७: मृत्यूचा सापळा
माणसाच्या आयुष्यात योगायोगाला किती महत्त्व असते याचा प्रत्यय हवा असेल, तर अगदी प्रत्येक घटकेला तो सापडतो. एखादी गोष्ट मनात आणावी आणि तीच दत्त म्हणून समोर उभी राहावी! अगदी तसेच त्रिकूटाच्या बाबतीत झाले.
हॉटेल रिट्झमध्ये आलेले ते तिघे उठून निघाले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. जेव्हा दारातच त्यांना दोघे ओलांडून गेले, तेव्हाच तिघांच्या मनात संशयाने घर केले.
त्रिकूटाला आता बदमाशांची रेघ परिचित झाली होती.
अॅड० राजसिंह आणि डॉ० माजगेबद्दल तिघांच्या कानावर अनेक अफवा आल्या होत्या. ही जोडी कुणाचेतरी काळे काम करत असावी, असा त्यांना जुना संशय होता. मात्र आपण सध्या हाताळत असलेल्या प्रकरणात ह्या दोघांचा फार मोठा हिस्सा आहे याची त्यांना कल्पना नव्हती.
तिघे येऊन सुदर्शनच्या गाडीत बसले. सुदर्शनची काळी रोल्स रॉइस बांद्रा रोडच्या रोखाने धावत निघाली. तिघे शांत होते. चालू प्रकरणाचाच प्रत्येकाच्या मनात घोर सुरू होता. अनिलही इतर विचार करत हातातल्या चमत्कारीक ट्रान्झिस्टरच्या बटणांशी खुडबुड करत होता. हा ट्रान्झिस्टर दोन महिन्यांपूर्वी त्याने इंग्लडहून खरेदी केला होता. तो नुसते गाणे ऐकण्याचा नव्हता, तर त्यात दोन ट्रॅक्स असलेला एक साउंड बॉक्स होता. अनिलने अभावितपणे हातातील ट्रॅन्झिस्टरचे बटण फिरवले आणि त्या शांत वातावरणात एकदम स्फोट झाला! कारण बटण फिरवल्याबरोबर आतून आलेला शब्द भयानक होता.
“राज, मालीचा खून झाला.”
ट्रॅन्झिस्टरमधून गार लहरीसारखा आवाज आला. सुदर्शनने करकरत ब्रेक्स मारले आणि अजय वेड्यासारखा त्या ट्रॅन्झिस्टरकडे बघायला लागला. आता त्यातून खाताना मिटक्या माराव्यात तसा आवाज येत होता आणि त्यात काट्या-चमच्यांचे आवाज मिसळले होते.
“अनिल, हा काय प्रकार आहे?” सुदर्शन आश्चर्याने ओरडला.
“मायक्रोफोन…”
“कुठाय?”
“आपण बसलो होतो त्या टेबलावर, फ्लावरपॉटच्या शेजारी विसरलाय.”
“अन्या, तू… तू तर नाडकर्णी डिटेक्टिव्हचा बाप झालास!”
अनिलने आता आवाजाचा व्हॉल्यूम मोठा केला होता. स्पष्टपणे त्यांच्या कानावर एक नवीन संभाषण पडत होते. हाच तो योगायोग!
सुदर्शनने गाडी भर्रदिशी वळवली. रोल्स रॉइस आता पुन्हा रिट्झकडे धावत होती. ट्रान्झिस्टरवरून आता संभाषणाचा पूर सुरू झाला होता.
“राज, पुन्हा अशी चूक झाली तर तीरखांची सवय तुला माहीत आहेच!” पलीकडे आवाज झाला. पाठोपाठ दचकण्याचा आवाज झाला होता. आता ट्रॅन्झिस्टरमधून बाहेर पडणारा आवाज मान दाबावी तसा बंद पडला होता. खट्ट. अनिलने बटण बंद केले.
“सुदर्शन, तीरखांसुद्धा यात आहे!”
“भायखळ्याचा?”
“हो.”
“आता प्रकरणाला खरी गती मिळेल. अनिल उभ्या हयातीत एकाच गोष्टीबद्दल मी तुला शाबासकी देईन. ती म्हणजे हा मायक्रोफोन.”
“बरंय! सुदर्शन, तुझा बेत काय?”
“आधी ह्यात कोण कोण भाग घेतंय हे पाहू.”
त्रिकूट पुन्हा रिट्झच्या पायऱ्या चढत होते. आणि त्यांना येताना पाहून मॅनेजरने एका वेटरला खूण केली होतो. सुदर्शन मोहिते हे हॉटेल रिट्झचे नेहमीचे गिऱ्हाईक होते.
“साहेब, ते टेबल मोकळं आहे.”
तिघे खुर्चीवर बसले. अगदी सहज गप्पा मारायला सुरुवात झाली होती. आपण त्यांच्या गावचेसुद्धा नाही असेच तिघे वागत होते, मात्र त्यांच्या धारदार नजरेतून उजव्या कोपऱ्यात बसलेल्या टेबलाभोवती बसलेल्या प्रत्येकाची बारीक हालचालसुद्धा टिपली जात होती.
“फ्रेश लेमन,” सुदर्शनने ऑर्डर दिली आणि वेटर ती आणायला धावला. तेव्हाच टेलिफोन बूथमधून बाहेर पडलेला तीरखां चौघांसमोर जाऊन बसलेला होता.
“अनिल, बटण सुरू कर.” अनिलने बटण दाबले.
“राज, भालूचा फोन होता,” निर्विकार असा तीरखांचा आवाज आला आणि इतरांचे भेदरलेले आवाज पाठोपाठ झाले.
त्रिकूट आता उजव्या टोकाला चाललेले ते संभाषण लेमनच्या आस्वादात मिटक्या मारत चघळत होते, आणि त्या संभाषणाच्या प्रत्येक शब्दाबरोबर एक नवा भीषण सत्याचा प्रकार समोर येत होता. लवकर पावलं उचलायची वेळ जवळ येत होती.
“अनिल, आता आपली चाल खेळायची.”
“सांग.”
“चौघांतील एकाला ताब्यात घ्यायचं.”
“घाटकोपर?”
“हो.”
“अजय, तू टॅक्सीने पुढे हो. नवं हत्यार तयार कर.”
“चाप?”
“नाही. मासा!”
“शॉकचा?”
“हो.”
अजय बाहेर पडला. त्याला जास्त सांगायची गरज नव्हती. सुदर्शनने वेटरला खूण केली.
“काय साहेब?” वेटर अदबीने खाली वाकला.
“माजगेची गाडी कोणती?” हातात शंभराची नोट नाचवत सुदर्शनने प्रश्न विचारला.
“साहेब, लेमन कलरची ऑस्टिन आहे. एम एच पी छत्तीस झीरो वन.”
“हे घे.” दोन नोटा आनंदाच्या पदरात पडल्या, आणि बिलाचा ट्रे घेऊन तो सटकला.



***
हा सर्व प्रकार अगदी सराइतासारखा झाला होता. कोणालाही संशय यायचे कारण नव्हते. सुदर्शन रोल्स रॉइस स्टार्ट करून बाहेर पडला तेव्हा अनिल डाव्या हाताच्या गाड्यांच्या रांगातून चालला होता. तिसऱ्या रांगेत त्याला डॉ. माजगेची ऑस्टीन मिळाली. गाडीपण काय गाडी होती! तीन स्टॉपरचे बॅक मडगार्ड होते आणि मोराच्या फुललेल्या पिसाऱ्यासारखा मागचा डिकीचा भाग वर आला होता. जेफ ऑस्टीनचे ते लेटेस्ट मॉडेल होते!
आपलीच गाडी आहे अशा रुबाबात अनिल मागच्या दाराच्या हॅन्डलला टेकला. त्याच्या हातातल्या पातळ पट्ट्यांच्या जुडग्यातली तिसरी पट्टी लॉकमधे बरोबर बसली, आणि लॉक सटकले. मागची सीट आणि पुढची सीट यांच्यामधील पोकळीत अनिल शांतपणे पडला. आता त्याने हातातला ट्रॅन्झिस्टर पुन्हा ऑन केला.
“राज, कोणत्याही क्षणी तो आपल्या मागे लागेल. सर्वानी सावध राहायला हवं,” तीरखांचा आवाज आला. पाठोपाठ खुर्ची सरकल्याचा आवाज झाला आणि सर्व जण हसले.
अनिलने बटण बंद केले. आता डॉ० माजगे कोणत्याही क्षणी गाडीपाशी पोचणार होता.
पाचव्या मिनिटाला माजगेने ड्रायव्हिंग व्हीलच्या बाजूचे दार उघडले आणि आत बसून गाडी स्टार्ट करून तुफान वेगात रिट्झच्या पोर्चमधून बाहेर काढली. अनिलला गडबड नव्हती. माटुंगा रोडजवळ तो कामाला सुरुवात करणार होता. मागच्या काचेतून त्याला आता खुणेचे लाईट दिसत होते. दोन वेळा लेफ्टचा हेडलाईट चकाकला होता. सुदर्शन मागून येत होता असाच त्याचा अर्थ होता.
पडल्या पडल्या अनिलने शांतपणे विचार करायला सुरुवात केली. ह्या चौकटीचा आणि माली पानसेचा काय संबंध?
अवघ्या पंधरा मिनिटांत माटुंगा रोडचे गेट आले. इथेच माजगे नायगावच्या रोखाने ऑस्टीन वळवणार होता.
“माजगे, गाडी घाटकोपरच्या रोखाने घे.” अनिलने उठून माजगेच्या कपाळाला रिव्हॉल्वरची नळी टेकवली होती. हे इतक्या अचानक झाले होते की माजगे जाम घाबरला.
“कोण… भालू?”
“भालूचा बाप! गाडी सरळ घाटकोपरच्या रोखाने घे.”
“का?” हादरलेला माजगे काय करावे या संभ्रमात होता.
“आपल्याला गप्पांचा डाव टाकायचा आहे.”
“नाही,” माजगे घाबरून म्हणाला.
“माजगे, ट्रिगर दाबला तर काय होईल हे शेंबड्या पोरालाही समजतं. तुला वेगळं सांगायला नकोच.” माजगेची अवस्था विचार करण्यापलीकडे गेली होती. त्याने बाहेर ब्रिजवरून गाडी हायवेच्या रोखाने घेतली, आणि अनिलने तरीही रिव्हॉल्वरची नळी त्याच्या मानेला टेकवूनच ठेवली. माजगेवर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे होते.
सायन मागे पडले तेव्हा माजगेने चलाखी करण्याचा प्रयत्न केलाच, आणि अनिलच्या मुठीचा फटका सटकन त्याच्या मानेत आपटला. माजगे कळवळला.
“पुन्हा असा वेडेपणा करू नकोस, माजगे. तुझ्या बापाचं बारसं जेवलोय मी,” अनिल बोलला. “आता उजव्या हाताला घे.” पुढची काही मिनिटं अनिल सूचना करत राहिला आणि माजगे ऑस्टिन वळवत राहिला. आता ऑस्टिन घाटकोपर पूर्व भागात आली होती.
“शास्त्री नगरच्या पुढे घे. वेग वाढव.” करकरत ऑस्टिनने वेग घेतला. समोर चौकात पोलीस उभा होता आणि त्याचसाठी थांबायची अनिलची इच्छा नव्हती. अनिलला तो हवालदार ओळखत होता. ऑस्टिन आता रहदारी नसलेल्या रस्त्यावरून धावत होती.
“डाव्या बाजूला त्या निळ्या फाटकातून आत घे.”
फाटकातून ऑस्टिन आत शिरली आणि वेगात पोर्चमधे शिरून गप्पकन थांबली. अनिल सावध होता. ह्याच क्षणी माजगे हालचाल करेल असा त्याचा अंदाज होता, आणि तसेच झाले. एकाच वेळी माजगेने दोन गोष्टी केल्या - गिअरस्टिकवरचा हात काढून त्याने सर्व ताकद एकवटून मागे अनिलच्या डोक्यात आपटला, आणि त्याच वेळी दार उघडून बाहेर झेप घेतली.
फटका तर अनिलने चुकवला. माजगे बाहेर उडी घेईल ह्याचाही त्याला अंदाज होता, मात्र तो इतक्या चपळ हालचाली करेल असे त्याला वाटले नव्हते. माजगे वाटतो तितका साधा नाही याची त्याला त्याच क्षणी कल्पना आली.
पाठोपाठ अनिलनेही दार उघडून बाहेर झेप घेतली, ती सरळ माजगेच्या पाठीवर. पण अनिल पाठीवर आपटल्याबरोबर हात खाली दाबून माजगे उसळला. चेंडूसारखा. पाठीला रेटा देऊन त्याने अनिलला दूर उडवले, आणि त्याच वेळी झटक्यात सरळ होऊन वर फेकल्या गेलेल्या अनिलच्या पोटात त्याच्या बुटाची लाथ बसली. वेदनांनी अनिल कळवळला, पण मनातल्या मनात त्याने माजगेला शाबासकी दिली. इतका शिस्तीत, शास्त्रोक्त आघात करणारा अनिलला आजच प्रथम भेटला होता. हातावर तोल घेत अनिल सावरला. ही वेळ माजगेची स्तुती करायची नव्हती. तो हातातून निसटला असता तर सुदर्शन आणि अजय कितीतरी दिवस त्याची चेष्टा करत बसले असते.
माजगेला सावरायला त्याने अवधीच दिला नाही, आणि सपकन त्याच्या मानेत बुटाची लाथ फेकली. पण पुन्हा आश्चर्याने थक्क व्हायची पाळी अनिलवरच आली! माजगेने त्याची लाथ वरच्यावर धरली आणि त्याला मागे फेकला.
शाबास!
आता मात्र अनिल सावध झाला. कोणत्याही क्षणी रिव्हॉल्व्हर काढून गोळी झाडायची तयारी त्याने ठेवली, पण आजपर्यंत शिकलेल्या डावपेचांच्या परीक्षेची वेळ खरोखरच आज आलीय हे त्याने ओळखले.
परत एकदा काय झाले हे त्याला समजलेच नाही. माजगे डाव्या बाजूला झुकला आणि त्याने पायावर गिरकी घेता घेताच पुढे सरकणाऱ्या अनिलच्या रोखाने उसळून झेप घेतली. हा प्रकार अनिलला नवा होता. सपकन त्याच्या कुशीत बुटाची लाथ बसली, आणि तो सावरायच्या प्रयत्नात असतानाच माजगेच्या हाताचा पंजा त्याच्या थोबाडावर आदळला. दोन्ही आघात जीवघेण्या वेदना देऊन गेले. अनिल कळवळला.
माजगे आपल्याला भारी आहे हे त्याच क्षणी त्याने ओळखले, पण तरीही अजून तो पिस्तूल झाडायला तयार नव्हता. काही झाले तरी माजगेला निसटू द्यायचे नाही असा त्याने निश्चय केला. आता तो वेदना गिळून शांत उभा राहिला. बंगल्याच्या पोर्चमधल्या लाईटच्या अंधूक प्रकाशात माजगेच्या हालचाली त्याला स्पष्ट दिसतही नव्हत्या. त्याने नजर स्थिर केली. माजगेला काय येत नाही याचा त्याने अंदाज घेतला, आणि तोच डाव टाकायचा त्याने विचार केला.
आणि अनिल उसळला. त्याचा ही खेळी मात्र चांगलीच होती. त्याने दोन्ही पाय एकाच वेळी झाडले. माजगेच्या मानेच्या दोन्ही बाजूला पाय आपटले आणि मागे येताना अनिलने दोन्ही हातांचे पंजे नेमके त्याच जागेवर मारले. कट आवाज झाला. खांद्याजवळचे एक कॉलर-बोन निखळले होते. वेदनांनी माजगे जोराने ओरडला. त्याच वेळी अनिलने पुऱ्या ताकदीने माजगेचा हात मागे खेचला - तोच कॉलर-बोन मोडलेला हात. भयानक वेदनांनी माजगे गुरासारखा ओरडला.
“माजगे, आता हललास तर हात कायमचा गमवावा लागेल,” अनिल धापा टाकत ओरडला.
पण आता काहीही करण्याची माजगेची शक्ती संपली होती. तो वेदनांनीच मेल्यात जमा होता. अनिल त्याला खेचत आत घेऊन गेला तेव्हा अजय आवाज कसला आलाय हे पाहाण्यासाठी दार उघडून बाहेर येत होता.
“माजगे, ऊठ.” कुशीत सणसणीत लाथ बसून माजगे पुन्हा कळवळला, तेव्हा त्याच्यासमोर नुकताच बंगल्यात शिरलेला सुदर्शन उभा होता. डॉ० माजगेला सुदर्शनच्या घाटकोपरच्या बंगल्यात आणण्यात आले होते आणि त्याला आता पोपटासारखे बोलायला भाग पाडण्यात येणार होते.
“बोल माजगे, मालीचा तुमच्या टोळीशी काय संबंध होता?”
“कोण माली! आणि तुम्ही मला इथे का आणलंय?”
“ज्योतिप्रसादच्या ताब्यात तुला देणार आहोत, माजगे. पण त्याआधी आम्हांला काही माहिती हवी आहे.”
“मला काहीही माहीत नाही,” माजगे आता वेदना गिळून शांत झाला होता. “तुम्ही माझ्यावर कितीही जबरदस्ती केलीत तरी एकही शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडणार नाही.”
“छान. माजगे, ह्या बंगल्यात येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही वदवलाय. कधी हीटरचे शॉक देऊन, तर कधी भयानक प्राण्यांना अंगावर सोडून. आज तुझ्यावर नवा प्रयोग करायचा आमचा विचार आहे.”
“मी बोलणार नाही,” माजगे ठामपणे म्हणाला.
अनिलने माजगेचे दोन्ही हात मागे खेचून एका खुर्चीला बांधले आणि दोन्ही पाय त्याच्याच कमरेचा पट्टा सोडून जाम केले.
***
आता सुदर्शनच्या हातात धरलेल्या लाकडी चिमट्यात एक विचित्र आकाराचा फूटभर लांबीचा मासा होता. तो त्याने माजगेच्या शरीराला लावला. एकच क्षण. माजगेचा चेहरा काळा-निळा पडला आणि अंग थरथरवून त्याने भयानक किंकाळी ठोकली.
मासा सुदर्शनने बाजूला ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या काचेच्या भांड्यात सोडला. आफ्रिकेतील चितांगो नदीत सापडणारा तो मासा होता. ‘सांगो’! त्याचा स्पर्श झाल्याबरोबर विजेच्या हजार वॅट शक्तीचा शॉक बसतो.
“मालीचा खून कुणी केला? तिचा तुमच्या चौकडीशी काय संबंध?” सुदर्शनचा चेहरा एकाएकी अत्यंत चिडका झाला होता. दया हा शब्द ह्या माणसाच्या कोषात आहे का नाही असेच त्या वेळी त्याच्याकडे पाहणाऱ्याला वाटले असते.
“माजगे, तुला एक संधी देतोय. सांग.”
“नाही…” माजगे त्याही स्थितीत दातात ओठ दाबून शांत होता.
पाण्यात सोडलेला मासा सुदर्शनने पुन्हा लाकडी चिमट्यात पकडला. तसाच माजगेच्या मानेवर दाबला. दातावर दात दाबून माजगेने किंकाळी दाबली. ओठ घट्ट आवळले. त्याच्या बांधलेल्या हातांच्या मुठी गच्च आवळल्या गेल्या.
पण एक मिनिटभरसुद्धा तो टिकाव धरू शकला नाही. त्याचे एकमेकांवर दाबलेले दात थडथडले आणि एक जीवघेणी किंकाळी त्याच्या तोंडातून कधी बाहेर पडली हे त्यालाही समजले नाही. सुदर्शनने परत मासा बाजूला घेतला.
“माजगे…”
“नाही…” आता माजगे कधीही बेशुद्ध पडेल असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
आता सुदर्शनच्या मनातली दया नावाची चीज पूर्णपणे संपली होती. त्याने मासा सरळ माजगेच्या तोंडावर दाबला. क्षणभर माजगेला काय झाले हेच समजले नाही. गालाच्या स्नायूतून काही तरी सरसरत गेल्याचा त्याला भास झाला आणि नंतर सर्व चेहऱ्यात असंख्य सुया खुपसल्यासारखे वाटले. पाठोपाठ भयानक जीवघेण्या वेदनांचा लोळ सुरू झाला. दातावर दात आपटले. त्याचा सर्व चेहराच आता बदलला होता. डोळे पापण्यांतून बाहेर पडतायत असे वाटत होते. जीभ लोंबायच्या बेताला आली होती. शेवटची आरोळी तर काळीज फाडून गेली, आणि सुदर्शनने मासा बाजूला घतला.
दहा मिनिटे माजगेचे शरीर नुसतेच थरथरत होते. ओठ फाटून रक्ताचा एक ओघळ हनुवटीपर्यंत आला होता. माजगेने हळूवारपणे डोळे उघडले. वेदनांनी त्याचे डोके फुटायची वेळ आली होती…
त्याच वेळी सुदर्शनने मासा परत त्याच्या रोखाने नेला.
“नको, मी सांगतो,” माजगे धापा टाकत ओरडला.
“माली आमचं काम करते.”
“आमचं म्हणजे कुणाचं?”
“तीरखांचं.”
“तुमच्या चौकटीत कोण कोण आहेत?”
“राजसिंग, शंभू भोसले, बच्चन.”
“आणि तीरखां?”
“तो आमचा पुढारी.”
“मालीचा संबंध काय?”
“बातम्या आणायचं काम तिच्याकडे होतं. अचूक नकाशे, माहिती ती पुरवायची. नंतर दरोडे घालायचं, लुटायचं काम आम्ही करत होतो.”
“मालीचा खून कुणी केला?”
“भालूने. तो स्वतःला लंगडा भालू म्हणवून घेतो.”
“कशासाठी?”
“आमच्या लुटीत त्याला हिस्सा हवा होता निम्मा. त्याने तीरखांला धमकी दिली होती फोनवरून. तीरखांने नकार दिला. भालूने पहिला बळी मालीचा घेतला.”
“हा भालू आहे तरी कोण?”
“काहीच कल्पना नाही. तो फक्त फोनवरून धमकी देतो. आजही मघाशी त्याने तीरखांला धमकी दिली होती.”
“तुम्ही आजवर किती दरोडे घातलेत?”
“किमान वीस.”
“वीस! मग पोलिसात रिपोर्ट कसे आले नाहीत?”
“आम्ही लुटला तो सर्व ब्लॅकचा पैसा.”
“छान! माजगे, आता तू काय करणार?”
माजगेला ह्या प्रश्नाचा वेगळाच वास आला. तो आश्चर्याने सुदर्शनकडे पाहू लागला.
“कारण मी आता तुझ्या त्या तीरखांला फोन करणार आहे, आणि नंतर तुला सोडणार आहे.”
“काय? नको!” अंगावर शहारे येऊन माजगे थरथरला. तीरखांला हे समजले असते तर त्याने माजगेला जिवंत सोडले नसते.
“वाटलं तर मला गोळी घाला, पण सोडू नका.”
““नाही माजगे, तसंच घडणार आहे. तुला तीच शिक्षा योग्य आहे.”
“नको…” घाबरून माजगे ओरडला.
“अनिल, याला सोडून परत ये.”
“माझ्यावर दया करा.”
“माजगे, तुझ्यावर दया करु? इतक्यांना तू लुबाडलंस, कत्तली केल्यास. तुला असंच मरण यायला हवं.”
आणि डॉ० माजगे, तो दगडासारखा माणूस, भीतीने ढसाढसा रडायला लागला.
“अनिल, याला तळघरात फेकू.” सुदर्शन आणि अनिलने माजगेला उचलून घेतले तेव्हा काचेच्या भांड्यातला तो विचित्र मासा अजयने उचलला होता.
त्रिकूट आता मार्गावर होते.
