विक्रांतव्हर्स आणि वाचनसंकल्प
मूळच्या ओमप्रकाश शर्मांचा मानसपुत्र जगत. त्याच्या लोकप्रियतेमुळे अनेक नकली ओमप्रकाश शर्मा जन्माला आले. कुमार कश्यप हा यांपैकी एखादा घोस्ट रायटर असावा. त्याने जगत ही व्यक्तिरेखा तर उचललीच, पण त्याखेरीज जगत या पात्राला गुरुस्थानी मानणारी विक्रांत ही नवी व्यक्तिरेखा जन्माला घातली. हा विक्रांत इतका लोकप्रिय झाला, की इतर नकली ओमप्रकाश शर्मांनीही विक्रांत-कादंबर्या लिहाव्यात असा आग्रह प्रकाशक धरू लागले आणि त्यातूनच विक्रांत-कादंबर्यांची संख्या भरमसाठ वाढत गेली

पंकज भोसले
अतिथी संपादक
Thu Jan 09
विक्रांतव्हर्स आणि वाचनसंकल्प
पंकज भोसले
१ नकली लेखकांच्या असली कादंबऱ्या
अलिकडच्या काही वर्षांत मी ‘पुस्तकालय’ आणि ‘पुस्तकों का संसार’ या व्हाॅट्सॲप हिंदी ग्रंथविक्री समूहाशी जोडला गेलो. फार विशेष कारण कोणतेच नाही. निखिलेश चित्रे माझा ग्रंथमित्र तिथे आहे, त्यामुळे. देशभरातील बहुतांश शहरांतून आणि विदेशातून पुस्तक खरेदी करणारा ग्रंथपिरांचा जथा तिथे कार्यरत असतो. हिंदीतील समांतर काळात लिहिणाऱ्या सत्य व्याससारख्या ‘बेेस्टसेलर’ लेखकांचीही तेथे उपस्थिती दिसते. दिल्ली, मेरठ, रोहतकसह हिंदी पट्ट्यातील बरेचसे दर्दी पुस्तकविक्रेते तेथे सक्रिय असतात. लायब्ररीत, घरात, दुकानांत फुगत चाललेल्या साठ्यामुळे पुस्तक ठेवायला जागा नसलेल्यांची अडचण या समूहांत फक्त डोकावून अंशतः पूर्ण होते. कथा-कादंबर्या आणि वैचारिक पुस्तके, जुनी मासिके, कॉमिक्स, विशेषांक यांच्या खरेदी-विक्रीची लयलूट अष्टौप्रहर चालते. दुर्मीळ पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्या तिथे पाहायला मिळतात; तसेच लगदा मासिके-कादंबऱ्या (Pulp magazines and novels) साठी-सत्तरीतील ट्रेण्ड मुखपृष्ठांसह तिथे बघता येतात. गुरुनाथ नाईकांच्या हिंदीत अनुवादित झालेल्या कादंबऱ्यांची मुखपृष्ठे मला तिथे बघायला मिळाली होती, अन् जयवंत दळवींच्या ‘चक्र’ कादंबरीचे सत्तरच्या दशकात हिंदीत झालेल्या अनुवादाचे अद्भुत मुखपृष्ठदेखील. त्यातच मला समाधान मानावे लागले होते, कारण पुस्तक बुक करणारा पहिला ‘हाजीर’च इथला ‘वजीर’ बनतो. पुस्तक ग्रुपात येऊन पडण्याच्या वेळी तिथल्या तिथे ती लगोलग खरेदी करणाऱ्यांची बोटे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विखुरलेली. त्यामुळे पुस्तक थेट ‘बुक’ करून विक्रेत्याला ऑनलाईन पैसे देऊन त्यांच्या प्रतीक्षापर्वाला सुरुवात झालेली असते, तेव्हा ती पुस्तके पाहून आपण कुतूहल आणि हळहळ या दोन अवस्थांच्यामध्ये बुडालेले असतो.
आपल्या मराठी पुस्तकविक्रीच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर हौशी सदस्य संख्येने खूप आहेत. पण उलाढाल कमी. कारण सातत्याने खरेदी करणारे खरेदीदार निवडक आणि कमी. याउलट, हिंदीत मात्र सदस्य कमी असूनदेखील (‘पुस्तकालय’ (१०० सदस्य) आणि ‘पुस्तकों का संसार’ (१७४ सदस्य)) उचकपाचकीचा व्यवहार प्रचंड. बराच काळ मी तिकडे खरेदीच्या फंंदात पडत नव्हतो, कारण आधीच असलेल्या पुस्तकांचा फडशा पाडता पाडता नाकीनऊ आले असताना आयुष्यातील वेळेचे दुर्भीक्ष्य आणखी का वाढवा? त्यामुळे मराठी, हिंदी, आणि इंग्रजीतील पुस्तके विक्री करणाऱ्या कोणत्याही समूहात टंगळ-मंगळ करण्याच्या हेतूनेही डोकावायचे नाही, पुस्तक-हावरटपणाला वावच ठेवायचा नाही, हे मनाशी पक्के केलेले.
पण ओमप्रकाश शर्मा यांच्या ‘विक्रांत’ मालिकेच्या आठ-दहा पुस्तकांची छायाचित्रे समूहात डकवून त्यांची एकत्रित विक्री होत असल्याच्या नेमक्या वेळेत मी व्हाॅट्सॲपवरील या समूहाचे दर्शन घेतले आणि माझा नाईलाज झाला.
तातडीने ती पुस्तके मी बुक करून टाकली. पण खरे तर कुणीही इतर प्रतिस्पर्धी खरेदीदार नसल्यामुळे मला ती बुक करता आली. कारण ओमप्रकाश शर्मांचा ‘विक्रांत’ आख्ख्या हिंदी पट्ट्यांत पुरेपूर वाचला गेला असला, तरी आता पुरेसा बदनाम झालेला आहे. नकली लेखकांनी ‘विक्रांत’ कादंबऱ्या लिहिल्यामुळे ही बदनामी झाली आहे. म्हणजे ‘जनप्रिय लेखक’ या खिताबाद्वारे पन्नास हजार प्रतींनिशी छापला जाणारा आणि विकला जाणारा ओमप्रकाश शर्मांचाच ‘विक्रांत’. पण त्या विक्रांतच्या कादंबर्या लिहिणारे ‘खरे’ ओमप्रकाश शर्मा महिन्याला दोनच कादंबऱ्या लिहू शकत असत. पण १९६० ते १९७०-८० या काळात या कादंबऱ्यांबद्दल समाजात एक वाचनवखवख दिसू लागली. मग ती भरून काढायला सुरुवातीला एक प्रकाशक बाजारात उतरला. या प्रकाशकाने चक्क नव्या ओमप्रकाश शर्माची जुळवणी करून त्या नव्या लेखकाला ‘विक्रांत’ ही व्यक्तिरेखा बेतायला लावली आणि त्याला नवी कादंबरी लिहिण्यास भाग पाडले. बाजारात मग दोनाऐवजी चार ‘विक्रांत’ दाखल झाले. पण मागणीचा रेटा इतका की हा पुरवठाही कमी पडू लागला. पुस्तके धो-धो खपतायत म्हणून या धनगंगेत हात धुवून घेण्यासाठी इतर प्रकाशकदेखील उतरले, त्यांनी आपापले ओमप्रकाश शर्मा हुडकून काढले आणि त्या दशकांत मेरठ शहर हे ‘विक्रांत’ कादंबऱ्यानिर्मितीची फॅक्टरीच बनली. अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही, पण वीस-पंचवीस किंवा त्याहून अधिक लेखकांची फौज मेरठमधील प्रकाशनगृहांशी बांधली गेली. मग त्यांच्या त्यांच्या लेखकवकुबानुसार ‘विक्रांत’ कादंबऱ्या प्रकाशित होऊ लागल्या. मूळचा ओमप्रकाशदेखील गब्बर झाला आणि त्याच्या नावाचा वापर करून दे-मार विक्रांतपुराण लिहिणारे भले-बुरे लेखकदेखील पैसे कमावते झाले. १२८ ते २६० पाने इतक्या पल्ल्याच्या या कादंबऱ्यांचे ठोकळे आता फारसे मिळत नाहीत, विक्रीसाठी वर येत नाहीत. कारण मधल्या काळात त्यांच्या लेखकांच्या ‘नकली’पणावर बरेचसे वादंग झडले. कुमार कश्यपचे विक्रांत ‘ओरिजनल’, ओमप्रकाश शर्माचे विक्रांत ‘ओरिजनल’, अमुक-तमुकने लिहिलेले सुमार किंवा अतिसुमार, असे ते वाद होते. त्यात ओमप्रकाश शर्मांचे नाव नंतर ‘चमेली की शादी’ या त्यांच्या कादंबरीवर आलेल्या चित्रपटानंतर आणखी खपाऊ बनले. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनीही ‘विक्रांत’ या नायकाचे पितृत्व नाकारले. मग नकली लिहिणाऱ्यांची काय कमतरता! विक्रांतच्या एकूण पाच हजारांहून अधिक कादंबऱ्या आल्या. होय, पाच हजार. ५०००. गिनेस बुक रेकाॅर्डमध्ये हा विक्रम नोंदला गेला असता. पण त्यासाठी दावा करणार कोण? ‘बाप’च नसल्याने या कादंबऱ्या पोरक्या ठरल्या. पुढल्या दशकांत त्यांचा प्रवास दुर्मीळतेकडे होत गेला. ५० हजारांच्या प्रतींनिशी त्या छापल्या जात असल्याने त्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यांत जिवंत राहिल्या असतील, इतकेच.
पहिल्या दहा ‘विक्रांती’ कादंबऱ्या घेतल्यानंतर आणि त्यांतल्या काही वाचल्यानंतर मी या समूहातील काही पुस्तकविक्रेत्यांना ‘मिळतील तितके विक्रांत शोधून मला मिळवून द्या’ असे कळवले. प्रत्येक कादंबरीस १०० रुपये याच दराने ते विकणार होते. त्याला माझी ना नव्हती. पण पुस्तके चांगल्या स्थितीत, वाचण्याच्या स्थितीत, पूर्णावस्थेत असल्याची अट होती. आठवड्या-दीड आठवड्यात ते विक्रेते माझ्यासमोर फार फार तर आणखी पन्नासेक विक्रांत उभे करू शकतील, असा माझा अंदाज होता. पण तो तडकला. कारण हरयाणाच्या रोहतक शहरातून, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतून ‘विक्रांत’ कादंबऱ्यांचा पाऊस पडू लागला. एकाने थेट दुर्मीळ-दुर्लभ कव्हर्ससह अडीचशे पुस्तकांचा लाॅटच्या लॉटच छायाचित्रांसह डकवला, ‘आता वाच किती वाचायचेत ते’ असे सांगत. मी एकाच वेळी या तिघांकडून मिळून विक्रांतच्या सव्वाशे कादंबऱ्या उचलल्या. या कादंबर्यांवर लेखक म्हणून ‘जनप्रिय ओमप्रकाश शर्मा’ हे नाव होते.
अफलातून शीर्षके, पहिल्या पानापासून पकडू कथानक आणि विक्रांत तसेच त्याचा गुरू जगत याचे जागतिक कारनामे यांनी भरलेल्या कादंबऱ्यांनी मला जखडून ठेवले. १९६०-७० सालातील हा भारतीय गुप्तहेर जेम्स बाॅण्डच्या वरताण कारनामे करताना दिसतो. इतकेच नाही, तर ‘विक्रांत और जेम्स बांड’ कादंबरीमालिकेत तो जेम्स बाॅण्डला तुडव-तुडव तुडवतानाही भेटतो! या पिटाईमुळे आख्ख्या जगात ००७ बाॅण्डची प्रतिमा धुळीस मिळाल्यामुळे खवळलेला बाॅण्ड मग विक्रांतच्या जीवावर उठतो आणि विक्रांत त्याला एखाद्या पेदऱ्या खलनायकासारखा वागवत ‘नावाने थोर- पण कर्तृत्वाने सुमार’ करून टाकतो.
विक्रांतच्या या कादंबर्या नकली लेखकांच्या म्हणून हिणवल्या गेल्या असल्या, तरी कादंबऱ्या अस्सलच आहेत, हे नाकारता येणार नाही. मी वाचलेली पहिलीच कादंबरी होती ‘विक्रांत और हिचकाक’. (त्याबद्दल पुढे येईलच) ती वाचली, तेव्हाच पुढल्या वर्षभरात ‘विक्रांत’ आणि हिंदी पल्पिस्तानाचे वाचन प्रमुख आणि इतर त्या मानाने दुय्यम असा माझा संकल्प ठरला. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढला काळ मी बराचसा विक्रांतभारित असेन.
२ ओमप्रकाश शर्मांची अनेक रूपे आणि कुमार कश्यप
‘एक मिल वर्कर ओमप्रकाश शर्मा दिनभर नोकरी करते थे और शाम को लिखते थे. इनके मुख्य पात्र राजेश, जगत, जयंत, जगन बंदूक सिंह थे. जगत इंटरनेशनल ठग था. बाकी केंद्रीय खुफिया विभाग के जासूस. जनप्रिय ओमप्रकाश शर्मा ने कुछ सामाजिक उपन्यास भी लिखे है. इनकी भाषा बहुत सरल थी. इनकी लोकप्रियता का फायदा उठाकर एक दूसरे ओमप्रकाश शर्मा तयार कर दिए गये. और उन्हों ने अपने उपन्यासों मे राजेश और जगत के साथ एक विक्रांत का पात्र ले लिया जो बहुत लोकप्रिय हुआ. इसके बाद कुमार कश्यप आये और विक्रांत के साथ अपना एक पात्र बटलर बढा दिया.’
- विपुल मिश्रा (‘आप का विपुल’ या ब्लाॅगमधील ‘हिंदी उपन्यासों का संसार’ या नोंदीतून)
ओमप्रकाश शर्मा यांची उपलब्ध असलेली काही ‘प्रोफाईल्स’ पाहिली, तेव्हा मला ते भाऊ पाध्येंसारखेच वाटायला लागले. कामगार आणि मिल युनियन्सच्या संबंधांतले भाऊ पाध्ये आणि ओमप्रकाश शर्मा यांचे काम साधारणत: सारखेच आहे. दिल्लीमधील कापड कारखान्यात सुरुवातीला कामगार म्हणून लागलेल्या शर्मा यांनी नंतर युनियनमध्ये कामगारांच्या प्रश्नांसाठी होणार्या कामात सक्रिय सहभाग ठेवला. यादरम्यान त्यांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या, त्या सर्वसामान्य माणसांना आनंद देण्यासाठी. त्यांना उच्चभ्रूंचे ‘लिटररी’ साहित्य लिहायचे नव्हतेच. तो काळ हिंदीमध्ये वायुवेगाने जेम्स हेडली चेस अनुवादित होण्याचा आणि गुलशन नंदांच्या कादंबऱ्यांवर धडाधड सिनेमा बनण्याचा होता. ‘पल्प फिक्शन’ वाचन हा दोन-तीन तासांचा सर्वाधिक स्वस्त मनोरंजनमार्ग होता. इब्ने सफीच्या उर्दू कादंबऱ्या हिंदीत ज्या वेगाने खपत, त्यातूनही या फिक्शनबाबत वाचकांमध्ये ओढ अधिक असल्याचे प्रकाशकांच्या लक्षात आले होते.
[ओमप्रकाश शर्मा आणि ‘चमेली की शादी’चे दिग्दर्शक बासू चतर्जी (‘अमर उजाला’मधील छायाचित्र)]
या काळात ओमप्रकाश शर्मांच्या जगत जयन्ती, राजेश, जगन, गोपाली, बागारोफ या व्यक्तिरेखा आवडणाऱ्या लोकांची परिस्थिती अशी झाली होती, की एक ताजी कादंबरी संपवल्यानंतर वाचक लगेचच नव्या कादंबरीच्या शोधाला निघत. त्यासाठी वाटेल तितके पैसे मोजायला तयार होत. हे पाहून ‘लक्ष्मी पाॅकेट बुक्स’च्या जंगबहादूर या प्रकाशक-संपादकाने ओमप्रकाश शर्मांचा तोतया अवतार पहिल्यांदा जिवंत केला. जर मूळ ओमप्रकाश शर्मा यांनी आपल्यावर खटला गुदरला, तर काय करायचे याचीही तजवीज करून ठेवली. आपला मित्र असलेल्या आणि बिलकूल लिहिता न येणाऱ्या एका दुसऱ्याच ओमप्रकाश शर्माला कोर्टात सादर करायचे आणि तिथे ‘लक्ष्मी पाॅकेट बुक्सतर्फे ज्याच्या कादंबर्या प्रकाशित होतात तो हा आमचा लेखक’ असे सांगून मोकळे व्हायचे, हा प्लॅन आखला. पण त्याची अंमलबजावणी करण्याची वेळच आली नाही. कारण मूळच्या ओमप्रकाश शर्मांनी कोणताही खटला दाखल केला नाही. मग लक्ष्मी पाॅकेट बुक्सचा यशस्वी ‘फाॅर्म्युला’ इतर प्रकाशकांनी अवलंबायला सुरुवात केली. हा संदर्भ योगेश मित्तल यांच्या पुस्तकातून समोर येतो.
लिहिणाऱ्यांना या फिक्शनने रोजगार पुरवला. प्रत्येक गरजू लेखकाची, संपादकांकडे उमेदवारी करणाऱ्या कित्येक तरुणांची इच्छा होती, ती ‘विक्रांत’ किंवा अल्पावधीत गाजणारे तसलेच फिक्शन लिहिण्याची. उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडच्या प्रदेशात राहणाऱ्या कित्येकांचे संसार हे या विक्रांत कादंबऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या घोस्ट रायटिंगमुळे चालायचे, असे व्यास यांनी स्पष्ट केले आहे. प्रभात रंजन यांनी ‘जगात कुठल्याही लेखकाच्या नावे इतके घोस्टरायटिंग झाले नसावे,’ हे निरीक्षण आपल्या पुस्तकात मांडले, ते उगाच नाही. खटला भरायला मूळ ओम प्रकाश शर्मांकडे वेळ नव्हता. त्यांना मनस्तापही नको होता. त्यांना फक्त त्यांच्या दरमहा दोन या संख्येने येणार्या आपल्या कादंबऱ्या पूर्ण करायच्या होत्या. त्यासाठी मनःशांती हवी होती. नकली लेखकांमुळे असली लेखकाच्या कादंबऱ्यांना आधीपेक्षा अधिक झळाळी चढली.
ओमप्रकाश शर्मांचे हे घोस्ट रायटर्स मूळ ओमप्रकाश शर्मांच्या कम्यनिस्ट विचारसरणीपासून ते त्यांच्या शैलीपर्यंत सगळ्याचा अंगीकार करायचे. मूळ ओमप्रकाश शर्मा हे शरच्चंद्र चतर्जी यांचे भक्त. जगभरातून हिंदीत अनुवादित होणारे साहित्य वाचण्यात अग्रेसर. जेवढे कथानक कळू शकेल तितपत का होईना, पण इंग्रजी सिनेमाचे दर्शकपण मिरवणारे. नकली ओमप्रकाश शर्मांनी मात्र आपापल्या वकुबानुसार, आपापल्या वाचनातून घडलेल्या भाषाऐवजानुसार विक्रांत रेखाटला. त्यात सामाजिक प्रश्नांची, श्रद्धा-अंधश्रद्धांची पेरणी केली. काहींनी विक्रांतची उंची सात फूट असल्याचेही दाखविले! जगत या विक्रांतच्या गुरूपुढे नतमस्तक होणारा विक्रांत रेखाटताना मूळ ओमप्रकाश शर्मांच्या जगत या व्यक्तिरेखेबाबतचा आदर कायम राखला.
योगेश मित्तल यांचे म्हणणे मात्र वेगळेच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विक्रांतचा जन्मदाता कुमार कश्यप हा लेखक आहे. जेव्हा ओमप्रकाश शर्मा यांच्या नावाने नकली लेखकांचा सुळसुळाट व्हायला लागला, तेव्हा कुमार कश्यप यांनी ठगांचा राजा जगत, तसेच राजेश, जयंत या व्यक्तिरेखा तर उचलल्याच; पण त्यासोबतच एक जल्लादसदृश व्यक्तिरेखा तयार केली. त्या व्यक्तिरेखेचे नाव ‘विक्रांत’ होते. बेदरकार, अय्याश, स्त्रीसुखसंशोधनात जेम्स बाॅण्डला बच्चा ठरवणारी ही जासूसी व्यक्तिरेखा वाचकांना खूप आवडली. मेरठच्या फॅक्टऱ्यांतील नकली ओमप्रकाश शर्मांच्या कादंबऱ्यांमध्येदेखील विक्रांत ही व्यक्तिरेखा आणली जावी, यासाठी प्रकाशकांनी हट्ट धरायला सुरुवात केली. मग लेखकांनी शक्कल लढवत जगतला विक्रांतचा गुरू बनविले. पण विक्रांत असलेल्या कादंबऱ्यांत विक्रांत हीच मुख्य व्यक्तिरेखा आणि इतर सगळी पात्रे सहायक असा आराखडा तयार झाला. कित्येक कादंबऱ्यांची शीर्षके लेखकाला सुचविली जात आणि त्यांच्याकडून पन्नास ते शंभर रुपयांमध्ये प्रकाशक आख्खी कादंबरी लिहवून घेत.
म्हणजे मूळच्या ओमप्रकाश शर्मांचा मानसपुत्र जगत. त्याच्या लोकप्रियतेमुळे अनेक नकली ओमप्रकाश शर्मा जन्माला आले. कुमार कश्यप हा यांपैकी एखादा घोस्ट रायटर असावा. त्याने जगत ही व्यक्तिरेखा तर उचललीच, पण त्याखेरीज जगत या पात्राला गुरुस्थानी मानणारी विक्रांत ही नवी व्यक्तिरेखा जन्माला घातली. हा विक्रांत इतका लोकप्रिय झाला, की इतर नकली ओमप्रकाश शर्मांनीही विक्रांत-कादंबर्या लिहाव्यात असा आग्रह प्रकाशक धरू लागले आणि त्यातूनच विक्रांत-कादंबर्यांची संख्या भरमसाठ वाढत गेली.
मूळच्या ओमप्रकाश शर्मांनी मात्र पुढच्या काळात विक्रांतचे पितृत्व अर्थातच नाकारले. ते आपल्या ‘दरमहा दोन’ कादंबर्यांमध्ये मशगूल राहिले.
तेव्हा मूळ ओमप्रकाश शर्मा यांच्या एका कादंबरीचे मानधन तीनशेच्या आसपास गेले होते. दिल्ली सोडून मूळ ओमप्रकाश शर्मा मेरठमध्येच आले. त्यांनी लेखकीय उद्योगातून तेथे मोठे घर बांधले, हा तपशील मात्र त्यांच्याविषयी लिहिणाऱ्या सर्वांनी सारखाच दिला आहे.
यादवेंद्र शर्मा चंद्र यांनी त्यांच्या ‘रचनाकार’ या ब्लाॅगवर ओमप्रकाश शर्मा यांच्याबाबत जो तपशील दिला आहे, तो हिंदीतूनच वाचणे उचित ठरेल.
‘मेरी मित्रता उससे बहुत पुरानी थी. जब ओमप्रकाश दिल्ली के पहाड़ी धीरज के एक मकान में किराए पर रहता था और दिल्ली क्लॉथ मिल में कामगार था. मैंने उससे पूछा था कि तुम्हें लेखन की प्रेरणा कैसे मिली? उसके पास भारी भरकम साहित्यिक उत्तर नहीं था. उसका संकेत आत्मप्रेरित-सा ही था. मुझे लगा कि तब भी उसकी संगत बुध्दिजीवियों से थी. जवाहर चौधरी उसका विशेष दोस्त था. चौधरीजी कुशल संपादक, श्रेष्ठ प्रकाशक और लेखक भी थे. चौधरी, चौधरी ज़रूर थे पर उनका रहन-सहन अभिजात वर्ग का था. बात के पक्के थे. उन्होंने एक बार कहा था. ओमप्रकाश केवल जासूसी लेखक ही नहीं है अपितु उसमें विलक्षण प्रतिभा है और वह अध्ययनशील व्यक्ति है. वह श्रेष्ठ ऐतिहासिक व सामाजिक लेखक भी हैं.
ओमप्रकाश डी.सी.एम. की नौकरी के अलावा जासूसी उपन्यास ‘गुप्ता पुस्तक भंडार’ खारी बावली के लिए लिखता था. वे रंगमहल नामक पुस्तक साइज की एक मासिक पत्रिका निकालते थे. कहानी के तीन-पांच रुपए देते थे.
उन दिनों ओमप्रकाश के ख़ास मित्रों में प्रकाशक बृजमोहन पंड्या, ओमप्रकाश और एक सरदारजी थे. ये तीनों पार्टनर थे और ओमप्रकाश की बड़ी इज्ज़त करते थे. इन तीनों ने मिलकर बैंग्लों रोड, जवाहर नगर में ‘दिल्ली पुस्तक सदन’ की शुरुआत की थी. इसी दिल्ली पुस्तक सदन ने आगे चलकर ओमप्रकाश का बहुचर्चित उपन्यास सांझ का सूरज छापा था. यह उपन्यास अंतिम मुगल सम्राट बहादुरशाह जफ़र पर था और इससे ओमप्रकाश की प्रतिभा और लेखन की अलग पहचान बनी. वह काफ़ी प्रसिध्द हुआ.
मैंने उससे एक बार पूछा, ”तुम्हें कौन साहित्यकार पसंद है?” उसने तपाक से उत्तर दिया, ”सबसे ज्यादा शरतचंद्र चटर्जी, अमृतलाल नगर, आनंदप्रकाश जैन, भगवतीचरण वर्मा आदि. नागरजी की टकसाली भाषा पर मैं मोहित हूं. इसके अलावा रवींद्र्रनाथ ठाकुर, भैरप्पा, गोर्की और सी वर्जिल जारजो का पच्चीसवां घंटा बहुत पसंद है जिसके अनुवादक भदंत आनंद कौत्यायन हैं. इतिहास के प्रति मेरी गहरी रुचि है.”
उसने एक दिन कहा, ”यार! तनाव से किसी भी समस्या का कोई हल निकला है? यदि तुम्हें पैसे चाहिए तो पैसे कमाओ. जैसे मुझे पैसों की ज़रूरत होती है तो पच्चीस रुपए में अपना उपन्यास बेच देता हूं…और ज्यादा ज़रूरत हो तो उससे भी कम में?…या फिर किसी से उधार लाता हूं. शरीफ आदमी पैसा तो इन्हीं दो तरीकों से ला सकता है. मेरे जैसा लेखक चोरी नहीं कर सकता, जेब नहीं काट सकता, कपट नहीं कर सकता…हम नैतिक मूल्यों को जीते हैं न?”
(‘रचनाकार’मधील जनप्रिय लेखक : ओमप्रकाश शर्मा : ‘बौनों का देश’ या पोस्टमधून)
‘बनारस टाॅकीज’सह अनेक हिंदी बेस्टसेलर कादंबऱ्या लिहिणाऱ्या सत्य व्यास यांचे ओमप्रकाश शर्मा यांच्यावरचे पुस्तक प्रस्तावित असल्याचे ऐकिवात आहे. दोन हजार विक्रांत-कादंबऱ्या बाळगणाऱ्या या लेखकाच्या मतेदेखील या कादंबऱ्या नकली लेखकांनीच लिहिलेल्या आहेत. पण त्याची सुरुवात कुमार कश्यप यांनीच केल्याचा त्यांचादेखील योगेश मित्तल यांच्यासारखा दावा आहे. २५ डिसेंबर २०२४ रोजी सत्य व्यास यांनी आपल्या फेसबुक वाॅलवर ओमप्रकाश शर्मा यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील काही अंश जोडला. त्यातून या लेखकाची रहस्यकथा लेखक म्हणून घडण कधी झाली आणि कशी झाली याची माहिती होते.
जनप्रिय लेखक ओम प्रकाश शर्मा/ एक अधूरी आत्मकथा से अंश
कुछ मित्र जो लेखन के कारण बन गए थे, वह सभी मुझसे सम्पन्न थे। एक सांझ शायद चांदनी चौक का हिमाचल रेस्तरां था, मैंने मित्रों से कहा कि अब मैं “नया साहित्य” में कहानी लिखूंगा। एक मित्र ने कहा-वहां से रुपये नहीं मिलेंगे। मैंने कहा- न सही, फिर भी एक अच्छे कहानीकारों की श्रेणी में तो आ जाऊंगा। दूसरे मित्र ने कहा- नरोत्तम नागर बहुत ही कड़े सम्पादक हैं। वह न तो माया जैसी पत्रिका में छपने वाली कहानियां छापते हैं और न तुम्हारे रंगमहल वाले “लाला” जैसे हैं। जो जैसी भी कहानी हो वैसी ही छाप देते हैं, न रुपए मिलेंगे और न कहानी ही छपेंगी। यह तो बिल्कुल अग्निपरीक्षा देने वाली बात है । यह बात बिल्कुल सही थी, परन्तु जिद तो थी ही । मैंने नया साहित्य में नरोत्तम नागर के सम्पादकीय तो पढ़े ही थे । इसके अतिरिक्त उनकी दो पुस्तकें भी पढ़ीं थीं । एक पुस्तक का नाम था एक माताव्रत। इसमें गांधी जी की बड़ी तीखी आलोचना थी। दूसरी पुस्तक थी- शुतुरमुर्ग पुराण। इसमें स्थापित कथाकार जैनेन्द्र कुमार और अज्ञेय की आलोचना थी । गजब की भाषा थी।
मैंने नया साहित्य को पहली कहानी भेजी। जैसी भेजी थी वैसी ही वापस आ गई। अस्वीकृति का कोई कारण नहीं लिखा था, दूसरी कहानी भेजी उसकी भी पहले जैसी गति हुई। परन्तु मुझे भी जैसे जिद सवार हो गई थी। मैंने तीसरी कहानी भेजी वह वापस नहीं आई। नरोत्तम सागर का पत्र मिला। लिखा था कि अगर जल्दी नहीं मचाओगे तो यह कहानी छप जाएगी। कहानी की मूल भावना अच्छी है, परन्तु भाषा में सुधार आवश्यक है। जब ‘नया साहित्य’ का छपा अंक तो आया ही, साथ ही मेरी कहानी भी वापस आ गई। साथ ही पत्र भी मिला - तुम्हारी मूल कहानी को मुझे खुद ही दोबारा लिखना पड़ा। अपनी मूल कहानी से छपी हुई कहानी मिलाकर देखना, और भाषा तथा कहानी की टेकनिक को समझने की कोशिश करना। फिर तो नरोत्तम नागर एक प्रकार से मेरे गुरु बन गए ।
दरिद्रता और अभाव तो दूर नहीं हुआ… परन्तु कहानी तो मैं लिखता ही रहा।
इसी प्रकार जिन्दगी घिसटती रही।
सन ५३ में फिर समस्या। अब नारायण दास गर्ग ने रंगमहल का कार्यभार अपने भतीजे के पुत्र महेन्द्र को सौंप दिया था । उनके यहां एक कर्मचारी थे मेरे ही नाम वाले गुप्ता। काम था पीर, बावर्ची सभी कुछ। वैसे बच्चों की प्रत्रिका में उनका सम्पादक के रूप में नाम भी छपता था । गुप्ता से ही बातें से ही बातें हो रही थीं।
समस्या थी गर्म पतलून की। सर्दियों में मेरे पास कोई गर्म कपड़ा न था। हिसाब लगाया था, अब गर्म पतलून तैयार कराने में पचास रुपए लगने थे।
गुप्ता ने कहा- “पचास रुपए का ही सवाल है?”
“हां।”
“मैं तुझे अभी जेब से पचास रुपए दिए देता हूं। मगर तू बदले में एक जासूसी उपन्यास रगड़ दे। तुझे लिखने में एक सप्ताह से अधिक नहीं लगेगा।”
“लेकिन गुप्ता, जासूसी उपन्यास तो मैंने पढ़े भी नहीं हैं, वैसे जासूसी उपन्यास लिखना मुझे पसन्द भी नहीं है।”
“पसन्द की बात तो यह है कि मुझे यह नौकरी भी पसन्द नहीं है, तू जो काम मिल में करता है क्या तुझे पसन्द है ? जरूरत होती है, और जरूरत ऐसे काम भी करा देती है, जो पसन्द नहीं होते।”
उसने यह कहकर मेरे सामने दस-दस के पांच नोट गिनकर रख दिए ।
“ले ले भाई, अगर जासूसी उपन्यास न लिखे तो जैसे तेरी सुविधा हो लौटा देना।” गुप्ता ने कहा।
कुछ मित्रों से सलाह की और फिर मैंने दस दिन में उपन्यास लिखकर दे दिया। ‘जासूस’ के नाम से जो मासिक पत्रिका निकलती थी, उसमें बीस दिन बाद मेरा वह उपन्यास प्रकाशित हो गया।
पहला उपन्यास प्रकाशित होने के दस दिन बाद…! कहानी देने गुप्ता के पास गया तो वह बोला- चाय तो खैर तुझे पिलानी चाहिए, लेकिन चल मैं तुझे चाय भी पिलाऊंगा. और नाश्ता भी कराऊंगा। हम दोनों ही ऑफिस से नीचे आ गए।
नया बाजार के एक रेस्तरां में हम दोनों ने चाय पी, चाय से पहले कुछ खाया भी। इसके बाद उसने एक लिफाफे में रक्खे हुए पचास रुपए मुझे दे दिए।
ये रुपए कैसे हैं भई…?
जैसे रुपए हुआ करते हैं वैसे ही हैं, और यह रुपए तेरे हैं । आज जो मजेदार बात हुई है, वह सुन । तेरा उपन्यास सबसे पहले पढ़ा लाला महेशचन्द ने । उपन्यास पढ़कर उन्होंने पूछा- लेखक को क्या दिया है? मैंने बता दिया कि पचास, तो वह बोले-इस लेखक को इस उपन्यास के अस्सी रुपए दो, और लगातार हर महीने इससे उपन्यास लिखवाओ। मैंने सोचा अपने यार के तीस रुपए बन गए। अगले दिन वह छोटे लाला रमेशचन्द ने पढ़ लिया। उन्होंने पूछा-क्या दिया है लेखक को उसकी कहानी तो अच्छी होती थीं। लेकिन उपन्यास लाजवाब है। क्या दिया है लेखक को ? पचास दिये थे, बड़े लालाजी ने कहा है कि उपन्यास अच्छा है तीस रुपए और देना । तो वह बोले — ” लेखक बहुत अच्छा है, जल्दी ही भाग जाएगा। उसके पूरे सौ रुपए कर दो, और हर महीने उसी से उपन्यास लिखवाओ।” । देख भाई, अब तू नया उपन्यास शुरू कर दे। जितना लिखे उतना देते रहना, अगले महीने भी तेरा ही उपन्यास छपना चाहिए।
इस प्रकार मैं जासूसी उपन्यास लेखक बन गया ।
प्रचलित फार्मूले पर मैंने उपन्यास नहीं लिखे । समस्या अथवा अपराध एकदम भारतीय अपराध सामाजिक ही होता है, उस पर सामाजिक विवेचन ही होना चाहिए। जासूस भी इन्सान हैं, और इन्सान की अपनी खूबी और कमी भी होंगी। उपन्यास मनोरंजक होना चाहिए और जासूस को अपराध पकड़ने वाली मशीन नहीं होना चाहिए।
मेरे जीवन में, अथवा मेरे बाद शायद कोई समझदार आलोचक यह साबित करे कि शर्मा ने जासूसी लेबिल लगाकर सामाजिक उपन्यास लिखे तो उसका कहना गलत नहीं होगा।
जनप्रिय ओम प्रकाश शर्मा (सत्य व्यास यांच्या फेसबुक वाॅलवरून.)
कुमार कश्यप या लेखकाच्या विक्रांत-कादंबऱ्या मला गेल्या आठवड्यात रोहतकमधील विक्रेत्याने दाखविल्या. तिथून तीन आणि कर्नालमधून पाच विक्रांत-कादंबऱ्यांचा गठ्ठा माझ्याकडे येण्यासाठी निघाला आहे. कश्यप यांचा विक्रांत, त्याआधी मूळ ओमपप्रकाश शर्मा यांचा जगत, आणि अनेक बापांनी जन्माला घातलेला विक्रांत, असा फरक स्पष्ट करण्यासाठी बराच ऐवज पुढल्या काही दिवसांत माझ्याकडे असणार आहे आणि माझे दिवस आनंदीबेजार असणार आहेत, यात शंका नाही.
३ टोपणकारांचे कारनामे आणि विक्रांतची वाचलेली पुस्तके
‘ओमप्रकाश शर्माने फिल्मों मे खास दिलचस्पी नही दिखाई. वे फिल्म माध्यम से इसलिए चिढे रहते थे क्योंकि उसमे लेखककी स्वतंत्रता नही होती है. हालाकि बासू चटर्जी की फिल्म ‘चमेली की शादी’ उन्ही के उपन्यासपर बनी थी. अनिल कपूर और अमृता सिंह की वह फिल्म जबरदस्त काॅमेडी है. गली-मोहल्लो वाली कहानी. उनके पाठको का तो कहना है की उनके मरने के बाद उनके उपन्यास ‘अपने देश में अजनबी’ को आधार बनाकर एक बडी फिल्म बनी थी. फिल्म का नाम था स्वदेस, तथा उसमे शाहरूख खान ने अभिनय किया था. लेकिन फिल्म बनाने वाले ने उनको क्रेडिट नही दिया. ’
- प्रभात रंजन (‘पाॅप्युलर हिन्दी लोकप्रिय हिन्दी’ या पुस्तकातील ‘लोकप्रिय तो बहुत है, लेकिन एक थे जनप्रिय लेखक’मधून)
[‘चमेली की शादी’चे पोस्टर, जालावरून साभार.]
‘स्वदेस’ चित्रपटाची निर्मिती ही ‘झी टीव्ही’वरच्या ‘लव्ह स्टोरी’ या १९९३ ते ९५ सालात चाललेल्या मालिकेवर आधारित आहे. हे कळल्यावर मला ‘लव्ह स्टोरी’च्या लेखकांबद्दल सहानुभूती वाटली होती. त्यात मोहन भार्गवची - म्हणजे शाहरूखची - भूमिका स्वत: आशुतोष गोवारीकरनेच केली होती. यू ट्युबवर तो ४९व्या क्रमांकाचा भाग पाहायलादेखील मिळतो. या ‘लव्ह स्टोरी’च्या पटकथालेखकांनी ती गोष्ट ‘अपने देश में अजनबी’ कादंबरीवरून रचली असावी हे मला प्रभात रंजन यांचं लेखन वाचल्यानंतर कळले. झीटीव्हीच्या एपिसोडकर्त्यांबद्दल आधी वाटलेली सहानुभूती तेव्हा नष्ट झाली. ‘अपने देश में अजनबी’ ॲमेझाॅनवर सध्या स्वस्तात उपलब्ध आहे. त्याचे श्रेय प्रभात रंजन यांच्या पुस्तकातील या खासमखास तपशिलाला असू शकेल.
[‘स्वदेस’, ‘लव्ह स्टोरी’, दोन्हीमधले साधर्म्य, आणि मूळ कादंबरीचे मुखपृष्ठ, सर्व छायाचित्रे जालावरून साभार.]
बासू चतर्जींचा ‘चमेली की शादी’ हा ओमप्रकाश शर्मा यांच्या कादंबरीवरील सिनेमा आज जनसमूहाच्या विस्मृतीत का गेला, तर त्यातील एकही लक्षात न राहणारे गाणे. अनिल कपूरचा ‘साहेब’ किंवा ‘मशाल’ किंवा नंतरचा कुठलाही सिनेमा आठवून पाहा. त्यासोबत त्याची गाननृत्येही स्मरतील. ते ‘चमेली की शादी’बाबत होत नाही. हे त्या सिनेमाबाबतच्या विस्मृतीचे कारण असेल काय? असो. सिनेमा-गाण्यांवरून आपण पुन्हा ‘विक्रांत’कडे आणि त्याच्या पिताश्री ओमप्रकाश शर्मांकडे येऊ.
मला सुरुवातीला ज्या विक्रांत-कादंबऱ्या मिळाल्या, त्यांच्या मलपृष्ठावर हाॅलीवूडमधल्या कलाकारांच्या, आंग्ल पुरवण्यांमधील छायाचित्रांवरून जुळलेल्या व्यक्तिरेखांची नावे लिहिलेली दिसली. ‘मेरठ-२’ हा प्रकाशकांचा पत्ता. तो सगळीकडे एकच. पण प्रकाशकांची नावे इतकी विभिन्न की डोके चक्रावून जावे. आख्खे ‘मेरठ-२’ नगरच विक्रांत-कादंबऱ्यांच्या उद्योगात रमले असावे असे वाटावे. प्रत्येकाचा दावा ‘आमचाच विक्रांत असली’ असल्याचा. काहींनी जगत, लिली, अमरजीत, बटलर (हे वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे ‘बटlr’ असेदेखील!), गोपाली, ताऊ (याचा पोशाख अनेकांनी वेगवेगळा ठेवला आहे. एका कादंबरीमागे तो अरबी शेखच्या पोशाखात दिसतो.) यांची छायाचित्रे दिली आहेत. कुणा प्रकाशकाने स्वत:ची छबी लोकप्रिय करण्यासाठी स्वत:चेच छायाचित्र कादंबरीच्या मलपृष्ठावर देऊन ‘प्रकाशक’ असे लिहिले आहे. कुणी ‘प्रत्येक कादंबरी निवडताना खरेपणा तपासायचा असेल, तर ओमप्रकाश शर्मा यांचे मलपृष्ठावरील हे छायाचित्र पाहूनच कादंबरी घ्या’ अशी सावधगिरीची सूचना केली आहे. नीलम पाॅकेट बुक्स, प्रभात पाॅकेट बुक्स, अजय पाॅकेट बुक्स, नुतन पाॅकेट बुक्स, बाॅबी पाॅकेट बुक्स, पूजा पाॅकेट बुक्स, गंगा पाॅकेट बुक्स, अनिल पाॅकेट बुक्स, संगीता पाॅकेटबुक्स, वीर पाॅकेट बुक्स, आनंद पाॅकेट बुक्स,कंचन पाॅकेट बुक्स (आधी मेरठ-२, नंतर दिल्ली-६), विनीत बुक डिस्ट्रिब्यूटर्स, रायल पाॅकेट बुक्स, कृष्णा पाॅकेट बुक्स, मनोहर पाॅकेट बुक्स…
आता मी नावे लिहून थकलोय, इतकी वेगवेगळी आणि न संपणारी नावे आहेत.
अजेय पाॅकेट बुक्सची एक जाहिरात थोरच आहे.
‘ओमप्रकाश शर्मा : पाठकों के मनचाहे लेखक. विक्रांत, जगत, ताऊ… रोमान्स की मीठी मीठी सेंक जो आपके दिल को पल-पल गुदगुदाती रहेगी. ऐसा रोमांच जो कदम-कदम पर आपको रोमांचित करेगा. ऐसा रहस्य जिसकी कुहारो मे डुबी परते आपको कदम-कदम पर चौंकाती रहेगी.’
अन्सार काॅलनी, मेरठ-२ या पत्त्यावरील मनोहर पाॅकेट बुक्स आणि कृष्णा पाॅकेट बुक्स एकतर शेजारी तरी असावेत किंवा मित्र तरी. त्यांच्या मलपृष्ठावर एकच मजकूर वेगवेगळ्या लेआऊटमध्ये आहे. तो कुणातरी एकाच व्यक्तीने लिहून दिला असणार. तो मजकूर असा :
‘ओमप्रकाश शर्मा : हिन्दी साहित्य जगत मे जब जासूसी साहित्य और साहित्यकारोंका विमोचन होगा तो… ओमप्रकाश शर्मा का नाम सर्वप्रथम आयेगा. यह कलम का जादूगर भाषा के बल पर जिस खुबसुरती से कथानक को उभारता है, वह कला अन्यत्र कही किसी भी जासूसी लेखक मे नही पायी जाती. यह मानना ही होगा की शर्मा जी ने पाठकों को जासूसी साहित्य के अध्ययन से बहुत कुछ दिया है, और दे रहे है. उदाहरण के लिये प्रस्तुत उपन्यास पढे.’
अनिल पाॅकेेट बुक्सच्या जाहिरातीत म्हटले आहे :
‘स्वस्थ व भरपूर मनोरंजन का आधार अनिल पाॅकेट बुक्स. जिसके प्रत्येक उपन्यास मे पाठक सहज ही खो जाता है. विक्रांत, जगत-राजेश सिरीज व जासूूसी थ्रिलर और उच्च कोटी के सामाजिक उपन्यास पढने के लिए सदैव याद रखे अनिल पाॅकेट बुक्स.’
यातही गंमत अशी की अगदी जुन्या कादंबऱ्यांत मलपृष्ठ सजविण्यात हात आणि कल्पना आखडत्या घेणार्या काही प्रकाशकांनी आपल्या आर्थिक भरभराटीनंतर चुका दुरूस्त करून आपल्या प्रकाशनाचे नाव आणि मलपृष्ठ-मुखपृष्ठ अधिक आकर्षक केलेले दिसते. उदा. संगीता पाॅकेट बुक्सची सर्वात जुनी पुस्तके. त्यात प्रकाशनाचे नाव वाचकांनी दखलही घेऊ नये असे छापलेले आढळते. नंतर नव्या कादंबऱ्यांमध्ये मात्र संगीता पाॅकेट बुक्सचे नाव अगदीच आकर्षक स्वरूपात ठसठशीतपणे लिहिलेले आहे.
[‘गंगा पॉकेट बुक्स’ची एक जाहिरात]
४ वेगवान, बेबंद, रंजक, सुरस आणि चमत्कारिक…
तर - दोन-अडीच तासांत भरभर संपणाऱ्या दोन कादंबऱ्यांचा फडशा मी दोन दिवसांत पाडला. माझे पहिले कुतूहल हे आकर्षक, क्लासिक नावांविषयी, प्रसिद्ध व्यक्तींशी विक्रांतला भिडविणाऱ्या कादंबऱ्यांविषयी अधिक होते. उदाहरणार्थ, ‘विक्रांत और हिचकाक’मध्ये हिचकाॅक या सिनेदिग्दर्शकाच्या सिनेमांशी साधर्म्य साधणारे काही कथानकात वापरले आहे का अशी उत्सुकता सर्वाधिक होती. कादंबरी अर्थातच तोतया ओमप्रकाश शर्मा यांनी लिहिलेली असणार. पण त्यातही या तोतयाने साम्यवादी विचारांचा पुरस्कार आणि भांडवली विचारांचा धिक्कार ही, मूळच्या ओमप्रकाश शर्मांची भूमिका उचलली आहे. कादंबरीची सुरुवात जगतपासून होते. अगदी सतत जगभर भटकंती करून, ‘दारू आणि पारू’ या दैनंदिन हौसांमध्ये डुंबणार्या जगतबद्दल सांगताना निवेदक म्हणतो :
‘दुनिया का एक अजुबा इन्सान जगत. आंतरराष्ट्रीय ठग. जगत सारे संसार मे ठगके नामसे प्रसिद्ध है. यारों का यार दुष्मनो का दुष्मन. जगत का व्यापार सारे संसार मे चलता है. उसका पेशा ठगी है और अपने इस धंदे मे वह माहीर है. हर देश मे वह अपने इस विद्या का प्रयोग करता है. यू जगत को चेले बनाने का शौक है. संसार का शायद ही कोई ऐसा राष्ट्र हो जहा उसके शिष्य ना हो. जगत और विक्रांत जैसे खतरनाक जासूस तक उसके शिष्य है.’
बऱ्याच दिवसांत भारतात राहिल्यामुळे दैनंदिन ‘दारू आणि पारू’चा शिरस्ता पाळता येत नाही, अशी जगतची खंत टोकाला जाते आणि त्याच दुःखात तो न्यूयाॅर्कला जाण्यास निघतो. तो घरातून विमानतळावर आणि तिथून विमान पकडून न्यूयाॅर्कला पोहोचेपर्यंत प्रवासाचे सर्व तपशील दिले आहेत. मग तिकडे उतरून तो ‘वाॅशिंग्टन’ नामक हॉटेलात रूम बुक करेपर्यंतचे संदर्भ आहेत. हे तपशील जगतच्या ऐषारामी जगण्याची रूपरेषा स्पष्ट करतात. दुसऱ्या प्रकरणात विक्रांत फ्रान्समध्ये कुठल्यातरी मोहिमेत रमून नंतर भारतात परततो. सुट्ट्यांमध्ये तो जगतइतका नाही, पण ‘थोडी दारू आणि थोड्या पारू’ यांच्या सानिध्यात राहण्याचे बेत आखत असतानाच त्याला देशाला संकटातून वाचविण्याच्या नव्या मोहिमेची सुपारी मिळते. मग नव्या प्रकरणातून हिचकाॅकचा प्रवेश होतो. अमेरिकेबद्दल प्रचंड दुस्वास आणि रशियाबद्दल अमाप प्रेम असलेल्या निवेदकामार्फत अर्थातच अमेरिकी सीआयएच्या नव्या कुरापतींबद्दलचे तपशील येतात. हिंदी महासागरामधील शेकडो वर्षे जगाला अज्ञात राहिलेल्या एका छोट्या बेटावर अमेरिका सैनिकी वसाहत बनवते. भारत आणि पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी आणि रशियावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे हिचकाक नावाचा सीआयएचा प्रमुख एजंट असतो. तो क्रूरकर्मा आणि शिस्तखोर असतो. (पण यापूर्वी जगत आणि विक्रांतने त्याला धोबीपछाड दिलेला आहे, असा तपशीलही निवेदक पुरवतो!) या बेटावरील अमेरिकी नौदल एका भारतीय जहाजाचे अपहरण करून जहाज त्यांच्या ताब्यात घेतात. पण त्यांचा कॅप्टन जहाजावरून पळ काढून मुंबईत येतो आणि या बेटाविषयी सीबीआयला सतर्क करतो. या पळालेल्या कॅप्टनच्या मागावर हिचकाक आपला उजवा हात मेनोदे याला पाठवतो. त्यामुळे विक्रांतला त्या बेटावर जाण्याचा पासपोर्ट आपोआप प्राप्त होतो. मेनोदेला ताब्यात घेऊन, त्याच्यासारखा खोटा चेहरा तयार करून, त्याच्याकडून अल्पावधीत माहिती हस्तगत करून विक्रांत मेनोदेचा बहुरूपी बनतो आणि बेटावर पोहोचतो. इकडे अमेरिकेत कॅनडाच्या एका संगीत-नाटक कंपनीतील मुख्य अभिनेत्री जगत गटवतो. त्या कंपनीकडे एक नवे कंत्राट येते - अमेरिकी बेटावर सैनिकांसाठी आठवडाभर मनोरंजनपर कार्यक्रम करण्याचे. गटवलेल्या तरुणीबरोबर जगत या कंपनीचा एक कलाकार म्हणून बेटावर हजर होतो. मग हिचकाकवर मात करण्याच्या कारवाया सुरू होतात! विक्रांत आणि हिचकाकचा संघर्ष वाचताना, सत्तरीच्या दशकातला अमिताभ बच्चनचा एखादा भरभक्कम सिनेमा पाहत असल्याचा भास कादंबरीच्या पानापानांवर होत राहतो.
कथानकाची सहजता ही यातील मला आवडलेली खास बात. सहज आणि साहित्यिक भाषा. ‘लालायत’सारखा शब्द मला यातून सापडला (उत्सुकता, जिजीविषा वगैरेशी साधर्म्य सांगणारा अर्थ असावा.) आणखीदेखील बरीच शब्दसंपदा मिळाली.
‘विक्रांत और जेम्स बांड’ ही लक्ष्मी पाॅकेट बुक्स या प्रकाशनाची कादंबरी. यांनीच ओमप्रकाश शर्मा यांच्या कादंबऱ्या मोठ्या प्रमाणावर प्रकाशित केल्या होत्या. ‘जगत और जेम्स बांड’ ही मालिकादेखील त्यांनी प्रकाशित केली आहे. ‘विक्रांत और जेम्स बांड’ या कादंबरीच्या मलपृष्ठावर ओमप्रकाश शर्मा यांची छबी नसून प्रकाशकाने स्वत:चेच छायाचित्र डकवले आहे. मजकूर लिहिला आहे, की :
‘उपन्यास सम्राट’ से सम्बोधित किये गये उपन्यासकार ओमप्रकाश शर्मा के उपन्यास जो काल्पनिक होते हुए भी सत्य जैसे प्रतीत होते है और पाठको के मन-मष्तिष्क पर अपनी अमिट छाप छोड जाते है. ऐसे ही कुछ उपन्यास जिन्हे प्रकाशित करने का गौरव हमे प्राप्त है, शर्माजी की लोकप्रियता बनाये हुवे है.’
‘विक्रांत और जेम्स बांड’चे कथानक हिचकाकपेक्षा थोर वेगात पळणारे, जेम्स बाॅण्ड नामक जासूसाची जमेल तितकी नाचक्की करणारे आहे. लंड़नच्या इस्पितळात आणल्या जाणाऱ्या वाॅटसन ज्युल या म्हाताऱ्या वैज्ञानिकाच्या तपशिलापासून कादंबरीला सुरुवात होते. (हा वाॅटसन कुठून आला आणि ज्यूल म्हणजे कोण? या नावांचे एकत्रीकरण करणारा लेखक किती पट्टीचा वाचक असावा याची कल्पना सहज करता येऊशकेल.) हा वाॅटसन ज्यूल एका अज्ञात बेटावरल्या अजब घटनांची नवीच माहिती देतो. ‘प्रेत संसार’ किंवा ‘नीली घाटी’ असे पुढे या बेटाचे नामकरण होते. तिथे मानव जाऊ शकत नाही. बेटाच्या जवळपास गेल्यावर झाडांवर लटकलेली मानवी शिरे जिवंत माणसाप्रमाणे गाताना दिसतात, रक्त गळत असलेली मुंडकी रडत असलेली पाहायला मिळतात. या बेटाचे रहस्य उलगडण्याची जबाबदारी देशोदेशीचे गुप्तहेर एजंट्स घेतात. रशियन लोक वाॅटसन ज्यूलचे अपहरण करतात, ते त्याला बेटावर पोहोचविणारा गाईड बनविण्यासाठी. दुसरीकडे बेटावर पोहोचण्यासाठी जेम्स बॉण्ड स्वतंत्ररीत्या मार्ग शोधत असतो. सगळ्या धाडसी कारवायांमध्ये भारतीय सीबीआयचा जासूसच ‘ऑपरेशन सक्सेसफुल’ बनवत असल्याने जेम्स बॉण्डची पत जगभरात खाली गेलेली असते. ती पुन्हा उंचावण्यासाठी जेम्स बॉण्ड सक्रिय झालेला असतो. अमेरिकी स्त्री-हेर मिस कैनी विक्रांतच्या मोहापायी त्याच्याबरोबर मोहिमेत सामील होते. दारू हा विक्रांतनंतर तिचा दुसऱ्या क्रमांकाचा मोह. म्हणजे ‘दारू आणि मारू’ या दोन गाष्टींनी तीही बाधित. रशियन हेर बागारोफच्या चमूत विक्रांत आणि जगत हे दोघे आपसूक दाखल होतात आणि बेटावर जाण्याचे मार्ग शोधू लागतात. ते तिथे यशस्वीरीत्या शिरतात. पण विक्रांतला जेम्स बॉण्ड आडवा येतो. त्याला विक्रांत इतका पिटतो, की जीव वाचविण्यासाठी बेटावरून तोंड काळे करण्याशिवाय कोणताच पर्याय बाॅण्डकडे उरत नाही. ‘नीली घाटी’मधील रहस्यमय लोकांची मने विक्रांत जिंकून घेतो, तिथली राणी देवी मोनाँजा हिलादेखील गटवतो, आणि ‘नीली घाटी’त चालणारी मानवविरोधी षडयंत्रे निकामी करण्याच्या कामाला लागतो.
या कादंबरीतदेखील रशिया हा भारताचा मित्र असून अमेरिका हा जगासाठी धोका असल्याचे संदर्भ जागोजागी पेरण्यात आले आहेत. कहाणीतले तपशील फॅण्टसीच्या - अद्भुताच्या सगळ्या शक्यता खरडवून येतात.
सत्तरीच्या दशकापर्यंत जेम्स बाॅण्डच्या कादंबऱ्या भारतात अनुवादित होऊन पसरत होत्या. सिनेमेदेखील येत होते. पण विक्रांतच्या भारतभर पसरलेल्या चाहत्यांसाठी मात्र जेम्स बाॅण्ड हा शक्ती कपूरसारखा, एखाद्या दुबळ्या खलनायकाच्या रूपात रंगविण्यात आला आहे. ‘००७’ची कीर्ती धुळीला मिळविण्याची एकही संधी विक्रांत किंवा जगत सोडत नाहीत. ह्या कथानकात मुबलक म्हणींचा वापर केला आहे. जेम्स बाॅण्डविषयी सांगताना एक पात्र म्हणते, “अरे वो बांड तो अंधो में काणा जैसा है!” आणि आपण खोखो हसायला लागतो.
५ येते वर्ष विक्रांतव्हर्सचे
एकुणातच विक्रांतव्हर्समध्ये वावरणे हा माझ्यासाठी २०२५ सालामधला संकल्प आहे. इंग्रजी आणि मराठी वाचनाच्या धबगड्यातून वेळ काढून मी विक्रांतकादंबर्यांचे वाचन करीन. व्यायामामुळे जसे डोपामाईन स्रवते आणि त्याचा अंमल पुढेही टिकतो, तसे विक्रांतकादंबर्यांचे वाचन माझ्या मेंदूला नंतरही बराच काळ खाद्यपुरवठा करत राहते. कधीही हार न पत्करणार्या, सतत लढत राहणार्या, आणि रहस्यांचे अतिकठीण पापुद्रे सोलून काढणार्या विक्रांतचे कारनामे वाचण्याचा मोह टाळणे अशक्य आहे. त्याच्या सगळ्याच्या सगळ्या कादंबऱ्या उपलब्ध होणे शक्य नाही. उपलब्ध झाल्याच, तरी तरी तेवढे पैसे टाकून त्या खरेदी करता येणे शक्य नाही. जमेल तितकी हौस भागवण्यासाठी हिंदी पट्ट्यातील दुर्मीळ पुस्तकविक्रेत्यांशी वर्षभर संधान ठेवावे लागणार आहे आणि माझ्या खाती जमा झालेल्या विक्रांत-कादंबर्यांचा आकडा वाढतच जाणार आहे.
एखाद्या नायकाचा ट्रेण्ड तयार व्हावा, त्याच्या नावे नकली लेखकांनी पुस्तके लिहावीत, त्या नायकाला सवाई ठरेल असे त्याच्या शिष्याचे पात्र कुणा नकली लेखकाने जन्माला घालावे, मग तेच पात्र अधिक लोकप्रिय होऊन त्याच्यावर, अनेक नकली लेखकांनी मिळून का होईना, पण चक्क पाच हजारांच्या वर पुस्तके लिहिली जावीत… हे एकमेवाद्वितीय उदाहरण आहे. याचा सांगोपांग अभ्यास करणे मला महत्त्वाचे वाटते.
मराठीत असा एखादा नायक वा नायिका जन्माला घालून रंगवण्याचा प्रकार झालाच नाही असे नाही. तुरळक उदाहरणे आहेत. महंत-कथा अनेकांनी लिहिल्या, रातराणी या नायिकेवरही दोन-तीन लेखकांनी लिहून पाहिले. एस. एम. काशीकरांच्या कादंबऱ्यांंमधील हाणामाऱ्या, शरच्चंद्र वाळिंबेच्या कादंबऱ्यांतील परदेशगमन करून प्रताप करणारे नायक, सुभाष शहांच्या तूफानी-चक्रम कथा, गुरुनाथ नाइकांच्या कादंबऱ्यांतील समुद्री- आणि वैज्ञानिक तपशिलांनी भरलेल्या कथा… अशी काही उदाहरणे सापडतात. पण विक्रांतइतकी संख्या त्यांपैकी कुणीही गाठली नाही.
विक्रांतची निर्मिती नक्की कुणी केली, हा विषय आजही वादग्रस्तच मानला जातो. त्यामुळे आजही हिंदी टापूत चर्चेसाठी किंवा अभ्यासासाठी या कादंबर्यांच्या वाटेला क्वचितच कुणी जाताना दिसते. पण या कादंबऱ्या आजही इतका आनंद देतायत, त्या त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना किती जोरकसपणे वाचल्या जात असतील याची कल्पना करून थक्क व्हायला होते.
या कादंबऱ्या, त्यांच्या प्रकाशात अमिताभ बच्चन यांच्या दे-मार चित्रपटांचे नव्याने घडणारे दर्शन, आणि मराठी रहस्यकथांतील लेखकांच्या शैलीचा अभ्यास या उपक्रमात हे वर्ष किती वेगात जाते, ते आता पाहायचे!
- (पल्पिस्तान या मासिक सदरात हिंदी, मराठी, आणि क्वचित इंग्रजी पुस्तकांच्या संदर्भात केलेली टिपणे असतील.
- हिंदीतील मजकूर त्या-त्या ब्लॉगवरून जसाच्या तसा चिकटविला आहे, त्यामुळे त्या-त्या लेखकांच्या शैलीनुसार लेखनपद्धतीत फरक आढळतील.
- ज्या छायाचित्रांचे श्रेय दिलेले नाही, ती लेखकाच्या संग्रहातील आहेत.)
६ संदर्भ आणि आणखी वाचनदुवे
- जनप्रिय लेखक ओमप्रकाश शर्मा
- अधूरी रह गई थी ओमप्रकाश शर्मा की आत्मकथा
- ओमप्रकाश शर्मा - जनप्रिय लेखक
- ओमप्रकाश शर्मा की कहानी मांगने मेरठ आये थे बासु चटर्जी
- एक थ्रिलर प्रेमकथा
- जनप्रिय लेखक : ओमप्रकाश शर्मा : बौनों का देश
- हिंदी के लोकप्रिय साहित्यकार ओमप्रकाश शर्मा, जिन्होंने जासूसी साहित्य को एक नई पहचान दी, उनकी जन्मशती पर प्रभात खबर की विशेष प्रस्तुति
- विक्रांत,जनप्रिय ओमप्रकाश शर्मा का किरदार नहीं था