हेमंत राजोपाध्ये
भारतीय धर्म, इतिहास, संस्कृत भाषा, दक्षिण आशियाई धर्म आणि धर्मेतिहास ...
माझे नाव हेमंत प्रकाश राजोपाध्ये. राहायला पुणे आणि खोपोली.
सध्या ‘ओला-कृत्रिम’ या कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) क्षेत्रातील भारतीय कंपनीत प्रमुख-भाषातज्ज्ञ म्हणून कार्यरत. फ्लेम विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत विषयाचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन. भारतीय धर्म, इतिहास, संस्कृत भाषा, दक्षिण आशियाई धर्म आणि धर्मेतिहास या विषयांचे विविध विद्यापीठांत आणि खाजगी संस्थांत अध्यापन. अनेक अकादमिक आणि बिगर-अकादमिक व्यासपीठांसाठी अकादमिक लिखाण, व्याख्याने. छंद म्हणून हिंदी चित्रपटांसाठी, ‘म्यूझिक अल्बम्स्’साठी हिंदी, संस्कृतात गीतलेखन.
शालेय वयात जुजबी ललित आणि विडंबनपर लिखाणाला सुरुवात. पदवी अभ्यासक्रम काळात (१७-१८व्या वर्षी) ललित आणि अकादमिक संशोधकीय लिखाणाचा आरंभ. गीतलेखनाची सुरुवात १९-२०व्या वर्षी.
प्राच्यविद्या, भारतीय समाजातील धर्म-श्रद्धाव्यवहार, सांस्कृतिक व्यवहार या विषयांचे वाचन, माणसे आणि वेगवेगळी सामाजिक-राजकीय-आर्थिक- व्यवहारांतील विविध क्षेत्रांचे सहभागी निरीक्षक म्हणून बारकाईने निरीक्षण करणे, संशोधनानिमित्त प्रवास आणि विविध समूहांत मिसळणे, संवाद साधणे, एकट्याने डोंगरात भटकणे, आवडत्या विषयावर वा प्रवासादरम्यान केलेल्या निरीक्षणांवर विचार करत लोळत पडणे या मला आवडणाऱ्या काही गोष्टी.
आणि मला न आवडणाऱ्या काही गोष्टी? ललित लिखाणाविषयीची माझी पराङ्मुखता आवडत नाही. स्वतःचा आळस आवडत नाही. आणि समाजातील आदर्श मानल्या जाणार्या वैचारिक आणि सामाजिक व्यवस्थांतील दंभ आवडत नाही.
पब्लिक लिंक्स: ब्लॉग, फेसबुक, इंस्टाग्रॅम, लिंकडइन्