संजीवनी खोजे
कवयित्री संजीवनी तुकाराम खोजे या मराठी साहित्यातील महत्त्वाच्या कवियत्री होत्या. अवघ्या २५ वर्षांचे अल्पायुष्य लाभलेल्या संजीवनी यांचा जन्म २९ मार्च १९६५ रोजी झाला, तर २८ ऑगस्ट १९९० रोजी त्यांचे निधन झाले.
एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) नोकरीला होत्या. साहित्याची आवड म्हणून त्यांनी 'ओवी' नावाचे केवळ कवितेला वाहिलेले अनियतकालिक सुरू केले. विविध वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांचे ललित लेख व कविता प्रसिद्ध झाल्या.
त्यांचे 'एकोल' आणि 'पैलतीर' हे दोन कवितासंग्रह ज्येष्ठ कवि नारायण सुर्वे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. 'एकोल' या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले, तसेच १९९० मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती पुरस्कार या काव्यसंग्रहाला मिळाला .
त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी अहमदनगर महानगरपालिकेने 'दिल्लीगेट ते बागरोजा हुडको' या रस्त्याला 'कवयित्री संजीवनी खोजेपथ' असे नाव दिले. आजही 'कवयित्री संजीवनी खोजे स्मृती प्रतिष्ठान' दरवर्षी २८ ऑगस्टला मराठीतील एका उत्कृष्ट काव्यसंग्रहास ₹५,००१ चा पुरस्कार आणि मानचिन्ह देते. तसेच या दिवशी राज्यस्तरीय कविसंमेलन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काव्यस्पर्धांचे आयोजन केले जाते.