सुभाष शहांचा सुधीर गाडगीळ, सदा डुंबरे, आणि राजेंद्र बनहट्टी...

...तरीही लगदा कागदावरची शहांची पुस्तकं राज्यातल्या कुठल्या-कुठल्या भागात काही प्रमाणात जिवंत अवस्थेत तुरळक आढळतात. ठिगळं लावलेल्या, कागदांची पानं फाटलेल्या, भडक मुखपृष्ठांची दशा-दशा झालेल्या अवस्थेत हे ‘इराॅटिक मराठी पल्प फिक्शन’ दिसलं की विकत घेणं होतं. ..

पंकज भोसले

पंकज भोसले

अतिथी संपादक

Sat Jun 06

१ पल्प लेखनातला सूड-आसूड?

मराठीत १९६४ ते १९६८ ‘बेळगावी मासिकांची’ जोरदार हवा निर्माण करणाऱ्या आणि नंतर दीड दशकांचा काळ लगदा कथाजगतातून दिसणाऱ्या सुभाष शहा यांच्या कादंबऱ्या शोधायला कुणीच जात नाही.

कारण मासिकं आता जवळ-जवळ गडप झालीत. मुख्य धारेतली वाचनालयं असली पुस्तकं आणत नसत. ही पुस्तक-मासिकं खासगी लायब्रऱ्यांचा गल्ला भरत असली, तरी आता त्याच नामशेष झाल्यात. तरीही लगदा कागदावरची शहांची पुस्तकं राज्यातल्या कुठल्या-कुठल्या भागात काही प्रमाणात जिवंत अवस्थेत तुरळक आढळतात. ठिगळं लावलेल्या, कागदांची पानं फाटलेल्या, भडक मुखपृष्ठांची दशा-दशा झालेल्या अवस्थेत हे ‘इराॅटिक मराठी पल्प फिक्शन’ दिसलं की विकत घेणं होतं. कोल्हापूर-पुण्यातल्या निष्णात विक्रेत्यांनी या पुस्तकांची किंमत अव्वाच्यासव्वा वाढवून ठेवलीय. तरीही दिसली की मोह आवरत नाही. नंतरच्या काळात, पांढऱ्या कागदावर छापलेल्या, शहांच्या कादंबऱ्या मिळाल्याचा लोकांना थोर आनंद होतो. पण त्या ८५-९० सालातल्या कादंबऱ्यांत त्यांच्या त्याआधीच्या कादंबऱ्यांमधला मादकशैलीचा जोर बिलकुल सापडत नसल्याने या शोधकांची पार निराशा होते. त्यांनी काढलेली ‘राणी’, ‘प्यारी’, ‘मस्ती’ आणि ‘कामदेव’ ही सर्वाधिक खपाची मराठी अश्लील मासिकं ठरली. ही घडामोड साठोत्तरी साहित्यिकांनी घडवलेल्या संक्रमण काळातलीच. समांतर जगात याच काळावर ‘कोसला’चा प्रखर पगडा दिसतो. ‘श्यामा’ ही अश्लीलता खटल्यामुळे चार वर्षांत थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचणारी आणि उच्चभ्रू वाचकांच्या नजरेतून ‘बी’ दर्जाची ठरलेली कादंबरी त्याच काळात अवतरली होती. ‘वासूनाका’मधल्या कथा दिवाळी अंकांच्या माध्यमातून गाजत पुस्तकाच्या मार्गाकडे चालल्या होत्या. त्या वीसेक वर्षांतल्या नवकथेच्या ध्वज-पताकांना बाद करणाऱ्या आणि त्यांची खिल्ली उडवणाऱ्या तरुणांच्या ताफ्यामध्ये साहित्यातल्या बिनधास्तपणाला चांगलंच महत्त्व आलं होतं. त्यातच ‘सत्यकथे’नं अवघड होण्याचा वसा हाती घेतल्यानंतर बहुजन वर्गानं ‘लिटिल मॅगझीन’ची चळवळ उभारली होती. पुण्यातून कौटुंबिक-महिलाप्रधान मासिकांचा वेगळा सवतासुभा (मेनका-माहेर-रंभा) झाला होता. साहित्यिक-वैचारिक-मनोरंजक नियतकालिकांचा अड्डा (हंस-मनोहर-स्त्री-किर्लोस्कर-साधना) चालू होता. नि मुंबई-पुण्यातून निघणाऱ्या, रहस्यकथा खोऱ्यानं ओतणाऱ्या नवल-धनंजयसारख्या मासिकांचा स्वतंत्र वाचक होता. प्रत्येकाचा वाचक, आणि लेखकवर्गही घडत होता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आलेली शहांची मासिकं कुठली चालायला, ती आर्थिक तोट्यामुळे बंद पडली असतील, असं कुणाला वाटेल. पण ती बंद पडली नाहीत. ती उत्तरोत्तर फुलत आणि आर्थिक डोलारा फुगवत चालली होती. पण मासिकांतल्या मादक मजकुरामुळे शहांच्या घरावर छापे पडू लागले. त्या मासिकांची चटक लागलेल्या एका पिढीमुळे नाव आणि खानदानाची इभ्रत बिघडते आहे, असं शहांच्या वडिलांना वाटू लागलं. परिणामी वडिलांनी सुभाष शहांना बेळगावातून पकडून सांगलीतल्या घरी आणलं आणि कोंडून ठेवलं.

“कुठलाही उद्योग केला नाहीस तरी चालेल. छंदच करायचा असेल लिहिण्याचा, तर इथे सांगलीतल्या घरात कागद खराब करून तो पूर्ण कर.” अशी तंबीच वडिलांनी शहांना देऊन टाकली. मग सुभाष शहांची गाडी पुण्याच्या सदानंद प्रकाशनाच्या वाटेकडे वळली. तिथेच गुरुनाथ नाईक आपल्या रहस्यकथांमधून हेरगिरीचा मुद्दा पुढे सारत होते. रहस्यकथालेखकांना भारताच्या दुश्मन राष्ट्रांच्या - चीन आणि पाकिस्तान यांच्या - हेरांचे कट उधळायला अमिताभच्चन नामक ताडमाड नायकासारखा हिरो निर्माण करायचे वेध लागले होते.

हिंदीत ‘विक्रांत’ या नायकाद्वारे हे फार आधीच साधलं होतं. मराठीत गरुड आला, मग कॅप्टन दीप आला, अजगर आला. हाॅलिवुडच्या चित्रपटांत परग्रहवासीयांपासून पृथ्वी आणि पृथ्वीवासीयांची सुटका करून देण्याची जबाबदारी जशी अमेरिकेवर असते, तशीच मराठी रहस्यकथेतल्या गुंड-हेर-देशभेदी-गुन्हेटोळ्या यांना पाणी पाजायची जबाबदारी मराठी रहस्यकथेंच्या नायकांवर येऊन पडली होती. मुंबईत हाजी मस्तानच्या कारवायांपासून संघटित गुन्हेगारीला सुरुवात झाली. त्याच काळाच्या आसपास परभणीतल्या मानवतमधल्या हत्याकांडानं राज्यभर खळबळ उडवून दिली. मुंबईतलं टोळीयुद्ध समेवर आलेलं असताना तिकडे पुण्यात जोशी-अभ्यंकर हत्याकांडाला आरंभ झालेला होता. या सगळ्याचं अतिरंजित प्रतिबिंब तत्कालीन रहस्यकथांमध्ये पडलेलं दिसतं. यात वैयक्तिक गुन्हेगारीचा किती आणि कसा वाटा होता, त्याचा तपशील श्रीकांत सिनकरांच्या साठ-सत्तर पुस्तकांत आणि सिनकरांचे अनुयायी असलेल्या अर्ध्या डझन लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांत सापडतो.

सत्तर-ऐंशीच्या ‘पल्प फिक्शन’मधल्या लेखकांना समाजातील गुन्ह्यांनी भरपूर कच्चा माल पुरवला होता. त्याच वेळी मराठी साहित्याला ‘दलित आत्मचरित्रां’ची वेगळी फांदी फुटली होती. शहरी-निमशहरी भागातले लेखक-लेखिका एकतर ‘नवी कोसला’ लिहिण्याच्या मागे लागत अति-अस्तित्ववादी बनले होते. किंवा पुलं-वपु-पाडगावकरी गाणी यांचे कित्ते गिरवण्यात ‘अजरामरवजा’ साहित्य प्रसवत चालले होते. अश्लीलतेवरच्या खटल्याच्या लचांडामुळे ‘नवी श्यामा’ लिहायला कुणीच धजावत नव्हतं. ‘साहित्य आणि अश्लीलता’ हा परिसंवादांचा-साप्ताहिक मासिकांच्या कव्हर स्टोऱ्यांचा आणि भाषणांचा विषय झाला होता. अन् नेमक्या याच काळापासून - म्हणजे १९७० ते १९८५ या काळात समाजातला बराच मोठा वाचकवर्ग सुभाष शहांच्या कादंबऱ्या मिटक्या मारत वाचत होता. त्याला दे-मार हिंदी चित्रपटांची आणि त्यात चालणाऱ्या बिशूम-बिशूम मारामारीची गोडी लागली होती. ’शोले’सारख्या चोरपटातला ’मारत्या’ अमिताभ बच्चन किंवा मुंबईतल्या रस्त्यावरून श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचणारा ‘विजय’ नामक त्याचा अवतार या प्रेक्षकांना भावत होता. आपल्या ठिगळ लावलेल्या, तुटक्या-फुटक्या आयुष्यातली सगळी स्वप्नं त्यांना पल्प साहित्यात आणि त्याहून कमी दर्जाच्या असलेल्या पल्परूपी सिनेमांत साकार झालेली दिसत होती. त्यामुळेच हे सिनेमे सुपर-ड्युपर हिट होते आणि पल्प फिक्शन पुस्तकं रेल्वेस्टाॅल्सपासून सर्क्युलेटिंग लायब्रऱ्यांपर्यंत जोरकस कमाई करत होती.

रहस्यकथेबद्दलच्या माझ्या प्रकल्पासाठीचा ‘शृंगाराचा बादशहा’ हा प्रदीर्घ लेख आणि ‘मराठीत सेक्स विकणारा लेखक’ हा लेख लिहेपर्यंत मी सुभाष शहा या लेखकाच्या भरपूर कादंबऱ्या वाचल्या होत्या.

दोन-तीनशे कादंबर्‍या माझ्याच संग्रहात होत्या. त्यात सदानंद प्रकाशन आणि सागर प्रकाशन या दोन प्रकाशनांच्या लहान आकारांच्या कादंबर्‍या होत्या. अलीकडे मात्र माझ्या संग्रहात काही नवा स्टाॅक दाखल झाला, ज्यांच्यातल्या काही गोष्टी मला अचंबित करणार्‍या होत्या.

लोकप्रिय, समाजात माहिती असलेल्या, आणि साहित्याच्या-कलेच्या मुख्यधारेत परिचित असलेल्या माणसांची नावं रहस्यकथांमधल्या नायक-खलनायक वगैरेंच्या नावासाठी वापरण्याची खोड अनेक रहस्यकथालेखकांना होती. शरदचंद्र वाळिंबे यांत सर्वांत आघाडीवर. दिवाकर नेमाडे यांनी त्यांच्या ‘अगस्ती’ नावाच्या सागरावरच्या नायकाचं मूळ नाव उत्पल दत्त असल्याचं स्पष्ट केलं होतं.

सुभाष शहांनी हे कळसाला नेलं. सुभाष शहांच्या ‘कपटी सैतान’ या फेब्रुवारी १९८५ साली सागर पब्लिकेशन, सातारा या प्रकाशनाने काढलेल्या घंटाकर्ण-कथेत मूळ नायक राहतो बाजूला. त्याची जागा घेतो सुधीर गाडगीळ हा सर्वसामान्य माणसांचा प्रतिनिधी असलेला बँककर्मचारी. तो त्या मूळ नायकाचं बहुतांश काम पूर्ण करून टाकतो. हा बँक कर्मचारी हाँगकाँगला असाच एकटा फिरायला जातो. तिथे त्याला त्याचा पुणेकर मित्र भेटतो. हेरखात्यातला हा मित्र त्याला देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असा रहस्यसंदेश सिक्रेट सर्व्हिस एजंटकडे पोहोचवण्यासाठी तोंडी सुपूर्द करतो. कारण ति=थे हाँगकाँगमध्ये त्या मित्रावर शत्रुराष्ट्राच्या सिक्रेट एजंटची नजर असते. पुढे भारतात परतायच्या आत या सुधीर गाडगीळला हाँगकाँगमधल्या मित्राचा तिथे खून झाल्याची बातमी कळते. शत्रू राष्ट्राचे हेर पाठलाग करत सुधीर गाडगीळला बेजार करतात. त्या बेजारपणातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात सुधीर गाडगीळला राष्ट्रप्रेमाचं भरतं येतं. त्याच्यात आत्मशक्ती संचारते. शत्रूची सगळी जाळी तोडत सुधीर गाडगीळ दोन-तीन ललनांच्या सान्निध्यात राहून देशाप्रतीचं कर्तव्य पार पाडू लागतो. हाणामाऱ्या करतो, सुरेबाजी करतो, टेहळणी वगैरेही पार पाडतो. त्याच गठ्ठ्यात सापडलेली दुसरी कादंबरी ‘दि सेव्हन घोस्ट’ नावाची.

सागर पब्लिकेशनने १९७७ साली काढलेली ही वेताळकथा सुभाष शहांनी माया सावंत या त्यांच्या टोपणनावाने लिहिली. अतिशृंगारिक लेखनासाठी त्यांनी तयार केलेलं हे टोपणनाव होतं. भुतांचा सम्राट वेताळ एका सर्वपित्री अमावस्येनंतर सात दिवसांच्या रजेवर जातो आणि या रजेच्या काळात स्मशानातली भुतं त्यांच्या साऱ्या सूडसंकल्पना घरी-दारी जाऊन पूर्ण करतात, ही कादंबरीची थीम. कादंबरीचं नाव जरी इंग्रजी असलं, तरी त्याचा सगळा प्लाॅट बाभुळगावात घडणारा. यात मला ‘सदा डुंबरे’ हे एका अति-मायनर कॅरेक्टरचं नाव असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर आणखी एक कादंबरी वाचली, ती त्यातल्या राजेंद्र बनहट्टी नावाच्या पात्रामुळे.

शहांचं कादंबरीलेखन म्हणजे एका बैठकीत होणारं. एकदा लिहायला बसले की लहान आकाराचं ६० ते ७२ पानी पुस्तक संपवूनच उठणार. फार फार तर ८६ पानांचं पुस्तक. सकाळी प्रकाशनाचा माणूस कादंबरी मागायला घरी आला की संध्याकाळी तो परतीच्या गाडीने जाईपर्यंत त्याच्या हातात ते कथेचं संपूर्ण बाड सोपवत. प्लाॅट-शीर्षक आदी गोष्टींचा विचार वा आखणी करायला त्यांना वेळ नसे. कधी-कधी शीर्षक आणि कादंबरीचा प्लाॅट पूर्णपणे गडबडलेला असे. नायकाचं आगमन होण्यासाठी कादंबरी संपायचादेखील मुहूर्त उजाडे. पण वाचकाला त्याच्याशी काही देणंघेणं नसे. दोन खुबसूरत (अर्थात ’बुब’-सूरतदेखील) बायकांची तपशिलांत जाऊन केलेली वर्णनं. त्या बायकांवर झालेल्या वा होणार्‍या अत्याचाराचा प्रसंग. तो शहांच्या मूडनुसार बदले. म्हणजे खलनायकाच्या हाती खुबसूरत ललना सोपवायची की नायकाच्या हस्ते तारुण्याने मुसमुसलेल्या तरुणीला ’मुस्करत-कुस्करत’ ठेवायचं याचा अंतिम निर्णय हा शहांचा.

मुलाखतकार सुधीर गाडगीळ, दिवंगत पत्रकार सदा डुंबरे, आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी ही मराठी वाचकाला बऱ्यापैकी परिचित असलेली नावं शहांनी आपल्या कादंबऱ्यांत का आणली असावीत? त्या व्यक्तींपर्यंत या कादंबऱ्या पोहोचण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे? की त्यांच्यावरचा सूड (अथवा स्नेह?!) काढण्यासाठी? किंवा यांपैकी कोणत्याही कारणांशिवाय - नुसतीच गंमत म्हणून? पुण्यातल्या अनेकांशी शहांचा भरपूर संपर्क होता. त्यांचं फाईव्हस्टार हाॅटेलही ठरलेलं होतं. इथले लेखक-संपादक-प्रकाशक आणि फुकटे यांना खिलविण्या-पिलविण्याचा त्यांचा उद्योग ‘वर्तुळातील माणसे’ या लेखसंग्रहात सुहास शिरवळकर यांनी रंगवून सांगितला आहे. .या जनसंपर्कातून ज्ञात झालेल्या माहितीच्या आधारे शहांनी लेखनात ही नावं आणली असतील का? त्या वेळी या कादंबऱ्या वाचणाऱ्या वाचकांनी या गमती-जमतींचा जाणीवपूर्वक आस्वाद घेतला असेल की कसं याचं उत्तरही आता मिळायचं नाही.

तूर्त या कादंबऱ्यांमधल्या परिचित नावांच्या पात्रांबरोबर केलेल्या गमती इथे पाहू या.

२ जाणून-बुजून?

घंटाकर्ण, अजिंक्य, इन्स्पेक्टर तुफानराव यांसह आणखी दोन-तीन नायक सुभाष शहांनी रहस्यकथांना दिले. तुफानी नावाची त्या काळाच्या दृष्टीने-अजब गजब असलेली आणि लंडनमध्ये वावरणारी नायिका सुभाष शहांनी तयार केली. प्रचंड दारूची आणि प्रचंड सेक्सची भुकेली असलेली ही नायिका शेरलाॅकच्या सिक्रेट संस्थेत काम करत असते.

कठीणात कठीण परिस्थितीत खलनायकासमोर चोळी उघडून त्याला गारद करून नंतर ठार करणारी ही नायिका.

कुसुम शिरोडकर या टोपणनावाने सुभाष शहांनी लिहिलेल्या काही कथा खूपच वाचनीय होत्या. उदा. दोन तोंडांच्या सापाला पकडण्याची गोष्ट. त्या कथांमध्ये सापांविषयीचं सखोल संशोधन आढळतं. बाकी प्लाॅटमधली गंमत-जंमत कायम राखलेली.

‘रणधीर आणि सुधीर गाडगीळ दोघे खास दोस्त नव्हते. तरी दोघांची चांगली दोस्ती होती. दोघांना एकमेकांबद्दल अत्यंत प्रेम होते. बी. एस.सीला दोघे एकाच काॅलेजात बरोबर होते, आणि दोघेजण फुटबाॅल आणि फ्री स्टाईल कुस्तीमध्ये मान पटकावून होते. ’ (कपटी सैतान, पृष्ठक्रमांक ८)

एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाही. वर दिलेल्या परिच्छेदात ’खास दोस्त नव्हते’ आणि ’चांगली दोस्ती होती’ ही दोन परस्परविरोधी वाक्यं एकापाठोपाठ एक आढळतील. संपादक-संपादन ही बाबच अस्तित्वात नसलेल्या मराठी रहस्यकथाप्रांताचा गुणविशेषच होता होता.

या ’कपटी सैतान’ नामक साॅलिड शीर्षकाच्या कादंबरीचा नायक कार्तिकेयन चक्रवर्ती उर्फ घंटाकर्ण असल्याचं नमूद केलं आहे. तो पहिल्या प्रकरणात अवतरतो ते त्याच्यापर्यंत संदेश पोहोचवायचा आहे, हे सुधीर गाडगीळ याच्या मित्राने नमूद केल्यामुळे. मग पुढे त्याचा पत्ताच नाही. त्याचं अस्तित्व नावापुरतंच राहतं. कारण एकटाकी कादंबरी संपवायच्या नादात सुभाष शहा हे सुधीर गाडगीळ या बँक कर्मचार्‍यालाच कारनामासज्ज करून सोडतात. रेल्वेमध्ये त्याच्यावर हल्ला होतो, त्यात तो वाचतो. पुढे कार्तिकेयनचा सहकारी असलेल्या ज्या कर्नलपर्यंत संदेश पोहोचवायचा तो गायब होतो. मग ज्याच्याकडे जायचं असतं, त्याचंही अपहरण होतं. पुढे सुधीर गाडगीळचंही अपहरण करण्याचा प्रयत्न होतो. त्या गाडीत एक सुडौल ललना असते. तो तिच्यासह सुखरूप बाहेर पडतो. शहांचा घंटाकर्ण नामक नायक अशीच कृत्यं करण्यात तरबेज. पण इथे ती सगळी कामं करण्याचं काम एकट्या सुधीर गाडगीळवर येऊन पडलेलं दिसतं. क्षणोक्षणी त्याला शत्रूचे हेर जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. काॅलेजमधला एक ओळखीचा इसम त्याला बार-कम-रेस्तराँमध्ये नेतो. तिथे त्याला जणू सौैंदर्यबाॅम्बच अशी मद्यासक्त ललना भेटते. ती त्याच्या दारूत बेशुद्धीचं औषध टाकून त्याचं अपहरण करते. त्याला नागवा करून शयनगृहात बंदिस्त करून ठेवते. हाँगकाँगमधल्या संदेशाच्या बदल्यात त्याच्याशी रत होण्याचं, लग्न करण्याचं, संपत्तीत वाटा देण्याचं आमिष दाखवते. पण राष्ट्रासाठी प्राणही देण्याचं ठरवून बसलेला सुधीर गाडगीळ त्या अवस्थेतदेखील मोह-मायापाशांपासून स्वत:ला मुक्त ठेवतो. घंटाकर्णने सुधीरच्या पाळतीवर ठेवलेल्या माणसाचं निमित्त होऊन कसाबसा सुधीर गाडगीळ सुटतो. त्या धाडीचं वर्णन करताना शहा मारधाडीचं कमी, तर सौंदर्यबॉम्ब-ललनेच्या पळापळीदरम्यानच्या अर्धनग्नपणाचं वर्णन जास्त करतात. त्यांची शब्दसंपदा जराही कमी पडत नाही..

‘सुधीरने अंदाज घेतला. इतर सारे हात उंचावून उभे होते, शम्मी गच्चीवर उलथी पडली होती. तिचा गाऊन छातीपर्यंत वर सरकला होता. कमरेखालचा भाग अनावृत्त झाला होता आणि दारात एक इसम पिस्तुल ताणून उभा होता. ’

अपहरण झालेला सुधीर गाडगीळ त्याचे कपडे फ्लॅटमधून शोधून काढतो आणि घंटाकर्णच्या माणसाबरोबर बाहेर पडतो. मग मात्र त्याने वेगळाच पवित्रा घेतलेला दिसतो. सारी सूत्रं हाती घेऊन तो अपहरण झालेल्या सिक्रेट एजंटला शोधण्याच्या कामावर रूजू होतो. मग अचानक आपल्या वस्तूंमधून खंजीर बाहेर काढून सिक्रेट एजंटला चकित करून टाकतो. तो खंजीर हाताळण्याचं आणि चालवण्याचं प्रशिक्षण आपण घेतलेलं असल्याची धक्कादायक माहिती एजंट्सना पुरवतो.

काही वेळानंतर ती सिक्रेट संस्था सुधीर गाडगीळवर एका बंगल्याच्या टेहळणीचं काम सोपवते. तिकडे शिरून हा पूर्वाश्रमीच्या बॅंक कर्मचारी निष्णात हेराला लाजवेल अशा करामती करायला लागतो. मग त्याच्यावर एका बलाढ्य राजकारण्याच्या खुनाचं बालंट येतं. तिथून पळत पळत मग तो एका रेल्वेत चढतो. त्या डब्यातही एक ललना त्याच्या प्रतीक्षेत असतेच!

संपूर्ण कादंबरीत सुधीर गाडगीळवर कामव्यवहाराचे अनेक प्रसंग येतात. जणू तो म्हणजे जेम्स बाॅण्ड आणि इतर मादक-बुबसुंदरी म्हणजे बाॅण्ड गर्ल्स. पण ’आधी लग्न कोंढाण्याचे’ या धर्तीवर ’आधी देशाची सुरक्षा, मग इतर कामं’ अशी प्रतिज्ञा केलेला सुधीर वाचकांची निराशा करतो.

या निराश होऊ शकणाऱ्या वाचकांना ‘बर्निंग ट्रेन’ आठवावा असा प्रसंग शहा लिहितात. अचानकपणे आलेल्या हॅण्डसम सुधीर गाडगीळला तिथली ललना आदेश देते -

‘तोम डिब्बेका दरवाजा बंद कर दोगे. फिर मेरा गाऊन उतारोगे और मुझे प्यार करोगे.’

देशसेवेच्या नशेत पूर्णपणे न्हालेल्या सुधीर गाडगीळसमोर ॲडव्हेन्चरचा नवा पहाड दाखल होतो.

‘आणि तिने स्वत:च अंगावरचा गाऊन उतरवून त्याला म्हटले. ‘ क्या मै तोमको पसंत हू? मी कॅब्रे डान्सर आहे. माझा डान्स बघायचाय?’

मग रात्री करायच्या कॅब्रे डान्सची रिहर्सल रेल्वेत करायसाठी उतावीळ झालेली ती ललना त्याला आपलं शक्तिप्रदर्शन दाखवायला सज्ज होते. ते वर्णन पाहा -

‘लोक माझा डान्स बघायला येतात. माझे उघडे शरीर बघायला येतात. माझी तनू ब्युटिफूल आहे. बघा मी दाखविते.’

आणि तिने बेले डान्स सुरू केला. तिची पावले गाडीच्या आवाजाबरोबर भिरकत होती. शरीर नागिणीसारखे वळसे घेत होते. तिची गौर तनू लचकदार होती. रबरासारखी ती अंगाला कुठेही लचक देत होती. नाचता नाचता ब्रेसियरमध्ये दोन बोटे सरकवून तिने झटका दिला आणि ब्रेसियर तिच्या हातामध्ये आला. ब्रंसियर छताच्या दिशेन फेकून तो उभार वक्षस्थळांचे दर्शन करीत ती नाचू लागली. सुधीरचे रक्त तापायला लागले.’

पण तापलेली गाडी तशीच सोडून आपले तापलेले रक्त देशाच्या सेवेत सांडण्याचा विडा घेतलेला सुधीर गाडगीळ त्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जात रक्त अथवा काही इतर न सांडता उरलेल्या विस्कीचे ग्लास तिला पाजत पाजत निद्राधीन करतो आणि ‘बर्निंग ट्रेन’सह स्वत:वरही अग्निशामक विचारांचा फवारा फवारतो.

पुढे या सुधीर गाडगीळचं देशप्रेम आणि त्याचा आगंतुकपणे सिक्रेट एजंटच्या वर्तुळात झालेला प्रवेश देशाला शत्रूच्या कारवायांपासून वाचवतो आणि नंतर हा सुधीर गाडगीळ तापलेल्या रक्ताला योग्य ठिकाणी सांडण्यासाठी सज्ज होतो. ‘घंटाकर्ण’ असं कथेचं नाव असल्यामुळे शेवटाला एकदाचा घंटाकर्णही अवतरतो. असली त्या कथेची अवस्था.

’दि सेव्हन घोस्ट’ ही वेताळकथा प्रचंड विनोदी असेल अशा अंदाजानेच मी वाचली. दिवाकर नेमाडे गेल्यानंतर अनेकांनी भूतकथा लिहून पाहिल्या, तशा सुभाष शहांनी वेताळकथा लिहिल्या. सदानंद प्रकाशनातून बाहेर पडत गुरुनाथ नाईकांनी स्वतंत्र सवतासुभा केला, तेव्हा शहांनी गुरुघंटालकथा, सम्राटकथा लिहिल्या. त्यांचा नायक कोणताही असो, अधूनमधून बदचलन किंवा बदनमस्त ललना आणणे ही शहांची कारागिरी ठरलेली असायची.

या कथेत सात दिवसांसाठी स्मशानातून बाहेर पडलेली भुतं आपल्या मानवी आयुष्यात झालेल्या अन्यायाचा मुक्तपणे बदला घेण्यासाठी सज्ज होतात. म्हातारीचं भूत सुनांना बडवून काढतं. .खून करून भावाची संपत्ती आणि पत्नी दोन्ही लाटणाऱ्या भावाला त्रास देण्यात भावाचं भूत कसर सोडत नाही. बलात्कार करून विहिरीत ढकलून देणार्‍या आणि तो अपघातच आहे असं भासवणाऱ्या पाटलाचं काम तसंच तळ्यात बुडवून ‘काम तमाम’ करण्याच्या कामी एका बाईचं भूत लागतं. एक भूत शाहिराचं असतं. त्याचा सूडप्रसंग वाचताना खिदळायला होतंच. पण ‘जाने भी दो यारो’ या १९८३ साली आलेल्या सिनेमातल्या शेवटाकडे घडणार्‍या महाभारतीय हास्यरसाशीशी त्याचं नातं जुळलेलं पाहायला मिळतं. तो प्रसंग इथे थोडक्यात मांडतो -

‘अर्जून आंबीकराच्या घरासमोर गोंधळ चालू होता. शेपन्नास माणसे थंडीने कुडकुडत बसून होते. दोन गॅसबत्त्या पेटलेल्या होत्या. गोंधळ रंगात आला होता.

राम- रावण युद्धाचा प्रसंग स्टेजवर चालू होता. संघर्षमय प्रसंग होता. रावणाने दहा तोंडाचा मुखवटा चेहऱ्यावर चढवलेला होता. आणि तलवार परजीत तो रामाशी युद्ध खेळत होता. धनुष्यबाणाचा वापर त्यांंनी का केला नाही कळत नव्हते.

अन् तेवढ्यात हनुमानाचा मुखवटा चढवून एकाने उडी मारत आगंतुकपणे स्टेजवर प्रवेश केला. हातातील गदेने त्याने पहिला आघात रावणाच्या टाळकीवर करताच भांबावलेला रावण धाडकन खाली आपटला. त्याच्या मुखवट्याचे दोन तुकडे झाले. तलवार कुठल्याकुठे दूर उडाली. लोक सहर्षाने किंचाळले. टाळ्या पिटू लागले.

भेदरलेला राम विंगेमध्ये पळण्याच्या तयारीत असताना हनुमानाने त्याला रोखून धरले. गदा आडवी तिडवी रामाच्या तोंडासमोर नाचवीत तो गायला लागला.

‘खबरदार जर टांग मारूनी जाशील पुढती रामा

भ्याड , दुष्ट फेकुनी दे तलवार मुकाट हरामा

नेमेंची होतो रावण-वध पण आज तुला ना क्षमा

चल ये पुढेची करीतो एका प्रहारात तुझा खातमा

पराक्रमी राम थरथरायला लागला. क्षणार्धात हनुमानाने विराट रुप धारण केले. गदा उलटी सुलटी फिरवीत तो रामावर धावून गेला. रामाने हातातील तलवार वेडीवाकडी फेकून दिली. बचावासाठी त्याने पुढ्यात बसलेल्या प्रेक्षकांत दाणकन उडी घेतली. रामाला तसे भ्याडपणे पळताना बघून हनुमानात आणखी धैर्य संचारले. तो थयाथया नाचायला लागला. स्टेजवर घडणारे विपरीत रामायण बघून प्रेक्षकांची थुंकी वाळून गेली.’

या प्रसंगाखेरीज या कादंबरीत बाभुळगावातल्या एक अतिसामान्य निरोप्याचं काम करताना सदा डुंबरे हे पात्र दाखवलं आहे. ६४व्या पानावर हे पात्र येतं आणि त्या पात्राला कसलाही आगापिछाच नसल्याने ६५व्या पानावर गायब होतं.

त्या मानाने इन्स्पेक्टर तुफानरावांच्या कथेमध्ये बनहट्टी नामक पात्राला गाडी चालवायचं तरी काम दिलं आहे. इतरही काही गोष्टी करायला दिल्या आहेत.

३ संगती आणि विसंगती

लंडनमध्ये जवळजवळ अंटार्क्टिका खंडाइतका बर्फ पडतो, बर्फाचाच पाऊस पडतो, असं दाखवणारी एक कथा अलीकडे वाचली. त्यात फ्लिप नावाच्या माणसाच्या बंगल्यात - ’फ्लिप हाऊस’मध्ये - खुनांची वावटळ उडवून दिली आहे. ’तोडलेले मुंडके’ असं त्या कथेचं नाव. ’पांढरी नागीण’ नावाची आणखी एक तुफानी कथादेखील गेल्या काही दिवसांत नव्या गठ्ठ्यांतून हाती आली.

सुभाष शहांच्या कादंबर्‍या म्हणजे माझ्यासाठी वाढत्या उन्हातल्या ट्रेनप्रवासातला दिलासा ठरल्या. हास्य आणि मनोरंजनाची ॲक्शनपॅक्ड अशी वाचनएक्स्प्रेसच जणू खास माझ्यासाठी सुरू झाली होती. त्यांतल्या विसंगती आणि विसंगतींमागची संगती शोधताना प्रवास सोपा झाला. त्यांनी कुसुम शिरोडकर या नावाने तर कादंबऱ्या लिहिल्याच, पण माया सामंत, राजा पेडणेकर अशा टोपणनावांनिशीदेखील लिहिल्या. त्याही पालथ्या घालण्याची तहान मला सतावू लागली.

आता जुन्या गठ्ठ्यांत काही न वाचलेले सुभाष शहा आणखी काही लोकप्रिय नावांसह भेटतात का, हे पाहायला माझ्या घरातच माझा शोधप्रवास सुरू झालाय.

पंकज भोसले