शिल्पा पाठक

शिल्पा पाठक

कॅनडातला निसर्ग आणि माणसं...

मी शिल्पा पाठक.  मी मूळची कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटीची असून सध्या कॅलगरी या कॅनडातल्या शहरात राहते. मी व्यवसायाने अभियंता आहे आणि गेल्या काही वर्षांपासून मी अतिशय संथगतीने मराठी कथा आणि ललितलेखन करते आहे. 

लहानपणापासून मला वाचन-लिखाणाची आवड होतीच, पण गेल्या पंचवीस वर्षांत, तीन खंडांतून स्थलांतरं केली. कला-साहित्य व्यवहारांपासून अगदी दूर असलेल्या व्यवसायात काम केलं. त्यामुळे मला आपल्या मूळभाषेपासून विलग होत असल्याची खंत वाटत होती. आणि त्यामुळेच व्यक्त होत राहण्याची गरज भेडसावत होती. तुरळक ललितलेखनातून ती गरज काही अंशी पूर्ण होत होती खरी. तरी एकदा कथालेखनाचा प्रयत्न केला. मग मात्र भाषेच्या मोकळ्या अवकाशात आपल्या मनाप्रमाणे बागडण्याचा आनंद आपल्याला यातून घेता येतोय याची जाणीव अधोरेखित झाली.

माझ्या आतापर्यंतच्या कथा एकाच वेळी माझ्या सध्याच्या स्थानिक वातावरणातल्या आहेत, पण त्या या वातावरणाशी अगदी विसंगत असलेल्या माझ्या मातृभाषेत वावरतात. त्यांतली पात्रं देश, भाषा, संस्कृती यांपलीकडल्या वैश्विक सुखदुःखांशी भिडतात आणि पर्यावरणाच्या माध्यमातून आपलं सत्य शोधत राहतात. 

[email protected]