जितेंद्र (जितेन) वैद्य

जितेंद्र (जितेन) वैद्य

मी जितेंद्र वैद्य. जन्म कराडचा, मोठा झालो औरंगाबादेत, आणि कॉलेज मुंबईत. गेली तीस वर्षं अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये राहतो. सध्या ‘न धरी शस्त्र करी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ या प्रकारचं इतर लोकांना सल्ले देण्याचं काम करतो आणि मेघनाला ‘पुस्तकगप्पा’ कार्यक्रम चालवायला मदत करतो.

मला माणसं आवडतात आणि मला गोष्टी आवडतात. माणसांना समजावून घ्यायला, त्यांच्या गोष्टी ऐकायला आवडतं. ओघानेच सर्व प्रकारचं ललित साहित्य आवडतं. लहानपणापासून बेशिस्तपणे आणि भरपूर वाचत आलो आहे. गेली काही वर्ष मुख्यतः इंग्रजीमध्ये, पण आता गेल्या दोन वर्षांत पुन्हा मराठीत वाचायला सुरुवात केली आहे.

मी अभिजात साहित्य वाचतो, परंतु त्याबरोबरच भरपूर genre fiction वाचतो (विशेष व्यसन विज्ञानकथांचं, पण अद्भुतकथांचंही). वाचनाची आवड असणारा एखादा मनुष्य जर फक्त अभिजात साहित्यच वाचत असेल, तर त्याची वाचनाची आवड जरा संशयास्पद असते असं माझं मत आहे.

याशिवाय मला भटकायला आवडतं. सह्याद्रीत, हिमालयात आणि अमेरिकेत डोंगरखोऱ्यांतून बरीच भटकंती केली आहे. कॅम्पिंग करायला आवडतं, रोड ट्रिप्स आवडतात, मुझियम्समध्ये दिवस-दिवस काढायला आवडतात. खायला आवडतं आणि मित्रमैत्रिणींच्या मैफिली जमवून खिलवायलाही आवडतं. स्वैपाक करायला आवडतो. निरनिराळी कॉकटेल्स तयार करून प्यायला आवडतात. त्याला लागणारी निरनिराळी सिरप्स घरी तयार करायला आवडतात. मला संगीताची बऱ्यापैकी आवड आहे. जुनी आणि नवी हिंदी सिनेमातील गाणी, कव्वाल्या आणि गज़ल, शास्त्रीय संगीत, Western Classical music, Classic Rock music ऐकायला आवडतं. थोडंफार गातो आणि बऱ्यापैकी शिट्टीही वाजवतो.

जितकं खरं कळतं त्यापेक्षा आपल्याला जास्ती कळतं असं दाखवणारे लोक आवडत नाहीत. दांभिकपणा आवडत नाही. कोरडेपणा आवडत नाही. खोटं बोलणं आवडत नाही.