चॅलेंज

शरदचंद्र वाळिंबे यांनी लिहिलेली थरार कथा...

नर्मदा खरे

नर्मदा खरे

Wed Apr 01

चॅलेंज

शरदचंद्र वाळिंबे

उभ्या हयातीत वैतागला नसेल इतका इन्स्पे० ज्योतिप्रसाद आज वैतागला होता.

दोन कारणे होती. सकाळपासून सहा वेळा रांगणेकरांचा फोन आला होता, आणि याही वेळी रांगणेकरांनी त्याची फक्त बिनपाण्याने करायची शिल्लक ठेवली होती. दुसरे कारण होते नंदिनी! ती सिमल्याला तिच्या मावशीकडे गेली होती ती अजून परत आली नव्हती. नंदिनीशी लग्न केल्यापासून ती कधीही त्याच्यापासून एक दिवसापेक्षा जास्त दूर राहिली नव्हती. पण आज तिसरा आठवडा होता. आता नंदिनी जवळ नसल्यामुळे संपूर्ण ब्लॉक त्याला खायला उठल्यासारखा वाटत होता.

ह्या सर्वांत भर म्हणजे, गेल्या तीन महिन्यात इन्स्पे० ज्योतिप्रसादला एकही म्हणावी तशी सनसनाटी घडामोड हाताळायला मिळाली नव्हती. कुठेही दरोडा पडला नव्हता; म्हणावा असा भयानक खून झाला नव्हता. ज्योतिप्रसाद अगदी बेचव जीवन जगत होता.

सातला त्याने ऑफिस सोडले. एकदा त्याच्या मनात आले, ‘स्टर्लिंग’ला पिक्चर टाकावा. थिएटरच्या रोखाने त्याने मोटारसायकल पिटाळलीसुद्धा. पण पाटी पाहूनच त्याने पिक्चरचा विचार गिळला. मायकेल केनचा पिक्चर होता. बोगस!

काय करावे ह्या विचारात तो ‘एंपायर’ थिएटरपर्यंत आला. पुन्हा त्याने विचार बदलला, आणि पुन्हा ‘स्टर्लिंग’. असे किमान तीन-चार वेळा झाले. शेवटी त्याने धाडस करून तिकीट काढले आणि बाल्कनीत जाऊन तो सीटवर बसला, तेव्हा पिक्चरची टायटल्स सुरूही झाली होती. पिक्चर जुनंच होतं - ‘द मॅगस’!

पुढचे नाव पाहून तो खूश झाला - अँथनी क्वीन! भन्नाट अ‍ॅक्टर मानत होता ज्योतिप्रसाद त्याला. मात्र अर्ध्या तासापलीकडे तो पिक्चर पाहू शकला नाही. सरळ जिना उतरून त्याने मोटार सायकलला किक् दिली. ज्योतिप्रसादचा चेहरा मोडीत निघालेल्या भांड्यासारखा झाला होता. सगळाच वैताग! निदान पिक्चर तरी चांगलं निघावं! तेही नाही.

विचार दूर करण्यासाठी त्याने मोटारसायकलला तुफान वेग दिला आणि सबवेकडे गाडी सोडली. भायखळ्यातून त्याने डबल रोडवर मोटारसायकल घेतली तेव्हा रहदारी रोडावली होती. साडे-दहा वाजून गेले होते. ह्यूम हायस्कूलपुढे त्याने सफाईदार वळण घेतले आणि गाडी दादर टी. टी.च्या रोखाने सोडली. नायगाव नाक्यावरून त्याने ब्रॉडवेकडे वळण घेतले, आणि सेंट्रल रेल्वे लाईन क्रॉस करून तो दादर-पूर्व भागात आला. इथे रहदारी तुरळक होती. त्याला पार्ल्याला जायचे होते. तुफान वेगात गेला तर दहा मिनिटांत तो फ्लॅटचा दरवाजा उघडून आत गेला असता.

हेच त्याला नको होते.

राम मंदिरापासून त्याने मोटारसायकल स्लो केली आणि आपटे स्कूलच्या बोळात घेतली. साडे-अकरापर्यंत दादरमध्येच भटकायचा त्याचा विचार होता. आता तो बोळाबोळातून फिरत होता. गोखले रेस्टॉरंटकडून त्याने उजव्या हाताला वळण घेतले. दोन बोळवजा रस्ते मागे टाकून तिसऱ्या बोळात त्याने गाडी घातली. हल्ली मुंबईत एक नवेच फॅड निघाले होते. प्रत्येक बोळाचे नाव बदलायचा कॉर्पोरेटरांनी धडाका लावला होता. सेनापती बापट रस्ता. हिरे चौक. कर्मवीर, धर्मवीर, रावबहादूर - आणि पुढे रस्त्याचे नाव!

तीन नंबरच्या बोळातून कोहिनूर मिल्सकडे जायचा त्याचा विचार होता. त्याने साठ स्पीडमध्ये गाडी घेतली. डी. एल. वैद्य रोडवर तो जाणार होता. पुन्हा त्याने विचार बदलला. उलट वळून त्याने वळण घेतले, आणि दोन नंबरच्या बोळात हँडल वळवले. आता ज्योतिप्रसाद तोंडाने शिटी वाजवत होता. उद्योग नव्हता दुसरा! बोळ संपला. पुढे काय? हा खोखोचा खेळ किती वेळ खेळायचा? शेवटी त्याला फ्लॅटवर जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याने हॅण्डल वळवले. आणि त्याने वेगात धावणाऱ्या गाडीला ब्रेक मारला!

त्या शांत वातावरणात एक भयानक किंकाळी त्याच्या कानावर आली होती.

कुणातरी तरुणीने जोव तोडून किंकाळी ठोकली होती. पाठोपाठ दुसरी किंकाळी आली – पहिलीपेक्षा जीवघेणी. जीवाच्या आकांताने कोणी स्त्री किंकाळी फोडून गेली होती. अशी किंकाळी, की कुणीही घाबरून जावे.

ज्योतिप्रसादने आवाजाचा अंदाज घेतला आणि त्या दिशेने वाऱ्यासारखी मोटारसायकल पिटाळली. अजून एखादी किंकाळी यायच्या आत तेथे पोहचायचा त्याचा विचार होता. दोन वळणे घेतल्यावर त्याच्या लक्षात आले, आपण पूर्वीच्याच मार्गावर आलोय. पुन्हा त्याने रेसची ग्रिप फिरवली. आता त्याच्या अंदाजाप्रमाणे तो आवाजाच्या जवळ पोहचला होता. क्रॉस लेनचा रस्ता अगदी जवळ आला होता. त्याने गाडी दोन्ही रस्त्यांच्या मध्ये उभी केली आणि आवाजाचा कानोसा घेतला. आता रस्त्यावर विरुद्ध बाजूच्या गल्लीत धावपळ चाललेली त्याच्या कानावर आली, आणि त्याने आवाजाच्या रोखाने मोटारसायकल सोडली. एका बोळाच्या तोंडाला बरीच गर्दी जमली होती. मोटारसायकल स्टँडला लावून तो गर्दीत शिरला… आणि तो पाहतच राहिला!

गर्दीच्या कड्यात एक तरुणी पडली होती. एक हात मागे घेऊन ती तोंडावर पडली होती, आणि तिच्या पाठीत एक सुरा खुपसलेला होता. दुसरा सुरा पाठीतच जरा खालच्या बाजूला होता - अचूक हृदयाची जागा हेरून तो खुपसला होता.

गर्दीच्या कोपऱ्यात एक तरुण घाबरून उभा होता. त्याचे दोन्ही हात दोन बॉम्बे पोलिसांनी धरले होते. तो इतका घाबरला होता की नुसतीच मान हलवून नकार देत होता. त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हता.

इन्स्पे० ज्योतिप्रसाद झटक्यात पुढे झाला. तोपर्यंत हवालदाराच्या हुद्द्याचे दोन पोलीस तिथे आले होते.

“हवालदार, गर्दी मागे घ्या.” सहज बोलून गेला इन्स्पे० ज्योतिप्रसाद.

“होय साहेब.”

“तुझं नाव?” इन्स्पे० ज्योतिप्रसादने दुसऱ्याला विचारले.

“व्यंकटेश महाजन.”

“नंबर?”

“तेवीस अकरा.” हवालदार उत्तर देत होता.

“चौकीवर जा. इन्स्पेक्टरना रिपोर्ट दे.”

“साहेब!” धावतच तो हवालदार निघाला.

“आणि तुझा नंबर?”

“सतरा तीन.”

“सी० आय० डी० ऑफीसला फोन कर. खून झाल्याची वर्दी दे.”

“होय, साहेब.”

तासाभारत त्या लहानशा चौकात प्रदर्शन भरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. एक अँब्युलन्स हेडचा लाल दिवा लुकलुकवत तिथे येऊन पोचली. ठसेतज्ज्ञ जमले. भराभर त्या तरुणीच्या प्रेताचे फोटो घेण्यात आले. डॉक्टरांनी प्रेताची तपासणी केली. प्रेत अँब्युलन्सच्या मागच्या बॉडीत सारण्यात आले, आणि आली तशीच अँब्युलन्स वेगात निघून गेली. फोटोग्राफर्सचेही काम आता संपले होते. ठसेतज्ज्ञांना फक्त दोन बुटांचे अगदी वेगळ्या प्रकारचे ठसे मिळाले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तापलेल्या डांबरी रस्त्यावर ते ताजे ठसे लगेच नजरेत भरले होते. तीन तासांत तो चौक निर्मनुष्य झाला, आणि इन्स्पे० ज्योतिप्रसाद त्या धरून ठेवलेल्या तरुणाकडे वळला.

“तुझं नाव?” पायापासून डोक्यापर्यंत त्याला निरखत ज्योतिप्रसादने पहिला प्रश्न विचारला.

“योगश… योगेश अभ्यंकर.”

“ही तरुणी कोण?”

“मला खरोखर काहीच माहीत नाही. मी तिला आजच पाहतोय.”

“तुझ्याबरोबर होती?”

“नाही, मी घरी निघालो होतो.”

“कुठे भेटली?”

“भेटली नाही. तीही चालत होती. माझ्या मागे होती.”

“का?”

“माहीत नाही.” पोरगा भयानक घाबरला होता. ज्योतिप्रसादच्या मते असला तरुण खुनासारखे धाडस करणेच शक्य नव्हते.

“बरं जा, पण हे बघ. उद्या बोलवू तेव्हा हजर राहवं लागेल.” त्याच्या रडवेल्या चेहऱ्याकडे बघत ज्योतिप्रसाद सहानुभूतीने त्याचा खांदा दाबून म्हणाला.

“हो हो, राहतो,” त्या तरुणाच्या मनावरचे निम्मे ओझे कमी झाले.

“थांब. हवालदार, याचा पत्ता लिहून घे, आणि उद्या याला माझ्या ऑफिसात घेऊन ये.”

हवालदाराने पत्ता लिहून घ्यायचा अवकाश, ‘जा’ म्हणून सांगायच्या आधीच तो तरुण धावत निघाला.

**

ज्योतिप्रसाद आता ह्या खुनाबद्दल विचार करत होता. त्या तरुणीच्या हातात एकूण तीन वस्तू होत्या - पिशवीसारखी चौकोनी बास्केट, मोठी पर्स आणि खांद्याला थर्मास. ती इतक्या रात्रीच्या वेळी कुठे निघाली असेल?

आपण जास्त विचार करत राहिलो तर झोपेचे खोबरे होईल, असं मनात आल्यावर मोटारसायकलला किक् मारून त्याने स्टँड पाडला आणि तो पार्ल्याच्या रोखाने निघाला. ब्लॉकवर येईपर्यंत तोच विचार त्याच्या मनात घोळत राहिला. पलंगावर पडल्यावर सर्व विचार बाजूला सारून डोळे मिटले, तरी त्याच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर तीच पालथी, तोंडावर पडलेली तरुणी दिसत होती, आणि तिच्या पाठीत खोल खुपसलेले दोन सुरे.

पेडर रोडवर मुलींचे एक अलिशान हॉस्टेल होते. ‘सोफिया’ हे नाव मुंबईत दोन कारणासाठी प्रसिद्ध होते - एक ‘सोफिया’ कॉलेज आणि दुसरे त्याला जोडलेलं ‘सोफिया’ होस्टेल. अर्थात ह्या दोन्ही संस्था फक्त तरुणींच्या पुरत्याच मर्यादित होत्या. इतरांना इथे मज्जाव होता. बाहेरच्या गुरख्याच्या हातातला दंडुका पाहूनच गेटमधून आत शिरताना चार वेळा विचार करावा लागत असे. ‘सोफिया’ होतेही तसेच! श्रीमंत तरुणींचेच ते कॉलेज म्हणावे लागेल. उंची कपड्यातल्या आणि शानदार कारमधून फिरणाऱ्या बड्यांच्या मुलींचे हे कॉलेज, आणि तीच बाब होस्टेलची. महिना पाचशे रुपये उडवणाऱ्या मुली या होस्टेलवर राहत होत्या.

एक मुलगी मात्र… जी इतर मुलींच्यासारखीच रुबाबात, भपक्यात राहत होती; छानछोकीत वावरत होती; उंची कपड्यात फिरत होती - मालिनी पानसे तिचे नाव. फार तर एकवीस वर्षांची तरुणी. बांधा सुबक, नजरेत भरावा असा. चेहरा हसरा, बोलका, आणि गालावर खळी ही मालीला मिळालेली अशी देणगी होती, की पाहणाऱ्याला वाटावे, तिच्या गालाची खळीच पाहत बसावे. जिच्या तारुण्याने सर्व प्रकारे पूर्ण रूप घेतले असावे अशी ती तरुणी होती. इतर तरुणी तिच्या त्या रूपाचा तिरस्कार करत. लाखात उठून दिसेल अशी मालीची रूपसंपदा होती.

मालीने कॉलेज कधीच चुकवले नाही - एम० ए०च्या फर्स्ट पार्टला ती होती. पण ती अतिशय खटपटी. नाना उद्योग करायची. ‘सोफिया’सारख्या महागड्या होस्टेलमध्ये ती राहत होती हेच त्यामागचे कारण होते. अशा जगण्यासाठी तिला अनेक धंदे करावे लागत होते. कधी लेख लिहून पैसे मिळव, पेटिंग्ज तयार करून प्रदर्शनात भाग घे, आणि बसल्या बसल्या सुबक विणकाम करून त्याच्यावर चार पैसे गाठीला मार, अशा अनेक धडपडी ही माली पैसे मिळविण्यासाठी करायची.

पण दोन महिन्यांपूर्वी का कोण जाणे, पण मालीत आमूलाग्र बदल झाला. पूर्वीची खटपटी माली जशी काही संपून गेली. आता ती पूर्वीसारखे कष्ट करत नव्हती. पूर्वीसारखा अभ्यासही ती आता करत नव्हती. कॉलेज सुटल्याबरोबर न रेंगाळता बाहेर पडत होती.

त्या दिवशीसुद्धा कॉलेज संपल्यावर ती दमून होस्टेलवर खोलीत येऊन पडली. पाच वाजून गेले होते. रात्रभर तिने जाग्रण केले होते. कधी एकदा जेवून झोपतेय असे तिला झाले होते, आणि त्याच वेळी रूमच्या दारावरची बेल वाजली. ‘काय कटकट आहे,’ असा चेहरा करून तिने दार उघडले, तर बाहेर होस्टेलची मोलकरीण उभी होती.

“मालीबाई, तुमचा फोन आलाय. बड्या बाईंनी निरोप द्यायला सांगितला.”

माली गडबडीने रूम लॉक करून निघाली. ती वॉर्डनच्या ऑफिसात आली तेव्हा वॉर्डन मिसेस बारुआ तिचीच वाट पाहत होत्या. समोर टेबलावर रीसिव्हर ठेवला होता होल्ड करून. तिने रीसिव्हर उचलून कानाला लावला.

“येस, माली स्पीकिंग.”

“पानसे, मी बोलतोय.” पलीकडून गंभीर धारदार आवाज आला.

“कोण बोलतंय?” मालीला तो आवाज अपरिचित होता.

“नाव विचारू नकोस, माली. नीट ऐक. तुझ्याकडे तीन अस्सल पाणीदार मोती आणि आठ लाख रुपयांच्या शंभराच्या नोटा आहेत.” माली क्षणभर दचकली.

“असं कोण म्हणतंय?”

“मीच. माली, ती रक्कम आणि मोती तूच कुठेतरी ठेवले आहेस, हे मला पूर्ण माहीत आहे.”

पलीकडून ठाम आवाज आला आणि माली हादरली - ह्या माणसाला आपल्याजवळच्या पैशांबद्दल माहीत कसे झाले? समोर बसलेली वॉर्डन आता तिच्याकडे संशयाने पाहायला लागली होती. जरी तिला मराठी समजत नव्हते तरी मालीला जास्त बोलता येणार नव्हते. चुकून जरी एखादा शब्द निसटला तरी आजपर्यंत गुप्त राखलेल्या योजनेवर पाणी पडणार होते.

“तू कोण बोलतोयस?” तिने हलक्या आवाजात विचारले.

“ते तुला समजणार नाही. तुला मरायचं नसेल, तर मी सांगतो तसे कर.”

“तू कोण बोलतोयस हे कळेपर्यंत मी काहीच ऐकायला तयार नाही.”

“माली, तुला स्वतःच्या हाताने मृत्यू ओढवून घ्यायचाय तर…”

“माझ्याकडे पैसे नाहीत. तुझ्या डोक्यात कोणीतरी भरवलेले दिसते.”

“माझी बातमी खोटी नाही. शेवटचे ऐक. उद्या दुपारी तीन वाजता निळा सूट घातलेला माझा एक माणूस ब्रॉडवे थिएटरच्या बाहेर उभा असेल. सर्व रक्कम असलेली अ‍ॅटॅची त्याच्याजवळ तीनपर्यंत पोचायला हवी.”

“माझ्याकडे ती रक्कम नाही.”

“नाही? तर मग ऐक. माली, तुला आता कोणतीही शक्ती वाचवू शकणार नाही.” ह्या कठोर शब्दांबरोबर पलीकडून फोन कट केल्याचा आवाज झाला.

कितीतरी वेळ रीसिव्हर तसाच कानाला लावून माली पुतळ्यासारखी उभी होती. भीतीने थरथरत होती आणि तिचे सर्वांग घामाने ओले झाले होते.

“व्हॉट हॅपन्ड, माली?” वॉर्डनने घाबरून विचारले तेव्हा कुठे माली भानावर आली. ती झटपट सावरली.

“माझे अंकल सिरीयस आहेत. त्यांना अ‍ॅक्सिडेन्ट झालाय,” तिने सफाईने सारवासारव केली. “मॅडम, मला पाच-सहा दिवसांसाठी घरी जायचंय.”

“सर्टनली! तू कधीही जाऊ शकतेस.”

**

माली वॉर्डनच्या ऑफिसातून बाहेर पडली आणि धावत खोलीत आली. एका बास्केटमध्ये तिने दोन साड्या घातल्या. उशीचा अभ्रा काढला, आणि आत असलेली शंभराच्या नोटांची दोन बंडले गादीवर पडली. दोन्ही बंडले तिने पर्समध्ये ठेवली. अर्ध्या तासात तयार होऊन ती बाहेर पडली. ती अ‍ॅड० राजसिंहला फोनवरून सर्व सांगणार होती.

पुढच्या दहा मिनिटांत ती पेडर रोड नाक्यावर पोचली आणि तिची नजर टेलिफोन बूथ शोधू लागली. चौकातला तिचा सवयीचा सार्वजनिक बूथ नुकताच बॉम्बे टेलिफोन्सने हलवला होता. कलेक्शन घ्यायला येणाऱ्या सेंटरला सहा वेळा कॅशच्या डब्यात नाण्यांऐवजी दोन किलो वाळू मिळाली होती. काही चहाटळ मुलांनी त्या टेलिफोनची मोडीत वासलात लावली होती. शेवटी जवळच्याच इराण्याच्या हॉटेलात जेव्हा तिने फोनसाठी पाय ठेवला, तेव्हा आपल्यावर कुणीतरी नजर तर ठेवून नाही? अशी शंका तिच्या मनाला चाटून गेली.

घाईघाईने तिने डायल फिरवला. एक महत्त्वाचा नियम ती मोडत होती. कुणीही कुणाला फोन करायचा नाही असा त्यांच्यात एक अलिखित करार होता, पण आज तिचा नाईलाज होता. तिने नंबर फिरवला - टू, सेवन, थ्री, झिरो. उतावीळपणे ती दोन मिनिटे थांबली, पण पलीकडे रीसिव्हर उचलला जात नव्हता. ती फोन ठेवणार, तेवढ्यात पलीकडून तो उचलल्याचा आवाज आला.

“हॅलो, राजसिंह? मी माली बोलतेय.”

“काय झालं, माली?” पलीकडून तिला हवा तो आवाज आला. निम्मे ओझे कमी झाले तिच्या मनावरचे!

“राजसिंह, मला अर्ध्या तासापूर्वी फोन एक आला होता.”

“कुणाचा?”

“कुणीतरी अज्ञात बोलत होता. राजसिंह, त्याला आपल्या ऑपरेशनचा पत्ता लागलाय.”

“काय?” राजसिंह आश्चर्याने ओरडलाच.

“होय. तो आठ लाखांची मागणी करत होता. शिवाय तीन मोतीसुद्धा त्याने मागितले.”

“अशक्य!”

“राजसिंह, मूर्खासारखा ओरडू नकोस,” ती अगदी हळू आवाजात बोलली.

“माली, तू कुठून बोलते आहेस?”

“पेडर रोड नाक्यासमोरच्या इराण्याच्या हॉटेलातून.”

“मी लगेच तिथे येतो.”

“नाही, राज… माझ्यावर नजर आहे. तू इथं येणं धोक्याचं आहे.”

“माली, उद्या तोच धोका माझ्यासमोर उभा राहणार आहे.”

“पण उद्या! आज नाही. मी माझं पाहून घेते, तू फक्त नऊच्या सुमाराला दादरच्या ब्लॉकबाहेर माझ्या संरक्षणाची व्यवस्था कर. पुढच्या पाच-सहा दिवसांसाठी मला हॉस्टेल सोडावं लागणार आहे,” एका दमात तिने सर्व भडभड ओकून टाकली. आता ती कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार होती.

“करतो. नऊला बच्चन तिथे हजर होईल.”

“ठीक. आणि राज, तू सावध राहा.”

“तू तुझी काळजी घे,” राजचा आवाज काळजीने ग्रासला होता.

तिने जास्त न बोलता रीसिव्हर क्रेडलवर ठेवला. अगदी सावकाश! मग वळून पन्नास पैशांचे नाणे काचेच्या काउंटरवर उडवून ती बाहेर पडली.

आता ती कमालीची सावध होती. पर्सच्या आतल्या कप्प्यात तिने लहान, पंजात मावणारे पिस्तूल तयार ठेवले. त्याच्या नळीवर आधीच सायलेन्सर बसवून ठेवले. पुढची योजना तिने करून ठेवली होती - नऊपर्यंत बाहेरच वेळ काढून त्यानंतर ती दादरच्या ब्लॉकवर जाणार होती. हा तीन खोल्यांचा ब्लॉक दोन महिन्यापूर्वी राजसिंहने तिला घेऊन दिला होता.

धोका कोणत्या दिशेन येईल हे तिला माहीत नव्हते. टॅक्सीला हात करतानासुद्धा तिने सावधगिरी बाळगून आत आधीच कुणी बसले नाही याची खात्री केली. दहा मिनिटांत टॅक्सी मेट्रोसमोर येऊन पोचली. नऊ वाजेपर्यंत वेळ काढण्यासाठी पिक्चरशिवाय योग्य मार्ग तिच्यासमोर नव्हता. मेट्रो बाहेरच्या मोबाईल लंच व्हॅनमधून दोन घास तिने पोटात घातले. सकाळी ब्रेकफास्टसाठी सहा सँडविचेसचे पार्सल करून घेतले, आणि तिकीट काढून ती थिएटरमध्ये शिरली. इतकी सावध ती कधीही राहिली नव्हती, आणि तरी आपल्यावर कुणाचीतरी नजर आहे असे तिला थिएटरमध्येसुद्धा वाटत राहिले. एकाच गोष्टीचे समाधान होते - तिच्या अंदाजाप्रमाणे तीन तास तरी तिला धोका नव्हता. इतक्या गर्दीत, सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता कमीच होती.

पिक्चर संपला. शेजारच्या इराण्याच्या हॉटेलातून तिने सहा ग्लास कॉफी घेतली. आता रात्री बारापर्यंत तरी तिला झोप लागणार नव्हती. आता ती विचार करू लागली - टॅक्सीने प्रवास टाळावा लागणार. रात्रीची वेळ होती. दादरपर्यंत कधीही कसाही तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती. धोका कुठून येतोय हे जोपर्यंत माहीत नाही, प्रत्यक्ष दिसत नाही, तोपर्यंत तिला जपून वागणं भागच होतं.

घाईघाईत ती व्ही० टी० ला आली. तिथेही गर्दीत कुणी तिच्यावर हल्ला करण्याची शक्यता नव्हती. दादरला उतरली तेव्हा दहा वाजून वीस मिनिटं झाली होती. टॅक्सी करायचा विचार तिने परत टाळला, आणि चालतच ती ब्लॉकच्या रोखाने निघाली. रहदारीच्या रस्त्यावरून पुढे क्रॉस लेनला वळसा घालून ती आडव्या गल्लीत शिरली. समोरच एक तरुण चालत होता. त्याला हाक मारावी, निदान ब्लॉकपर्यंत त्याची सोबत मिळेल, असा विचार तिच्या मनात येऊन गेला.

आपल्याला धोका झाला तर ह्याच बोळात होईल, असे तिचे मन वारंवार बजावत होते. जणू सहजच तिने थर्मास डाव्या खांद्याला लटकावला, चौकोनी बास्केटही डाव्याच हातात घेतली. डाव्या काखेत हातातली पर्स अडकवली आणि पर्समधले रिव्हॉल्वर उजव्या हाताच्या पंज्यात तयार ठेवले.

मागे कसलीतरी सरसर झाली. घाबरून तिने मागे मान वळवली. एक सायकल-स्वार मागून येत होता. भीती मनात दाबून तिने पावलं उचलायला सुरुवात केली. सायकल आता जवळ आली होती - अवघी पाच फुटांवर.

त्याच वेळी… तिच्या पाठीत वेदनांचा डोंब उसळला! डाव्या बाजूला. वेदनांनी ती कळवळली. जोरात किंचाळली.

ट्रिगरवरचे तिचे बोट दाबले जाऊन ‘फट’ असा आवाज झाला, आणि त्यापाठोपाठच तिच्या पाठीत परत खसकन काहीतरी शिरले. पुन्हा तिने किंकाळी फोडली, आणि भेलकांडून तोंडावर आपटली. आणि रिव्हॉल्व्हरमधून दुसरी गोळी सुटली, आणि त्याबरोबरच तिच्या हातातले रिव्हॉल्वर उडून दूर जाऊन पडले.

पुढचा तरुण घाबरून उभा असलेला तिने पाहिला. तिची तडफड होत होती आणि पाठीत भयानक वेदना होत होत्या. चाचपडत तिने हात मागे नेला. तो सुरा होता!

अजून एक जीवघेणी कळ उसळली आणि माली संपली. तडफडत, तळमळत संपली!

इन्स्पे० ज्योतिप्रसाद आज अगदी थक्क झाला होता. आठ वर्षांच्या सर्व्हिसमध्ये त्याने अनेक खुनांचे प्रकार पाहिले होते, सोडवले होते, पण काल त्याने पाहिलेला खून अगदीच अजब प्रकारचा होता. ज्या हत्यारांनी खून झाला ते दोन्ही सुरे आता त्याच्यासमोर टेबलावर पडले होते. त्यांचा आकार फारच चमत्कारिक होता. साधारण सुरे पुढच्या बाजूला चपटे आणि निमुळते होत जाऊन अगदी पुढे टोकदार असतात. हे सुरे रचनेने वेगळे होते. त्यांचा पुढचा भाग लाकडाला भोक पाडायच्या गिरमिटासारखा त्रिकोणी होता आणि त्याच्या तिन्ही बाजूंना धार होती. मागे चपटा होत होत त्याचा आकार निमुळता बनला होता. सकाळी ऑफिसात आल्यापासून गेल्या वीस वर्षांतल्या सुरे फेकणाऱ्या खुन्यांचे रेकॉर्डस् त्याने तपासले होते, पण ह्या प्रकारचे सुरे वापरणारा एकही खुनी रेकॉर्डमध्ये नव्हता.

इन्स्पे० ज्योतिप्रसाद गोंधळला होता. त्या तरुणीच्या जखमा तपासण्यात आल्या होत्या. सकाळी येतानाच सायन हॉस्पिटलला थांबून त्याने डॉक्टरांचा रिपोर्ट ऐकला होता. डॉक्टर मिरचंदानी खून-खटल्यात अगदी तज्ज्ञ मानले जात, आणि तरीही ज्योतिप्रसाद त्यांचा रिपोर्ट वाचताना साशंक झाला होता.

“डॉक्टर, या खुनाबद्दल तुम्हांला काय वाटतं?” इन्स्पे ज्योतिप्रसादने न राहवून विचारले.

“इन्स्पेक्टर, मी अनेक खून पाहिलेत, पण ही सुरा फेकण्याची पद्धतच विलक्षण आहे. अगदी असं समजा, की सुरा बंदुकीतून फेकला, तरीही तो असा शिरणार नाही. ही फेक अगदीच निराळी आहे.

“आता हेच पाहा - मृत स्त्रीच्या जखमेचे व्रण,” टेबलावर पडलेल्या कागदावर डॉक्टरांनी दोन्ही जखमांची जमतील तशी रेखाचित्रे काढली होती.

“हा सुरा दोन मणक्यांना छेदून आत घुसलाय. कितीही ताकदीने आत सारला तरी अशी जखम होणार नाही. आणि हा दुसरा सुरा खालून वर आलाय, आणि सरळ हृदयच बर्स्ट झालंय. दुसर्‍या सुऱ्याच्या घावानेच ती मेलीय.”

“मी मानतो. पण मग तुमचं मत तरी काय?” ज्योतिप्रसादला दिसत होतं की डॉक्टर ह्यापेक्षा जास्त माहिती देऊ शकणार नाहीत.

“वेगवेगळ्या प्रकारच्या आघातांचा मी अभ्यास केलाय. समजा, ह्या ठिकाणी सुरा नसता, तर ज्या ताकदीने हे आघात केले गेले आहेत, ते पायाने किंवा लाथेने केले आहेत असं कोणत्याही डॉक्टरने रिपोर्टमधे नमूद केलं असतं.”

“पायाने?” इन्स्पे० ज्योतिप्रसाद थक्क झाला.

“ज्या प्रकाराने हे फटके बसलेत ते आघात पायानेच होणं शक्य आहे.”

“तशा खुणा सापडल्या?”

“हो, पण इथेही गोंधळ उडालाय. कारण अशा प्रकारचा बूट अस्तित्वात असेल असं मला तरी वाटत नाही.”

“कोणत्या प्रकारचा?” इन्स्पे० ज्योतिप्रसादने न राहवून विचारले.

“लोखंडी! कोणत्यातरी अतिशय कठीण अशा धातूचा बूट असावा.”

आता टेबलावरच्या सुऱ्यांकडे बघत ज्योतिप्रसाद विचार करत होता. भर रस्त्यावर हा खून झाला. त्याच सुमारास तिथे हजर असलेला तरुणही पोलिसांच्या हातात सापडला, पण खुन्याला कुणाही पकडले नाही. त्या तरुणीच्या हातातील सर्व वस्तू आता त्याच्या टेबलावर हजर करण्यात आल्या होत्या. एक पर्स, एक थर्मास आणि एक चौकोनी बास्केट. बास्केटमधे दोन साड्या, दोन घडी केलेले ब्लाऊज आणि एक टॉवेल, एक टॉयलेट सेट आणि एक मेकअपची पेटी. ह्यांत विशेष असे काही नव्हते.

पण मग ज्योतिप्रसादने पर्सच्या दोन्ही कप्प्यांची चेन ओढली आणि सरळ पर्स उलटी केली, आणि तो आश्चर्याने पाहतच राहिला! शंभराच्या नोटांची दोन बंडले होती. इतकी मोठी रक्कम ह्या तरुणीजवळ कशी? वीस हजार ही काही लहानसहान रक्कम नव्हती, आणि सहज फिरायला बाहेर पडलेल्या तरुणीजवळ तर नाहीच नाही. पर्समधील इतर सामानात एक किल्ली होती. बहुधा ती राहत असलेल्या जागेची असावी. त्याची नजर त्या सामानात असलेल्या आयडेंटिटी कार्डवर पडली. डाव्या बाजूला त्या तरुणीचा फोटो होता. खाली नाव होते - ‘मालिनी पानसे’. कॉलेजचे कार्ड होते ते आणि त्यावर होस्टेलचा पत्ता होता!

आता हे खून प्रकरण वेगळाच रंग घेत होते. पेडर रोडवर असलेल्या सोफिया कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी. तथेच होस्टेलवर राहणारी. इतक्या रात्रीच्या वेळी ती दादरला काय करत असावी?

त्याच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती - हे प्रकरण फक्त खुनापुरते मर्यादित नसणार. भराभर त्याने टेबलावर पसरलेल्या सर्व वस्तू कपाटात टाकल्या आणि तो निघाला.

तासाभरात तो सोफिया कॉलेजच्या होस्टेलच्या वॉर्डनसमोर खुर्चीवर बसला होता, आणि एका पोलीस इन्स्पेक्टरला पाहूनच वॉर्डन मिसेस बारुआ हादरली होती.

“आपल्याला काय हवंय?” तिने भीत भीत विचारले.

“हा फोटो ओळखता?” आय कार्डातील फोटो वार्डनसमोर धरत त्याने विचारले.

“हो! माली पानसे.”

“सध्या होस्टेलवर आहे?”

“छे. ती कालच परगावी गेलीय.”

“कुठे?”

“पण इन्स्पेक्टर, तुम्ही हे का विचारताय?”

“कारण तुमच्या ह्या मालिनी पानसेचा काल रात्री दादर भागात खून झालाय.”

“काय? खून?” घाबरून वॉर्डन डोळे फाडून इन्स्पे० ज्योतिप्रसादकडे पाहतच राहिली. तिचा त्या बातमीवर विश्वास बसेना.

“हे पाहा बाई, गेल्या दोन-तीन दिवसांत तिला कुणी भेटायला आलं होतं?”

“नाही. मात्र काल दुपारी तिला फोन आला होता.”

“कुणाचा?”

“काही कल्पना नाही. मात्र फोनवर तिला जबरदस्त धक्का देणारी बातमी मिळाली असावी. कारण फोनवर बोलताना ती बरीच घाबरली होती.”

“मला तिची खोली तपासायची आहे.”

“नाही. त्यासाठी तुम्हांला प्रिन्सिपॉलच्या परवानगी घ्यावी लागेल.” घाबरून बारुआ उभी राहिली.

थोड्या संभाषणानंतर इथे ह्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला मिळणार नाही हे इन्स्पे० ज्योतिप्रसादला समजले होते, आणि खोली त्याला नंतर कधीही तपासता येणार होती. शिवाय काल रात्री घटनास्थळी हजर असलेल्या तरुणाची साक्ष अजून बाकी होती. तो सी० आय० डी० ऑफिसात पोचला तेव्हा दोन हवालदार त्या तरुणाला घेऊन हजर होते.

“बसा,” ज्योतिप्रसाद त्याच्याकडे एकटक बघत म्हणाला. तो तरुण त्याची वेधक नजर पाहूनच अर्धा गारद झाला होता.

“हे बघ, घाबरू नकोस. मी तुला फासावर चढवत नाहीय. जितक्या शांतपणे प्रश्नांची उत्तरे देशील तितकी लवकर तुझी सुटका होईल,” त्याला दिलासा देण्यासाठी आणि त्याच्या मनातला भीतीचा पगडा दूर करण्यासाठी तो सहानुभूतीने म्हणाला.

“खरंच सांगतो साहेब, मला काहीच माहिती नाही. पुढे चालत होतो मी. तिची किंकाळी ऐकली तेव्हाच मी गर्रकन वळलो.”

“तू कुणाला पाहिलंस का?”

“हो, कुणीतरी सायकलस्वार मागून येत होता.”

“किती अंतरावरून?”

“अगदी तिच्या मागेच होता.”

“तो थांबला होता का?”

“नाही, पण तिची किंकाळी ऐकून तो धडपडला होता.”

“नंतर काय झालं?”

“पुन्हा तिने किंचाळी फोडली आणि तो पुन्हा धडपडला. साहेब, तिच्या हातात काहीतरी होतं. त्याचा दोनदा ‘फट’ आवाज झाला.”

“सायलेन्सर!” इन्स्पे० ज्योतिप्रसाद स्वतःशीच पुटपुटला. तिच्या सामानात त्याला रिव्हॉल्व्हर सापडले नव्हते. ही एक नवी माहिती होती. शिवाय रात्री जव्हा तो खुनाच्या जागेवर पोचला तेव्हा तसा कोणी सायकलस्वार त्याला दिसला नव्हता.

“अभ्यंकर, तो सायकलवर बसलेला माणूस गेला कुठे?”

“तो घाईघाईत निघून गेला. कुठे माहीत नाही.”

ह्या तरुणाला अडवून काहीही फायदा नव्हता. ज्योतिप्रसादच्या डोळ्यांसमोर आता फक्त तो अज्ञात सायकलस्वार दिसत होता. तो कोण होता आणि खून झाल्यावर तो तिथे न थांबता का पळून गेला या एकाच विचाराभोवती इन्स्पे० ज्योतिप्रसादचे मन फेऱ्या घालत होते.

***

दुपारी दोनची वेळ होती आणि फोर्टमधील सुप्रीम एजन्सी या प्रसिद्ध दुकानाच्या दारात एक लंगडा तरुण घोटाळत होता. त्याच्या अंगावर भारी सूट होता आणि डोक्यावर फेल्ट हॅट होती. ज्या काठीच्या आधाराने तो चालत होता, ती काठी मौल्यवान होती. मूठ जाड राजदंडासारखी चांदीच्या नक्षीदार कामाने शोभून दिसत होती. संपूर्ण काठीवर पातळ पिवळ्या पत्र्याचे आवरण होते आणि त्यावरही अप्रतिम नक्षी होती. हल्लीच्या जमान्यात तसली काठी मिळणेच काय, नुसती नजरेला पडणेसुद्धा दुर्मीळ होते. जाणारी-येणारी माणसे वळून वळून त्या लंगड्या तरुणाकडे पाहत होती, आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या काठीकडेच पाहणाऱ्याची नजर खिळून राहत होती.

कोटाच्या आतल्या बटणाजवळ सोनेरी साखळीला लोंबणाऱ्या घड्याळात त्याने पाहिले. तीन वाजत आले होते. तो सरळ पायऱ्या चढून काचेचे दार ढकलून आत शिरला आणि एका प्रशस्त हॉलमध्ये आला. हॉलच्या एका कोपऱ्यात ओळीने तीन केबिनी होत्या आणि त्यांच्याबाहेर असलेल्या पाट्यांवर सुबक अक्षरात नावे कोरलेली होती. पहिल्या पाटीवरचे नाव वाचून तो पुढे सरकला - ‘सुदर्शन मोहिते.’ त्याच्या पायाच्या ठेक्यात होणाऱ्या आवाजामुळे पाठमोरी बसलेली ऑपरेटर सॅली डिसा गरकन वळली.

“कोण हवंय?” डिसाने त्या चमत्कारिक माणसाकडे पाहून विचारले.

“सुदर्शन…”

“ते आज भेटणार नाहीत.”

“का?”

“एका केसच्या तपासासाठी ते पार्ल्याला गेलेत. उद्या सकाळशिवाय ते येणार नाहीत.”

“तुम्ही फोन करून चौकशी करा, किंवा मला नंबर द्या. मी बोलतो.” तो निर्वाणीच्या शब्दात बोलल्यासारखा बोलला, आणि डिसा त्याच्या युरोपियन उच्चाराने भारली.

“तुमचं… नाव?”

“शंकरदेव पानसे.”

“काय, तुम्ही महाराष्ट्रियन आहात?” आश्चर्याने डिसा उद्गारली.

“होतो. सध्या ईस्ट आफिकेत असतो.”

तिने नंबर जुळवला.

“बोल डिसा,” पलीकडून सुदर्शन बोलला.

“शंकरदेव पानसे नावाच्या कुणा ईस्ट आफ्रिकेहून आलेल्या गृहस्थांना आपली भेट हवीय.”

“त्यांना फोन दे.” डिसाने रीसिव्हर त्या लंगड्या गृहस्थासमोर धरला.

“हॅलो सुदर्शन, मीच शंकरदेव पानसे. मला तुमची भेट हवीय.”

“उद्या ऑफिसात या सकाळी.”

“नाही. सुदर्शन, माझ्यासमोर जीवनमरणाची वेळ उभी आहे आणि तुमची भेट घेतल्याशिवाय मला हलता येणार नाही.”

“मग तुम्हांला बराच वेळ वाट पाहत थांबावं लागू शकतं.”

“माझी तयारी आहे.”

**

दुपारी तीनला ऑफिसात आलेला तो लंगडा पानसे नऊ वाजले तरी तिथेच बसला होता. सॅली डिसा रोज सहालाच रस्ता धरायची, पण आज समोर फर्मचे गिऱ्हाईक बसले होते. मनातल्या मनात ती त्याच्या नावाने शिव्या मोजत होती.

नऊ वाजून गेले, आणि एक काळी रोल्स रॉइस भरारत येऊन थांबल्याचे पुढच्या काचेच्या दारातून दिसले. तिच्या पाठोपाठ अजून दोन गाड्या आल्या - एक फियाट, तर दुसरी टॅक्सी. तीन गाड्यांतून तिघे खाली उतरले, आणि दार उघडून ताडताड चालत आत आले. सर्वात शेवटचा सुदर्शन मोहिते होता.

**

“आपण शंकरदेव पानसे?”

“हो, मीच,” उभा राहत पानसे म्हणाला.

“या,” जास्त न बोलता सुदर्शन स्वतःच्या नावाची पाटी असलेले दार उघडून आत शिरला, आणि पानसे त्याच्यामागे गेला.

“बसा.” सुदर्शनने खुर्चीवर बसत एक बटण दाबले आणि एअरकंडिशनचा आवाज सुरू झाला. हे करत असतानाच त्याने अजूनही एक गुप्त बटण दाबले होते, जे इंटरकॉमचे होते. त्याद्वारे त्याच्या खोलीत चाललेले संभाषण शेजारच्या दोन केबिनींमध्ये ऐकू जाऊ शकणार होते. पानसेच्या नकळत अजय आणि अनिलदेखील ते संभाषण ऐकणार होते.

“हं, बोला पानसे, का आला होता?”

“मी कंपालात असतो. सध्या एका संकटात मी सापडलोय,” पानसेने सुरुवात केली आणि तो थांबला. आपल्या बोलण्याचा सुदर्शनच्या चेहऱ्यावर काय परिणाम होतोय हे त्याला पाहायचे होते.

“बोला, मी ऐकतोय.”

“सुदर्शन, मी मूळचा इथलाच, मुंबईतला. आम्ही तिघे भाऊ. दोघे खलास झाले. मी सर्वांत धाकटा. अजून ब्रम्हचारी आहे. असाच राहीन. सर्वांत थोरला - यज्ञदेव - नेव्हीत कॅप्टन होता. तो आठ वर्षापूर्वी वारला. त्याला एक मुलगी - मालिनी. तिच्या तपासासाठी मी मुंबईत आलोय.” शंकरदेवने सुरुवात केली.

“सापडली?”

“नाही. म्हणून तर धावत तुमच्या ऑफिसात आलोय.”

“ती कुठे असते?”

“सोफिया कॉलेजात. एम० ए० करतेय ती. पण आत्ता कॉलेजात नाहीय. दोन दिवसापूर्वी हॉस्टेल सोडून गेलीय. काल सकाळी मी चौकशी केली तेव्हा मला समजले.”

“नातेवाइकांकडे गेली असेल.”

“ते शक्य नाही. तिचा कोणीही नातेवाईक हयात नाही. वडील युद्धात खलास झाले. तिची आई तिला जन्म देतानाच वारली. दोन नंबरचा चुलता - माझा भाऊ, सोमदेव - खाणीत स्फोट झाला त्यात गाडला गेला. त्या वेळी त्यानं लग्नही केलं नव्हतं.”

“तुम्ही हॉस्टेलमधे चौकशी केलीत?”

“हो. परवा ती संध्याकाळी ‘काका आजारी आहे, त्याला अ‍ॅक्सिडेंट झालाय,’ असे सांगून बाहेर पडली. ह्याआधी ती अशी कधीही हॉस्टेल सोडून बाहेर पडली नव्हती. सुट्टीतसुद्धा ती हॉस्टेल सोडून जात नसे. होस्टेलवर राहण्यासाठी प्रिन्सिपलने तिला खास परवानगी दिली होती.

“आणि सुदर्शन, मी धावत तुमच्याकडे आलो त्याला कारण आहे. दहा दिवसांपूर्वी तिचं पत्र मिळालं मला. आपल्यावर फार मोठं संकट येणार आहे, असं तिने पत्रात लिहिलं होतं.”

“तुम्ही इथे येणार हे तिला माहीत होतं?”

“नाही. मी तिला पत्र लिहून तिथून निघालो, पण ते तिला वाचायलाच मिळालं नाही. ते तसंच होस्टेलच्या नोटीस बोर्डावर आहे लटकलेलं.”

“तुम्हांला आलेलं तिचं पत्र पाहू.”

पानसेने कोटाच्या खिशात हात घालून एक इनलँड बाहेर काढले. वर पानसेचा कंपालाचा पत्ता होता. मागे मुंबईचा शिक्का होता आणि सोफिया कॉलेजच्या होस्टेलचा पत्ता होता. आत दोनच ओळी होत्या, पण त्या दोन ओळींत फार मोठा अर्थ भरला होता. भीतीने पछाडलेली ती वाक्ये त्याला सर्व काही सांगून गेली. खरोखरच मालिनी मोठ्या संकटात सापडली होती. पत्राची घडी करून सुदर्शनने ती टेबलावर सारली आणि वर पेपरवेट ठेवला.

“बोला, पानसे. मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?”

“सुदर्शन, ते तर तुम्हीच ठरवू शकता. फक्त मला माझी पुतणी हवी आहे. समजा तिचं काही बरं-वाईट झाले असेल, तर ज्यांची तिला इतकी भीती वाटत होती त्यांना शोधून काढा. त्यांना शासन करा.” कठोर आवाजात पानसे बोलला.

“पानसे, ते नंतर पाहू. आधी या प्रकरणाची थोडी जास्त माहिती हवीय.”

“माहिती? आणि मी काय सांगणार? सुदर्शन तुमचा विश्वास बसणार नाही, पण सत्य हे आहे. माझी पुतणी काळी का गोरी हे सुद्धा मी पाहिलं नाहीय अजून!”

आश्चर्याने सुदर्शन पाहतच राहिला. हा माणूस खरे बोलतोय ह्यावर त्याचा विश्वास बसेना, मात्र पानसेचा चेहरा असा होता की तो खोटे बोलतोय असेही त्याला वाटेना.

“पानसे, नुसत्या ह्या पत्रावरून मी काय तपास घेणार? तुम्ही काही जास्त माहिती सांगितलीत तर बरं होईल.”

“काहीच सांगता येणार नाही मला. सुदर्शन, मी स्वत:च ह्या प्रकाराने इतका हबकलोय की काय करावं, हेच मला सुचत नाही.”

“तुम्ही पोलिसांकडे गेला होता?”

“रोज पेपर वाचतो मी आमच्या देशात, आणि पोलिसांचे खेळ उघड्या डोळ्यांनी पाहतो. पोलीस काही शोधून काढतील यावर माझा विश्वास नाही.”

“पानसे, मी हे प्रकरण स्वीकारलं असं समजा. मात्र एक आहे…” पैशांबद्दल बोलावे का बोलू नये या विचारात सुदर्शन होता, तेवढ्यात पानसेने कोटाच्या खिशात हात घातला आणि एक लांबलचक चेकबुक उघडून टेबलावर सारले. चेकवरचा आकडा पाहून सुदर्शन गप्पच बसला. पन्नास हजार!

“पानसे, बाहेर व्हाउचर करा. पावती मिळेल तुम्हांला.”

“नाही, त्याची गरज नाही.”

“तुम्हांला नसली तरी मला आहे. एक तर हा व्यवसाय माझ्या एकट्याचा नाही, आणि दुसरं, मला ब्लॅकचं लफडं आवडत नाही.”

“ठीक. तुम्ही सांगाल तशी पावती करतो.”

“फक्त तुमच्याच हाताने लिहून द्या.”

लिहिताना शंकरदेव पानसेचा हात किंचित थरथरल्याचा भास सुदर्शनला झाला. प्रकरणाच्या दडपणामुळे असे झाले असावे असा विचार करून सुदर्शनने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा पानसेच्या डोळ्यात थोडी भीतीची रेषा उमटलेली पाहिली, तेव्हा मात्र त्याला आश्चर्य वाटले. ह्याबद्दल तो विचार करत असतानाच रीतसर पावती लिहून पानसे निघून गेला, आणि थोड्याच वेळात अनिल आणि अजय त्याच्या कॅबिनमध्ये आले.

त्रिकूट जमले!

त्रिकूट शांत होते. कोणतीही शक्यता-अशक्यता त्यांच्या डोळ्यांसमोर येत नव्हती.

“सुदर्शन, तुला काय वाटतं?” अनिलने समोरचे इनलँड निरखून पाहत विचारले.

“वाटणं सोड. मुद्दा न् मुद्दा पायापासून तयार करत वर जावं लागेल.”

“हो. आधी त्या पोरीची चौकशी करायला हवी.”

“नाही, नुसती चौकशी नाही. अजय, एकेक भाग आपण वाटून घ्यायला हवा.”

“सुदर्शन, हेच चुकतेय तुझं. तिघांनी एकत्र हालचाली केल्या, तर धोका सोसता येईल. वेगळे वेगळे फिरत राहिलो तर कोण कुठे संपेल सांगता येणार नाही.”

“का? तू घाबरलायस?”

“हो! ह्या प्रकरणाची सुरुवातच अंधारातून झालीय. सुदर्शन, तू काही मांत्रिक नाहीस की डोळे मिटल्यावर सर्व पुढे उभं राहील! चाचपडण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा तिघं एकत्र राहून काम करू या.”

“वेळ जाईल.”

“गेला तर बिघडलं कुठे? आज सुटणारं कोडं उद्या सुटेल.”

“छान! मी माझा प्लॅन रद्द करतो तर मग.”

“वैतागू नकोस!”

“ह्यात वैताग कसला? अनिल, तू काहीतरी सुचव.”

“आपलं तर डोकंच काम करत नाही.”

त्याच वेळी दार उघडले गेले आणि इन्स्पे० ज्योतिप्रसाद आत आला.

“मग अनासिन घे एक डझन!” असं अनिलला सुचवून समोरच्या कोचावर बसत त्याने शर्टचे वरचे बटण काढले आणि आवळलेली टाय सैल केली.

***

“ज्योती! आज इकडे कसा रस्ता चुकलास?” दोन प्रकरणांत खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळे त्रिकूट आणि ज्योतिप्रसाद यांच्यात दुरावा उरला नव्हता. आता सगळा अरे-जारेचा कारभार सुरू झाला होता.

“सुदर्शन, सकाळपासून एका नव्या प्रकरणानं डोकं खाल्लंय. साला, ह्या पोरी नसते उद्योग करतात आणि पोलीस खात्याची तारांबळ उडवतात.”

“कोण?”

“आहे एक… मालिनी पानसे नावाची पोरगी!”

“काय?!” एकाच वेळी तिघेही ओरडले. अजून अर्धा ताससुद्धा झाला नव्हता हे प्रकरण त्यांच्या हातात येऊन, आणि त्या प्रकरणातील एक सनसनाटी धागा आपणहून त्यांच्यासमोर उलगडायला लागला होता.

“का? आश्चर्य कसलं वाटलं तुम्हांला इतकं? अगदी कोरसमध्ये तिघे किंचाळताय?”

“हे वाच!” सुदर्शनने इनलॅन्ड त्याच्या पुढे केले.

त्या दोनच ओळी वाचून ज्योतिप्रसाद हादरला. आता तो समोर बसलेल्या त्या अजब त्रिकूटाकडे पाहू लागला. ज्या कामासाठी तो सुदर्शनची काही मदत मिळेल ह्या आशेने आला होता, त्या संदर्भातच इथे हे त्रिकूट त्याच्या आधीच डाव मांडून बसले होते.

***

“सुदर्शन, ह्या प्रकरणाची सुरुवात चमत्कारिक झाली.” ज्योतिप्रसाद भावना गुंडाळून मुद्याकडे वळला. त्याने भडाभडा त्याला असलेली माहिती सांगायला सुरुवात केली.

“ज्योती, जरा दम खा. गडबड करू नकोस. इथं तुझ्यामागे वाघ लागला नाही,” सुदर्शन म्हणाला, आणि स्वतःच्या फटफटीइतकाच वेगात बोलणारा इन्स्पे० ज्योतिप्रसाद गपकन थांबला.

पुढचा अर्धा तास मात्र तो एकटाच बोलत होता आणि त्रिकूट शांतपणे ऐकत होते. ती संपूर्ण कथाच इतकी विलक्षण होती की मधे बोलायचे धाडस एकातही नव्हते. सर्व सांगून झाल्यावर इन्स्पे० ज्योतिप्रसादने त्याला पडलेले प्रश्न विचारायला सुरुवात केली.

“आता तू बोल, सुदर्शन. हे पत्र तुझ्याकडे कसं आलं?”

“मालीचा काका इथे आला होता. ही केस त्याने माझ्या गळ्यात मारली. अजून सुरुवातीलाच चाचपडतोय सर्व, पण तुझ्या केसमुळे आता जरा प्रकाश दिसायला लागलाय.”

“तुझा काय अंदाज आहे?”

“खरं सांगू ज्योती, माझा गोंधळ उडालाय ह्या प्रकरणात. कारण सुरुवात कशी करायची हेच समजत नाही.”

“माझीही तीच अवस्था झालीय. आता हेच पाहा. ती तरुणी - माली नावाची.” टेबलावरचा कागद समोर ओढून त्यावर फुली मारत ज्योतीने ह्या प्रकरणाचा आराखडा उतरवायला सुरुवात केली.

“ती राहते पेडर रोडवर. दुपारी तिला कुणाचातरी फोन आला. फोन कुणाचा जरी असला तरी एक गोष्ट स्पष्ट आहे - ती बोलताना कमालीची घाबरली होती. त्यानंतर अर्ध्या तासाने तिने हॉस्टेल सोडलं. असं धरू की ती पाचला बाहेर पडली.

“मी तिची पर्स तपासली. आत मेट्रोच्या दुसऱ्या शोचं तिकीट होतं. अर्थ स्पष्ट होतो - नऊपर्यंत ती थिएटरवर होती.”

“आता प्रश्न हा… ती थिएटरवर का होती? ती घाबरली असं गृहीत धरलं तर ती सिनेमा पाहत बसली होती हा प्रकार जरा विसंगत वाटतो.” अनिल म्हणाला.

“माझा अंदाज आहे, तिला नऊपर्यंत वेळ काढायचा होता,” ज्योती म्हणाला. “त्यानंतर ती दादरला आली. ते तिकीटसुद्धा तिच्या पर्समध्ये मिळालं. व्ही० टी० ते दादरपर्यंतचा प्रवास तिने लोकलने केला. बहुधा गर्दीत ती टी० सी० ला तिकीट न देता बाहेर पडली असावी. नंतर चालत ती कुणाला तरी भेटायला निघाली असणार. कोणाला, हे समजायला हवं,” दुसरी फुली मारत ज्योतिप्रसादने त्यांच्याकडे पाहिले.

“इथे मधे तिचा खून झाला. सुदर्शन, खून कसा झाला हे तू उद्या प्रत्यक्षच पहा. डॉक्टर मिरचंदानीना तू ओळखतोस. या माणसाने किमान हजार खुनांची अचूक स्टेटमेंट्स सादर केली असतील कोर्टात. पण या खुनाच्या प्रकरानी तेसुद्धा आश्चर्यात पडलेत. इतका तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा ह्या खुनाने गडबडलाय.”

“खून झाला तरी कोणत्या हत्याराने?” सुदर्शन प्रथमच प्रश्न विचारत होता.

“तीही आश्चर्याची बाब आहे. सुरा वापरलाय. विचित्र सुरा.”

“विचित्र?”

“हो. कुकरीपासून बूमरँगपर्यंत अनेक सुरे मी पाहिलेत, पण असा सुरा नाही पहिला,” असे म्हणत ज्योतिप्रसादने कोटाच्या खिशातून कागदात गुंडाळलेले एक लांबुडके पुडके काढून टेबलावर ठेवले. सुदर्शनने कागद उलगडला तर आतमध्ये तोच विचित्र सुरा होता. सुदर्शनइतकेच अनिल आणि अजयही आश्चर्याने त्या सुऱ्याकडे पाहू लागले.

“सुदर्शन, खरा प्रकार अजून बाकी आहे. ह्या मालीच्या पर्समध्ये दोन शंभराच्या नोटांची बंडले मिळाली. इतकी मोठी रक्कम तिच्या जवळ कशी हे एक कोडं आहे. ती कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी आणि अशी रक्कम तिच्या जवळ कशी हा प्रश्न महत्त्वाचा आहे.”

“तू चौकशी केलीस? दरोड्याचा तर प्रकार नाही?”

“काही सांगता येत नाही. मी उद्या सर्व बँकांना नोटांचे नंबर कळवणार आहे.”

“ही तरुणी दादरमध्ये का होती याचा तपास केलास? मला त्याबद्दल वेगळाच वास येतो आहे. ती जर घाबरली होती, तर ती दादरमध्ये कुणाच्या तरी आश्रयाला आली असणार.”

“शक्य आहे.”

“ज्योती, तू उद्या एक काम कर. तिच्या गेल्या महिन्यातल्या हालचालींची मिळवता येईल तितकी माहिती मिळव. कदाचित एखादा नवा दुवा मिळेल.”

जेव्हा इन्स्पे० ज्योतिप्रसाद आणि त्रिकूट या विचित्र खुनाबद्दल कीस काढत बसले होते, नेमक्या त्याच वेळी हॉटेल रिट्झमध्ये एक भयानक चौकट जमली होती.

रिट्झ हॉटेलच्या डायनिंग हॉलच्या उजव्या कोपऱ्यात शेवटच्या टेबलावर चार जण अगदी बारीक आवाजात बोलत बसले होते. चौघांचेही पोशाख भपकेबाज असले तरी त्यातले दोनच जण जरा सभ्य वाटत होते. त्या दोघांतील पहिला होता अ‍ॅडव्होकेट राजसिंह. त्याने बदामी रंगाचा सूट घातला होता आणि त्याच रंगाची गडद टाय गळ्याभोवती आवळली होती. कोटाच्या वरच्या खिशात त्याच रंगाचा रुमाल खोवला होता. हा राजसिंह त्या चौघांत उठून दिसत होता.

दुसरा होता डॉक्टर माजगे. सूट नसला तरी तो अप-टु-डेट होता. त्याने केस वाढवले होते आणि रात्रीची वेळ असूनही डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा, डार्क काचांचा गॉगल होता. बहुधा तो नंबरचा चष्मा असावा. हा डॉक्टर वारंवार डोळ्यांवरचा गॉगल काढून खिशातल्या रुमालाने पुसत होता. ही त्याची नेहमीची सवय असावी.

त्याच्यासमोर दोघे बसले होते. पहिला होता बच्चन. शाम बच्चन! हे जबरदस्त पात्र होते. हा किमान दहा-बारा वेळा येरवड्याची हवा खाऊन आला होता, आणि तीस वर्षे वयाचा शाम बच्चन त्यामुळेच वयस्कर वाटू लागला होता. जेलमधे त्याची गोरी कातडी रापली होती. गालावर आणि भिवयांजवळ जखमांच्या लांब खुणा होत्या. शाम बच्चनच्या प्रतापाच्याच त्या खुणा दिसत होत्या.

शाम बच्चनच्या शेजारी बसला होता शंभू भोसले. देहाने कमालीचा राकट आणि चेहरासुद्धा तितकाच राकट. हा बच्चनपेक्षा काकणभर सरसच होता, पण फरक इतकाच की त्याने अजून जेलची हवा चाखली नव्हती.

खाताना सर्व शांत होते आणि सारखे दाराकडे पाहत होते. ते कुणाची तरी वाट पाहत असावेत.

“बच्चन…तो बघ आला.”

मान न वळवता डोळ्यांच्या कोपऱ्यांमधून सर्वांनी प्रवेशद्वाराकडे पाहिले. उंच, धिप्पाड देहाचा एक तरुण घाईघाईत आत आला. कुठेही न पाहता तो सरळ चौघे बसलेल्या टेबलाजवळ आला आणि खुर्ची ओढ्न बसला.

“राज, मालीचा खून झाला,” तो बोलला.

बोलता बोलता त्याने कोटाच्या खिशातला पाईप काढून त्यात तंबाखू भरायला सुरूवात केली. आपल्या बोलण्याचा चौघांवर काय परिणाम झाला होता हे मान वर करून पाहण्याचीही त्याने तसदी घेतली नाही. चौघे मात्र वेड्यासारखे त्याच्याकडे पाहत होते, जणू इतका जबरदस्त धक्का त्यांना कधीच बसला नव्हता. त्याची पाईपमध्ये तंबाखू भरून झाली.

“तीरखां, तुला कशासाठी पाठवले होते?” राजसिंह बोलला. त्याच्या चेहऱ्यावर रागाच्या छटा उमटल्या होत्या.

“हो… पण तू मला पाठवलंस दादरच्या तिच्या ब्लॉकवर. राज, मालीला रस्त्यातच गाठलं होतं. क्रॉस लेनच्या बोळात तिचा खून झाला. सकाळीच मला ती बातमी समजली.”

“आणि तू आत्ता सांगतोयस?”

“हो… राज, तू चिडलास तरी मला पर्वा नाही.” पाइपातून धुराचे भपकारे उडवत नवीन आलेला तीरखां शांतपणे दम खेचत होता. त्याच्या चेहऱ्यात कसलाही बदल झाला नव्हता. “तुला कल्पनासुद्धा येणार नाही इतक्या चमत्कारिक हत्याराने तिचा खून झालाय.”

“झालाय ना पण? आता पुढे काय?” राजसिंह आता निवळला होता.

“पैसे…?”

“हो… तीरखां, तू ब्लॉकमध्ये शिरला होतास?”

“हो. पैसे तिथे नाहीत. मी सर्व सामानाची तपासणी केली.”

“मग पैसे गेले कुठे?”

“होस्टेलवर ठेवले असण्याची शक्यता आहे.”

“नाही तीरखां, रक्कम ब्लॉकवर हलवताना मी स्वतः हजर होतो.”

“तुला काय म्हणायचंय?”

“तीरखां, तू नजर वर कर आधी.”

“का?” रागाने तीरखांने डोळे राजसिंह च्या डोळ्यांना भिडवले.

दोघे एकमेकांना ओळखून होते. क्षणार्धात राजसिंहच्या मनातली शंका पूर्ण निवळली. जर तीरखांने मालीकडचे पैसे लांबवले असते तर इतक्या ठामपणे तो राजसिंहच्या डोळ्यांना कधीही नजर भिडवू शकला नसता.

“तीरखां, माझी चूक झाली.”

“राज, पुन्हा अशी चूक झाली तर ह्या तीरखांची सवय तुला माहीतच आहे,” राजसिंहकडे भेदकपणे बघत तिरखां अशा स्वरात बोलला, की राजसिंह कल्पनेनेच हादरला.

***

सलीम तीरखां हा त्या जमलेल्या पाच जणांत जबरदस्त होता. अख्ख्या मुंबईत ‘तीरखां’ ह्या नावाचा बेफाम दरारा होता. काळ्या वर्तुळांत त्याच्या सावलीलासुद्धा घाबरणारे अनेक दादा लोक होते, कारण एखाद्याला खलास करणे हे तीरखांसाठी चिलट मारण्यासारखे होते.

दहा वर्षांपूर्वी तो भायखळ्यात आला, आणि अगदी पद्धतशीरपणे त्याने आपले वजन बसवले. त्यावेळी सलीम तीरखांची किमान चाळीस माणसांची टोळी होती. खुनापासून बँका लुटण्यापर्यंत, आणि दरोड्यापासून पोलीस स्टेशन जाळण्यापर्यंत त्याने अनेक सुपाऱ्या घेतल्या होत्या. लाखाच्या आत तो काम करत नसे, आणि एकदा काम स्वीकारले की पूर्ण केल्याशिवाय झोप घेत नसे.

एकदा असेच एक जबरदस्त काम त्याच्याकडे आले.

सहा लाखांच्या नोटांची बंडले काम सुरू व्हायच्या आधीच हातात मिळाली होती. काम होते जव्हेरी बाजारातील अमीनचंद जव्हेरीच्या पेढीवर सकाळी कामावर येणाऱ्या सर्व कामगारांना अडवण्याचे. कारण भर दिवसा अकरा वाजता अमीनचंदची पेढी लुटण्याचा एक कट शिजत होता.

तीरखां आदले दिवशीच कामाला लागला. सात सेल्समन, तीन हिऱ्यांना पैलू पाडणारे प्रसिद्ध कारागीर, आणि दुकानाचे रखवालदार वगैरे धरून एकूण पंधरा माणसे त्याच रात्री धावत्या लोकलमधून उडवली गेली. ती घरीही जाऊ शकली नव्हती, तर दुसरे दिवशी कामावर तरी कशी हजर राहणार! दुसऱ्या दिवशी सकाळी बरोब्बर आकराला दरोडा पडला, तेव्हा तीरखां आपल्या माणसांना घेऊन पेढीच्या बाहेर उभा होता. दरोड्याचा माल त्याने ताब्यात घेतला, आणि दरोडा घालणाऱ्या चौघांना त्याने भर रस्त्यात गोळ्या घालून मारले. पंधरात चारांची भर पडली, आणि तीरखां आणि त्याची गँग फरार झाले.

बॉम्बे सी० आय० डी० या अजब दरोड्याने हादरून गेले. सहा महिने तपास सुरू होता. शेवटी केस फाईलला लागली, तेव्हा कुठे तीरखांने ढेकर दिला! असा हा तीरखां होता. अगदी ह्याच्या सावलीलासुद्धा भ्यावे इतका जबरदस्त!

इतक्यात त्याने आपली टोळी बरखास्त केली होती. एक कारण तर आता त्याला ह्या खून-मारामारीचा वीट आला होता. आणि दुसरे, आपले नशीब रोजच आपल्याला साथ देईल ह्याची काय खात्री होती? आता मोजकीच चार माणसे त्याने दिमतीला ठेवली होती. रिट्झ हॉटेलच्या त्या हॉलमध्ये जमलेली ती चार माणसे, हीच त्याची चौकट होती, आणि तीरखां स्वतः बादशहासारखा त्यांच्यावर हुकूमत गाजवू पाहात होता. खरे म्हणजे या चौघांवर त्याची हुकमत जुजबी होती. काय करावे, काय नाही याची प्रत्येकाला मोकळीक होती. कुणाचेही कुणावर बंधन नव्हते. सर्व एकमेकांशी सहकार्याने वागत होते, इतकेच.

मात्र गेल्या पंधरा दिवसापासून त्याच्या संघटनेला जबरदस्त धक्के बसले होते. कुणीतरी हात धुऊन त्यांच्या मागे होते.

***

तीरखांच्या नकळत त्याच्या पापाचा घडा भरत आला होता. काही महिन्यांपूर्वी कशाचीही तमा न बाळगणाऱ्या तीरखांने एक पाखरू जवळ केले होते - माली पानसे. माली कोणी अशी-तशी मुलगी नव्हती. जरी ती त्याला ओळखत नव्हती, तरी तो तिला चांगला ओळखत होता. तिचा आणि क्रूरकर्मा तीरखांचा भूतकाळ एकमेकांत गुंतले होते. मालीला त्याने फार परिश्रमाने पळवले. प्रथम त्याने सरळ तिला भुरळ घातली. तिच्यावर पौरुष गाजवले. त्याच्यासाठी कोणताही त्याग करायला ती तयार झाली होती, तिला फक्त तो हवा होता.

आणि तीरखांला हवी होती संपत्ती - बेसुमार संपत्ती! सोफिया कॉलेजमधे शिकणारी माली पानसे, श्रीमंत बापाची मुलगी माली पानसे - ज्या बापाचा तीरखांने घोर अपराध केला होता, ती माली पानसे - तिला नाहीसे करून तिच्या जागी एक तोतया माली बसवायला त्याला काहीच वेळ लागला नाही.

ह्या नव्या मालीला त्याने आधीच तयार केले होते. ती तिच्या श्रीमंत वर्गमैत्रिणींच्या कुटुंबांची अचूक माहिती काढून आणत होती. बंगल्यांचे, बँकांचे, पेढ्यांचे अगदी अचूक नकाशे त्याच्या हातात पडत होते. लूट करायची, तीही अशा ठिकाणी की काळा पैसाच भरपूर असावा - म्हणजे ज्याची लूट व्हायची त्याला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायला लागावा. अशी अनेक माणसे होती - रोज पाच-दहा साफ केली तरी आयुष्यभर पुरणार होती!

इतकी बेमालूम योजना! पण आज त्या योजनेत कुणीतरी माती मिसळत होतं. कुणीतरी तीरखांचा बाप बनून पुढे आला होता. तो खरंच सामोरासमोर आला असता तर तिरखांने सरळ चुटकीसरशी त्याला उडवला असता, पण जो कुणी अज्ञात त्याच्या मागे होता, तो अंधारातून वार करत होता.

***

सुरुवात झाली बच्चनपासून. प्रथम त्याला फोनवरून धमकी आली. नंतर शंभू भोसलेवर ती पाळी आली - एक निनावी पत्र, त्यात पन्नास लाखाची मागणी. तिसरा नंबर डॉ. माजगेचा लागला होता. आठवडाभर माजगेला रोज चिठ्ठ्या येत होत्या - दर वेळेला कुणीतरी नवा मुलगा चिठ्ठी घेऊन येत होता.

शेवटी पाळी आली होती राजसिंहची. एका सकाळी राजसिंहकडे एक अशील आले. त्याला वाटले ते खरोखरच अशील आहे, पण बोलत असताना काहीतरी भिरभिरीत राजसिंहच्या नाकात शिरले. प्लास्टिकच्या पिस्तुलातून त्याच्या तोंडावर क्लोरोफॉर्म फवारण्यात आले होते. काही कळायच्या आतच राजसिंह खाली आपटला, आणि जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याचे हातपाय बांधलेले होते. कशीतरी त्याने स्वतःची सुटका करून घेतली. टेबलावर एक लखोटा होता, आणि आत स्पष्टपणे त्याला धमकी देणारे पत्र होते. पत्राच्या शेवटी सही करतात, त्या ठिकाणी कोरल्यासारखे दोनच शब्द लिहिले होते - ‘लंगडा भालू’!

तीरखांची ती धाडसी चौकट कुणीतरी गदगद हलवली होती, आणि आज त्या अज्ञाताने आपला पहिला बळी घेतलेला होता. माली पानसे!

“राज, कुणीतरी आपल्याला धुळीला मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने दुसरा बळी घ्यायच्या आत त्याला खेचायचं असं मी आता ठरवलंय,” काहीच झाले नाही अशा रुबाबात तीरखां पाइपातला धूर खेचत बोलला, पण तो बोलत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कोणते भाव दिसतात तेही तो पाहत होता.

“तीरखां, तुला कुणाचा संशय येतो?” राजसिंह आता थोडा सावरला होता, शांत झाला होता.

“कुणाचाच नाही. कदाचीत एकच अज्ञात आपल्या सर्वाना धमकी देतोय. कदाचित तो आपल्यातलाच एक आहे.”

शांतपणे तीरखां बोलला, आणि त्याच वेळी किंचित पाय ओढत एक वेटर जवळ येऊन टेबलाजवळ अदबीने उभा झाला.

“साहेब आपला फोन आलाय,” राजसिंहकडे पाहत वेटर म्हणाला.

“कुणाचा, माझा?” राजसिंहला आश्चर्य वाटले.

“आपल्यापैकी सलीमसाहेब कोण?”

“मी…,” तीरखां सावध झाला.

“फोन आपला आहे मग.”

“आलो, चल.” तीरखां ताडकन उठला.

अशा वेळी कुणाचा फोन असावा याचा विचार करत तो कोपऱ्यातल्या मॅनेजरच्या काउंटरजवळ पोचला. हॉटेल रिट्झ हे जुहू बीचवरील अलिशान हॉटेल होते. तेथे येणाऱ्या श्रीमंत लोकांना शांतपणे फोनवर बोलता यावे म्हणून बूथसारखी पार्टिशनची सोय केली होती. तीरखां सरळ बूथमध्ये शिरला आणि मॅनेजरच्या मागे बसलेल्या ऑपरेटरने दोन स्लॉट्समध्ये पिना सारून त्याला लाईन दिली.

“हॅलो, मी तीरखां.”

“तीरखां, मी लंगडा भालू.” पलीकडून गंभीर धारदार आवाज आला.

“कोण?” आश्चर्याने आणि रागाने तीरखांने विचारले.

“मीच, तीरखां. ऐक. उद्या सकाळी मला तुझ्या सर्व मिळकतीतला निम्मा हिस्सा हवाय.”

“नाही दिला तर तू काय करणार आहेस?” तीरखां ओरडला. त्याचा स्वतःवरचा ताबा गेला होता.

“ते अगदी शेवटी समजेलच. पण त्याआधी तुला एक संधी देतोय.”

“काही गरज नाही. आता माझेच ऐक, भालू. उद्या मीच माझी हालचाल सुरू करणार आहे.”

“उत्तम.”

“भाल्या… तू कितीही अंधारात दडलास तरी मी तुला शोधून काढीन,” रागाने थरथरत तीरखां किंचाळला.

“छान!”

“भाल्या… मी तुला हालहाल करून मारीन.”

“माझी तयारी आहे.”

“मग समोर येऊन लढ.”

“तोही दिवस दूर नाही.”

“तू भेकड आहेस.”

“नाही तीरखां, मी शेर आहे! म्हणूनच तुला सांगतोय. तुझी चौकट निखळणार आहे.” आणि पलीकडून फोन कट झाला.

कितीतरी वेळ तीरखां लालेलाल होऊन थरथरत नुसता उभा होता. चौघांच्या समोर येऊन तो कधी बसला हे त्याचे त्यालाच समजले नव्हते. एखाद्या वेड्यासारखी त्याची अवस्था झाली होती.

“सलीम, कुणाचा फोन होता?” शंभू भोसलेने विचारले तेव्हा कुठे तो भानावर आला.

“लंगड्या भालूचा.” आवाजातली थरथर तो लपवू शकला, पण पाईप शिलगावताना त्याचे हात मात्र चांगलेच कापत होते. चौघे घाबरून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते. तीरखां शांत होऊन धूर खेचत होता, पण त्याच्या डोक्यात भयानक विचारांची उलथापालथ सुरू होती.

रात्रीचे अडीच वाजून गेले होते. हॉटेल रिट्झ अंधारात गुडूप झाले होते. नाही म्हणायला गेटच्या जवळच्या चौकीदाराच्या खोलीत मंद उजेडाचा दिवा जळत होता.

हॉटेलच्या मागचा, नोकरांच्या क्वार्टर्सचा एक दरवाजा हलकेच उघडला. एक वेटर बाहेर आला. आवाज होणार नाही याची खबरदारी घेत त्याने दरवाजा बंद केला आणि सावकाश तो कंपाउंडच्या रोखाने निघाला. चालताना तो एक अधू पाय ओढत होता.

आता तो कंपाउंडला खेटून उभा होता. अचानक त्याने अधू असलेला पाय जोरात जमिनीवर रेटला आणि झेप घेतली. पाच फूट उंचीच्या कंपाउंडच्या भिंतीवर दोन्ही हाताचा दाब देऊन कोलांटी मारत त्याने सहज रस्त्यावर उडी घ्यावी तशी भिंतीपलीकडे उडी घेतली! त्याच्या हालचाली कुणी पाहिल्या असत्या तर एका पायाने अधू असलेला माणूस इतका चपळ असू शकेल यावर त्यांचा विश्वास बसला नसता.

आता तो गडबडीने चालत निघाला, आणि दहा मिनिटांत खार रोडवर आला. उजव्या बाजूला एक बाहेरून टॅक्सीसारखी रंगवलेली जुनी फियाट सरकारी दूध केंद्राच्या बूथजवळ पार्क केलेली होती. तिच्या काचेवर बोटाने खटखट करताच त्याच्या बाजूचे दार उघडले गेले आणि तो आत शिरून बसला.

हेड लाईट चालू करून टॅक्सी निघाली.

“कबीर, फोन केला होतास?” मागच्या सीटवर आडवं होत त्याने आपला अधू पाय लांबवला आणि तो आरामात पसरला.

“हो. बरोबर दहा वाजता.”

“काय झालं?”

“तीरखां रागाने वेडा झाला!”

“रकमेबद्दल बोललास?”

“हो, अर्ध्या रकमेची मागणी केली, तेव्हा तो पिसाळून ओरडायला लागला. “

“कबीर, त्याच्यामागे आता हात धुऊन लागायला हवं.”

“हो. आता गाडी कुठे घेऊ?”

“शंभू भोसलेच्या बंगल्यावर.”

“वरळीला?” ड्रायविंग व्हील संभाळणारा कबीर आश्चर्याने न राहवून उद्गारला.

“कबीर, समोर लक्ष ठेव,” मागून धारदार आवाज आला आणि कबीर भीतीने गारठला.

***

तब्बल दीड तासाने वरळी सी फेसच्या चढावर ती गाडी उभी राहीली तेव्हा रहदारी अजिबात बंद झाली होती. टॅक्सी थांबली, आणि मागचे दार उघडून तो वेटरच्या वेषातला तरुण बाहेर पडला. पाय ओढत तो बंगल्याच्या रोखाने निघाला. बंगला अगदी एकाकी होता. वातावरणात आता किंचित गारठा होता, आणि समुद्रावरून येणारा गार वारा अंगाला बोचत होता.

पाय ओढत त्याने रस्ता ओलांडला तेव्हा त्याच्या हातात धारदार सुरे होते. खाली वाकून त्याने ते अधू पायाच्या बुटात टाचेखाली सारले, दाबले. खट् आवाज झाला. आता त्याच्या अंगात एक प्रकारचा उत्साह संचारला होता. त्याचा पाय आता जोरात ओढला जात होता.

थोड्याच वेळात कबीरही गडबडीने येऊन त्याच्यापर्यंत पोचला.

त्या तरुणाच्या हालचालींत आता एक प्रकारचा उत्साह होता. कंपाउंडपाशी पोचताच त्याने अधू पाय जमिनीवर दाबला आणि उसळी मारली. वर उसळताना दोन्ही हातांचे पंजे भिंतीवर दाबून त्याने आत झेप घेतली. तो पलीकडे कधी गेला हेच कबीरला समजले नाही. अशी उडी आपल्या देवालाही जमणार नाही याची त्याला कल्पना होती आणि तो खजील झाला होता.

पण त्यानेही कसाबसा भिंतीचा वरचा काठ पकडून वर वेंघून पलीकडे उडी मारली, तेव्हा त्याचा साहेब त्याची वाटच बघत होता. आता कबीरला हाताने थांबण्याची खूण करून तो पुढे सरकला. बंगल्यात शिरायला काही धोका नाही याची त्याने पूर्ण खात्री करून घेतली, आणि मनोमन आत कसे शिरायचे याचे गणित केले. अधू पाय दाबून तो बंगल्याच्या रोखाने धावत निघाला. भिंतीपासून चार फुटावर असताना विजेच्या वेगाने झेप घेऊन उसळला.

कबीरला वाटले आज आपल्या डोळ्याचे पारणे फिटले! साहेबाने आपला अधू पाय आपटून त्या उंच भिंतीवर दुसरा पाय दाबला आणि बाणासारखी वर झेप घेतली. सात-आठ फूट तो सरळ उडाला, आणि पुन्हा अधू पाय भिंतीवर रोवून दोन फूट वर असलेला गच्चीचा काठ पकडला. ती जीवघेणी कसरत होती. हळूहळू त्याने काठावर पंजे पक्के रोवले आणि सावकाश शरीर तोलून कंबरेपर्यंतचे अंग वर घेतले. जपून शरीर कमरेत लववत त्याने अंग वर सारले आणि अवघ्या पाच मिनिटांत तो सरळ होऊन गच्चीत उभा राहिला.

मग कमरेला गुंडाळलेला भक्कम नॉयलॉनचा दोर खाली सोडून त्याने कबीरला खूण केली. गच्चीच्या सज्जाला त्याने दोराची एक गाठ दिली आणि दोरीला हिसका दिला. खाली उभ्या असलेल्या कबीरला तेवढी सूचना पुरी होती. तो माकडासारखा चढून वर आला.

आता दोघे गच्चीत उभे होते. बंद दाराजवळ उभा राहून त्याने दाराची पाहाणी केली. अंगच्या कुलुपाचे ते दार होते. खिशातून एक चपटी बाटली काढून त्याने ती कबीरच्या हातात दिली आणि दुसऱ्या खिशातून काचेच्या नळीचा ड्रॉपर काढला. चपट्या बाटलीचे बूच काढून त्याने नळी आत सारली आणि फुगा दाबला. सोडला. आता सावकाश त्याने नळीचे एक टोक दाराच्या की-होलमध्ये सारले. थेंबा-थेंबाने तो आतला द्रव की-होलमध्ये सोडत होता. नळी बाजूला काढली तेव्हा फसफस असा आवाज झाला. दोन मिनिटे तो स्तब्ध उभा राहिला.

नंतर त्याने दाराची मूठ पुरी फिरवली.

हळूवार धक्का देऊन त्याने दार उघडले आणि तयार झालेल्या फटीतून ते दोघेही आत शिरले. दोघे आता मंद, निळ्या प्रकाशात उभे होते. छतावर मॅकलाईट जळत होता आणि समोर पलंगावर शंभू भोसले झोला होता.

त्याच्या उशीखालून एक नळी डोकावत होती. ते रिव्हॉल्व्हर साहेबाने हलकेच खेचून घेतले. नंतर अजिबात आवाज न करता समोरच्या भिंतीवर असलेल्या बटणांकडे तो सरकला.

‘खट!’ अचानक खोलीत प्रकाश झाला आणि तो शांतपणे शंभू भोसले जागा व्हायची वाट बघू लागला. शंभूची झोप चाळवली. सावकाश त्याने डोळे उघडले, आणि प्रकाशात त्याचे डोळे दिपले. पापण्या किलकिल्या करून त्याने प्रकाशाच्या विरूद्ध कूस बदलली आणि सवयीने उशीखाली हात घालून रिव्हॉल्व्हर तपासले. झोपेतसुद्धा तो सावध होता.

रिव्हॉल्व्हर नाही हे समजताच शंभू भोसले धडपडून उठून बसला. कोणते संकट पुढे वाढलेले आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.

“शंभू, पिस्तुल माझ्या खिशात आहे,” धारदार आवाज आला.

गर्रकन शंभू आवाजाच्या रोखाने वळला. सैतान पाहावा तशी त्याची डोळ्यांची बुबळे गरगरली. एका क्षणात झोप पूर्ण उडाली आणि शंभू भोसले वेड्यासारखा समोरच्या तरुणाकडे बघत राहिला.

प्रथम आपल्यासमोर कोण उभा आहे हेच त्याला समजेना. नंतर मात्र त्याच्या शरीराबरोबर मनसुद्धा थरथरले. त्याचे नुसते ओठच हलले. भीतीने त्याच्या तोंडून आवाज फुटेना. जो त्याच्यासमोर उभा होता तो खरोखर आपल्यासमोर उभा आहे याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.

“पानसे?” तो घाबरलेल्या आवाजात ओरडला.

“हो शंभू…. शंकरदेव पानसे.”

“तू…इथे…?”

“हो. अजून जिवंत आहे मी. आणि ह्याच बंगल्यात आहे. अगदी तुझ्यासमोर.”

“पानसे… मी…”

“शंभू, आता ब्रम्हदेवसुद्धा तुला वाचवू शकणार नाही.”

मनातून उफाळणारा राग आवरत, पाय ओढत तो पुढे सरकला. शंभू वेड्यासारखा त्याच्या त्या अधू पायाकडे पाहत होता.

“शंभू, उठ. आपल्याला खाली दिवाणखान्यात जायचंय. माझा हिशोब मिटवायचाय.”

“पानसे, नको.”

“उठ,” पानसे अशा आवाजात बोलला की शंभू भोसले धडपडत उठला. रागाने लाल झालेले पानसेचे डोळे पाहताच तो निम्मा संपला होता. आपली शंभर वर्षे भरली आहेत याची त्याला कल्पना आली होती.

दार उघडून तो बाहेर पडला तेव्हाच त्याने उलट हल्ला करायचा प्रयत्न केला. सपकन लोखंडी बुटाची लाथ त्याच्या मणक्यावर बसली.

“शंभू, चलाखी केलीस तर सरळ जिन्याच्या शेवटच्या पायरीवर जाऊन पडशील एका लाथेत.”

शंभू भोसले आता पूर्ण जाळ्यात सापडला होता. मुकाट्याने जिना उतरून तो खाली दिवाणखान्यात आला. त्याच वेळी मागून बसलेल्या धक्क्याने तो जाऊन कोचावर पडला.

“शंभू, तीरखांचा खाजगी नंबर फिरव.” घाईघाईने शंभूने रीसिव्हर उचलून नंबर फिरवला आणि त्याच्या हातातला रीसिव्हर खेचला गेला.

“कोण?”

“हॅलो, तीरखां. मी भालू.”

“काय?”

“तीरखा, तुझ्या चौकडीतील एक पट्टी निखळणार आहे.”

“कोण ?”

“शंभू भोसले. मी त्याच्या रिज व्हीलाच्या दिवाणखान्यात उभा आहे.”

“थाप मारू नकोस.”

रीसिव्हर शंभूच्या हातात देऊन त्याने रिव्हॉल्वरची नळी त्याच्या मस्तकाला लावली.

“शंभू, तीरखांबरोबर शेवटचे बोलून घे.”

बळी द्यायला निघालेल्या बकऱ्यासारखी शंभू भोसलेची अवस्था झाली होती. थरथरत्या हाताने त्याने रीसिव्हर कानाला लावला.

“हॅलो… शंभू…”

“होय सलीम, मीच बोलतोय. मला त्याने गाठलं.”

“शंभू, तू काय सांगितलंस?”

“अजून काहीच नाही.”

“तू…”

याच वेळी शंभू भोसलेच्या हातातला रीसिव्हर खेचला गेला आणि तसाच लोंबत राहिला.

“शंभू, तिजोरी कुठाय?”

“नाही. पानसे, ती माझी कमाई आहे.”

“किल्ल्या दे.”

त्याच्या हातातले पिस्तूल पाहून शंभू भोसले भयानक हादरला. त्या पिस्तुलातून सुटलेल्या गोळीमुळे काय होईल याची कल्पना त्याला होती. अनेक वेळा तसला प्रयोग त्याने स्वतः अनेकांच्यावर केला होता.

“पानसे, समोरच्या टी-पॉयच्या खाली तिजोरी आहे. टी-पॉय उजव्या बाजूला फिरवल्यावर वरची फरशी आपोआप बाजूला होते.”

कबीरला खूण समजली. धावत तो टी-पॉयपाशी गेला. त्याने टी-पॉय फिरवला. फरशी आपोआप बाजूला झाली आणि सूर्यप्रकाशाच्या दर्शनाने फूल उमलावे तशी एक भक्कम तिजोरी फूटभर वर आली. ती तिजोरी जगातल्या एका प्रसिद्ध कंपनीने बनवलेली होती, रुझवेल्ट सेफर्स! वर कंपनीचे इटालियन नाव होते.

“शंभू, पासवर्ड सांग.”

“एस थ्री… सेवन थ्री…”

भराभर कबीर आकडे जुळवत होता. शेवटी त्याने लीव्हर फिरवला आणि बाहेर ओढला. दार बाजूला खेचून तो गुडघ्यावर बसला. दोन्ही हातांनी पाच-पाच दहा-दहा बंडले तो बाहेर काढत होता. सर्व बंडले काढून झाली. नंतर त्याने तीन पेट्या काढल्या.

शंभू भोसले आता संपला होता. आपण असेही मरणारच, मग निदान मरताना तरी शेवटचा हल्ला करावा, असा विचार करून त्याने झेप घेतली - सरळ पानसेच्या रोखाने. तो अगदी बेभान बनला होता. त्याच वेळी पानसेने अधू पाय जमिनीवर आपटून उसळी मारली. दुसरा पाय त्याने जमिनीवर आपटला. पुढे झेप घेऊन आलेल्या शंभू भोसलेच्या पाठीत बुटाची लाथ बसली.

शंभू भोसले भयानक किंकाळी फोडून धडपडला. त्याच्या पाठीत एक सुरा सात इंच आत घुसला होता. शंभू आता वेडा बनला होता. पुन्हा दात ओठ खात तो पानसेच्या रोखाने उसळून पुढे आला. आणि पानसेने सर्व शक्ती पणाला लावून अधू पायाला झटका दिला. खट् असा आवाज झाला, आणि शंभूच्या कुशीत दुसरा सुरा शिरला.

जीव तोडून शंभू भोसले ओरडला. तो आवाज इतका भयानक होता की अख्खा बंगला त्या आवाजाने दणाणून गेला, असा कबीरला भास झाला. जिवाच्या आकांताने तडफडणाऱ्या शंभू भोसलेकडे कबीर पाहतच राहिला. माशासारखा शंभू भोसले तडफडला. त्याने एक शेवटचा आचका दिला आणि तो पाठीवर आपटला!

पुढच्या दहा मिनिटांत दोघे टॅक्सीत बसले होते आणि कबीरने टॅक्सी वेगाने जुहूच्या रोखाने सोडली होती.

“कबीर, व्ही० टी०वर सव्वीस नंबरच्या लॉकरमध्ये सर्व रक्कम ठेव,” आरामात मागच्या सीटवर आडवा पडत पानसे गरजला, तेव्हा कबीरने होकारार्थी मान हलवली.

माणसाच्या आयुष्यात योगायोगाला किती महत्त्व असते याचा प्रत्यय हवा असेल, तर अगदी प्रत्येक घटकेला तो सापडतो. एखादी गोष्ट मनात आणावी आणि तीच दत्त म्हणून समोर उभी राहावी! अगदी तसेच त्रिकूटाच्या बाबतीत झाले.

हॉटेल रिट्झमध्ये आलेले ते तिघे उठून निघाले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. जेव्हा दारातच त्यांना दोघे ओलांडून गेले, तेव्हाच तिघांच्या मनात संशयाने घर केले.

त्रिकूटाला आता बदमाशांची रेघ परिचित झाली होती.

अ‍ॅड० राजसिंह आणि डॉ० माजगेबद्दल तिघांच्या कानावर अनेक अफवा आल्या होत्या. ही जोडी कुणाचेतरी काळे काम करत असावी, असा त्यांना जुना संशय होता. मात्र आपण सध्या हाताळत असलेल्या प्रकरणात ह्या दोघांचा फार मोठा हिस्सा आहे याची त्यांना कल्पना नव्हती.

तिघे येऊन सुदर्शनच्या गाडीत बसले. सुदर्शनची काळी रोल्स रॉइस बांद्रा रोडच्या रोखाने धावत निघाली. तिघे शांत होते. चालू प्रकरणाचाच प्रत्येकाच्या मनात घोर सुरू होता. अनिलही इतर विचार करत हातातल्या चमत्कारीक ट्रान्झिस्टरच्या बटणांशी खुडबुड करत होता. हा ट्रान्झिस्टर दोन महिन्यांपूर्वी त्याने इंग्लडहून खरेदी केला होता. तो नुसते गाणे ऐकण्याचा नव्हता, तर त्यात दोन ट्रॅक्स असलेला एक साउंड बॉक्स होता. अनिलने अभावितपणे हातातील ट्रॅन्झिस्टरचे बटण फिरवले आणि त्या शांत वातावरणात एकदम स्फोट झाला! कारण बटण फिरवल्याबरोबर आतून आलेला शब्द भयानक होता.

“राज, मालीचा खून झाला.”

ट्रॅन्झिस्टरमधून गार लहरीसारखा आवाज आला. सुदर्शनने करकरत ब्रेक्स मारले आणि अजय वेड्यासारखा त्या ट्रॅन्झिस्टरकडे बघायला लागला. आता त्यातून खाताना मिटक्या माराव्यात तसा आवाज येत होता आणि त्यात काट्या-चमच्यांचे आवाज मिसळले होते.

“अनिल, हा काय प्रकार आहे?” सुदर्शन आश्चर्याने ओरडला.

“मायक्रोफोन…”

“कुठाय?”

“आपण बसलो होतो त्या टेबलावर, फ्लावरपॉटच्या शेजारी विसरलाय.”

“अन्या, तू… तू तर नाडकर्णी डिटेक्टिव्हचा बाप झालास!”

अनिलने आता आवाजाचा व्हॉल्यूम मोठा केला होता. स्पष्टपणे त्यांच्या कानावर एक नवीन संभाषण पडत होते. हाच तो योगायोग!

सुदर्शनने गाडी भर्रदिशी वळवली. रोल्स रॉइस आता पुन्हा रिट्झकडे धावत होती. ट्रान्झिस्टरवरून आता संभाषणाचा पूर सुरू झाला होता.

“राज, पुन्हा अशी चूक झाली तर तीरखांची सवय तुला माहीत आहेच!” पलीकडे आवाज झाला. पाठोपाठ दचकण्याचा आवाज झाला होता. आता ट्रॅन्झिस्टरमधून बाहेर पडणारा आवाज मान दाबावी तसा बंद पडला होता. खट्ट. अनिलने बटण बंद केले.

“सुदर्शन, तीरखांसुद्धा यात आहे!”

“भायखळ्याचा?”

“हो.”

“आता प्रकरणाला खरी गती मिळेल. अनिल उभ्या हयातीत एकाच गोष्टीबद्दल मी तुला शाबासकी देईन. ती म्हणजे हा मायक्रोफोन.”

“बरंय! सुदर्शन, तुझा बेत काय?”

“आधी ह्यात कोण कोण भाग घेतंय हे पाहू.”

त्रिकूट पुन्हा रिट्झच्या पायऱ्या चढत होते. आणि त्यांना येताना पाहून मॅनेजरने एका वेटरला खूण केली होतो. सुदर्शन मोहिते हे हॉटेल रिट्झचे नेहमीचे गिऱ्हाईक होते.

“साहेब, ते टेबल मोकळं आहे.”

तिघे खुर्चीवर बसले. अगदी सहज गप्पा मारायला सुरुवात झाली होती. आपण त्यांच्या गावचेसुद्धा नाही असेच तिघे वागत होते, मात्र त्यांच्या धारदार नजरेतून उजव्या कोपऱ्यात बसलेल्या टेबलाभोवती बसलेल्या प्रत्येकाची बारीक हालचालसुद्धा टिपली जात होती.

“फ्रेश लेमन,” सुदर्शनने ऑर्डर दिली आणि वेटर ती आणायला धावला. तेव्हाच टेलिफोन बूथमधून बाहेर पडलेला तीरखां चौघांसमोर जाऊन बसलेला होता.

“अनिल, बटण सुरू कर.” अनिलने बटण दाबले.

“राज, भालूचा फोन होता,” निर्विकार असा तीरखांचा आवाज आला आणि इतरांचे भेदरलेले आवाज पाठोपाठ झाले.

त्रिकूट आता उजव्या टोकाला चाललेले ते संभाषण लेमनच्या आस्वादात मिटक्या मारत चघळत होते, आणि त्या संभाषणाच्या प्रत्येक शब्दाबरोबर एक नवा भीषण सत्याचा प्रकार समोर येत होता. लवकर पावलं उचलायची वेळ जवळ येत होती.

“अनिल, आता आपली चाल खेळायची.”

“सांग.”

“चौघांतील एकाला ताब्यात घ्यायचं.”

“घाटकोपर?”

“हो.”

“अजय, तू टॅक्सीने पुढे हो. नवं हत्यार तयार कर.”

“चाप?”

“नाही. मासा!”

“शॉकचा?”

“हो.”

अजय बाहेर पडला. त्याला जास्त सांगायची गरज नव्हती. सुदर्शनने वेटरला खूण केली.

“काय साहेब?” वेटर अदबीने खाली वाकला.

“माजगेची गाडी कोणती?” हातात शंभराची नोट नाचवत सुदर्शनने प्रश्न विचारला.

“साहेब, लेमन कलरची ऑस्टिन आहे. एम एच पी छत्तीस झीरो वन.”

“हे घे.” दोन नोटा आनंदाच्या पदरात पडल्या, आणि बिलाचा ट्रे घेऊन तो सटकला.

***

हा सर्व प्रकार अगदी सराइतासारखा झाला होता. कोणालाही संशय यायचे कारण नव्हते. सुदर्शन रोल्स रॉइस स्टार्ट करून बाहेर पडला तेव्हा अनिल डाव्या हाताच्या गाड्यांच्या रांगातून चालला होता. तिसऱ्या रांगेत त्याला डॉ. माजगेची ऑस्टीन मिळाली. गाडीपण काय गाडी होती! तीन स्टॉपरचे बॅक मडगार्ड होते आणि मोराच्या फुललेल्या पिसाऱ्यासारखा मागचा डिकीचा भाग वर आला होता. जेफ ऑस्टीनचे ते लेटेस्ट मॉडेल होते!

आपलीच गाडी आहे अशा रुबाबात अनिल मागच्या दाराच्या हॅन्डलला टेकला. त्याच्या हातातल्या पातळ पट्ट्यांच्या जुडग्यातली तिसरी पट्टी लॉकमधे बरोबर बसली, आणि लॉक सटकले. मागची सीट आणि पुढची सीट यांच्यामधील पोकळीत अनिल शांतपणे पडला. आता त्याने हातातला ट्रॅन्झिस्टर पुन्हा ऑन केला.

“राज, कोणत्याही क्षणी तो आपल्या मागे लागेल. सर्वानी सावध राहायला हवं,” तीरखांचा आवाज आला. पाठोपाठ खुर्ची सरकल्याचा आवाज झाला आणि सर्व जण हसले.

अनिलने बटण बंद केले. आता डॉ० माजगे कोणत्याही क्षणी गाडीपाशी पोचणार होता.

पाचव्या मिनिटाला माजगेने ड्रायव्हिंग व्हीलच्या बाजूचे दार उघडले आणि आत बसून गाडी स्टार्ट करून तुफान वेगात रिट्झच्या पोर्चमधून बाहेर काढली. अनिलला गडबड नव्हती. माटुंगा रोडजवळ तो कामाला सुरुवात करणार होता. मागच्या काचेतून त्याला आता खुणेचे लाईट दिसत होते. दोन वेळा लेफ्टचा हेडलाईट चकाकला होता. सुदर्शन मागून येत होता असाच त्याचा अर्थ होता.

पडल्या पडल्या अनिलने शांतपणे विचार करायला सुरुवात केली. ह्या चौकटीचा आणि माली पानसेचा काय संबंध?

अवघ्या पंधरा मिनिटांत माटुंगा रोडचे गेट आले. इथेच माजगे नायगावच्या रोखाने ऑस्टीन वळवणार होता.

“माजगे, गाडी घाटकोपरच्या रोखाने घे.” अनिलने उठून माजगेच्या कपाळाला रिव्हॉल्वरची नळी टेकवली होती. हे इतक्या अचानक झाले होते की माजगे जाम घाबरला.

“कोण… भालू?”

“भालूचा बाप! गाडी सरळ घाटकोपरच्या रोखाने घे.”

“का?” हादरलेला माजगे काय करावे या संभ्रमात होता.

“आपल्याला गप्पांचा डाव टाकायचा आहे.”

“नाही,” माजगे घाबरून म्हणाला.

“माजगे, ट्रिगर दाबला तर काय होईल हे शेंबड्या पोरालाही समजतं. तुला वेगळं सांगायला नकोच.” माजगेची अवस्था विचार करण्यापलीकडे गेली होती. त्याने बाहेर ब्रिजवरून गाडी हायवेच्या रोखाने घेतली, आणि अनिलने तरीही रिव्हॉल्वरची नळी त्याच्या मानेला टेकवूनच ठेवली. माजगेवर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे होते.

सायन मागे पडले तेव्हा माजगेने चलाखी करण्याचा प्रयत्न केलाच, आणि अनिलच्या मुठीचा फटका सटकन त्याच्या मानेत आपटला. माजगे कळवळला.

“पुन्हा असा वेडेपणा करू नकोस, माजगे. तुझ्या बापाचं बारसं जेवलोय मी,” अनिल बोलला. “आता उजव्या हाताला घे.” पुढची काही मिनिटं अनिल सूचना करत राहिला आणि माजगे ऑस्टिन वळवत राहिला. आता ऑस्टिन घाटकोपर पूर्व भागात आली होती.

“शास्त्री नगरच्या पुढे घे. वेग वाढव.” करकरत ऑस्टिनने वेग घेतला. समोर चौकात पोलीस उभा होता आणि त्याचसाठी थांबायची अनिलची इच्छा नव्हती. अनिलला तो हवालदार ओळखत होता. ऑस्टिन आता रहदारी नसलेल्या रस्त्यावरून धावत होती.

“डाव्या बाजूला त्या निळ्या फाटकातून आत घे.”

फाटकातून ऑस्टिन आत शिरली आणि वेगात पोर्चमधे शिरून गप्पकन थांबली. अनिल सावध होता. ह्याच क्षणी माजगे हालचाल करेल असा त्याचा अंदाज होता, आणि तसेच झाले. एकाच वेळी माजगेने दोन गोष्टी केल्या - गिअरस्टिकवरचा हात काढून त्याने सर्व ताकद एकवटून मागे अनिलच्या डोक्यात आपटला, आणि त्याच वेळी दार उघडून बाहेर झेप घेतली.

फटका तर अनिलने चुकवला. माजगे बाहेर उडी घेईल ह्याचाही त्याला अंदाज होता, मात्र तो इतक्या चपळ हालचाली करेल असे त्याला वाटले नव्हते. माजगे वाटतो तितका साधा नाही याची त्याला त्याच क्षणी कल्पना आली.

पाठोपाठ अनिलनेही दार उघडून बाहेर झेप घेतली, ती सरळ माजगेच्या पाठीवर. पण अनिल पाठीवर आपटल्याबरोबर हात खाली दाबून माजगे उसळला. चेंडूसारखा. पाठीला रेटा देऊन त्याने अनिलला दूर उडवले, आणि त्याच वेळी झटक्यात सरळ होऊन वर फेकल्या गेलेल्या अनिलच्या पोटात त्याच्या बुटाची लाथ बसली. वेदनांनी अनिल कळवळला, पण मनातल्या मनात त्याने माजगेला शाबासकी दिली. इतका शिस्तीत, शास्त्रोक्त आघात करणारा अनिलला आजच प्रथम भेटला होता. हातावर तोल घेत अनिल सावरला. ही वेळ माजगेची स्तुती करायची नव्हती. तो हातातून निसटला असता तर सुदर्शन आणि अजय कितीतरी दिवस त्याची चेष्टा करत बसले असते.

माजगेला सावरायला त्याने अवधीच दिला नाही, आणि सपकन त्याच्या मानेत बुटाची लाथ फेकली. पण पुन्हा आश्चर्याने थक्क व्हायची पाळी अनिलवरच आली! माजगेने त्याची लाथ वरच्यावर धरली आणि त्याला मागे फेकला.

शाबास!

आता मात्र अनिल सावध झाला. कोणत्याही क्षणी रिव्हॉल्व्हर काढून गोळी झाडायची तयारी त्याने ठेवली, पण आजपर्यंत शिकलेल्या डावपेचांच्या परीक्षेची वेळ खरोखरच आज आलीय हे त्याने ओळखले.

परत एकदा काय झाले हे त्याला समजलेच नाही. माजगे डाव्या बाजूला झुकला आणि त्याने पायावर गिरकी घेता घेताच पुढे सरकणाऱ्या अनिलच्या रोखाने उसळून झेप घेतली. हा प्रकार अनिलला नवा होता. सपकन त्याच्या कुशीत बुटाची लाथ बसली, आणि तो सावरायच्या प्रयत्नात असतानाच माजगेच्या हाताचा पंजा त्याच्या थोबाडावर आदळला. दोन्ही आघात जीवघेण्या वेदना देऊन गेले. अनिल कळवळला.

माजगे आपल्याला भारी आहे हे त्याच क्षणी त्याने ओळखले, पण तरीही अजून तो पिस्तूल झाडायला तयार नव्हता. काही झाले तरी माजगेला निसटू द्यायचे नाही असा त्याने निश्चय केला. आता तो वेदना गिळून शांत उभा राहिला. बंगल्याच्या पोर्चमधल्या लाईटच्या अंधूक प्रकाशात माजगेच्या हालचाली त्याला स्पष्ट दिसतही नव्हत्या. त्याने नजर स्थिर केली. माजगेला काय येत नाही याचा त्याने अंदाज घेतला, आणि तोच डाव टाकायचा त्याने विचार केला.

आणि अनिल उसळला. त्याचा ही खेळी मात्र चांगलीच होती. त्याने दोन्ही पाय एकाच वेळी झाडले. माजगेच्या मानेच्या दोन्ही बाजूला पाय आपटले आणि मागे येताना अनिलने दोन्ही हातांचे पंजे नेमके त्याच जागेवर मारले. कट आवाज झाला. खांद्याजवळचे एक कॉलर-बोन निखळले होते. वेदनांनी माजगे जोराने ओरडला. त्याच वेळी अनिलने पुऱ्या ताकदीने माजगेचा हात मागे खेचला - तोच कॉलर-बोन मोडलेला हात. भयानक वेदनांनी माजगे गुरासारखा ओरडला.

“माजगे, आता हललास तर हात कायमचा गमवावा लागेल,” अनिल धापा टाकत ओरडला.

पण आता काहीही करण्याची माजगेची शक्ती संपली होती. तो वेदनांनीच मेल्यात जमा होता. अनिल त्याला खेचत आत घेऊन गेला तेव्हा अजय आवाज कसला आलाय हे पाहाण्यासाठी दार उघडून बाहेर येत होता.

“माजगे, ऊठ.” कुशीत सणसणीत लाथ बसून माजगे पुन्हा कळवळला, तेव्हा त्याच्यासमोर नुकताच बंगल्यात शिरलेला सुदर्शन उभा होता. डॉ० माजगेला सुदर्शनच्या घाटकोपरच्या बंगल्यात आणण्यात आले होते आणि त्याला आता पोपटासारखे बोलायला भाग पाडण्यात येणार होते.

“बोल माजगे, मालीचा तुमच्या टोळीशी काय संबंध होता?”

“कोण माली! आणि तुम्ही मला इथे का आणलंय?”

“ज्योतिप्रसादच्या ताब्यात तुला देणार आहोत, माजगे. पण त्याआधी आम्हांला काही माहिती हवी आहे.”

“मला काहीही माहीत नाही,” माजगे आता वेदना गिळून शांत झाला होता. “तुम्ही माझ्यावर कितीही जबरदस्ती केलीत तरी एकही शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडणार नाही.”

“छान. माजगे, ह्या बंगल्यात येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही वदवलाय. कधी हीटरचे शॉक देऊन, तर कधी भयानक प्राण्यांना अंगावर सोडून. आज तुझ्यावर नवा प्रयोग करायचा आमचा विचार आहे.”

“मी बोलणार नाही,” माजगे ठामपणे म्हणाला.

अनिलने माजगेचे दोन्ही हात मागे खेचून एका खुर्चीला बांधले आणि दोन्ही पाय त्याच्याच कमरेचा पट्टा सोडून जाम केले.

***

आता सुदर्शनच्या हातात धरलेल्या लाकडी चिमट्यात एक विचित्र आकाराचा फूटभर लांबीचा मासा होता. तो त्याने माजगेच्या शरीराला लावला. एकच क्षण. माजगेचा चेहरा काळा-निळा पडला आणि अंग थरथरवून त्याने भयानक किंकाळी ठोकली.

मासा सुदर्शनने बाजूला ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या काचेच्या भांड्यात सोडला. आफ्रिकेतील चितांगो नदीत सापडणारा तो मासा होता. ‘सांगो’! त्याचा स्पर्श झाल्याबरोबर विजेच्या हजार वॅट शक्तीचा शॉक बसतो.

“मालीचा खून कुणी केला? तिचा तुमच्या चौकडीशी काय संबंध?” सुदर्शनचा चेहरा एकाएकी अत्यंत चिडका झाला होता. दया हा शब्द ह्या माणसाच्या कोषात आहे का नाही असेच त्या वेळी त्याच्याकडे पाहणाऱ्याला वाटले असते.

“माजगे, तुला एक संधी देतोय. सांग.”

“नाही…” माजगे त्याही स्थितीत दातात ओठ दाबून शांत होता.

पाण्यात सोडलेला मासा सुदर्शनने पुन्हा लाकडी चिमट्यात पकडला. तसाच माजगेच्या मानेवर दाबला. दातावर दात दाबून माजगेने किंकाळी दाबली. ओठ घट्ट आवळले. त्याच्या बांधलेल्या हातांच्या मुठी गच्च आवळल्या गेल्या.

पण एक मिनिटभरसुद्धा तो टिकाव धरू शकला नाही. त्याचे एकमेकांवर दाबलेले दात थडथडले आणि एक जीवघेणी किंकाळी त्याच्या तोंडातून कधी बाहेर पडली हे त्यालाही समजले नाही. सुदर्शनने परत मासा बाजूला घेतला.

“माजगे…”

“नाही…” आता माजगे कधीही बेशुद्ध पडेल असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते.

आता सुदर्शनच्या मनातली दया नावाची चीज पूर्णपणे संपली होती. त्याने मासा सरळ माजगेच्या तोंडावर दाबला. क्षणभर माजगेला काय झाले हेच समजले नाही. गालाच्या स्नायूतून काही तरी सरसरत गेल्याचा त्याला भास झाला आणि नंतर सर्व चेहऱ्यात असंख्य सुया खुपसल्यासारखे वाटले. पाठोपाठ भयानक जीवघेण्या वेदनांचा लोळ सुरू झाला. दातावर दात आपटले. त्याचा सर्व चेहराच आता बदलला होता. डोळे पापण्यांतून बाहेर पडतायत असे वाटत होते. जीभ लोंबायच्या बेताला आली होती. शेवटची आरोळी तर काळीज फाडून गेली, आणि सुदर्शनने मासा बाजूला घतला.

दहा मिनिटे माजगेचे शरीर नुसतेच थरथरत होते. ओठ फाटून रक्ताचा एक ओघळ हनुवटीपर्यंत आला होता. माजगेने हळूवारपणे डोळे उघडले. वेदनांनी त्याचे डोके फुटायची वेळ आली होती…

त्याच वेळी सुदर्शनने मासा परत त्याच्या रोखाने नेला.

“नको, मी सांगतो,” माजगे धापा टाकत ओरडला.

“माली आमचं काम करते.”

“आमचं म्हणजे कुणाचं?”

“तीरखांचं.”

“तुमच्या चौकटीत कोण कोण आहेत?”

“राजसिंग, शंभू भोसले, बच्चन.”

“आणि तीरखां?”

“तो आमचा पुढारी.”

“मालीचा संबंध काय?”

“बातम्या आणायचं काम तिच्याकडे होतं. अचूक नकाशे, माहिती ती पुरवायची. नंतर दरोडे घालायचं, लुटायचं काम आम्ही करत होतो.”

“मालीचा खून कुणी केला?”

“भालूने. तो स्वतःला लंगडा भालू म्हणवून घेतो.”

“कशासाठी?”

“आमच्या लुटीत त्याला हिस्सा हवा होता निम्मा. त्याने तीरखांला धमकी दिली होती फोनवरून. तीरखांने नकार दिला. भालूने पहिला बळी मालीचा घेतला.”

“हा भालू आहे तरी कोण?”

“काहीच कल्पना नाही. तो फक्त फोनवरून धमकी देतो. आजही मघाशी त्याने तीरखांला धमकी दिली होती.”

“तुम्ही आजवर किती दरोडे घातलेत?”

“किमान वीस.”

“वीस! मग पोलिसात रिपोर्ट कसे आले नाहीत?”

“आम्ही लुटला तो सर्व ब्लॅकचा पैसा.”

“छान! माजगे, आता तू काय करणार?”

माजगेला ह्या प्रश्नाचा वेगळाच वास आला. तो आश्चर्याने सुदर्शनकडे पाहू लागला.

“कारण मी आता तुझ्या त्या तीरखांला फोन करणार आहे, आणि नंतर तुला सोडणार आहे.”

“काय? नको!” अंगावर शहारे येऊन माजगे थरथरला. तीरखांला हे समजले असते तर त्याने माजगेला जिवंत सोडले नसते.

“वाटलं तर मला गोळी घाला, पण सोडू नका.”

““नाही माजगे, तसंच घडणार आहे. तुला तीच शिक्षा योग्य आहे.”

“नको…” घाबरून माजगे ओरडला.

“अनिल, याला सोडून परत ये.”

“माझ्यावर दया करा.”

“माजगे, तुझ्यावर दया करु? इतक्यांना तू लुबाडलंस, कत्तली केल्यास. तुला असंच मरण यायला हवं.”

आणि डॉ० माजगे, तो दगडासारखा माणूस, भीतीने ढसाढसा रडायला लागला.

“अनिल, याला तळघरात फेकू.” सुदर्शन आणि अनिलने माजगेला उचलून घेतले तेव्हा काचेच्या भांड्यातला तो विचित्र मासा अजयने उचलला होता.

त्रिकूट आता मार्गावर होते.

आता स्वच्छ सूर्यप्रकाशासारखे एकेक धागे तिघांच्या समोर होते आणि त्या प्रकरणाबद्दल अंधारात चाचपडण्याची त्यांची वेळ निभावली होती. आता तिघे घाटकोपर येथील सुदर्शनच्या बंगल्यात बसले होते. एरवी कधीतरीच उपयोगात येणारा तो बंगला सुदर्शन आजकाल नेहमीच वापरायला लागला होता. बंगल्याची व्यवस्था पाहण्यासाठी त्याने एक माणूस नेमला होता. त्या प्रशस्त खोलीत आल्यावर सुदर्शनने थ्री-फाइव्हचे पाकीट काढले. एक सिगारेट स्वतः घेतली आणि पाकीट अनिलच्या दिशेने उडवले.

तीरखांसारख्या माणसाला धमकी देणारा असा कोण लंगडा मुंबईत अवतरलाय, याचे त्याला आश्चर्य वाटत होते. त्याच्या डोळ्यांसमोर अनेक लंगडे चेहरे वेगात येऊन नाहीसे होत होते. एक कोडेही मनात तयार होत होते - खरोखरच तो लंगडा असेल की नुसताच नावाचा लंगडा असेल?

“अनिल, तू तीरखांला ओळखतोस?” सिगारेट शिलगावून नाकातून धूर फेकत सुदर्शनने विचारले.

“ओळखतो. सुदर्शन, खरं तर याआधीच तो आपल्या तावडीत सापडायला हवा होता. सलीम तीरखां! भायखळ्यात त्याच्या नावाला मोठे वजन आहे. पैशासाठी तो काहीही करायला तयार होतो. केसाने गळा कापेल एखाद्याचा.”

“तोच लंगडा भालू तर नसेल?”

“अशक्य नाही. जो पैशासाठी कुठलाही मार्ग हाताळतो त्याला हा नवा मार्गसुद्धा शक्य आहे.”

“अनिल, त्याच्या मागे लागायला हवं.”

“समोर जाऊन उभा राहतो त्याच्या!”

“नाही, अनिल. पहिले ह्या प्रकरणात त्याचा काय भाग आहे हे समजून घेऊ. एक आपल्या ताब्यात आहे - मजगे. आता चार राहिलेत. प्रत्येकाने एकेक वाटून घ्यायचा. अजय, तू बच्चनच्या मागे लागायचंस.”

“हो… मी त्याला पाहतो.”

“अनिल, तू तीरखांला संभाळ.”

“चालेल.”

“मी राजसिंहच्या मागे राहतो.”

“ठरलं. सुदर्शन, त्या तिघांनाही धोका आहे असं दिसलं तर ज्याच्यापासून धोका आहे तोही आपोआप समोर येईल. सर्व गूढ संपेल,” अजयने मुद्दा उलगडून ठेवला.

“नाही, अजय. जो इतक्या बेफाम आणि उलट्या काळजाच्या माणसांना उघडउघड धमकी देतो, त्याला इतकं सामान्य ठरवता येणार नाही.”

सुदर्शनचा मुद्दा पटण्यासारखा होता. खरोखर जो तीरखांसारख्या सापाच्या शेपटीवर धोका माहीत असून पाय देतो, त्याची ताकद तशीच अफाट असणार. दोघे काहीच बोलले नाहीत.

“सुदर्शन, शंभू भोसलेचं काय?”

“मी ज्योतिप्रसादला त्याच्यावर नजर ठेवायला सांगणार आहे.”

“छान. ही वाटणी समान झाली.”

“अनिल,अशा वेळी आपल्या हातात ‘ते’ असायला हवं होतं,” सुदर्शन म्हणाला.

“मायक्रोफोन!”

“हो ना! एकमेकांशी संपर्क ठेवता आला असता. एखादा धोक्यात असेल, तर लगेच मदतीला धावून जाता आले असतं.”

“सुदर्शन, तीनची ऑर्डर आजच देऊ?”

“चारची! एक ऑफिसात हवा. ते हेडक्वार्टर आहे!”

***

त्रिकूट घाटकोपरच्या बंगल्यातून बाहेर पडले तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. सकाळी सुदर्शन फोन करून इन्स्पे० ज्योतिप्रसादला शंभू भोसलेवर नजर ठेवायला सांगणार होता. तिघे सुदर्शनच्या रोल्स रॉइसमध्येच होते. अनिलला सुदर्शनने माटुंगा रोडवर सोडले. तो तिथून गाडी घेऊन तीरखाच्या मागे सुटणार होता.

“अनिल, तू त्याच्यासमोर कधीच जाऊ नकोस.”

“नाही. तू काळजी करू नकोस.”

सुदर्शनने रोल्स रॉइस तशीच दादरकडे पिटाळली. अजय टी०टी०च्या नाक्यावर उतरला.

“अजय, बच्चन कुठे राहतो माहीत आहे? ज्योतीला फोन कर. तो पत्ता सांगेल अचूक.”

“चालेल.”

“तीनला मी रिंग देतो घरी. तूही तुझा पराक्रम सांग, अनिता दोघांचा निरोप फिरवेल.”

“डन.”

***

मग क्षणभरही न थांबता सुदर्शनने महालक्ष्मीच्या रोखाने गाडी पिटाळली. त्याला राजसिंहला गाठायचे होते. का कुणास ठाऊक, सर्वांत जास्त हा राजसिंहच महत्त्वाचा वाटत होता सुदर्शनला. एका वकिलाचे डोके होते - कोणताही प्लॅन शिजायला चांगला वाव होता. म्हणूनच सुदर्शनने राजसिंह आपल्या वाटणीला घेतला होता.

ऐकलेला सर्व इतिहास सुदर्शनच्या डोळ्यापुढे चित्रपटातील प्रसंगासारखा उभा राहिला. पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीसारखा राजसिंह अचानक सहा वर्षांपूर्वी मुंबईत आला. आला तेव्हाचा तो आणि आताचा राजसिंह ह्यांत म्हणे जमीन-अस्मानाचे अंतर होते.

अचानक त्याला कुठूनतरी पाण्यासारखा पैसा मिळाला, आणि आज तो कोट्यधीशांच्या घरात वावरत होता. महालक्ष्मी रेसकोर्ससमोर मोक्याच्या जागेवर सात मजली इमारत आणि इमारतीसमोर आठ मजली टोलेजंग ‘शालिमार’ लॉज हे दोन्ही त्याच्या मालकीचे होते. दोन-तीन समारंभांत सुदर्शनची आणि त्याची ओळख झाली होती आणि दोन महिन्यांपूर्वी एका पार्टीत तर तो राजसिंहबरोबर तब्बल दोन तास बोलत बसला होता.

रोल्स रॉइस एका बोळात उभी करून सुदर्शन चालत निघाला तेव्हा त्याने कोटाच्या आतल्या खिशातील सुरा काढून शर्टच्या बाहीजवळ मनगटापाशी ठेवला. एक पिस्तूल मोज्यात सारले आणि दुसरे पॅन्टच्या मागे हिप पॉकेटच्या वर तयार केलेल्या खास खिशात सारले. राजसिंगपासून कधी धोका होईल याचा नेम नव्हता. आता तो सात मजली इमारतीसमोर आला. सर्वांत वरच्या मजल्यावर लाईट जळत होता, म्हणजे अ‍ॅड० राजसिंह अजून जागाच होता. सहा रूम्सचा तो प्रशस्त ब्लॉक तो स्वत: एकटा वापरत होता.

आता सुदर्शनच्या मनात विचार घोळू लागला. राजसिंहला जबरदस्त धक्का द्यावा लागणार, कारण त्याशिवाय हे प्रकरण काय रंग घेणार हे समजणार नव्हते. त्या विचाराबरोबरच त्याने समोरच्या इराण्याच्या हॉटेलात प्रवेश केला. डिरेक्टरीत त्याला राजसिंहचा फोन नंबर मिळायला वेळ लागला नाही. रीसिव्हर उचलून त्याने नंबर फिरवला.

“हॅलो, राजसिंह का?”

“हो. कोण बोलतंय?” पलीकडून राजसिंहचा आवाज झाला. त्या आवाजात थोडी भीती जाणवत होती. घाबरलेला माणूस जसा जोरात श्वासोच्छ्वास करतो तसा धाप लागल्यासारखा आवाज होता.

“मी सुदर्शन मोहिते.”

“बोला मोहिते. काय काढलंत ह्या वेळेला?” आश्चर्यात राजसिंह बोलला.

“वकीलसाहेब, मला तुम्हांला अर्जन्ट भेटायचंय.”

“का?”

“एक केस आत्ताच माझ्याकडे आलीय. तुमचा त्या केसशी संबंध आहे असा पुरावा पुढे आलाय.”

“कसली केस?”

“ते मी समक्ष भेटीत सांगेन.”

“सकाळी भेटलं तर बरं होईल असं मला वाटतं.”

“नाही वकीलसाहेब, पुरावा इतका सबळ आहे की कोणत्याही क्षणी पोलीस तुमच्या दारावर टकटक करतील.”

“पोलीस?” आश्चर्याने राजसिंह जवळ जवळ किंचाळलाच.

“हो, मैत्रीचे संबंध पडले आपले, म्हटलं तुम्हांला सावध करावं.”

“तुम्ही लगेच या.”

“येतो.”

सुदर्शनची मात्रा बरोबर लागू पडली होती. दहा मिनिटांत तो मस्तपैकी डबल कॉफी ढोसून तयार झाला आणि बरोबर पंधरा मिनिटांनी त्याने जिना चढून राजसिंहच्या फ्लॅटची बेल दाबली. त्याला वाट पाहावी लागली नाही, स्वतः राजसिंहनेच दार उघडले.

“या मोहिते. मी वाटच पाहत होतो तुमची,” जरी हसून राजसिंहने सुदर्शनचे स्वागत केले, तरी तो घाबरल्याचे त्याचा चेहरा स्पष्ट सांगत होता. दोघे आत जाऊन एका हॉलमध्ये प्रशस्त कोचावर बसले.

“हं. बोला मोहिते. कसली केस?”

“राजसिंह, तुमचा आणि मालिनी पानसेचा संबंध काय?” सुदर्शनने सरळ-सरळ बाँब टाकला.

“कोण पानसे?” वरून शांत चेहरा दाखवत असला, तरी मालीचे नाव घेतल्याबरोबर राजसिंह कमालीचा हादरला.

“राजसिंह, मी मित्र म्हणून तुमच्याकडे आलोय याचा विचार करा. दुसरा कुणी असता तर पुरावा घेऊन कमिशनरांच्या ऑफिसात शिरला असता,” सुदर्शनने आणखी एक धक्का दिला.

“मोहिते, तुमची काहीतरी चूक होतेय.”

“तसं समजा. पण तीरखां, माजगे, बच्चन आणि शंभू भोसले यांचीही नावं तुमच्याबरोबर आहेत. अजूनही तुम्हांला काही म्हणायचं नाही का?”

“ही माणसं कोण?” एका क्षणात स्वतःला सावरून राजसिंह सावध झाला होता.

“तुम्ही ओळखता त्यांना राजसिंह, आज सहा वाजल्यापासून इन्स्पेक्टर ज्योतिप्रसाद तुमच्यामागे होता. नऊला तुम्ही त्यांच्याबरोबर रिट्झमध्ये डिनर घेत होता.”

“तुम्ही पोलिसांना रिपोर्ट केलात की काय?”

“नाही.”

“मोहिते, तुम्ही इथं का आलात?”

“तुम्हांला सल्ला देण्यासाठी. राजसिंह, कोणत्याही क्षणी पोलीस तुमच्या पाठीवर हात ठेवतील.”

“कोणत्या आरोपावरून?”

“तेही तुम्हांला माहीत आहे.”

“मोहिते, तुम्ही काय बोलताय? तुमचा काहीतरी गैरसमज तरी होतोय, किंवा तुम्हांला काही विपरीत माहिती मिळालीय. मी कुणाही मालिनी पानसेला ओळखत नाही.” राजसिंह इतके बेमालूम नाटक वठवत होता, की कुणालाही वाटावे हा निर्दोष आहे.

“बरं! राजसिंह, माजगे सध्या अटकेत आहे.”

क्षणभर राजसिंहचा चेहरा भयानक बनला. त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. नंतर मात्र तो कमालीचा शांत झाला.

“मोहिते, तुमचं काम झालं?”

“नाही. राजसिंह मला तुमचा शब्द हवाय.”

“कशाबद्दल?”

“तुम्ही मला स्पष्टपणे सर्व प्रकरण उलगडून सांगितलंत तर मी माझ्या हाताने पुरावा दाबून ठेवीन. मात्र कोणताही आडपडदा न ठेवता मला सर्व समजायला हवं.”

“छान, मोहिते तुम्ही नट झाला असतात तर फार पैसे कमावले असतेत.”

“राजसिंह, तुमची तयारी नाही तर?”

“हो, माझा संबंध नाही तर मी काय सांगणार!”

“बराय राजसिंह, तुमची मर्जी.”

सुदर्शन दाराकडे निघाला होता तो अचानक वळला. त्याला खडा टाकून शेवटचा अंदाज करायचा होता.

“राजसिंह… लंगडा भालू कोण?”

भीतीने काळानिळा पडलेला राजसिंह नुसताच पाहत राहिला सुदर्शनकडे.

त्याच क्षणी सुदर्शनची खात्री पटली की राजसिंह हा लंगडा भालू नाही. गर्रकन वळून तो बाहेर पडला आणि राजसिंह राहत असलेल्या इमारतीच्या बाहेर आला.

तेव्हाच एक काळी छाया अंधारातून जिन्याच्या वळचणीतून बाहेर येऊन पाय ओढत जिना उतरत होती, पण त्याला ती दिसली नाही.

९.

इन्स्पे० ज्योतिप्रसाद सकाळपासून तापला होता. भर रस्त्यात खून झाला होता आणि ज्या तरुणीचा खून झाला त्या तरुणीपासून तो अवघ्या हजार यार्डाच्या अंतरावर असून काहीही उपयोग झाला नव्हता. खुनी खून करून, एक गूढ वलय निर्माण करून सटकला होता.

दोन दिवसांत सर्व बाजूंनी प्रयत्न करूनही ज्योतिप्रसादची प्रगती शून्य होती. काहीतरी सुगावा लागेल म्हणून तो सर्व बदमाशांचे अड्डे पालथे घालून आला होता. अगदी कुलाब्यापासून सुरुवात करून भाईंदरपर्यंत येऊन तो थांबला होता, पण तरी तपास लागायच्या नावाने बोंब.

शिवाय गर्दीत फिरताना त्याच्या खिशातले पाकीट कुणीतरी उडवले होते. रात्री शेरे पंजाबमध्ये तो डिनर घ्यायला गेला. त्याने चक्क साठ रुपयांचे बिल केले होते, आणि बिल आल्यावर खिशात हात घातला तेव्हा त्याचा चेहरा फोटो काढण्यासारखा बनला होता. संपूर्ण दिवसभर तो इतका गडबडीत होता की पाकीट कधी मारले गेले हे त्याच्या लक्षातही आले नव्हते. केवळ मॅनेजर ओळखीचा होता म्हणून पुढची शोभा वाचली.

गेल्या दोन दिवसांत नुसती परवड झाली होती त्याची, आणि इन्स्पे० ज्योतिप्रसादला कशातच यश आले नव्हते. त्यात आता जास्त भर पडली होती. सकाळीच आय० जी० पी० रांगणेकरांचा निरोप आला होता आणि तो आता त्यांच्याच ऑफिसात शिरत होता… वैतागून. पण समोरचा साहेबांचा चेहरा ज्योतिप्रसादला बरेच काही सांगून गेला. आता तो तोफेला तोंड द्यायला तयार झाला.

“बसा!” त्याला आत आलेला पाहून रांगणेकर गुरगुरले.

“साहेब, मला जास्त वेळ थांबता येणार नाही. काय बोलायचं ते लवकर बोला.”

“का?”

“सध्या एक महत्त्वाची केस माझ्याकडे आहे!” साहेब जितके जास्त चिडतील, तितकेच लवकर शांत होतील याची त्याला कल्पना होती. म्हणून तो साहेबांना तापवत होता.

“इन्स्पेक्टर, आज तारीख किती?”

“तेरा.”

“किती दिवस ही केस हाताळताय?”

“नऊपासून.”

“म्हणजे चार-पाच दिवस झाले. प्रगती?”

“तपास चाललाय. केस पूर्ण निकालात निघाल्यानंतर फाईल समोर ठेवतो.”

“तोपर्यंत मी काय माश्या मारू? इन्स्पेक्टर, तुमचं ऑफीस खाली आहे. माझ्या डोक्यावर तो बडा साहेब बसलाय - कमिशनर. त्याला काय सांगू?” रांगणेकर उखडले.

“साहेब, माझा तपास सुरू आहे.”

“हे बघ ज्योती, तू केसबद्दल सांग,” तापलेले रांगणेकर क्षणात खाली आले. आणि ज्योतिप्रसाद हसला. आता साहेब गार झालेत हे त्याने ओळखलें.

“एका तरुणीचा खून झाला दादर भागात. खुनी सापडला नाही. आणि ज्या हत्याराने खून झाला ते अगदी चमत्कारिक आहे.” फ्रंटियर मेलसारखा धाडधाड, न थांबता, सर्व केसच त्याने एका तासात साहेबाच्या समोर मांडली. तेव्हा रांगणेकर काही न बोलता फक्त ऐकत राहिले.

“ज्योती, तू तपास घे…”

“हो, सर.”

***

इन्स्पे० ज्योतिप्रसाद खाली कॅबिनमध्ये आला तेव्हा सुदर्शन तोंडातून सिगारेटचा धूर सोडत त्याची वाट पाहत होता.

“ज्योती, तीन मोहरे आम्ही सांभाळतो, तू चौथा सांभाळ.”

“कोण?”

“शंभू भोसले.”

ते नाव कानावर पडले तेव्हाच इन्स्पे० ज्योतिप्रसादच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ह्या सुदर्शनने आपल्यापुढे आघाडी मारलीय याची त्याच क्षणी त्याला कल्पना आली.

“त्याचा इथे कुठे संबंध येतो?”

“ज्योती, तीरखांची एक संघटना होती, जीची आज चौकट झालीय.”

“सुदर्शन, म्हणतोस काय? तो यात आहे?” आश्चर्याने ज्योतिप्रसाद ओरडला.

“हो – राजसिंह, बच्चन आणि माजगे हेही त्याचंच काम करतात.”

“ही भानगड तरी काय?”

“साधं आहे. स्वतःला ‘लंगडा भालू’ म्हणवणारा कोणीतरी ह्यात एका महिन्यापूर्वी उतरलाय. तो अज्ञात आहे. कदाचित याच चौघांतला एक जण, किंवा स्वतः तीरखांच, त्या नावाची कसरत करत बाकी चौघांना धमकी देऊन लुबाडण्याच्या उद्देशाने जाळं पसरून बसलेला असू शकतो.

दोन दिवसांत प्रथमच इन्स्पे० ज्योतिप्रसादने कोटाच्या खिशातून सिगारेटचे पाकीट काढून एक सिगरेट शिलगावली. दुसरी सिगारेट सुदर्शनसमोर धरली. ह्या कथानकाचे अगदी शेवटचे टोक सुदर्शनने त्याच्यासमोर उभे केले होते हे लक्षात येऊन तो भारावून गेला होता.

“सुदर्शन, हा प्रकार आहे तरी काय?”

“ज्योती, तीरखांला कुणीतरी शह देणारा तयार झालाय. त्याला ताक न घुसळता मलई हवीय. जो पैसा तीरखांची चौकट आज जवळ बाळगून आहे त्यातला मोठा हिस्सा त्याला हवाय. त्यासाठी तो त्या सर्वांना धमक्या देत सुटलाय. माली पानसे हा त्याचा पहिला बळी.”

“तिचा कुठे संबंध येतो ह्यात?”

“येतो. ही माली तीरखांची बातमीदार होती. बेमालूमपणे ती श्रीमंत वर्तुळांत फिरत होती. तिने आणलेल्या माहितीचा उपयोग करूनच तीरखां लूटमार करत होता. अगदी योजनाबद्ध रीतीने सर्व कारभार चालला होता.”

“आणि तिचा खून झाला…”

“हो. लंगडा भालू या नावाने अज्ञातात वावरणाऱ्या माणसाने तिला उडवलं.”

“सुदर्शन, हा भालू कोण असावा?”

“तेच समजत नाही. ज्योती, पण तो बाहेर आला की एकदाची या प्रकरणाची फाईल तुला रांगणेकरांच्या टेबलावर आपटता येईल.”

इन्स्पे० ज्योतिप्रसाद हसला. संपूर्ण प्रकरण आता त्याच्या डोळ्यांसमोर उभे होते. भराभरा त्याने पाच सहा कागद लिहून फायलीत सारले.

“सुदर्शन, मी शंभूला गाठतो!”

“छान. ज्योती, आणि एक तुला खाजगीत सांगतो. माजगे माझ्या घाटकोपरच्या बंगल्यातल्या तळघरात आहे.” असं बोलून सुदर्शन ताडताड निघाला आणि इन्स्पे० ज्योतिप्रसाद थक्क होऊन त्याच्या पाठीकडे पाहत राहिला. सुदर्शनचे त्रिकूट त्याच्या चांगलेच पुढे होते.

***

आता इन्स्पे० ज्योतिप्रसादने मोटारसायकल सुरू केली आणि वेगात वरळीच्या रोखाने सोडली. शंभूचे नाव त्याच्या काळ्या फाइलीत सहावे होते.

दहाच्या सुमारास तो बंगल्याच्या फाटकातून आत शिरला आणि त्याने दारावरची बेल दाबली. आतून बेलचाच आवाज घुमला. अर्धा तास ज्योतिप्रसाद बेल वाजवत होता, पण कुणी दार उघडायला आलं नाही. शेवटी बागेत बागकामासाठी ठेवलेला टिकाव एका वाफ्यात पडला होता, तो घेऊन त्याने दोन घावांत दार फोडले. त्याच्या मनात आले - शंभू कुठे बाहेर गेला असला तर परत आल्यावर मला फाडून खाईल.

धक्का देऊन त्याने दार उघडले, आणि इन्स्पे० ज्योतिप्रसाद दिवाणखान्याच्या दरवाजात खिळल्यासारखा उभा राहिला. समोर फोन लोंबत होता आणि फोनजवळ शंभू भोसले तोंडावर पडला होता. त्याच्या पाठीत एक आणि पाठीच्या बाजूला उजव्या कुशीत दुसरा, असे दोन सुरे मुठीपर्यंत खुपसलेले होते.

लंगड्या भालूने दुसरी शिकार केली होती - शंभू भोसलेची.

इन्स्पे० ज्योतिप्रसाद धावत फोनकडे गेला. भराभर त्याने ऑफिसातील निरनिराळ्या खाशांना फोन करून लवकर हजर राहायच्या सूचना केल्या आणि शेवटी ऑपरेटरकडे रांगणेकरांशी कनेक्शन मागितले.

“हॅलो साहेब?”

“कोण? ज्योती?”

“हो. साहेब, दुसरा खून झालाय.”

“काय?”

“हो. शंभू भोसलेचा. अगदी तसाच खून झालाय.”

“कुठे?”

“त्याच्याच बंगल्यात.”

१०

ते परत त्याच टेबलावर बसले होते, पण आता ते तिघेच होते. साडेसात वाजताच तिघांनी एकमेकांना फोन करून ती भयानक बातमी सांगितली होती - शंभू भोसले खलास झाला होता. आणि डॉ० माजगेही नाहीसा झाला होता. इतका धक्का तिघांना कधीही बसला नव्हता. तीरखांच्या माणसांनी बातमी आणली होती - शंभू भोसले संपला होता. दोन सुरे त्याच्या शरीरात घुसले होते - एक कुशीत आणि दुसरा पाठीतून हृदयात.

तीरखां उजव्या बाजूच्या खुर्चीवर बसला होता आणि तो दोघांकडे आपली धारदार नजर रोखून पाहत होता. अ‍ॅड० राजसिंह थरथरत होता. तीच अवस्था बच्चनची होती - तोही घाबरला होता, पण ते न दाखवायचा त्याचा प्रयत्न चालू होता. आता अ‍ॅड० राजसिंह काहीतरी बोलण्यासाठी पुढे झाला आणि तीरखांच्या डोळ्यांतील राग पाहून गप्प झाला. बच्चन चुळबुळत होता. शेवटी गप्प बसलो तर आपल्याला वेड लागेल असे त्याला वाटू लागले. ही कोंडी फोडायला हवी होती.

“तीरखां, शंभू अगदी तसाच खलास झाला,” बच्चन घाबरत म्हणाला.

“हो. मालीसारखाच त्याला उडवलाय.” काही झालेच नसावे अशा आवाजात तीरखां म्हणाला. त्याचा चेहरा कमालीचा शांत होता. असा शांत बनलेला तीरखां कधी कधी किती भयानक बनतो याची समोर बसलेल्या दोघांना कल्पना होती..

“शंभूच्या जवळच्या रकमेचं काय?” राजसिंह थरथरत म्हणाला. सुदर्शन मोहिते काल रात्री त्याला भेटला होता हेही त्याने दोघांच्या कानावर अजूनपर्यंत घातले नव्हते.

“त्याची चौकशी करून काय उपयोग?”

“तीरखां, एक गोष्ट स्पष्ट आहे. आपल्या मागे जो लागला आहे त्याला ती रक्कम हवीय. दोन्ही खून पैशासाठीच झालेत.”

“कशावरून?”

“मालीला फोन आला होता, तेव्हा त्याने पैशाची मागणी केली होती. आणि आपणा सर्वांना त्याने फोन केले होते. तेही पैशासाठीच.” राजसिंह घाबरला होता, तरीही त्याचे वकिली डोके मुद्दे मांडत होते.

“राजसिंह, कबूल. पण शंभूचा पैसा त्याला कशावरून मिळाला असेल?”

“शंभूने मरणाच्या भीतीने सर्व रक्कम देऊन टाकली असेल.”

“माझी रक्कम सुरक्षित आहे,” बच्चन म्हणाला.

“आपणा सर्वांना आता नीट विचार करावा लागेल,” राजसिंह एकाएकी गंभीर झाला होता.

“हो,” बच्चन काहीच बोलू शकला नाही.

“तीरखां, तू फक्त त्या लंगड्याचा विचार करू नकोस,” राजसिंह धीर करून म्हणाला. “त्याच्याशिवाय दुसरेही आपल्या मागे आहेत याचा मी सध्या विचार करतोय.”

“दुसरे कोण?”

“त्रिकूट!”

“हे नवे कोण?” तीरखां आश्चर्याने राजसिंगकडे पाहत बोलला.

“तुला माहीत नाही?” अ‍ॅड० राजसिंह थक्क होऊन बोलला. तीरखां त्याच्यापेक्षा ह्या क्षेत्रात मुरलेला होता, आणि तरी…

“नाही…”

“सुदर्शन मोहिते माहीत नाही?” अ‍ॅड० राजसिंहने विचारले, आणि तरीही सलीम तीरखां त्याच्याकडे पाहतच राहिला.

खरंतर तीरखां सुदर्शन मोहितेला चांगलाच ओळखत होता. त्याच्या भागीदारांबद्दलसुद्धा त्याला बरीच माहिती होती. तिघेही अतिशय भयंकर आहेत हे त्याला माहीत होते. जर खरोखरच हे त्रिकूट आपल्या मागे लागले असेल, तर त्यांचा धोका ही मोठीच अडचण होती. पोलिसांना तीरखांने कधी भीक घातली नव्हती, पण त्रिकूटाबद्दल मात्र तो आजपर्यंत नेहमीच सावध राहत आला होता. त्यांच्या नजरेस कधीही पडायचे नाही हे तत्व त्याने आजपर्यंत तंतोतंत पाळले होते.

“राजसिंह, तुला असं का वाटतं?”

“तो माझ्याकडे आला होता काल.”

“कधी? कोण?” घाबरून तीरखांने विचारले.

“सुदर्शन मोहिते. रात्री आला होता. माली पानसेबद्दल चौकशी करत होता. मी त्याला उडवून लावला.”

“राजसिंह, हे आधी का सांगितले नाहीस?” तीरखां एकाएकी तापला.

“त्याची जरुरी वाटली नाही मला.”

“राजसिंह, तू मूर्ख आहेस,” तीरखां रागाने ओरडला.

“हे बघ तीरखां, एकमेकांत भांडत बसायची ही वेळ नाही,” बच्चनने मध्येच सावरायचा प्रयत्न केला, आणि चिडलेला तिरखा शांत झाला.

घाबरून अ‍ॅड० राजसिंह तीरखांकडे पाहत राहिला, कारण त्याच्या आता शांत झालेल्या डोळ्यांत चकाकणारा जहरी खून त्याला स्पष्ट दिसला होता. हा तीरखां आपल्याला लौकरच उडवणार असे त्त्याला वाटले.

“तीरखां, ऐक. त्रिकूट तितकं महत्त्वाचं नाही,” राजसिंह सावरायचा प्रयत्न करत होता.

“मलाही तसंच वाटते,” बच्चनने दुसऱ्या वेळेला तोंड उघडून राजसिंहला साथ दिली होती.

“आपल्याला खरा धोका आहे लंगड्या भालूचा. मला असंच स्पष्ट दिसतंय. तोच आपल्या सर्व रकमेच्या मागे आहे आणि त्याला आपल्याबद्दल पूर्ण माहिती आहे. त्या अर्थी तो बरेच दिवस आपल्या मागे असावा. त्याने मालीपाठोपाठ शंभूला उडवलं, आणि माजगेसुद्धा आज आपल्यात नाही. तीरखां, शंभू मेला. तो बोलला नसेलही. पण माजगे पोपटासारखा बोलेल.”

“माजगे गेला कुठे?”

“तेच तर समजत नाही.”

“तीरखां, तू तुझ्या माणसांना बातम्या मिळवायला सोड. माजगे सापडायला हवा. तो बोलला तर आपल्याला जास्त धोका आहे. आणि माजगे गेलाय तरी कुठे?” अ‍ॅड० राजसिंह कडक शब्दात म्हणाला.

“त्याला भालूने गाठला असेल?”

“अशक्य. माजगे फार सावध असतो.”

“शंभू नसतो, असं तुला म्हणायचं आहे काय? तीरखां, शंभू भोसले असले हजार भालू पचवेल असंच मी समजत होतो. आणि तोही मेला, याला तुझ्याजवळ उत्तर आहे का?”

“राज, आता तू काय ठरवलं आहेस?”

“तीरखां, आज आपण तिघे आहोत. भालू आज ना उद्या आपल्याला गाठणार आहे. तो पैशासाठी खून पाडतोय. तेव्हा मी म्हणतो, आपण तिघांनीही आपापल्या रकमेतला निम्मा हिस्सा ह्या भालूला द्यावा.”

“राजसिंह, काय बोलतोयस तू?” तीरखां ओरडला.

“हे बघ तीरखां, तुझी मरायची तयारी असली तरी माझी नाही. पुन्हा भालूचा फोन आला तर चक्क माझ्याजवळची सर्व रक्कम मी त्याच्या हातावर आपटून मोकळा होणार आहे.” ठाम आवाजात राजसिंह बोलत होता.

“राज, तू घाबरलायस?” तीरखांने विचारले.

“हवं तर तसं समज. तीरखां, सुरे कुठून येतात हेही समजत नाही, तर तू प्रतिकार तरी कसा करणार आहेस हे सांगशील?” रागाने राजसंह ओरडला.

“मरणाला मी भीत नाही.”

“मीही नाही. पण म्हणून कुत्र्यासारखं मरायची माझी तयारी नाही.”

राजसिंह त्याच ठाम आवाजात बोलत होता. आता तीरखांच्या नजरेची भीती त्याला वाटत नव्हती. निर्णय एकदा घेतला की बदलायचा नाही असाच त्याचा स्वभाव होता. मनातून त्याने भालूचा फोन आल्यावर काय बोलायचे हेही ठरवून टाकले होते.

“राज, तुझा निर्णय पक्का झाला?” तीरखांची नजर सरळसरळ राजसिंगवर रोखलेली होती आणि त्या नजरेत राजसिंहला आपला मृत्यू दिसत होता.

“हो.”

“राज, तू त्याला काय सांगणार आहेस?”

“तुमच्याबद्दल?”

“हो.”

“काहीच नाही. तीरखां मी माजगेच्या रक्ताचा नाही. स्वार्थासाठी माझ्यामागे मी तुम्हांला मृत्यूच्या दाढेत ओढणार नाही,” राजसिंह जोरात म्हणाला आणि झटका आल्यासारखा उठून ताडताड चालत निघाला.

दोन मिनिटांत तो हॉटेल रिट्झच्या पोर्चमधून बाहेर पडत होता. हॉटेलचे वातावरण नेहमीच शांत असते. त्या शांत वातावरणात अ‍ॅड० राजसिंहच्या भरारत गेलेल्या कारचा आवाज स्पष्ट कानावर येत होता. तीरखां राजसिंह गेलेल्या दिशेने पाहत होता तर बच्चन घाबरून त्याच्याकडे. तीरखाच्या नजरेतच त्याला अनेक गोष्टीचा स्पष्ट खुलासा मिळाला होता.

“बच्चन, हा राजसिंह कधीतरी आपल्याला खड्ड्यात गाडून माती सारणार! तू त्याला ओळखत नाहीस. उद्या त्याच्यावर शेकलं तर सरळ तो आपल्याकडे बोट दाखवून मोकळा होईल.”

“तीरखां, तू काय ठरवलं आहेस?” घाबरून बच्चन म्हणाला.

“अजून काहीच नाही. मात्र आज रात्रीला काहीतरी ठरवायलाच हवं.”

“तो धूर्त आहे. त्याला आपल्या हालचालींचा पत्ता लागला तर तो भयंकर बनेल.”

“बच्चन!” तीरखां ओरडला आणि बच्चन कमालीचा घाबरला. आपलीही उद्या राजसिंहसारखीच अवस्था होणार याची त्याला स्पष्ट कल्पना आली.

“तीरखां, मला वाटतं, तू गडबडीने निर्णय घेऊ नयेस.”

“नाहीच! मी एक चाल राजसिंहला खेळण्यासाठी देणार आहे. बच्चन, मी नेहमीच पहिली चाल दुसऱ्याची मानतो. पण शेवटची चाल माझी असते.” तीरखां अशा आवाजात ते वाक्य बोलला की आता ब्रम्हदेवसुद्धा राजसिंहला वाचवू शकणार नाही याची बच्चनला पूर्ण कल्पना आली.

***

दोघे डायनिंग हॉलच्या उजव्या कोपऱ्यात बसले होते, तर त्यांच्या अगदी विरुद्ध बाजूला तीस फुटांवर त्रिकूट बसले होते आणि टेबलभोवतीच्या चौथ्या खुर्चीवर इन्स्पे० ज्योतिप्रसाद बसला होता. डायनिंग हॉलमध्ये मंद प्रकाश होता, पण बाकी सर्व अंधाराचेच साम्राज्य होते. चौघांच्या डोक्यावर फेल्ट हॅट्स होत्या आणि त्या खाली कपाळावर ओढल्यामळे त्यांचे निम्मे चेहरे झाकलेले होते. सर्वांच्या माना खाली होत्या. कुणीच त्यांना ओळखण्याची शक्यता नव्हती. त्यांच्यासमोर टेबलावर तोच ट्रॅन्झिस्टर होता. तिघांच्या बोलण्यातील प्रत्येक शब्द न् शब्द त्यांच्या कानावर आला होता. सुदर्शनने जेव्हा किंचित मान वर करून पाहिले, तेव्हा त्याची नजर अंधाराचा भेद घेत तीरखांच्या नजरेतील धोका ओळखून गेली होती.

“ज्योती, आजचीच रात्र कतलीची आहे,”

“हो. मलाही तसंच वाटतं.”

“आज फक्त राजसिंह वाचणार आहे.”

“काय? कशावरून करतोयस हे विधान?” आश्चर्याने ज्योतिप्रसाद सुदर्शनकडे पाहत राहिला.

“तो वकील आहे. आणि तू त्याच्या गाडीचा आवाज ऐकलास!”

तिघेही चाट पडले होते. आता हा सुदर्शन कोणता धक्का देणार आहे तेच त्यांना समजत नव्हते.

“तो इथून तर गेला, पण तीरखांला आज रात्री तो घरी सापडणार नाही.”

“मग कुठे गेला तो?”

“तो अगदी विरुद्ध दिशेने गेला. तो गेला विरारला. राजसिंहने कधीतरी सुट्टीत विश्रांतीसाठी वापरता यावा म्हणून स्टेशनजवळ घेतलेला बंगला आहे विरारला!”

“सुदर्शन, तू बरीच माहिती मिळवलीस.”

“सहज बोलता बोलता पार्टीच्या वेळी तो बोलला होता.”

तितक्यात समोर तीरखां आणि बच्चन उठले.

“आता तुला काय वाटतं?” ते पाहून घाईघाईने ज्योतिप्रसादने विचारले.

“हे दोघे आजच मरणार आहेत.”

“दोघे?”

“बच्चन आणि तीरखां.”

***

“सुदर्शन, मला काहीतरी बंदोबस्त करायला हवा. मी इन्स्पेक्टर आहे. खून होणार आहे हे समजूनही मी गप्प बसलो तर साहेब मला फाडून खातील.”

“हे बघ ज्योती, ह्यांना आता कुणीही वाचवू शकणार नाहीं.”

“सुदर्शन, तू काय बोलतो आहेस?”

“जा तर मग. काय व्यवस्था करायची ती कर,” सुदर्शन आरामात पाय ताणून बसत म्हणाला.

क्षणभर ज्योतिप्रसादने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, आणि दुसऱ्याच क्षणाला झटका बसल्यासारखा तो उठून चालायला लागला. अवघी दोन-चार पावले तो चालला असेल, त्याच वेळी वातावरणात दोन भीषण किंकाळ्या उमटल्या - पहिली जीव तोडून मारलेली किंकाळी, आणि पाठोपाठ अजून एक किंकाळी वातावरण भेदून गेली.

घाबरून इन्स्पे० ज्योतिप्रसाद स्तब्ध उभा राहिला. एकाच वेळी त्रिकूट झेप घेऊन उठले आणि त्यांनी पोर्चकडे धाव घेतली. सर्वात पुढे सुदर्शन होता आणि पाठोपाठ अनिल आणि अजय होते. इन्स्पे० ज्योतिप्रसादही धक्क्यातून सावरला, आणि तोही तिघांच्या मागे धावत सुटला. तिघे पोर्चमधून बाहेर पडून हॉटेल रिट्झच्या कार पार्कच्या मोकळ्या पटांगणात आले, तेव्हा एक टॅक्सी गेटमधून वेगात बाहेर पडत होती.

पोर्च-लाईटमधून बाहेर पडलेल्या प्रकाशात दोघे तडफडताना सुदर्शनला दिसले. धावत सुदर्शन तीरखांजवळ पोचला. तो तडफडत होता. दोन सुरे - अगदी तेच - त्याच्या पाठीत घुसले होते. तो वेदनेने तळमळत होता. गुरासारखा ओरडत होता. कापलेल्या कोंबडीसारखा तो मातीत तडफडत होता. दोन्ही हात मागे घेऊन पाठीत शिरलेले सुरे काढायचा त्याचा प्रयत्न सुरू होता. ते दृश्य जीवघेणे होते. कोणत्याही क्षणी तो मरेल हे सुदर्शनने ओळखले. तरीही तो काही करू शकत नव्हता.

दोनदा वेगाने पाय झाडून तीरखांचे शरीर ताठ झाले. क्षणात ढिले पडले. तीरखां संपला होता.

त्याच्यापासून आठ फुटांवर बच्चन पडला होता. त्याची मरणाच्या आकांताने तळमळ चालली होती. काही क्षणांत त्याला शेवटचा आचका बसला आणि बच्चन संपला.

लंगड्या भालूने अगदी सहज आपल्या बळींचे घास घेतले होते.

***

इन्स्पे० ज्योतिप्रसाद धावत हॉटेलात शिरला. भराभर त्याने फोन करून हेड ऑफिसला खुनाची हकिगत सांगितली. पुढच्या पाच मिनिंटात तीन सायरन जीप्स घोंघावत हॉटेलच्या गेटमधून आत शिरल्या.

“ज्योती, घाई करायला हवी,” सुदर्शन ज्योतिप्रसादजवळ येत म्हणाला.

“काय?”

“भालू त्याचा तिसरा आणि शेवटचा बळी आज रात्रीच उडवणार. अ‍ॅड्० राजसिंह!”

“अशक्य!” ज्योतिप्रसाद ओरडला.

“हे बघ, तू पंचनामा करत बस. मी पुढचं पाहतो.”

“थांब…मीही येतो.”

भराभर इन्स्पे० ज्योतिप्रसादने दोन इन्स्पेक्टर्सना सूचना दिल्या आणि तो त्रिकूटाबरोबर निघाला. बेफाम वेगात तीन गाड्या आणि एक जीप रिट्झच्या गेटमधून बाहेर पडल्या, तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. बांद्रा स्टेशनवर त्यांनी कार्स उभ्या केल्या आणि शेवटची लोकल पकडली. विरारला जाणारी!

११

(काही तासांपूर्वी काय घडले:)

संध्याकाळ झाली आणि रिट्झ हॉटेलच्या पहिल्या शिफ्टचे वेटर्स आपापल्या क्वार्टरकडे निघाले. शिफ्ट संपल्यावर नेहमीच अशी गडबड उडत असे. त्याच वेळी सात नंबरच्या वेटर्स क्वार्टरमधून एक माणूस बाहेर पडला. त्याला पाहिले तर कुणीही वेटर म्हणणार नाही इतका त्याचा पोशाख अप-टु-डेट होता. त्याने शेवाळी रंगाचा ट्वीड घातला होता. डोक्यावर त्याच रंगाची हॅट होती. दोन पायऱ्या उतरून तो गेटकडे चालत निघाला. चालताना तो डावा पाय जमिनीवर ओढत चालत होता आणि दुसरा उजवा पाय गुढघ्यात वाकवून जोरात जमिनीवर आपटत होता.

आता तो रिट्झ हॉटेलच्या गेटमधून बाहेर पडला. दोन फर्लांग चालत तो जुहू कँडीच्या रोखाने निघाला, तेव्हा एक टॅक्सी भर वेगात त्याच्या समोरून पुढे गेली आणि पाच फुटांवर थांबली. तो मागचे दार उघडून आत बसला आणि टॅक्सी परत भर वेगात निघाली. आज टॅक्सी चालवणारा दुसराच होता.

“संतू, काय झालं?” आत बसता बसताच त्याने प्रश्न केला.

“साहेब, बरीच खळबळ उडालीय. शंभू खलास झाला हे दुपारी तीरखांला समजले.”

“छान, नंतर?”

“त्याने भराभर दोघांना फोन केले.”

“आणि तिसरा?”

“साहेब, तो बेपत्ता आहे.”

“कोण?” आश्चर्याने तो साहेब म्हणवून घेणारा ओरडला.

“डॉक्टर माजगे.”

“संतू, तो होय! तो तर मेला!” जोरात हसला साहेब.

“कधी?”

“काल रात्री. सुदर्शनच्या तळघरात त्याचे प्रेत सडत पडले असेल. सुरा त्याच्या मेंदूत शिरलाय.”

“सुदर्शन?” घाबरून संतू ओरडला.

“हो. सुदर्शन मोहिते. तो काल राजसिंगकडे आला होता. संतू, पोरं हुषार आहेत. म्हणून हे काम मी त्यांच्यावर सोपवलं होतं. पण शेवटपर्यंत त्यांना हेच कोडे पडायला हवे की भालू कोण?” साहेब खदखदून हसला.

त्याचे हसणे अतिशय भेसूर होते. सुडाचे विष ह्या हास्यातून थबथबून ओघळते आहे असेच संतूला वाटले. हसता हसताच साहेबाने कोटाच्या खिशातून दोन सुरे बाहेर काढले. ते शेजारी सीटवर टाकून त्याने पायातला बूट काढून हातात घेतला. आणि उलटा करून तळाची बाजू वर घेतली. तो तळ चांगला अर्धा इंच जाड होता. टाचेच्या बाजूला दोन्ही बोटांनी दाबून साहेबाने तळ बाहेर ओढला, तेव्हा कापल्यासारखा त्याचा अर्धा भाग बाजूला झाला. आत विलक्षण रचना होती. टाचेच्या बाजूला लागून दोन स्प्रिंगा होत्या आाणि स्प्रिंगांच्या पुढे पाव इंच जाडीचा लोखंडी तुकडा होता. त्या लोखंडी तुकड्याला हुकासारखा एक नॉब होता.

दोन्ही सुरे साहेबाने त्या लोखंडी तुकड्याच्या समोर दाबून बसवले. स्प्रिंग मागे सरकली, दाबाने आकसली, आणि नॉबचा हुक ‘कट’ आवाज करत स्प्रिंग खेचून थांबला. काही बिघाड नाही याची साहेबाला खात्री करून घ्यायची होती. त्याने बुटाच्या टाचेवर हाताची मूठ आपटली. ‘सप् सप्’ असा आवाज झाला आणि दोन्ही सुरे झटक्यात उसळत बाहेर पडले, आणि टॅक्सीच्या दाराला असलेल्या मऊ कॉनव्हासच्या आवरणात घुसून थरथरत राहिले. टाच आपटल्यावर सुरे असेच अचूक बाहेर पडणार होते. दुसरा बूट काढून त्याने तसलेच दोन सुरे दुसऱ्या बुटाच्या तळाला बसवले. सुरे दाबून झटक्यात तळ फिरवला तेव्हा परत तो ‘कट’ आवाज झाला.

त्याने दोन्ही बूट पायांत घातले आणि हात चोळले. आज तो निदान दोघांना तरी उडवणार होता. त्याने मनाशी तसा निश्चय केला होता. टॅक्सी आता माटुंगा मागे टाकून दादरच्या रोखाने धावू लागली.

“संतू, इथेच थांबव.”

टॅक्सी थांबली तेव्हा तो घाईघाईत बाहेर पडला आणि समोरच असलेल्या टेलिफोन बूथच्या रोखाने निघाला. संतूला त्याच्या चेहऱ्याचा रंग क्षणाक्षणाला बदलताना दिसत होता. सुडाचा जबरदस्त असा भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होता. त्याने एक नंबर फिरवला. पलीकडे रीसिव्हर उचलल्याचा आवाज होईपर्यंत तो स्तब्ध होता.

***

“हॅलो, अ‍ॅड० राजसिंह हिअर.” साहेब हसला. अगदी त्याला हवी ती संधी आज मिळाली होती. प्रथम राजसिंहबरोबर बोलायला मिळावे अशी त्याची मनापासून इच्छा होती.

“राजसिंह, मी भालू बोलतोय. लंगडा भालू. राजसिंह, मला तू दडवलेली रक्कम हवी आहे.”

“कसली रक्कम?”

“साव बनायचा प्रयत्न केलास तरी मला तू फसवू शकणार नाहीस. राजसिंह, मी आज रात्री तुला गाठणार आहे.”

“तूच मरशील… तुला मरावेच लागेल भालू!” घाबरलेला राजसिंह अचानक ओरडला. त्याचा स्वतःवरचा ताबा उडाला होता.

“राजसिंग, पुन्हा विचारतो.”

“गरज नाही,” एवढेच बोलून राजसिंगने खटकन रीसिव्हर आपटला.

तो साहेब म्हणवणारा पुन्हा डायल फिरवू लागला. नाणी टाकून त्याने रीसिव्हर डाव्या हातात घेतला.

“हॅलो, तीरखां?”

“हो, तीरखां बोलतोय. कोण?”

“तीरखां, शंभू मेला.”

“काय?”

“माजगेसुद्धा रात्री खलास झाला. त्याच्या मेंदूत वरून सुरा घुसलाय.”

“तू कोण बोलतोयस?” तीरखांचा आवाज थरथरत होता.

“मी भालू. तीरखां, मला लुटीची रक्कम हवीय. नाहीतर तुला मरावे लागेल.”

“भालू, एक दिवस तुला मी गाठणार आहे.”

“त्याआधीच तू मरशील.”

ताडकन त्या साहेबाने फोन क्रेडलवर ठेवला आणि दार उघडून तो बूथमधून बाहेर पडला. रस्ता पार करून टॅक्सीपर्यंत येताना तो रागाने पिसाळून उठला होता. मागच्या सीटवर तो बसला आणि त्याच रागाच्या भरात ओरडला, “संतू, हॉटेलकडे घे.”

टॅक्सी मागे वळली. अचानक साहेबांचा बेत बदललेला पाहून संतूला आश्चर्याचा धक्का बसला. पाऊण तासाने संतूने टॅक्सी हॉटेल रिट्झच्या पार्किंग लॉटमध्ये सारून पार्क केली, तोपर्यंत मागे बसलेला साहेब शांत झाला होता.

“संतू, आत जाऊन टेबल बुक करून ये. कुणाला संशय यायला नको. निदान पंधरा मिनिटं तरी मॅनेजरबरोबर गप्पा मार,” साहेब म्हणाला, आणि क्षणाचा उशीर न लावता संतू बाहेर पडला.

साहेब समोर काचेच्या आत असलेल्या दोन आरशांकडे पाहत मागच्या सीटवर शांतपणे बसला होता. संतूने टॅक्सी अशा जागी उभी केली होती की हॉटेलच्या समोर असलेल्या पटांगणातील प्रत्येक हालचाल आत बसून आरशात दिसत होती.

सव्वासात झाले आणि साहेब सावध झाला. आत येणारी गाडी पाहून तो हबकलाच. सुदर्शनची सन-बीम आत येत होती. गाडी पाहताच त्याने ती ओळखली. पाठोपाठ दुसर्‍या दोन गाड्या आल्या. एक फियाट होती आणि एक स्टँडर्ड हेरॉल्ड.

सुदर्शन ह्या वेळी इथे कसा?

तिघे आत शिरतात न शिरतात तोच त्याला पुन्हा जबरदस्त धक्का बसला. बॉम्बे सी० आय० डी०ची जीप गेटमधून आत शिरत होती. जीप थांबली आणि इन्स्पे० ज्योतिप्रसाद खाली उतरला.

सुन्न झाल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. क्षणभर त्याला वाटले, आपली सर्व योजना ढासळणार! तरीही तो हार मानायला तयार नव्हता. चौघे असले तरी आपल्याला ते अडवू शकणार नाहीत अशी घमेंड त्याला स्वत:बद्दल होती.

साडेसातला इतर तीन गाड्या रिट्झच्या गेटमधून आत शिरल्या, आणि त्यांतून तिघे बाहेर पडताना त्याने पाहिले. राजसिंह फुल सूटमध्ये होता. मागे दोघे होते - तीरखां आणि बच्चन.

आत शिरताच तिघांना उडवायचे असा त्याचा विचार होता, पण तो आता बदलावा लागणार होता. कसलीही घाई नसल्यासारखा तो बसून राहिला. संतू आत येऊन ड्रायव्हिंग व्हीलजवळ बसला. तेव्हाही तो हल्ला कसा उडवून द्यायचा याचा विचार करत होता.

“साहेब, तिघे जाम हादरलेत.”

“हम्…”

“साहेब, तुम्ही काय ठरवलंय?”

“संतू, प्रश्न विचारू नकोस. फक्त गाडी कोणत्याही क्षणी फाटकातून बाहेर काढण्याची तयारी ठेव,” तो जरबेने बोलला आणि संतू गप्प झाला.

नऊला दहा मिनिटे कमी असताना अ‍ॅड० राजसंग घाईघाईत बाहेर पडताना त्याने पाहिला. भरारत राजसिंगने कार गेटमधून बाहेर काढली, आणि तो हसला. राजसिंह लवकर का बाहेर पडला हे आता त्याच्या लक्षात आले. आजची रात्र तो विरारच्या बंगल्यात काढणार ह्याची साहेबाला कल्पना आली. राजसिंगचा पूर्ण इतिहास त्याला माहीत होता. राजसिंह पाताळात जरी दडला तरी तो त्याला केव्हाही खेचून काढू शकला असता.

अर्ध्या तासाने इतर दोघे बाहेर पडले. त्याने तीरखां आणि बच्चन यांना पोर्चमधून पार्किंग लॉटकडे सरकताना पाहिले आणि दार खेचून बाहेर पडताना तो हळू आवाजात म्हणाला, “संतू, गाडी तयारीत ठेव.”

आता तो चालत दोघांच्या रोखाने निघाला. त्याच्या डोळ्यात सुडाचा खून उसळत होता. चालताना त्याला आपल्या अधू पायाचाही पूर्ण विसर पडला. अंगात चैतन्य संचारल्यासारखे वाटत होते. दोघांपासून पाच पावलांवर तो थांबला. दोन्ही हात खिशात खुपसून तो फाशीची शिक्षा ठोठावणाऱ्या जेलरच्या रूबाबात उभा राहिला.

“तीरखां!” तो बोलला तेव्हा त्याचा आवाजही चढला नव्हता. सार्वजनिक ठिकाणी तो उभा होता. पाहता पाहता लोक जमा झाले असते.

“कोण?” गपकन कारच्या रोखाने निघालेला तीरखां उभा राहिला.

“मी. भालू… किंवा शंकरदेव पानसे. तू ठरव!”

“तू? इथे?”

“हो तीरखां! पण तुझ्या पापांचा पाढा मी राजसिंहपुढे वाचीन. तुझ्याशी मला काहीही बोलायचं नाही. फक्त तुम्हा दोघांना मारायचं आहे.”

दोघांनी घाबरून आजूबाजूला पाहिले. भालू एकटाच आपल्याला धमकी द्यायला येईल असे त्यांना अजिबात वाटले नव्हते, पण पानसे जिवंत असण्याचा धक्का कितीतरी मोठा होता. तीरखांचा हात झटक्यात कंबरेकडे सरकला, मात्र त्याला रिव्हॉल्वर काढायची संधीच मिळाली नाही. काय होते आहे हेच त्याला समजले नाही.

भालू उजवा पाय झाडून, अधू पायावर गिरकी घेऊन उसळला आणि त्याच्या हाताचा फटका तीरखांच्या मानेवर जोरात बसला. तीरखां सावरायच्या प्रयत्नात असतानाच हेलपाटत फेकला गेला. त्याच वेळी साहेब जमिनीवर पाय आपटून उसळला आणि त्याच्या पायाचा फटका जोरात तीरखाच्या पाठीत बसला. साहेबाने पायाला एक खास झटका दिला.

सप सप आवाज करत दोन सुरे तीरखाच्या पाठीत घुसले.

तीरखाने भीषण किंकाळी ठोकली आणि तो प्रकार पाहणारा बच्चन धावत सुटला. मात्र दोन पावलेसुद्धा त्याला धावता आले नाही. त्याच्याही पाठीत दोन जोराचे फटके बसले आणि बच्चन तोंडावर आपटला. खाली आपटताच त्याने जीव तोडून किंकाळी ठोकली.

पाठीत धारदार काहीतरी शिरले होते. त्याची कळ त्याच्या मेंदूपर्यंत पोचली आणि बच्चन पुन्हा किंचाळला.

साहेबाने दोन पायांवर उडी घेत स्वतःला सावरले. तेव्हा टॅक्सी वेगात येऊन त्याच्याजवळ थांबली. मागचे दार खेचून तो आत बसला आणि त्याने मागच्या सीटवर मान टेकली. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. छाती भात्यासारखी वरखाली होत होती.

“संतू, बांद्रा स्टेशनवर घे,” त्याही स्थितीत तो धापा टाकत ओरडला, तेव्हा टॅक्सी रिट्झ हॉटेलच्या गेटमधून बाहेर पडली होती. कितीतरी वेळ त्याचा श्वास टॅक्सीच्या वेगाशी स्पर्धा करत होता.

विरारची दोन तिकिटे काढून तो स्टेशनवरच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मवर आला. लोकल धडधडत आली आणि घाईघाईने तो फर्स्ट क्लासच्या डब्यात शिरला. मागे संतू होताच. विरार हे वेस्टर्न रेल्वेचे शेवटचे स्टेशन होते आणि तिथे पोचायला निदान एक तास तरी लागणार होता. शांतपणे तो एक बाकावर बसला आणि त्याने डोळे मिटून घेतले.

आता तो राजसिंहला कसे मारायचे याचा विचार करत होता. विरारच्या बंगल्याचा पूर्ण नकाशा त्याच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर उभा होता. एक तास त्याने ह्याच विचारात घालवला. संतूने काही बोलायचे धाडस केले नाही.

लोकल विरार स्टेशनवर उभी राहिली तेव्हा तो स्टेशनच्या विरुद्ध बाजूच्या प्लॅटफॉर्मवर उतरला आणि चालत लॅव्हेटरीकडे सरकला. पाच मिनिटांत तो लॅव्हेटरीमधून बाहेर आला, तेव्हा शेवटचे दोन सुरे त्याने बुटाच्या तळव्यात बसवले होते.

तो अ‍ॅड० राजसिंहच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर उभा राहिला तेव्हा रात्रीच्या साडेअकराचा टोला पडत होता.

आत शिरणे त्याच्या दृष्टीने फार सोपे होते. दाराला अंगचेच कुलूप होते आणि त्याच्यासारख्या सराईत दरोडेखोरासाठी ते कुलूप उघडणे म्हणजे हातचा मळ होता. त्याने एक तार थोडी वाकवून की-होलमध्ये सारली, दोन वेळा फिरवली, आणि खटक्याची मूठ सावकाश फिरवून तो आत शिरला. आता तो दिवाणखान्यात उभा होता आणि तरी त्याच्या आगमनाची साधी चाहूलसुद्धा राजसिंहला लागली नव्हती.

राजसिंह त्याच्याकडे पाठ करून तिरका बसला होता. समोर टीपॉयवर व्हॅट सिक्स नाईन होती, आणि स्वतःच्याच विचारांत गढून तो ती सोड्याशिवायच पीत होता. हातातील सिगारेट सारखी ओठांजवळ नेऊन धुराची वलये हवेत फेकत होता.

“राजसिंह, मी आलोय,” करड्या आवाजात साहेब म्हणाला, आणि तो आवाज कानावर पडल्याबरोबर राजसिंह धडपडून उठला. साहेबाने बंगल्याची तंतोतंत माहिती असल्यासारखी भिंतीवरच्या अनेक बटणांतील तीन बटणे दाबली आणि सर्व दिवाणखाना प्रकाशाने न्हाऊन निघाला.

थक्क झालेला राजसिंह डोळे फाडून त्याच्याकडे पाहत होता.

पाय ओढत काळासारखा साहेब त्याच्या रोखाने निघाला.

***

“पानसे!” राजसिंह दचकून ओरडला.

“हो राजसिंह, मी पानसेच,” त्याच्या आवाजात खून होता. राग होता. सूड तर काठोकाठ भरला होता.

“तुम्हांला वाटलं, पानसे मेला? नाही, मी जिवंत आहे. तुम्ही सर्वांनी माझा विश्वासघात केलात. त्याचा बदला घ्यायला मी जिवंत आहे अजून.”

मशीनगनमधून गोळ्या सुटाव्यात तसा तो बोलत होता. भूतकाळातील दडलेले पडदे एकेक करून, उचकटत, भीषण सत्य राजसिंहसमोर उघडे करून दाखवत होता. राजसिंह थरथरत होता. पानसेच्या तोंडून निघणारे शब्द ऐकत होता.

“राजसिंह, दहा वर्षांपूर्वी विमान अपघातात मला ठार करण्याचा तुम्ही सर्वांनी निकराचा प्रयत्न केलात. नशिबाने मी वाचलो. तरीही मला एक पाय कायमचा गमवावा लागला.

“माझ्या हिश्शाचे चाळीस लाख तीस हजार तुम्ही पाच जणांनी वाटून घेतलेत. आणि माझ्या मुलीला ठार करून तिच्या जागेवर नकली मालिनी पानसे तयार करून बसवलीत. पैशासाठी तुम्ही मला आणि माझ्या मुलीला ठार केलेत. देवाने मला तुमचा सूड घेण्यासाठी जिवंत ठेवले. हा माझा इतिहास आहे.

“आता चार खलास झाले, तसाच पाचवा तूही मरणार आहेस.”

घाबरून राजसिंहचा हात खिशाकडे सरकला.

“राजसिंग, पुन्हा तुझा हात खिशाकडे सरकला तर पिस्तूल बाहेर काढायच्या आत तू मरशील.”

“नको, मला मारू नकोस.” राजसिंह घाबरून ओरडला.

“का? माझ्या मुलीला ठार करताना तुझा हात कसा उचलला?”

“पानसे, मी नाही … मला…” राजसिंह कमालीचा घाबरला होता. त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा बाहेर पडेना.

“राजसिंह, तुला कुणीही वाचवू शकणार नाही.”

आणि तो उसळला…

पण त्याच्यामागे दार हळूहळू उघडले जात आहे याची त्याला कल्पना नव्हती. राजसिंहच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजात हलकेच दार उघडून त्रिकूट आत शिरलेले त्याला समजले नव्हते.

सुदर्शनने चपळाईने हालचाली केल्या, पण तरीही पहिला सुरा राजसिंहच्या पाठीत शिरलाच. पानसे पुन्हा उसळी घेत असताना मात्र सुदर्शनने सरळ त्याच्या पायावर गोळी झाडली. जोरात ओरडून पानसे खाली आपटला. आपटताना तो तोंडावर, गुढग्यात पाय वाकवून पडला होता, आणि त्याच्याच बुटातून सणसणत बाहेर पडलेला सुरा त्याच्या नरड्यातून आरपार गेला.

***

“ज्योती, शेवटी त्याच्याच सुऱ्याने तो मेला,” पुढ्यात पडलेल्या शंकरदेव पानसेच्या देहाकडे बघत सुदर्शन म्हणाला.

सुरा कसा फेकला गेला होता हे अजूनही ज्योतिप्रसादला समजत नव्हते. त्याने पानसेच्या पायातला बूट खेचून काढला. तो तपासताना त्याने चुकून टाचेजवळ दाब दिला तेव्हा बुटाचा अर्धा तळ बाजूला झाला.

“सुरा इथे बसवला होता तर!” सुदर्शन अवाक होऊन उद्गारला. इतक्या मृत्यूंना कारणीभूत असलेल्या त्या अजब बुटाकडे आणि सूडाच्या आगीत होरपळून मेलेल्या त्या अजब गुन्हेगाराकडे सर्व जण आश्चर्याने पाहत होते.

त्या चमत्कारिक खुनांचे आणि विलक्षण सुऱ्यांचे रहस्य शेवटी हे असे उलगडले होते.