‘लंगडा भालू’ म्हणवणारा कोणीतरी ह्यात एका महिन्यापूर्वी उतरलाय. तो अज्ञात आहे. कदाचित याच चौघांतला एक जण, किंवा स्वतः तीरखांच, त्या नावाची कसरत करत बाकी चौघांना धमकी देऊन लुबाडण्याच्या उद्देशाने जाळं पसरून बसलेला असू शकतो.
दोन दिवसांत प्रथमच इन्स्पे० ज्योतिप्रसादने कोटाच्या खिशातून सिगारेटचे पाकीट काढून एक सिगरेट शिलगावली. दुसरी सिगारेट सुदर्शनसमोर धरली. ह्या कथानकाचे अगदी शेवटचे टोक सुदर्शनने त्याच्यासमोर उभे केले होते हे लक्षात येऊन तो भारावून गेला होता.
“सुदर्शन, हा प्रकार आहे तरी काय?”
“ज्योती, तीरखांला कुणीतरी शह देणारा तयार झालाय. त्याला ताक न घुसळता मलई हवीय. जो पैसा तीरखांची चौकट आज जवळ बाळगून आहे त्यातला मोठा हिस्सा त्याला हवाय. त्यासाठी तो त्या सर्वांना धमक्या देत सुटलाय. माली पानसे हा त्याचा पहिला बळी.”
“तिचा कुठे संबंध येतो ह्यात?”
“येतो. ही माली तीरखांची बातमीदार होती. बेमालूमपणे ती श्रीमंत वर्तुळांत फिरत होती. तिने आणलेल्या माहितीचा उपयोग करूनच तीरखां लूटमार करत होता. अगदी योजनाबद्ध रीतीने सर्व कारभार चालला होता.”
“आणि तिचा खून झाला…”
“हो. लंगडा भालू या नावाने अज्ञातात वावरणाऱ्या माणसाने तिला उडवलं.”
“सुदर्शन, हा भालू कोण असावा?”
“तेच समजत नाही. ज्योती, पण तो बाहेर आला की एकदाची या प्रकरणाची फाईल तुला रांगणेकरांच्या टेबलावर आपटता येईल.”
इन्स्पे० ज्योतिप्रसाद हसला. संपूर्ण प्रकरण आता त्याच्या डोळ्यांसमोर उभे होते. भराभरा त्याने पाच सहा कागद लिहून फायलीत सारले.
“सुदर्शन, मी शंभूला गाठतो!”
“छान. ज्योती, आणि एक तुला खाजगीत सांगतो. माजगे माझ्या घाटकोपरच्या बंगल्यातल्या तळघरात आहे.” असं बोलून सुदर्शन ताडताड निघाला आणि इन्स्पे० ज्योतिप्रसाद थक्क होऊन त्याच्या पाठीकडे पाहत राहिला. सुदर्शनचे त्रिकूट त्याच्या चांगलेच पुढे होते.
***
आता इन्स्पे० ज्योतिप्रसादने मोटारसायकल सुरू केली आणि वेगात वरळीच्या रोखाने सोडली. शंभूचे नाव त्याच्या काळ्या फाइलीत सहावे होते.
दहाच्या सुमारास तो बंगल्याच्या फाटकातून आत शिरला आणि त्याने दारावरची बेल दाबली. आतून बेलचाच आवाज घुमला. अर्धा तास ज्योतिप्रसाद बेल वाजवत होता, पण कुणी दार उघडायला आलं नाही. शेवटी बागेत बागकामासाठी ठेवलेला टिकाव एका वाफ्यात पडला होता, तो घेऊन त्याने दोन घावांत दार फोडले. त्याच्या मनात आले - शंभू कुठे बाहेर गेला असला तर परत आल्यावर मला फाडून खाईल.
धक्का देऊन त्याने दार उघडले, आणि इन्स्पे० ज्योतिप्रसाद दिवाणखान्याच्या दरवाजात खिळल्यासारखा उभा राहिला. समोर फोन लोंबत होता आणि फोनजवळ शंभू भोसले तोंडावर पडला होता. त्याच्या पाठीत एक आणि पाठीच्या बाजूला उजव्या कुशीत दुसरा, असे दोन सुरे मुठीपर्यंत खुपसलेले होते.
लंगड्या भालूने दुसरी शिकार केली होती - शंभू भोसलेची.
इन्स्पे० ज्योतिप्रसाद धावत फोनकडे गेला. भराभर त्याने ऑफिसातील निरनिराळ्या खाशांना फोन करून लवकर हजर राहायच्या सूचना केल्या आणि शेवटी ऑपरेटरकडे रांगणेकरांशी कनेक्शन मागितले.
“हॅलो साहेब?”
“कोण? ज्योती?”
“हो. साहेब, दुसरा खून झालाय.”
“काय?”
“हो. शंभू भोसलेचा. अगदी तसाच खून झालाय.”
“कुठे?”
“त्याच्याच बंगल्यात.”