३: तपासाची नवी दिशा
इन्स्पे० ज्योतिप्रसाद आज अगदी थक्क झाला होता. आठ वर्षांच्या सर्व्हिसमध्ये त्याने अनेक खुनांचे प्रकार पाहिले होते, सोडवले होते, पण काल त्याने पाहिलेला खून अगदीच अजब प्रकारचा होता. ज्या हत्यारांनी खून झाला ते दोन्ही सुरे आता त्याच्यासमोर टेबलावर पडले होते. त्यांचा आकार फारच चमत्कारिक होता. साधारण सुरे पुढच्या बाजूला चपटे आणि निमुळते होत जाऊन अगदी पुढे टोकदार असतात. हे सुरे रचनेने वेगळे होते. त्यांचा पुढचा भाग लाकडाला भोक पाडायच्या गिरमिटासारखा त्रिकोणी होता आणि त्याच्या तिन्ही बाजूंना धार होती. मागे चपटा होत होत त्याचा आकार निमुळता बनला होता. सकाळी ऑफिसात आल्यापासून गेल्या वीस वर्षांतल्या सुरे फेकणाऱ्या खुन्यांचे रेकॉर्डस् त्याने तपासले होते, पण ह्या प्रकारचे सुरे वापरणारा एकही खुनी रेकॉर्डमध्ये नव्हता.
इन्स्पे० ज्योतिप्रसाद गोंधळला होता. त्या तरुणीच्या जखमा तपासण्यात आल्या होत्या. सकाळी येतानाच सायन हॉस्पिटलला थांबून त्याने डॉक्टरांचा रिपोर्ट ऐकला होता. डॉक्टर मिरचंदानी खून-खटल्यात अगदी तज्ज्ञ मानले जात, आणि तरीही ज्योतिप्रसाद त्यांचा रिपोर्ट वाचताना साशंक झाला होता.
“डॉक्टर, या खुनाबद्दल तुम्हांला काय वाटतं?” इन्स्पे ज्योतिप्रसादने न राहवून विचारले.
“इन्स्पेक्टर, मी अनेक खून पाहिलेत, पण ही सुरा फेकण्याची पद्धतच विलक्षण आहे. अगदी असं समजा, की सुरा बंदुकीतून फेकला, तरीही तो असा शिरणार नाही. ही फेक अगदीच निराळी आहे.
“आता हेच पाहा - मृत स्त्रीच्या जखमेचे व्रण,” टेबलावर पडलेल्या कागदावर डॉक्टरांनी दोन्ही जखमांची जमतील तशी रेखाचित्रे काढली होती.
“हा सुरा दोन मणक्यांना छेदून आत घुसलाय. कितीही ताकदीने आत सारला तरी अशी जखम होणार नाही. आणि हा दुसरा सुरा खालून वर आलाय, आणि सरळ हृदयच बर्स्ट झालंय. दुसर्या सुऱ्याच्या घावानेच ती मेलीय.”
“मी मानतो. पण मग तुमचं मत तरी काय?” ज्योतिप्रसादला दिसत होतं की डॉक्टर ह्यापेक्षा जास्त माहिती देऊ शकणार नाहीत.
“वेगवेगळ्या प्रकारच्या आघातांचा मी अभ्यास केलाय. समजा, ह्या ठिकाणी सुरा नसता, तर ज्या ताकदीने हे आघात केले गेले आहेत, ते पायाने किंवा लाथेने केले आहेत असं कोणत्याही डॉक्टरने रिपोर्टमधे नमूद केलं असतं.”
“पायाने?” इन्स्पे० ज्योतिप्रसाद थक्क झाला.
“ज्या प्रकाराने हे फटके बसलेत ते आघात पायानेच होणं शक्य आहे.”
“तशा खुणा सापडल्या?”
“हो, पण इथेही गोंधळ उडालाय. कारण अशा प्रकारचा बूट अस्तित्वात असेल असं मला तरी वाटत नाही.”
“कोणत्या प्रकारचा?” इन्स्पे० ज्योतिप्रसादने न राहवून विचारले.
“लोखंडी! कोणत्यातरी अतिशय कठीण अशा धातूचा बूट असावा.”
आता टेबलावरच्या सुऱ्यांकडे बघत ज्योतिप्रसाद विचार करत होता. भर रस्त्यावर हा खून झाला. त्याच सुमारास तिथे हजर असलेला तरुणही पोलिसांच्या हातात सापडला, पण खुन्याला कुणाही पकडले नाही. त्या तरुणीच्या हातातील सर्व वस्तू आता त्याच्या टेबलावर हजर करण्यात आल्या होत्या. एक पर्स, एक थर्मास आणि एक चौकोनी बास्केट. बास्केटमधे दोन साड्या, दोन घडी केलेले ब्लाऊज आणि एक टॉवेल, एक टॉयलेट सेट आणि एक मेकअपची पेटी. ह्यांत विशेष असे काही नव्हते.
पण मग ज्योतिप्रसादने पर्सच्या दोन्ही कप्प्यांची चेन ओढली आणि सरळ पर्स उलटी केली, आणि तो आश्चर्याने पाहतच राहिला! शंभराच्या नोटांची दोन बंडले होती. इतकी मोठी रक्कम ह्या तरुणीजवळ कशी? वीस हजार ही काही लहानसहान रक्कम नव्हती, आणि सहज फिरायला बाहेर पडलेल्या तरुणीजवळ तर नाहीच नाही. पर्समधील इतर सामानात एक किल्ली होती. बहुधा ती राहत असलेल्या जागेची असावी. त्याची नजर त्या सामानात असलेल्या आयडेंटिटी कार्डवर पडली. डाव्या बाजूला त्या तरुणीचा फोटो होता. खाली नाव होते - ‘मालिनी पानसे’. कॉलेजचे कार्ड होते ते आणि त्यावर होस्टेलचा पत्ता होता!
आता हे खून प्रकरण वेगळाच रंग घेत होते. पेडर रोडवर असलेल्या सोफिया कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी. तथेच होस्टेलवर राहणारी. इतक्या रात्रीच्या वेळी ती दादरला काय करत असावी?
त्याच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती - हे प्रकरण फक्त खुनापुरते मर्यादित नसणार. भराभर त्याने टेबलावर पसरलेल्या सर्व वस्तू कपाटात टाकल्या आणि तो निघाला.
तासाभरात तो सोफिया कॉलेजच्या होस्टेलच्या वॉर्डनसमोर खुर्चीवर बसला होता, आणि एका पोलीस इन्स्पेक्टरला पाहूनच वॉर्डन मिसेस बारुआ हादरली होती.
“आपल्याला काय हवंय?” तिने भीत भीत विचारले.
“हा फोटो ओळखता?” आय कार्डातील फोटो वार्डनसमोर धरत त्याने विचारले.
“हो! माली पानसे.”
“सध्या होस्टेलवर आहे?”
“छे. ती कालच परगावी गेलीय.”
“कुठे?”
“पण इन्स्पेक्टर, तुम्ही हे का विचारताय?”
“कारण तुमच्या ह्या मालिनी पानसेचा काल रात्री दादर भागात खून झालाय.”
“काय? खून?” घाबरून वॉर्डन डोळे फाडून इन्स्पे० ज्योतिप्रसादकडे पाहतच राहिली. तिचा त्या बातमीवर विश्वास बसेना.
“हे पाहा बाई, गेल्या दोन-तीन दिवसांत तिला कुणी भेटायला आलं होतं?”
“नाही. मात्र काल दुपारी तिला फोन आला होता.”
“कुणाचा?”
“काही कल्पना नाही. मात्र फोनवर तिला जबरदस्त धक्का देणारी बातमी मिळाली असावी. कारण फोनवर बोलताना ती बरीच घाबरली होती.”
“मला तिची खोली तपासायची आहे.”
“नाही. त्यासाठी तुम्हांला प्रिन्सिपॉलच्या परवानगी घ्यावी लागेल.” घाबरून बारुआ उभी राहिली.
थोड्या संभाषणानंतर इथे ह्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला मिळणार नाही हे इन्स्पे० ज्योतिप्रसादला समजले होते, आणि खोली त्याला नंतर कधीही तपासता येणार होती. शिवाय काल रात्री घटनास्थळी हजर असलेल्या तरुणाची साक्ष अजून बाकी होती. तो सी० आय० डी० ऑफिसात पोचला तेव्हा दोन हवालदार त्या तरुणाला घेऊन हजर होते.
“बसा,” ज्योतिप्रसाद त्याच्याकडे एकटक बघत म्हणाला. तो तरुण त्याची वेधक नजर पाहूनच अर्धा गारद झाला होता.
“हे बघ, घाबरू नकोस. मी तुला फासावर चढवत नाहीय. जितक्या शांतपणे प्रश्नांची उत्तरे देशील तितकी लवकर तुझी सुटका होईल,” त्याला दिलासा देण्यासाठी आणि त्याच्या मनातला भीतीचा पगडा दूर करण्यासाठी तो सहानुभूतीने म्हणाला.
“खरंच सांगतो साहेब, मला काहीच माहिती नाही. पुढे चालत होतो मी. तिची किंकाळी ऐकली तेव्हाच मी गर्रकन वळलो.”
“तू कुणाला पाहिलंस का?”
“हो, कुणीतरी सायकलस्वार मागून येत होता.”
“किती अंतरावरून?”
“अगदी तिच्या मागेच होता.”
“तो थांबला होता का?”
“नाही, पण तिची किंकाळी ऐकून तो धडपडला होता.”
“नंतर काय झालं?”
“पुन्हा तिने किंचाळी फोडली आणि तो पुन्हा धडपडला. साहेब, तिच्या हातात काहीतरी होतं. त्याचा दोनदा ‘फट’ आवाज झाला.”
“सायलेन्सर!” इन्स्पे० ज्योतिप्रसाद स्वतःशीच पुटपुटला. तिच्या सामानात त्याला रिव्हॉल्व्हर सापडले नव्हते. ही एक नवी माहिती होती. शिवाय रात्री जव्हा तो खुनाच्या जागेवर पोचला तेव्हा तसा कोणी सायकलस्वार त्याला दिसला नव्हता.
“अभ्यंकर, तो सायकलवर बसलेला माणूस गेला कुठे?”
“तो घाईघाईत निघून गेला. कुठे माहीत नाही.”
ह्या तरुणाला अडवून काहीही फायदा नव्हता. ज्योतिप्रसादच्या डोळ्यांसमोर आता फक्त तो अज्ञात सायकलस्वार दिसत होता. तो कोण होता आणि खून झाल्यावर तो तिथे न थांबता का पळून गेला या एकाच विचाराभोवती इन्स्पे० ज्योतिप्रसादचे मन फेऱ्या घालत होते.
***
दुपारी दोनची वेळ होती आणि फोर्टमधील सुप्रीम एजन्सी या प्रसिद्ध दुकानाच्या दारात एक लंगडा तरुण घोटाळत होता. त्याच्या अंगावर भारी सूट होता आणि डोक्यावर फेल्ट हॅट होती. ज्या काठीच्या आधाराने तो चालत होता, ती काठी मौल्यवान होती. मूठ जाड राजदंडासारखी चांदीच्या नक्षीदार कामाने शोभून दिसत होती. संपूर्ण काठीवर पातळ पिवळ्या पत्र्याचे आवरण होते आणि त्यावरही अप्रतिम नक्षी होती. हल्लीच्या जमान्यात तसली काठी मिळणेच काय, नुसती नजरेला पडणेसुद्धा दुर्मीळ होते. जाणारी-येणारी माणसे वळून वळून त्या लंगड्या तरुणाकडे पाहत होती, आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या काठीकडेच पाहणाऱ्याची नजर खिळून राहत होती.
कोटाच्या आतल्या बटणाजवळ सोनेरी साखळीला लोंबणाऱ्या घड्याळात त्याने पाहिले. तीन वाजत आले होते. तो सरळ पायऱ्या चढून काचेचे दार ढकलून आत शिरला आणि एका प्रशस्त हॉलमध्ये आला. हॉलच्या एका कोपऱ्यात ओळीने तीन केबिनी होत्या आणि त्यांच्याबाहेर असलेल्या पाट्यांवर सुबक अक्षरात नावे कोरलेली होती. पहिल्या पाटीवरचे नाव वाचून तो पुढे सरकला - ‘सुदर्शन मोहिते.’ त्याच्या पायाच्या ठेक्यात होणाऱ्या आवाजामुळे पाठमोरी बसलेली ऑपरेटर सॅली डिसा गरकन वळली.
“कोण हवंय?” डिसाने त्या चमत्कारिक माणसाकडे पाहून विचारले.
“सुदर्शन…”
“ते आज भेटणार नाहीत.”
“का?”
“एका केसच्या तपासासाठी ते पार्ल्याला गेलेत. उद्या सकाळशिवाय ते येणार नाहीत.”
“तुम्ही फोन करून चौकशी करा, किंवा मला नंबर द्या. मी बोलतो.” तो निर्वाणीच्या शब्दात बोलल्यासारखा बोलला, आणि डिसा त्याच्या युरोपियन उच्चाराने भारली.
“तुमचं… नाव?”
“शंकरदेव पानसे.”
“काय, तुम्ही महाराष्ट्रियन आहात?” आश्चर्याने डिसा उद्गारली.
“होतो. सध्या ईस्ट आफिकेत असतो.”
तिने नंबर जुळवला.
“बोल डिसा,” पलीकडून सुदर्शन बोलला.
“शंकरदेव पानसे नावाच्या कुणा ईस्ट आफ्रिकेहून आलेल्या गृहस्थांना आपली भेट हवीय.”
“त्यांना फोन दे.” डिसाने रीसिव्हर त्या लंगड्या गृहस्थासमोर धरला.
“हॅलो सुदर्शन, मीच शंकरदेव पानसे. मला तुमची भेट हवीय.”
“उद्या ऑफिसात या सकाळी.”
“नाही. सुदर्शन, माझ्यासमोर जीवनमरणाची वेळ उभी आहे आणि तुमची भेट घेतल्याशिवाय मला हलता येणार नाही.”
“मग तुम्हांला बराच वेळ वाट पाहत थांबावं लागू शकतं.”
“माझी तयारी आहे.”
**
दुपारी तीनला ऑफिसात आलेला तो लंगडा पानसे नऊ वाजले तरी तिथेच बसला होता. सॅली डिसा रोज सहालाच रस्ता धरायची, पण आज समोर फर्मचे गिऱ्हाईक बसले होते. मनातल्या मनात ती त्याच्या नावाने शिव्या मोजत होती.
नऊ वाजून गेले, आणि एक काळी रोल्स रॉइस भरारत येऊन थांबल्याचे पुढच्या काचेच्या दारातून दिसले. तिच्या पाठोपाठ अजून दोन गाड्या आल्या - एक फियाट, तर दुसरी टॅक्सी. तीन गाड्यांतून तिघे खाली उतरले, आणि दार उघडून ताडताड चालत आत आले. सर्वात शेवटचा सुदर्शन मोहिते होता.
**
“आपण शंकरदेव पानसे?”
“हो, मीच,” उभा राहत पानसे म्हणाला.
“या,” जास्त न बोलता सुदर्शन स्वतःच्या नावाची पाटी असलेले दार उघडून आत शिरला, आणि पानसे त्याच्यामागे गेला.
“बसा.” सुदर्शनने खुर्चीवर बसत एक बटण दाबले आणि एअरकंडिशनचा आवाज सुरू झाला. हे करत असतानाच त्याने अजूनही एक गुप्त बटण दाबले होते, जे इंटरकॉमचे होते. त्याद्वारे त्याच्या खोलीत चाललेले संभाषण शेजारच्या दोन केबिनींमध्ये ऐकू जाऊ शकणार होते. पानसेच्या नकळत अजय आणि अनिलदेखील ते संभाषण ऐकणार होते.
“हं, बोला पानसे, का आला होता?”
“मी कंपालात असतो. सध्या एका संकटात मी सापडलोय,” पानसेने सुरुवात केली आणि तो थांबला. आपल्या बोलण्याचा सुदर्शनच्या चेहऱ्यावर काय परिणाम होतोय हे त्याला पाहायचे होते.
“बोला, मी ऐकतोय.”
“सुदर्शन, मी मूळचा इथलाच, मुंबईतला. आम्ही तिघे भाऊ. दोघे खलास झाले. मी सर्वांत धाकटा. अजून ब्रम्हचारी आहे. असाच राहीन. सर्वांत थोरला - यज्ञदेव - नेव्हीत कॅप्टन होता. तो आठ वर्षापूर्वी वारला. त्याला एक मुलगी - मालिनी. तिच्या तपासासाठी मी मुंबईत आलोय.” शंकरदेवने सुरुवात केली.
“सापडली?”
“नाही. म्हणून तर धावत तुमच्या ऑफिसात आलोय.”
“ती कुठे असते?”
“सोफिया कॉलेजात. एम० ए० करतेय ती. पण आत्ता कॉलेजात नाहीय. दोन दिवसापूर्वी हॉस्टेल सोडून गेलीय. काल सकाळी मी चौकशी केली तेव्हा मला समजले.”
“नातेवाइकांकडे गेली असेल.”
“ते शक्य नाही. तिचा कोणीही नातेवाईक हयात नाही. वडील युद्धात खलास झाले. तिची आई तिला जन्म देतानाच वारली. दोन नंबरचा चुलता - माझा भाऊ, सोमदेव - खाणीत स्फोट झाला त्यात गाडला गेला. त्या वेळी त्यानं लग्नही केलं नव्हतं.”
“तुम्ही हॉस्टेलमधे चौकशी केलीत?”
“हो. परवा ती संध्याकाळी ‘काका आजारी आहे, त्याला अॅक्सिडेंट झालाय,’ असे सांगून बाहेर पडली. ह्याआधी ती अशी कधीही हॉस्टेल सोडून बाहेर पडली नव्हती. सुट्टीतसुद्धा ती हॉस्टेल सोडून जात नसे. होस्टेलवर राहण्यासाठी प्रिन्सिपलने तिला खास परवानगी दिली होती.
“आणि सुदर्शन, मी धावत तुमच्याकडे आलो त्याला कारण आहे. दहा दिवसांपूर्वी तिचं पत्र मिळालं मला. आपल्यावर फार मोठं संकट येणार आहे, असं तिने पत्रात लिहिलं होतं.”
“तुम्ही इथे येणार हे तिला माहीत होतं?”
“नाही. मी तिला पत्र लिहून तिथून निघालो, पण ते तिला वाचायलाच मिळालं नाही. ते तसंच होस्टेलच्या नोटीस बोर्डावर आहे लटकलेलं.”
“तुम्हांला आलेलं तिचं पत्र पाहू.”
पानसेने कोटाच्या खिशात हात घालून एक इनलँड बाहेर काढले. वर पानसेचा कंपालाचा पत्ता होता. मागे मुंबईचा शिक्का होता आणि सोफिया कॉलेजच्या होस्टेलचा पत्ता होता. आत दोनच ओळी होत्या, पण त्या दोन ओळींत फार मोठा अर्थ भरला होता. भीतीने पछाडलेली ती वाक्ये त्याला सर्व काही सांगून गेली. खरोखरच मालिनी मोठ्या संकटात सापडली होती. पत्राची घडी करून सुदर्शनने ती टेबलावर सारली आणि वर पेपरवेट ठेवला.
“बोला, पानसे. मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?”
“सुदर्शन, ते तर तुम्हीच ठरवू शकता. फक्त मला माझी पुतणी हवी आहे. समजा तिचं काही बरं-वाईट झाले असेल, तर ज्यांची तिला इतकी भीती वाटत होती त्यांना शोधून काढा. त्यांना शासन करा.” कठोर आवाजात पानसे बोलला.
“पानसे, ते नंतर पाहू. आधी या प्रकरणाची थोडी जास्त माहिती हवीय.”
“माहिती? आणि मी काय सांगणार? सुदर्शन तुमचा विश्वास बसणार नाही, पण सत्य हे आहे. माझी पुतणी काळी का गोरी हे सुद्धा मी पाहिलं नाहीय अजून!”
आश्चर्याने सुदर्शन पाहतच राहिला. हा माणूस खरे बोलतोय ह्यावर त्याचा विश्वास बसेना, मात्र पानसेचा चेहरा असा होता की तो खोटे बोलतोय असेही त्याला वाटेना.
“पानसे, नुसत्या ह्या पत्रावरून मी काय तपास घेणार? तुम्ही काही जास्त माहिती सांगितलीत तर बरं होईल.”
“काहीच सांगता येणार नाही मला. सुदर्शन, मी स्वत:च ह्या प्रकाराने इतका हबकलोय की काय करावं, हेच मला सुचत नाही.”
“तुम्ही पोलिसांकडे गेला होता?”
“रोज पेपर वाचतो मी आमच्या देशात, आणि पोलिसांचे खेळ उघड्या डोळ्यांनी पाहतो. पोलीस काही शोधून काढतील यावर माझा विश्वास नाही.”
“पानसे, मी हे प्रकरण स्वीकारलं असं समजा. मात्र एक आहे…” पैशांबद्दल बोलावे का बोलू नये या विचारात सुदर्शन होता, तेवढ्यात पानसेने कोटाच्या खिशात हात घातला आणि एक लांबलचक चेकबुक उघडून टेबलावर सारले. चेकवरचा आकडा पाहून सुदर्शन गप्पच बसला. पन्नास हजार!
“पानसे, बाहेर व्हाउचर करा. पावती मिळेल तुम्हांला.”
“नाही, त्याची गरज नाही.”
“तुम्हांला नसली तरी मला आहे. एक तर हा व्यवसाय माझ्या एकट्याचा नाही, आणि दुसरं, मला ब्लॅकचं लफडं आवडत नाही.”
“ठीक. तुम्ही सांगाल तशी पावती करतो.”
“फक्त तुमच्याच हाताने लिहून द्या.”
लिहिताना शंकरदेव पानसेचा हात किंचित थरथरल्याचा भास सुदर्शनला झाला. प्रकरणाच्या दडपणामुळे असे झाले असावे असा विचार करून सुदर्शनने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा पानसेच्या डोळ्यात थोडी भीतीची रेषा उमटलेली पाहिली, तेव्हा मात्र त्याला आश्चर्य वाटले. ह्याबद्दल तो विचार करत असतानाच रीतसर पावती लिहून पानसे निघून गेला, आणि थोड्याच वेळात अनिल आणि अजय त्याच्या कॅबिनमध्ये आले.
त्रिकूट जमले!
