
गीता भावसार
मी शिक्षणाने कंप्यूटर इंजिनिअर, व्यवसायाने सायन्स-मॅथ्सची शिक्षिका. चित्र काढायला आधीपासूनच आवडायचं. पण शाळा सुटली तसं चित्रही सुटलं. माझी मुलं पेन्सिल धरायला लागली तेव्हा लक्षात आलं की त्यांनाही चित्र आवडतंय. त्यांच्या कल्पना त्यांना चित्रातून जास्त छान रंगवता येतात शब्दांपेक्षा. मुलं हे करत असताना मलापण मजा यायला लागली. मीपण त्यांच्यासोबत बसायला लागले. आणि चित्रांचाही सिलसिला त्यांच्यासोबत नव्याने सुरू झाला. खूप बारीकबारीक गोष्टी मुलं नकळत आणि सहज शिकवून जातात.
रविवारी मी, मुलगा, मुलगी - आम्ही तिघे कागद, ब्रश, रंगांचा पसारा घालतो. मनसोक्त चित्रं काढतो.
मला चित्रपट, मालिका बघायला आणि एखादा कोपरा धरून पुस्तकात बुडून जायलापण खूप आवडतं. घराजवळ टेकडी आहे . सुटीच्या दिवशी तिथं भटकायला आवडतं. डोळ्यांना जे जे सुंदर दिसेल त्याचे फोटो काढायला आवडतात. आणि ते शेअर करायलापण आवडतं.
क्रोशाचं विणकाम, रेशमी दोऱ्यांचं भरतकाम, कुंड्यांतली-झाडांची सगळी कामं, गप्पा मारायला… इतकं काय काय आवडतं, की वेळ कायमच अपुरा पडतो.
.