भास ११.२६ : राधिकेचे शांतवन

इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात तंजावूरच्या विदुषी कलावती मुद्दुपळनीनं रचलेली ही गोष्ट आहे नवजवान कृष्णाची, त्याच्या कामनेला आकार देणाऱ्या राधिकेची, आणि त्याच्याशी नुकतंच लग्न लागलेल्या ईलेची. कामभावना प्रत्येक मनात, कित्येक परिस्थितींत उद्भवत असतेच. तिला हाकारणारी ही गोष्ट आपल्या आसपासच्यांना सांगावीशी वाटते..

Sun Nov 15

… बेंबीखाली कसलेला सोनसळी कासवटा. नुकत्याच वयात आलेल्या कस्तुरीमृगावर शक्य तितक्या करुणेनं शरसंधान करून मिळवलेली कस्तुरी एका व्याधानं त्याच्या वडिलांना आणून दिली होती. ती एक भाग कस्तुरी दशभाग चंदन आणि दशभाग प्रवाळासह पारिजातकावरच्या दवबिंदूंमध्ये भिजवून त्याचा टिळा मदनगोपाळाच्या कपाळी रेखलेला. बाई बाई! तो काळ असा होता, की ‘काम’ हा पुरुषार्थ निभावण्यासाठी पुरुषालाही निगुतीनं सज्ज केलं जाई. कामेच्छेला दिशा देणारी नथीची वेसण बाईच्याच नाकी नव्हती केवळ. तरण्या परण्या कान्ह्याच्या नाकपुडीवर दक्षिणसिंधूतल्या टपोऱ्या मोत्याची चमकी रुपली होती. पाठीवर रुळणाऱ्या त्याच्या काळ्याभोर केसांचा एकच वेढा डोक्यामागे घेऊन त्याभोवती अबोलीची वेणी गुंफलेली. त्यामुळे त्याखालचे मोकळे केस आता त्याच्या रुंद खांद्याशी लगट करत विसावले होते….