Skip to content

४: पोलिसांचे चॅलेंज

त्रिकूट शांत होते. कोणतीही शक्यता-अशक्यता त्यांच्या डोळ्यांसमोर येत नव्हती.

“सुदर्शन, तुला काय वाटतं?” अनिलने समोरचे इनलँड निरखून पाहत विचारले.

“वाटणं सोड. मुद्दा न् मुद्दा पायापासून तयार करत वर जावं लागेल.”

“हो. आधी त्या पोरीची चौकशी करायला हवी.”

“नाही, नुसती चौकशी नाही. अजय, एकेक भाग आपण वाटून घ्यायला हवा.”

“सुदर्शन, हेच चुकतेय तुझं. तिघांनी एकत्र हालचाली केल्या, तर धोका सोसता येईल. वेगळे वेगळे फिरत राहिलो तर कोण कुठे संपेल सांगता येणार नाही.”

“का? तू घाबरलायस?”

“हो! ह्या प्रकरणाची सुरुवातच अंधारातून झालीय. सुदर्शन, तू काही मांत्रिक नाहीस की डोळे मिटल्यावर सर्व पुढे उभं राहील! चाचपडण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा तिघं एकत्र राहून काम करू या.”

“वेळ जाईल.”

“गेला तर बिघडलं कुठे? आज सुटणारं कोडं उद्या सुटेल.”

“छान! मी माझा प्लॅन रद्द करतो तर मग.”

“वैतागू नकोस!”

“ह्यात वैताग कसला? अनिल, तू काहीतरी सुचव.”

“आपलं तर डोकंच काम करत नाही.”

त्याच वेळी दार उघडले गेले आणि इन्स्पे० ज्योतिप्रसाद आत आला.

“मग अनासिन घे एक डझन!” असं अनिलला सुचवून समोरच्या कोचावर बसत त्याने शर्टचे वरचे बटण काढले आणि आवळलेली टाय सैल केली.

***

“ज्योती! आज इकडे कसा रस्ता चुकलास?” दोन प्रकरणांत खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळे त्रिकूट आणि ज्योतिप्रसाद यांच्यात दुरावा उरला नव्हता. आता सगळा अरे-जारेचा कारभार सुरू झाला होता.

“सुदर्शन, सकाळपासून एका नव्या प्रकरणानं डोकं खाल्लंय. साला, ह्या पोरी नसते उद्योग करतात आणि पोलीस खात्याची तारांबळ उडवतात.”

“कोण?”

“आहे एक… मालिनी पानसे नावाची पोरगी!”

“काय?!” एकाच वेळी तिघेही ओरडले. अजून अर्धा ताससुद्धा झाला नव्हता हे प्रकरण त्यांच्या हातात येऊन, आणि त्या प्रकरणातील एक सनसनाटी धागा आपणहून त्यांच्यासमोर उलगडायला लागला होता.

“का? आश्चर्य कसलं वाटलं तुम्हांला इतकं? अगदी कोरसमध्ये तिघे किंचाळताय?”

“हे वाच!” सुदर्शनने इनलॅन्ड त्याच्या पुढे केले.

त्या दोनच ओळी वाचून ज्योतिप्रसाद हादरला. आता तो समोर बसलेल्या त्या अजब त्रिकूटाकडे पाहू लागला. ज्या कामासाठी तो सुदर्शनची काही मदत मिळेल ह्या आशेने आला होता, त्या संदर्भातच इथे हे त्रिकूट त्याच्या आधीच डाव मांडून बसले होते.

***

“सुदर्शन, ह्या प्रकरणाची सुरुवात चमत्कारिक झाली.” ज्योतिप्रसाद भावना गुंडाळून मुद्याकडे वळला. त्याने भडाभडा त्याला असलेली माहिती सांगायला सुरुवात केली.

“ज्योती, जरा दम खा. गडबड करू नकोस. इथं तुझ्यामागे वाघ लागला नाही,” सुदर्शन म्हणाला, आणि स्वतःच्या फटफटीइतकाच वेगात बोलणारा इन्स्पे० ज्योतिप्रसाद गपकन थांबला.

पुढचा अर्धा तास मात्र तो एकटाच बोलत होता आणि त्रिकूट शांतपणे ऐकत होते. ती संपूर्ण कथाच इतकी विलक्षण होती की मधे बोलायचे धाडस एकातही नव्हते. सर्व सांगून झाल्यावर इन्स्पे० ज्योतिप्रसादने त्याला पडलेले प्रश्न विचारायला सुरुवात केली.

“आता तू बोल, सुदर्शन. हे पत्र तुझ्याकडे कसं आलं?”

“मालीचा काका इथे आला होता. ही केस त्याने माझ्या गळ्यात मारली. अजून सुरुवातीलाच चाचपडतोय सर्व, पण तुझ्या केसमुळे आता जरा प्रकाश दिसायला लागलाय.”

“तुझा काय अंदाज आहे?”

“खरं सांगू ज्योती, माझा गोंधळ उडालाय ह्या प्रकरणात. कारण सुरुवात कशी करायची हेच समजत नाही.”

“माझीही तीच अवस्था झालीय. आता हेच पाहा. ती तरुणी - माली नावाची.” टेबलावरचा कागद समोर ओढून त्यावर फुली मारत ज्योतीने ह्या प्रकरणाचा आराखडा उतरवायला सुरुवात केली.

“ती राहते पेडर रोडवर. दुपारी तिला कुणाचातरी फोन आला. फोन कुणाचा जरी असला तरी एक गोष्ट स्पष्ट आहे - ती बोलताना कमालीची घाबरली होती. त्यानंतर अर्ध्या तासाने तिने हॉस्टेल सोडलं. असं धरू की ती पाचला बाहेर पडली.

“मी तिची पर्स तपासली. आत मेट्रोच्या दुसऱ्या शोचं तिकीट होतं. अर्थ स्पष्ट होतो - नऊपर्यंत ती थिएटरवर होती.”

“आता प्रश्न हा… ती थिएटरवर का होती? ती घाबरली असं गृहीत धरलं तर ती सिनेमा पाहत बसली होती हा प्रकार जरा विसंगत वाटतो.” अनिल म्हणाला.

“माझा अंदाज आहे, तिला नऊपर्यंत वेळ काढायचा होता,” ज्योती म्हणाला. “त्यानंतर ती दादरला आली. ते तिकीटसुद्धा तिच्या पर्समध्ये मिळालं. व्ही० टी० ते दादरपर्यंतचा प्रवास तिने लोकलने केला. बहुधा गर्दीत ती टी० सी० ला तिकीट न देता बाहेर पडली असावी. नंतर चालत ती कुणाला तरी भेटायला निघाली असणार. कोणाला, हे समजायला हवं,” दुसरी फुली मारत ज्योतिप्रसादने त्यांच्याकडे पाहिले.

“इथे मधे तिचा खून झाला. सुदर्शन, खून कसा झाला हे तू उद्या प्रत्यक्षच पहा. डॉक्टर मिरचंदानीना तू ओळखतोस. या माणसाने किमान हजार खुनांची अचूक स्टेटमेंट्स सादर केली असतील कोर्टात. पण या खुनाच्या प्रकरानी तेसुद्धा आश्चर्यात पडलेत. इतका तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा ह्या खुनाने गडबडलाय.”

“खून झाला तरी कोणत्या हत्याराने?” सुदर्शन प्रथमच प्रश्न विचारत होता.

“तीही आश्चर्याची बाब आहे. सुरा वापरलाय. विचित्र सुरा.”

“विचित्र?”

“हो. कुकरीपासून बूमरँगपर्यंत अनेक सुरे मी पाहिलेत, पण असा सुरा नाही पहिला,” असे म्हणत ज्योतिप्रसादने कोटाच्या खिशातून कागदात गुंडाळलेले एक लांबुडके पुडके काढून टेबलावर ठेवले. सुदर्शनने कागद उलगडला तर आतमध्ये तोच विचित्र सुरा होता. सुदर्शनइतकेच अनिल आणि अजयही आश्चर्याने त्या सुऱ्याकडे पाहू लागले.

“सुदर्शन, खरा प्रकार अजून बाकी आहे. ह्या मालीच्या पर्समध्ये दोन शंभराच्या नोटांची बंडले मिळाली. इतकी मोठी रक्कम तिच्या जवळ कशी हे एक कोडं आहे. ती कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी आणि अशी रक्कम तिच्या जवळ कशी हा प्रश्न महत्त्वाचा आहे.”

“तू चौकशी केलीस? दरोड्याचा तर प्रकार नाही?”

“काही सांगता येत नाही. मी उद्या सर्व बँकांना नोटांचे नंबर कळवणार आहे.”

“ही तरुणी दादरमध्ये का होती याचा तपास केलास? मला त्याबद्दल वेगळाच वास येतो आहे. ती जर घाबरली होती, तर ती दादरमध्ये कुणाच्या तरी आश्रयाला आली असणार.”

“शक्य आहे.”

“ज्योती, तू उद्या एक काम कर. तिच्या गेल्या महिन्यातल्या हालचालींची मिळवता येईल तितकी माहिती मिळव. कदाचित एखादा नवा दुवा मिळेल.”