आदित्य पानसे यांचे बखरलेखनाचे तीस संकेत
... कोणत्या बखरीचा लहेजा उचलायचा हे ठरल्यावर ते कृत्रिम वाटू नये म्हणून नोट्स काढल्या. पण मग लक्षात आलं की हे नियम फॉर्ममध्ये लिहिलं तर नंतर संपादन करताना उपयोगी पडेल...
जितेंद्र (जितेन) वैद्य
Mon Apr 06
आदित्य पानसे यांचे बखरलेखनाचे तीस संकेत
०. लेखनात सातत्य आणि प्रमाण नसणे हा मुख्य नियम. उदा० एकाच व्यक्तीला एकीकडे ‘अबदाली’ आणि दुसरीकडे ‘आब्दलु आली’ म्हटलेलं असू शकतं. Every rule has exceptions. या नियमाचं लॉजिक असं की मोडीही धावती लिपी (running script) आहे. लिहिणारा भराभर लिहीत जातो. त्यात एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जाऊ शकतो. नंतर पुनर्लेखन झाल्यास कदाचित सातत्य आणलं जाईल. पण तीही शक्यता कमी.
१. ‘ऱ्य’ ऐवजी इ वापरणे. उदा. बखऱ्या → बखरिया.
२. स्वजोडाक्षरेआल्यास जोडाक्षर गाळावे. उदा० चित्तांत → चितांत.
३. ज, झ, च या व्यंजनांचा गुरु उच्चार एखाद्या शब्दात असेल तर ‘य’ जोडावा. उदा० चमेली → च्यमेली.
४. Bowdlerisation rule: शिव्या लिहायची वेळ आल्यास त्या संस्कृत करून लिहाव्यात. उदा० नजीबखान आईझवा → नजीबखान मात्रागमनी.
५. परका शब्द ‘कोपरेघासून’ घ्यावा. ‘कोपरेघासायचा’ संकेत असा की तत्कालीन भाषेत आगोदरच वापरात असलेल्या शब्दाशी काही ध्वनीसाधर्म्य असेल तर त्या शब्दाचं लॉजिक इथे चेपून द्यावं. उदा० कंदाहारास → खंदारास. (कारण ‘खंदा’ हा शब्द आगोदरच वापरात आहे.)
६. ‘वले’ याला ‘विलें’ म्हणणे. आणि तत्सम. उदा० समजावले→ समजाविलें.
७. कालगणना फारसी पद्धतीने. उदा० पेस्तर साली → पुढील वर्षी
८. ‘श’ चा ‘स’ करणे. उदा० शिंदे → सिंदे, सत्यानाश → सत्यानास
९. इकाराचा उकार होणे. उदा० निघून → निघोन. चुकून → चुकोन.
१०. शक्यतो ‘ळ’ वापरू नये. अपवाद म्हणजे विशेषनामांत. उदा० जगदाळा.
११. लघु‘झ’चा ‘जह’ होतो. उदा० झाली → जाहली.
१२. यचे→ वयाचे. उदा० जायचे→ जावयाचे
१३. शब्दाच्या शेवटी ‘न’ आल्यास त्याचा ‘ण’ होतो. उदा० ज्यानें→ ज्याणें
१४. Abbreviations. उदा० प्रमाणे→ प्राो. साहेब → साो; आणि समु ारे→ साो. Context is the king here.
१५. ‘अ’ ने सुरू होणारा शब्द ‘आ’ ने सुरू करावा. उदा० अडकित्ता → आडकित्ता. अधिक नि यम २ वापरून ‘आडकिता’.
१६. सैन्याशी किंवा राज्यकारभाराशी संबंधित क्रियापदे फारसी वापरावीत. (कारण सैन्याची आणि राज्यकारभाराची भाषा फारसी होती.)
१७. वाक्ये लहान पण impactful असावीत.
१८. Straplines rule : चमकदार वाक्ये. उदा० आप मेला जग बुडाले. आबरू जातेआणि वाचतो कोण?
१९. प्रत्यय कधीकधी शब्दांत जिरवणे. उदा० ईश्वरानें→ ईश्वरें
२०. ‘ओ’चा ‘वो’ होतो. उदा० ओढून → वोढून.
२१. ‘ए’चा ‘ये’ होतो. उदा० एकाएकीं→ येकायेकीं.
२२. भाषेत भारदस्तपणा आणायचा असल्यास संस्कृत शब्द चेपावा. उदा० कपडे→ प्रावरण, जेवण → भोजन.
२३. ‘अ’कारानंतर ‘य’ आल्यास तो गाळून आदल्या अ’काराचा ‘ए’कार करावा. उदा० प्रयत्न → प्रेत्न.
२४. ‘वू’ चा ‘ऊ’ होतो. वू = व + ऊ. म्हणजे‘व’चा लोप झाला आहे. उदा० फिरवून → फिरऊन.
२५. सामान्य जोडशब्द प्रसंगी उलट करणे. उदा० रागरंग → रंगराग.
२६. ‘बरोबर’ किंवा ‘सोबत’ → समागमें
२७. समानार्थी संकृतोद्भव आणि फारसी शब्द प्रसंगी एकाच वाक्यात लिहिणे. उदा० भाऊसाहेबीं सरदार लोकांचे चित्तांत किलाफ होता त्याचा संशय दरू केला. (किलाफ आणि संशय हे समानार्थी शब्द आहेत.)
२८. दमाजी गायकवाड आणि त्याची ‘पेशव्यांस डावेंहाती मुजरा’ करायची लकब. असले तपशील common knowledge मानून लिहावेत आणि तळटिपेत backstory द्यावी.
२९. Selective अनुस्वारविलोप. उदा० हिंदुस्थानातून फिरोन आल्यावर तुमचा गुता संपूर्ण उकलून देतो. आता ‘गुंता’चा ‘गुता’ होतो पण ‘संपूर्ण’चा ‘सपूर्ण’ का होत नाही?
३०. जोडशब्द सुटृॆ करून लिहिणे. उदा० कित्येक → कितीएक.