काटेकोरांटीची फुलं
रामदास
पुस्तकाबद्दल
... या कथांच्या आशयात आणि शैलीत सत्तरीच्या दशकातला ‘ओल्ड स्कूल’ चार्म आहे. आणि रामदासांची भाषेवरची सराईत-सफाईदार-सहज पकड. त्या भाषेला फापटपसारा मानवत नाही. ती आपल्या अल्पाक्षरत्वानं भेदक होत जाते....
तपशील
- मूळ प्रकाशन वर्ष : 2026
- प्रकार: कथासंग्रह
- भाषा: मराठी
- पृष्ठसंख्या : 136
सविस्तर...
‘भास' अनियतकालिकाच्या माध्यमातून अनेक लेखक दोस्त होताहेत, आणि अनेक दोस्त लेखक होताहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींबद्दल प्रेम, आस्था, आदर, अप्रूप वाटत आलं आहे. एकाच लेखकाच्या कथांचा, ‘भास प्रकाशना’चा हा पहिलाच संग्रह त्यातूनच आलेला. रामदास यांच्या कथांचा. रामदासांचं लिहिणं मुख्य धारेतल्या छापील माध्यमांत फारसं डोकावलेलं नाही. ते लिहिते झाले ते ऑनलाईन मराठी फोरम्सवरून. नव्वदीनंतर अवतरलेल्या जागतिकीकरणाचे पडसाद ऑनलाईन मराठी फोरम्सच्या रूपानं उमटू लागायला २००० साल उजाडावं लागलं. त्यानंतर जी अनेक मराठी संस्थळं अवतरली आणि देशी भाषांमधल्या अनौपचारिक, मोकळ्या-ढाकळ्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देऊ लागली; त्यांपैकी ‘मिसळपाव डॉट कॉम’ हे एक. रामदासांचं लेखन मुख्यतः तिथे झालं. त्याबद्दल ‘मिसळपाव’चे आभार मानायला हवेत. भारतानं जगाकरता आपली बाजारपेठ खुली करण्यापूर्वीचं मराठी मध्यमवर्गीय जग पुष्कळ साधंसुधं, आर्थिकदृष्ट्या तसं बेतास बात होतं. म्हणूनही की काय न कळे, पण मूल्यांविषयी चाड बाळगायला सवड होती. या मूल्यांना एक उघड सवर्ण रंग होता. अंथरुणाचा पन्हा बघून हातपाय पसरणाऱ्या या ब्राह्मणी-निमशहरी जगातला एखादा मुलगा जरा तिरक्या चालीचा, चौकटीबाहेर पडायला उत्सुक असावा आणि त्यानं मध्यमवर्गीय जगाच्या संकेतांची पर्वा न करता टक्केटोणपे खायला बाहेर पडावं; पण आपल्या मुळाशी असलेल्या मूल्यचौकटींविषयी, तीतल्या छुप्या अन्यायांविषयी, असहाय मर्यादांविषयीची सखोल जाणीव काही केल्या त्याला खोलवर पुरून टाकता येऊ नये; त्यानं सांगितलेल्या गोष्टींमधून ती नकळत दिसत राहावी… असं काहीसं रामदासांच्या कथा वाचताना मनात उमटत राहतं. त्या कथांच्या आशयात आणि शैलीत सत्तरीच्या दशकातला ‘ओल्ड स्कूल’ चार्म आहे. खेरीज रामदासांची भाषेवरची सराईत-सफाईदार-सहज पकड. त्या भाषेला फापटपसारा मानवत नाही. ती आपल्या अल्पाक्षरत्वानं भेदक होत जाते. सहस्रक बदलून पाव शतक उलटलेलं असताना शहरी सवर्ण मध्यमवर्गीय वर्तुळ ओलांडून मराठी कथाविश्व पुष्कळ विस्तारलं आहे. त्या वाढत्या पसाऱ्यात या कथा विरून जाऊ नयेत, म्हणूनही त्यांची आवर्जून दखल घेतली पाहिजे, असं वाटतं. आधुनिकोत्तर जगात राहूनही किंचित अलीकडच्या, गोष्टीवेल्हाळ वळणावर रेंगाळू बघणाऱ्या ‘भास प्रकाशना’च्या प्रकृतीला हे साजेसंच म्हणायला हवं! या नेटक्या साहित्याचं तितकंच देखणं आणि टिकाऊ पुस्तक काढण्याची आमची परंपरा याही पुस्तकातून रुजावी, अशी आमची इच्छा आहे. स्वाती साबणेंचं देखणं-अर्थवाही चित्र आपल्या खासगी संग्रहातून देऊ करणाऱ्या सीता सी. भट्ट आणि खुद्द स्वाती यांचे आभार; तसंच आपलं पहिलं पुस्तक ‘भास’च्या हाती सोपवणाऱ्या रामदास यांचेही. पुस्तकाच्या निर्मितीत आणि वितरणात हातभार लावणारी मंडळी घरचीच असली, तरी त्यांचेही इथे आभार मानणं उचित होईल. आमच्या या आनंदयात्रेत तुम्हां वाचकांचाही समावेश व्हावा, अशी इच्छा व्यक्त करून थांबतो. बोलत राहूच.
आपलं,
संपादक मंडळ, भास प्रकाशन