Skip to content

१: दादरचे रहस्य

उभ्या हयातीत वैतागला नसेल इतका इन्स्पे० ज्योतिप्रसाद आज वैतागला होता.

दोन कारणे होती. सकाळपासून सहा वेळा रांगणेकरांचा फोन आला होता, आणि याही वेळी रांगणेकरांनी त्याची फक्त बिनपाण्याने करायची शिल्लक ठेवली होती. दुसरे कारण होते नंदिनी! ती सिमल्याला तिच्या मावशीकडे गेली होती ती अजून परत आली नव्हती. नंदिनीशी लग्न केल्यापासून ती कधीही त्याच्यापासून एक दिवसापेक्षा जास्त दूर राहिली नव्हती. पण आज तिसरा आठवडा होता. आता नंदिनी जवळ नसल्यामुळे संपूर्ण ब्लॉक त्याला खायला उठल्यासारखा वाटत होता.

ह्या सर्वांत भर म्हणजे, गेल्या तीन महिन्यात इन्स्पे० ज्योतिप्रसादला एकही म्हणावी तशी सनसनाटी घडामोड हाताळायला मिळाली नव्हती. कुठेही दरोडा पडला नव्हता; म्हणावा असा भयानक खून झाला नव्हता. ज्योतिप्रसाद अगदी बेचव जीवन जगत होता.

सातला त्याने ऑफिस सोडले. एकदा त्याच्या मनात आले, ‘स्टर्लिंग’ला पिक्चर टाकावा. थिएटरच्या रोखाने त्याने मोटारसायकल पिटाळलीसुद्धा. पण पाटी पाहूनच त्याने पिक्चरचा विचार गिळला. मायकेल केनचा पिक्चर होता. बोगस!

काय करावे ह्या विचारात तो ‘एंपायर’ थिएटरपर्यंत आला. पुन्हा त्याने विचार बदलला, आणि पुन्हा ‘स्टर्लिंग’. असे किमान तीन-चार वेळा झाले. शेवटी त्याने धाडस करून तिकीट काढले आणि बाल्कनीत जाऊन तो सीटवर बसला, तेव्हा पिक्चरची टायटल्स सुरूही झाली होती. पिक्चर जुनंच होतं - ‘द मॅगस’!

पुढचे नाव पाहून तो खूश झाला - अँथनी क्वीन! भन्नाट अ‍ॅक्टर मानत होता ज्योतिप्रसाद त्याला. मात्र अर्ध्या तासापलीकडे तो पिक्चर पाहू शकला नाही. सरळ जिना उतरून त्याने मोटार सायकलला किक् दिली. ज्योतिप्रसादचा चेहरा मोडीत निघालेल्या भांड्यासारखा झाला होता. सगळाच वैताग! निदान पिक्चर तरी चांगलं निघावं! तेही नाही.

विचार दूर करण्यासाठी त्याने मोटारसायकलला तुफान वेग दिला आणि सबवेकडे गाडी सोडली. भायखळ्यातून त्याने डबल रोडवर मोटारसायकल घेतली तेव्हा रहदारी रोडावली होती. साडे-दहा वाजून गेले होते. ह्यूम हायस्कूलपुढे त्याने सफाईदार वळण घेतले आणि गाडी दादर टी. टी.च्या रोखाने सोडली. नायगाव नाक्यावरून त्याने ब्रॉडवेकडे वळण घेतले, आणि सेंट्रल रेल्वे लाईन क्रॉस करून तो दादर-पूर्व भागात आला. इथे रहदारी तुरळक होती. त्याला पार्ल्याला जायचे होते. तुफान वेगात गेला तर दहा मिनिटांत तो फ्लॅटचा दरवाजा उघडून आत गेला असता.

हेच त्याला नको होते.

राम मंदिरापासून त्याने मोटारसायकल स्लो केली आणि आपटे स्कूलच्या बोळात घेतली. साडे-अकरापर्यंत दादरमध्येच भटकायचा त्याचा विचार होता. आता तो बोळाबोळातून फिरत होता. गोखले रेस्टॉरंटकडून त्याने उजव्या हाताला वळण घेतले. दोन बोळवजा रस्ते मागे टाकून तिसऱ्या बोळात त्याने गाडी घातली. हल्ली मुंबईत एक नवेच फॅड निघाले होते. प्रत्येक बोळाचे नाव बदलायचा कॉर्पोरेटरांनी धडाका लावला होता. सेनापती बापट रस्ता. हिरे चौक. कर्मवीर, धर्मवीर, रावबहादूर - आणि पुढे रस्त्याचे नाव!

तीन नंबरच्या बोळातून कोहिनूर मिल्सकडे जायचा त्याचा विचार होता. त्याने साठ स्पीडमध्ये गाडी घेतली. डी. एल. वैद्य रोडवर तो जाणार होता. पुन्हा त्याने विचार बदलला. उलट वळून त्याने वळण घेतले, आणि दोन नंबरच्या बोळात हँडल वळवले. आता ज्योतिप्रसाद तोंडाने शिटी वाजवत होता. उद्योग नव्हता दुसरा! बोळ संपला. पुढे काय? हा खोखोचा खेळ किती वेळ खेळायचा? शेवटी त्याला फ्लॅटवर जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याने हॅण्डल वळवले. आणि त्याने वेगात धावणाऱ्या गाडीला ब्रेक मारला!

त्या शांत वातावरणात एक भयानक किंकाळी त्याच्या कानावर आली होती.

कुणातरी तरुणीने जोव तोडून किंकाळी ठोकली होती. पाठोपाठ दुसरी किंकाळी आली – पहिलीपेक्षा जीवघेणी. जीवाच्या आकांताने कोणी स्त्री किंकाळी फोडून गेली होती. अशी किंकाळी, की कुणीही घाबरून जावे.

ज्योतिप्रसादने आवाजाचा अंदाज घेतला आणि त्या दिशेने वाऱ्यासारखी मोटारसायकल पिटाळली. अजून एखादी किंकाळी यायच्या आत तेथे पोहचायचा त्याचा विचार होता. दोन वळणे घेतल्यावर त्याच्या लक्षात आले, आपण पूर्वीच्याच मार्गावर आलोय. पुन्हा त्याने रेसची ग्रिप फिरवली. आता त्याच्या अंदाजाप्रमाणे तो आवाजाच्या जवळ पोहचला होता. क्रॉस लेनचा रस्ता अगदी जवळ आला होता. त्याने गाडी दोन्ही रस्त्यांच्या मध्ये उभी केली आणि आवाजाचा कानोसा घेतला. आता रस्त्यावर विरुद्ध बाजूच्या गल्लीत धावपळ चाललेली त्याच्या कानावर आली, आणि त्याने आवाजाच्या रोखाने मोटारसायकल सोडली. एका बोळाच्या तोंडाला बरीच गर्दी जमली होती. मोटारसायकल स्टँडला लावून तो गर्दीत शिरला… आणि तो पाहतच राहिला!

गर्दीच्या कड्यात एक तरुणी पडली होती. एक हात मागे घेऊन ती तोंडावर पडली होती, आणि तिच्या पाठीत एक सुरा खुपसलेला होता. दुसरा सुरा पाठीतच जरा खालच्या बाजूला होता - अचूक हृदयाची जागा हेरून तो खुपसला होता.

गर्दीच्या कोपऱ्यात एक तरुण घाबरून उभा होता. त्याचे दोन्ही हात दोन बॉम्बे पोलिसांनी धरले होते. तो इतका घाबरला होता की नुसतीच मान हलवून नकार देत होता. त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हता.

इन्स्पे० ज्योतिप्रसाद झटक्यात पुढे झाला. तोपर्यंत हवालदाराच्या हुद्द्याचे दोन पोलीस तिथे आले होते.

“हवालदार, गर्दी मागे घ्या.” सहज बोलून गेला इन्स्पे० ज्योतिप्रसाद.

“होय साहेब.”

“तुझं नाव?” इन्स्पे० ज्योतिप्रसादने दुसऱ्याला विचारले.

“व्यंकटेश महाजन.”

“नंबर?”

“तेवीस अकरा.” हवालदार उत्तर देत होता.

“चौकीवर जा. इन्स्पेक्टरना रिपोर्ट दे.”

“साहेब!” धावतच तो हवालदार निघाला.

“आणि तुझा नंबर?”

“सतरा तीन.”

“सी० आय० डी० ऑफीसला फोन कर. खून झाल्याची वर्दी दे.”

“होय, साहेब.”

तासाभारत त्या लहानशा चौकात प्रदर्शन भरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. एक अँब्युलन्स हेडचा लाल दिवा लुकलुकवत तिथे येऊन पोचली. ठसेतज्ज्ञ जमले. भराभर त्या तरुणीच्या प्रेताचे फोटो घेण्यात आले. डॉक्टरांनी प्रेताची तपासणी केली. प्रेत अँब्युलन्सच्या मागच्या बॉडीत सारण्यात आले, आणि आली तशीच अँब्युलन्स वेगात निघून गेली. फोटोग्राफर्सचेही काम आता संपले होते. ठसेतज्ज्ञांना फक्त दोन बुटांचे अगदी वेगळ्या प्रकारचे ठसे मिळाले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तापलेल्या डांबरी रस्त्यावर ते ताजे ठसे लगेच नजरेत भरले होते. तीन तासांत तो चौक निर्मनुष्य झाला, आणि इन्स्पे० ज्योतिप्रसाद त्या धरून ठेवलेल्या तरुणाकडे वळला.

“तुझं नाव?” पायापासून डोक्यापर्यंत त्याला निरखत ज्योतिप्रसादने पहिला प्रश्न विचारला.

“योगश… योगेश अभ्यंकर.”

“ही तरुणी कोण?”

“मला खरोखर काहीच माहीत नाही. मी तिला आजच पाहतोय.”

“तुझ्याबरोबर होती?”

“नाही, मी घरी निघालो होतो.”

“कुठे भेटली?”

“भेटली नाही. तीही चालत होती. माझ्या मागे होती.”

“का?”

“माहीत नाही.” पोरगा भयानक घाबरला होता. ज्योतिप्रसादच्या मते असला तरुण खुनासारखे धाडस करणेच शक्य नव्हते.

“बरं जा, पण हे बघ. उद्या बोलवू तेव्हा हजर राहवं लागेल.” त्याच्या रडवेल्या चेहऱ्याकडे बघत ज्योतिप्रसाद सहानुभूतीने त्याचा खांदा दाबून म्हणाला.

“हो हो, राहतो,” त्या तरुणाच्या मनावरचे निम्मे ओझे कमी झाले.

“थांब. हवालदार, याचा पत्ता लिहून घे, आणि उद्या याला माझ्या ऑफिसात घेऊन ये.”

हवालदाराने पत्ता लिहून घ्यायचा अवकाश, ‘जा’ म्हणून सांगायच्या आधीच तो तरुण धावत निघाला.

**

ज्योतिप्रसाद आता ह्या खुनाबद्दल विचार करत होता. त्या तरुणीच्या हातात एकूण तीन वस्तू होत्या - पिशवीसारखी चौकोनी बास्केट, मोठी पर्स आणि खांद्याला थर्मास. ती इतक्या रात्रीच्या वेळी कुठे निघाली असेल?

आपण जास्त विचार करत राहिलो तर झोपेचे खोबरे होईल, असं मनात आल्यावर मोटारसायकलला किक् मारून त्याने स्टँड पाडला आणि तो पार्ल्याच्या रोखाने निघाला. ब्लॉकवर येईपर्यंत तोच विचार त्याच्या मनात घोळत राहिला. पलंगावर पडल्यावर सर्व विचार बाजूला सारून डोळे मिटले, तरी त्याच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर तीच पालथी, तोंडावर पडलेली तरुणी दिसत होती, आणि तिच्या पाठीत खोल खुपसलेले दोन सुरे.