Skip to content

२: भीतीचे सावट

पेडर रोडवर मुलींचे एक अलिशान हॉस्टेल होते. ‘सोफिया’ हे नाव मुंबईत दोन कारणासाठी प्रसिद्ध होते - एक ‘सोफिया’ कॉलेज आणि दुसरे त्याला जोडलेलं ‘सोफिया’ होस्टेल. अर्थात ह्या दोन्ही संस्था फक्त तरुणींच्या पुरत्याच मर्यादित होत्या. इतरांना इथे मज्जाव होता. बाहेरच्या गुरख्याच्या हातातला दंडुका पाहूनच गेटमधून आत शिरताना चार वेळा विचार करावा लागत असे. ‘सोफिया’ होतेही तसेच! श्रीमंत तरुणींचेच ते कॉलेज म्हणावे लागेल. उंची कपड्यातल्या आणि शानदार कारमधून फिरणाऱ्या बड्यांच्या मुलींचे हे कॉलेज, आणि तीच बाब होस्टेलची. महिना पाचशे रुपये उडवणाऱ्या मुली या होस्टेलवर राहत होत्या.

एक मुलगी मात्र… जी इतर मुलींच्यासारखीच रुबाबात, भपक्यात राहत होती; छानछोकीत वावरत होती; उंची कपड्यात फिरत होती - मालिनी पानसे तिचे नाव. फार तर एकवीस वर्षांची तरुणी. बांधा सुबक, नजरेत भरावा असा. चेहरा हसरा, बोलका, आणि गालावर खळी ही मालीला मिळालेली अशी देणगी होती, की पाहणाऱ्याला वाटावे, तिच्या गालाची खळीच पाहत बसावे. जिच्या तारुण्याने सर्व प्रकारे पूर्ण रूप घेतले असावे अशी ती तरुणी होती. इतर तरुणी तिच्या त्या रूपाचा तिरस्कार करत. लाखात उठून दिसेल अशी मालीची रूपसंपदा होती.

मालीने कॉलेज कधीच चुकवले नाही - एम० ए०च्या फर्स्ट पार्टला ती होती. पण ती अतिशय खटपटी. नाना उद्योग करायची. ‘सोफिया’सारख्या महागड्या होस्टेलमध्ये ती राहत होती हेच त्यामागचे कारण होते. अशा जगण्यासाठी तिला अनेक धंदे करावे लागत होते. कधी लेख लिहून पैसे मिळव, पेटिंग्ज तयार करून प्रदर्शनात भाग घे, आणि बसल्या बसल्या सुबक विणकाम करून त्याच्यावर चार पैसे गाठीला मार, अशा अनेक धडपडी ही माली पैसे मिळविण्यासाठी करायची.

पण दोन महिन्यांपूर्वी का कोण जाणे, पण मालीत आमूलाग्र बदल झाला. पूर्वीची खटपटी माली जशी काही संपून गेली. आता ती पूर्वीसारखे कष्ट करत नव्हती. पूर्वीसारखा अभ्यासही ती आता करत नव्हती. कॉलेज सुटल्याबरोबर न रेंगाळता बाहेर पडत होती.

त्या दिवशीसुद्धा कॉलेज संपल्यावर ती दमून होस्टेलवर खोलीत येऊन पडली. पाच वाजून गेले होते. रात्रभर तिने जाग्रण केले होते. कधी एकदा जेवून झोपतेय असे तिला झाले होते, आणि त्याच वेळी रूमच्या दारावरची बेल वाजली. ‘काय कटकट आहे,’ असा चेहरा करून तिने दार उघडले, तर बाहेर होस्टेलची मोलकरीण उभी होती.

“मालीबाई, तुमचा फोन आलाय. बड्या बाईंनी निरोप द्यायला सांगितला.”

माली गडबडीने रूम लॉक करून निघाली. ती वॉर्डनच्या ऑफिसात आली तेव्हा वॉर्डन मिसेस बारुआ तिचीच वाट पाहत होत्या. समोर टेबलावर रीसिव्हर ठेवला होता होल्ड करून. तिने रीसिव्हर उचलून कानाला लावला.

“येस, माली स्पीकिंग.”

“पानसे, मी बोलतोय.” पलीकडून गंभीर धारदार आवाज आला.

“कोण बोलतंय?” मालीला तो आवाज अपरिचित होता.

“नाव विचारू नकोस, माली. नीट ऐक. तुझ्याकडे तीन अस्सल पाणीदार मोती आणि आठ लाख रुपयांच्या शंभराच्या नोटा आहेत.” माली क्षणभर दचकली.

“असं कोण म्हणतंय?”

“मीच. माली, ती रक्कम आणि मोती तूच कुठेतरी ठेवले आहेस, हे मला पूर्ण माहीत आहे.”

पलीकडून ठाम आवाज आला आणि माली हादरली - ह्या माणसाला आपल्याजवळच्या पैशांबद्दल माहीत कसे झाले? समोर बसलेली वॉर्डन आता तिच्याकडे संशयाने पाहायला लागली होती. जरी तिला मराठी समजत नव्हते तरी मालीला जास्त बोलता येणार नव्हते. चुकून जरी एखादा शब्द निसटला तरी आजपर्यंत गुप्त राखलेल्या योजनेवर पाणी पडणार होते.

“तू कोण बोलतोयस?” तिने हलक्या आवाजात विचारले.

“ते तुला समजणार नाही. तुला मरायचं नसेल, तर मी सांगतो तसे कर.”

“तू कोण बोलतोयस हे कळेपर्यंत मी काहीच ऐकायला तयार नाही.”

“माली, तुला स्वतःच्या हाताने मृत्यू ओढवून घ्यायचाय तर…”

“माझ्याकडे पैसे नाहीत. तुझ्या डोक्यात कोणीतरी भरवलेले दिसते.”

“माझी बातमी खोटी नाही. शेवटचे ऐक. उद्या दुपारी तीन वाजता निळा सूट घातलेला माझा एक माणूस ब्रॉडवे थिएटरच्या बाहेर उभा असेल. सर्व रक्कम असलेली अ‍ॅटॅची त्याच्याजवळ तीनपर्यंत पोचायला हवी.”

“माझ्याकडे ती रक्कम नाही.”

“नाही? तर मग ऐक. माली, तुला आता कोणतीही शक्ती वाचवू शकणार नाही.” ह्या कठोर शब्दांबरोबर पलीकडून फोन कट केल्याचा आवाज झाला.

कितीतरी वेळ रीसिव्हर तसाच कानाला लावून माली पुतळ्यासारखी उभी होती. भीतीने थरथरत होती आणि तिचे सर्वांग घामाने ओले झाले होते.

“व्हॉट हॅपन्ड, माली?” वॉर्डनने घाबरून विचारले तेव्हा कुठे माली भानावर आली. ती झटपट सावरली.

“माझे अंकल सिरीयस आहेत. त्यांना अ‍ॅक्सिडेन्ट झालाय,” तिने सफाईने सारवासारव केली. “मॅडम, मला पाच-सहा दिवसांसाठी घरी जायचंय.”

“सर्टनली! तू कधीही जाऊ शकतेस.”

**

माली वॉर्डनच्या ऑफिसातून बाहेर पडली आणि धावत खोलीत आली. एका बास्केटमध्ये तिने दोन साड्या घातल्या. उशीचा अभ्रा काढला, आणि आत असलेली शंभराच्या नोटांची दोन बंडले गादीवर पडली. दोन्ही बंडले तिने पर्समध्ये ठेवली. अर्ध्या तासात तयार होऊन ती बाहेर पडली. ती अ‍ॅड० राजसिंहला फोनवरून सर्व सांगणार होती.

पुढच्या दहा मिनिटांत ती पेडर रोड नाक्यावर पोचली आणि तिची नजर टेलिफोन बूथ शोधू लागली. चौकातला तिचा सवयीचा सार्वजनिक बूथ नुकताच बॉम्बे टेलिफोन्सने हलवला होता. कलेक्शन घ्यायला येणाऱ्या सेंटरला सहा वेळा कॅशच्या डब्यात नाण्यांऐवजी दोन किलो वाळू मिळाली होती. काही चहाटळ मुलांनी त्या टेलिफोनची मोडीत वासलात लावली होती. शेवटी जवळच्याच इराण्याच्या हॉटेलात जेव्हा तिने फोनसाठी पाय ठेवला, तेव्हा आपल्यावर कुणीतरी नजर तर ठेवून नाही? अशी शंका तिच्या मनाला चाटून गेली.

घाईघाईने तिने डायल फिरवला. एक महत्त्वाचा नियम ती मोडत होती. कुणीही कुणाला फोन करायचा नाही असा त्यांच्यात एक अलिखित करार होता, पण आज तिचा नाईलाज होता. तिने नंबर फिरवला - टू, सेवन, थ्री, झिरो. उतावीळपणे ती दोन मिनिटे थांबली, पण पलीकडे रीसिव्हर उचलला जात नव्हता. ती फोन ठेवणार, तेवढ्यात पलीकडून तो उचलल्याचा आवाज आला.

“हॅलो, राजसिंह? मी माली बोलतेय.”

“काय झालं, माली?” पलीकडून तिला हवा तो आवाज आला. निम्मे ओझे कमी झाले तिच्या मनावरचे!

“राजसिंह, मला अर्ध्या तासापूर्वी फोन एक आला होता.”

“कुणाचा?”

“कुणीतरी अज्ञात बोलत होता. राजसिंह, त्याला आपल्या ऑपरेशनचा पत्ता लागलाय.”

“काय?” राजसिंह आश्चर्याने ओरडलाच.

“होय. तो आठ लाखांची मागणी करत होता. शिवाय तीन मोतीसुद्धा त्याने मागितले.”

“अशक्य!”

“राजसिंह, मूर्खासारखा ओरडू नकोस,” ती अगदी हळू आवाजात बोलली.

“माली, तू कुठून बोलते आहेस?”

“पेडर रोड नाक्यासमोरच्या इराण्याच्या हॉटेलातून.”

“मी लगेच तिथे येतो.”

“नाही, राज… माझ्यावर नजर आहे. तू इथं येणं धोक्याचं आहे.”

“माली, उद्या तोच धोका माझ्यासमोर उभा राहणार आहे.”

“पण उद्या! आज नाही. मी माझं पाहून घेते, तू फक्त नऊच्या सुमाराला दादरच्या ब्लॉकबाहेर माझ्या संरक्षणाची व्यवस्था कर. पुढच्या पाच-सहा दिवसांसाठी मला हॉस्टेल सोडावं लागणार आहे,” एका दमात तिने सर्व भडभड ओकून टाकली. आता ती कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार होती.

“करतो. नऊला बच्चन तिथे हजर होईल.”

“ठीक. आणि राज, तू सावध राहा.”

“तू तुझी काळजी घे,” राजचा आवाज काळजीने ग्रासला होता.

तिने जास्त न बोलता रीसिव्हर क्रेडलवर ठेवला. अगदी सावकाश! मग वळून पन्नास पैशांचे नाणे काचेच्या काउंटरवर उडवून ती बाहेर पडली.

आता ती कमालीची सावध होती. पर्सच्या आतल्या कप्प्यात तिने लहान, पंजात मावणारे पिस्तूल तयार ठेवले. त्याच्या नळीवर आधीच सायलेन्सर बसवून ठेवले. पुढची योजना तिने करून ठेवली होती - नऊपर्यंत बाहेरच वेळ काढून त्यानंतर ती दादरच्या ब्लॉकवर जाणार होती. हा तीन खोल्यांचा ब्लॉक दोन महिन्यापूर्वी राजसिंहने तिला घेऊन दिला होता.

धोका कोणत्या दिशेन येईल हे तिला माहीत नव्हते. टॅक्सीला हात करतानासुद्धा तिने सावधगिरी बाळगून आत आधीच कुणी बसले नाही याची खात्री केली. दहा मिनिटांत टॅक्सी मेट्रोसमोर येऊन पोचली. नऊ वाजेपर्यंत वेळ काढण्यासाठी पिक्चरशिवाय योग्य मार्ग तिच्यासमोर नव्हता. मेट्रो बाहेरच्या मोबाईल लंच व्हॅनमधून दोन घास तिने पोटात घातले. सकाळी ब्रेकफास्टसाठी सहा सँडविचेसचे पार्सल करून घेतले, आणि तिकीट काढून ती थिएटरमध्ये शिरली. इतकी सावध ती कधीही राहिली नव्हती, आणि तरी आपल्यावर कुणाचीतरी नजर आहे असे तिला थिएटरमध्येसुद्धा वाटत राहिले. एकाच गोष्टीचे समाधान होते - तिच्या अंदाजाप्रमाणे तीन तास तरी तिला धोका नव्हता. इतक्या गर्दीत, सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता कमीच होती.

पिक्चर संपला. शेजारच्या इराण्याच्या हॉटेलातून तिने सहा ग्लास कॉफी घेतली. आता रात्री बारापर्यंत तरी तिला झोप लागणार नव्हती. आता ती विचार करू लागली - टॅक्सीने प्रवास टाळावा लागणार. रात्रीची वेळ होती. दादरपर्यंत कधीही कसाही तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती. धोका कुठून येतोय हे जोपर्यंत माहीत नाही, प्रत्यक्ष दिसत नाही, तोपर्यंत तिला जपून वागणं भागच होतं.

घाईघाईत ती व्ही० टी० ला आली. तिथेही गर्दीत कुणी तिच्यावर हल्ला करण्याची शक्यता नव्हती. दादरला उतरली तेव्हा दहा वाजून वीस मिनिटं झाली होती. टॅक्सी करायचा विचार तिने परत टाळला, आणि चालतच ती ब्लॉकच्या रोखाने निघाली. रहदारीच्या रस्त्यावरून पुढे क्रॉस लेनला वळसा घालून ती आडव्या गल्लीत शिरली. समोरच एक तरुण चालत होता. त्याला हाक मारावी, निदान ब्लॉकपर्यंत त्याची सोबत मिळेल, असा विचार तिच्या मनात येऊन गेला.

आपल्याला धोका झाला तर ह्याच बोळात होईल, असे तिचे मन वारंवार बजावत होते. जणू सहजच तिने थर्मास डाव्या खांद्याला लटकावला, चौकोनी बास्केटही डाव्याच हातात घेतली. डाव्या काखेत हातातली पर्स अडकवली आणि पर्समधले रिव्हॉल्वर उजव्या हाताच्या पंज्यात तयार ठेवले.

मागे कसलीतरी सरसर झाली. घाबरून तिने मागे मान वळवली. एक सायकल-स्वार मागून येत होता. भीती मनात दाबून तिने पावलं उचलायला सुरुवात केली. सायकल आता जवळ आली होती - अवघी पाच फुटांवर.

त्याच वेळी… तिच्या पाठीत वेदनांचा डोंब उसळला! डाव्या बाजूला. वेदनांनी ती कळवळली. जोरात किंचाळली.

ट्रिगरवरचे तिचे बोट दाबले जाऊन ‘फट’ असा आवाज झाला, आणि त्यापाठोपाठच तिच्या पाठीत परत खसकन काहीतरी शिरले. पुन्हा तिने किंकाळी फोडली, आणि भेलकांडून तोंडावर आपटली. आणि रिव्हॉल्व्हरमधून दुसरी गोळी सुटली, आणि त्याबरोबरच तिच्या हातातले रिव्हॉल्वर उडून दूर जाऊन पडले.

पुढचा तरुण घाबरून उभा असलेला तिने पाहिला. तिची तडफड होत होती आणि पाठीत भयानक वेदना होत होत्या. चाचपडत तिने हात मागे नेला. तो सुरा होता!

अजून एक जीवघेणी कळ उसळली आणि माली संपली. तडफडत, तळमळत संपली!