मराठी माणसांची ‘डायजेस्टी’ परंपरा...

या लेखाचा आकार ‘वाढता वाढता वाढे...’ अशा गतीने वाढत गेला. पण माहिती आणि रंजन करणारी मासिके हा त्याचा आशय, त्यामागची सामाजिक पार्श्वभूमी आणि त्यातल्या विसंगती, त्यातून या मासिकांचे तयार होत गेलेले विशिष्ट व्यक्तिमत्त्व हे सगळे पाहता, लेख निव्वळ सुबक आकाराचा हवा म्हणून त्याचे संपादन करणे आशयाला अन्यायकारक ठरेलसे वाटले. खेरीज त्यातील अनेक तपशील सर्वसामान्य वाचकासाठी अतिशय रसाळ आहेत. प्रस्तुत लेखकासारखे काही वेडे पीर वगळता इतरांच्या हाती हे तपशील सहजासहजी लागणे मुश्किलीचे आहे. या सार्यातचा विचार करून लेखाला नैसर्गिक आकार येऊ दिला. ‘किर्लोस्करची ‘रीडर्स डायजेस्ट’ ओळख अर्थात कोंबडीआधी अंडे’ या त्याच्या पहिल्या भागात ‘रीडर्स डायजेस्ट’ या मासिकाची ओळख मराठी वाचकांना कुणी आणि कशी करून दिली याविषयीची पार्श्वभूमी दिलेली आहे. ‘चले जाव’ चळवळीच्या आधीच्या वर्षांतील वळवळ, अर्थात आद्य कामसाहित्योत्सव’ या दुसर्‍या भागामध्ये लेख काहीसे तिरके वळण घेतो आणि मराठी मासिकांना आलेले शृंगारिक नियतकालिकांचे स्वरून उलगडून दाखवतो. ‘सुप्रजननवेडकाळ अर्थात मासिकांचेही सुप्रजनन’ या तिसर्‍या भागात वासू मेहेंदळे या विलक्षण संपादकाची ओळख करून दिली आहे, तर ‘विचित्र संपादकाचे विश्व अर्थात गूगलपूर्व जगाची खिडकी’ या चौथ्या भागामध्ये ‘विचित्र विश्व’ या अजब मासिकाविषयी आणि वासू मेहेंदळे यांच्या अपूर्व दातृत्वाविषयी वाचकाला सुरस माहिती मिळते. ‘इतर डायजेस्ट अर्थात वाचकांनी नाकारलेली फौज’ या अखेरच्या भागात आजचे चित्र आणि त्यामागची कारणे यांचा शोध घेतला आहे. तरीही अनेक तपशील, अनेक नावे, अनेक मुद्दे, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अनेक आकर्षक वाटा राहून गेल्या असतील याची जाणीव आहे. तूर्त इतकेच. - संपादक, भास प्रकाशन

पंकज भोसले

पंकज भोसले

अतिथी संपादक

Fri Mar 14

१ किर्लोस्करची ‘रीडर्स डायजेस्ट’ ओळख अर्थात कोंबडीआधी अंडे

भारतीय आणि त्यातही मराठी माणूस हा ज्ञानपिपासू होता काय? तर कधीच नव्हता. त्याची इतर जगाविषयी जाणून घेण्याची ओढ ही तत्कालीन मासिकांनी निर्माण केली असली, तरी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या समाजात मासिके वाचून त्यांतील विचारांवर मंथन करणारा अभ्यासू वर्ग तो समाजात कितीसा असणार? बहुजन वर्गाची वाचनक्रीडा ही पहिल्या महायुद्धादरम्यान हळुहळू सुरू झाली असे मानले, तरी गेल्या शतकाच्या आरंभीची दीड-दोन दशके मुख्यत्वे मासिके आणि दिवाळी अंक यांतून ज्ञान आत्मसात करण्याचा आटापिटा सर्वाधिक झाला असावा. १९०९ साली ‘मनोरंजन’चा पहिला दिवाळी अंक आला. त्यानंतर हौशा-नवशा-गवशा संपादकांनी आपापल्या नियतकालिकांतून ज्ञानपोया घालण्याचा सपाटा लावला. त्यामुळे तेव्हाच्या मराठी समुदायाला जगात काय चालले आहे, याची जाणीव वर्तमानपत्रांतून कमी आणि मासिका-दिवाळी अंकातून अधिक होत होती. ‘मौज’, ‘ज्योत्स्ना’, ‘किर्लोस्कर’ यांचे १९३० सालानंतरच्या काही अंकांचे गठ्ठे हाती लागले, तेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या संपादकांची ज्ञानवाटपाची दृष्टी विशेष लक्षात येऊ लागली.

‘किर्लोस्कर’चे १९३७ सालातील सगळे अंक एकत्रित बांधलेला सुस्थितीमधील संपूर्ण खंड करोनाकाळापूर्वी कधीतरी माझ्या हाती आला. त्यात विविध विषयांवर लिहिणाऱ्या शि. आ. स्वामी या लेखकाने एप्रिल महिन्याच्या अंकात ‘रीडर्स डायजेस्ट’ या मासिकाची संपूर्ण कुंडली मांडणारा एक लेख लिहिला आहे. ‘रीडर्स डायजेस्ट’ या मासिकाविषयी मराठी वाचकांना कुतूहल वाटावे अशी सारी व्यवस्था त्या लेखात आहेच. पण तो इतक्या तपशिलात सांंगितला आहे, की आजही वाचताना थक्क होण्याशिवाय वगैरे पर्याय उरत नाही. ‘किर्लोस्कर’चे संपादक शं. वा. किर्लोस्कर आपल्या अंकातील मजकुराबाबत किती दक्ष आणि सजग होते, याचा पुरावा म्हणून मी या लेखाकडे पाहतो, त्याला कारण आहे. मराठी जगतात ‘डायजेस्टी’ मासिकांची परंपरा तोवर सुरूच झाली नव्हती. त्या दशकात ‘यशवंत’ नावाच्या मासिकाचे अंक ‘क्राऊन’ आकारामध्ये (म्हणजे ‘लोकप्रभा’, ‘साप्ताहिक सकाळ’ या साप्ताहिकांचा आकार) येत नसत. त्याहून छोट्या आकारात येत. पण तरीही तो आकार ‘डायजेस्ट’ मासिकांहून किंचित मोठा असायचा. तेव्हा ‘रीडर्स डायजेस्ट’ हे मासिक भारतात इतर पल्प मासिकांसह ब्रिटिशांसाठी म्हणून का होईना, येत असणारच. पण त्याचे अंक रद्दीत येऊन नेटिव्हांच्या हाती वाचायला कधी येत असतील, ते सांगता येत नाही. ती संख्या किरकोळ असण्याची शक्यता जास्त वाटते. भारतात ‘रीडर्स डायजेस्ट’ हे मासिक प्रथम छापण्यात आले ते १९५४ साली. खास स्वतंत्र भारतातील वाचकांसाठी ‘रीडर्स डायजेस्ट’ने काढलेली आशियाई आवृत्ती तेव्हापासून सुरू झाली. पण त्यापूर्वी १७ वर्षे, म्हणजे १९३७ सालीच ‘किर्लोस्कर’च्या अंकाच्या संपादकांना या मासिकाच्या जगभरात वाढत चाललेल्या पसाऱ्याची ओळख मराठी वाचकांना करून द्यावीशी वाटली. ‘मासिकाच्या व्यवसायांतील अपूर्व यश’ नावाचा हा शि. आ. स्वामींचा लेख तब्बल सात पानांचा स-छायाचित्र असा होता. त्यातील ‘रीडर्स डायजेस्ट’ अंकाचे मुखपृष्ठ तेव्हाच्या वाचकांना कितपत स्पष्ट दिसले असेल, ही बाब आपल्यासाठी आता नव्वदेक वर्षांनंतर अस्पष्टच.

जे मासिक मराठी वाचकांना माहीतच नाही, त्या अंकाची अमेरिकेसह इतर जगात वाढत चाललेली महत्ता सांगण्याचा ‘किर्लोस्कर’ मासिकाचा प्रयत्न कितीतरी कौतुकास्पद म्हणावा लागेल. 

‘रीडर्स डायजेस्ट’ या अमेरिकी मासिकाचे संपादक व संस्थापक मि. डीविट वॅलेस यांचे स्फूर्तिदायक कार्य’ असा लघु-इंट्रो या लेखाला देण्यात आला आहे. मात्र ठळक टंकात दीर्घ-इंट्रोदेखील देण्यात आला आहे. तो असा :

‘रीडर्स डायजेस्ट’ या अमेरिकन मासिकाचे संस्थापक आणि संपादक डीविट वॅलेस यांच्या प्रचंड कार्याकडे पाहिले म्हणजे स्वतंत्रपणे बुद्धी चालवणारा माणूस एखाद्या विशिष्ट कार्यक्षेत्रात कसे अभूतपूर्व यश मिळवू शकतो हे दिसून येते. ते युनिव्हर्सिटीचे पदवीधर नाहीत. किंवा वाड्मयसेवकही नाहीत. परंतु ज्ञानलोलूप लोकांना कोणत्या तऱ्हेच्या लेखांची आणि माहितीची जरूरी आहे, हे त्यांनी बरोबर ओळखले; आणि अशा तऱ्हेचे लेख पुरविण्याचे काम इतर मासिकांकडून होत नाही, असे पाहाताच त्यांनी स्वत: ‘रीडर्स डायजेस्ट’ नावाचे मासिक काढले. मित्रांकडून आणि आप्तांकडून उसने पैसे आणून त्यांनी थोडेबहुत भांडवल उभे केले. मासिकाच्या धंद्याचाही त्यांना पूर्वी अनुभव नव्हता. पण आपल्या मासिकाच्या नावीन्यपूर्ण योजनेवर त्यांचा विलक्षण आत्मविश्वास होता, आणि तो सर्वस्वी यथार्थ होता असे कबूल करणे आता भागच आहे. केवळ १४ वर्षांच्या काळात डीविट वॅलेसनी वर्गणीदारांची संख्या ५००० पासून १८ लाखांपर्यंत वाढविली. सर्वसाधारण वाचकांना कथावाङ्मयच अधिक आवडते, अशी समजूत आहे. पण ललितवाङ्मय विरहित लेख प्रसिद्ध करून ‘रीडर्सडायजेस्ट’ने आज आपला स्वत:चा म्हणून एक फार मोठा वाचकवर्ग निर्माण केला आहे.

या लेखाची पार्श्वभूमी, त्याचे काही संदर्भ, हा लेख आधारित की अनुवादित याची काहीही माहिती शि. आ. स्वामी यांनी दिलेली नाही. त्यांना खास या मासिकासाठी अमेरिकेत पाठविण्यात आल्याची शक्यताही अधिक आहे. कारण १९२५ साली डाॅलर आणि रुपया यांचा दर जवळजवळ सारखा होता. १९३७ सालामध्ये त्यात ६८ पैशांची भर पडली होती. म्हणजे अमेरिकेला जाणे आणि राहणे तितकेसे महाग नव्हते. ‘किर्लोस्कर’ची तितकी पत आणि पोहोच नक्कीच होती. पण तेव्हाही लेखाच्या शेवटी आधारित, अनुवादित, रूपांतरित इत्यादी माहिती देण्याची प्रथा होती. ती या लेखाच्या शेवटी पाळलेली नाही. त्यामुले हा लेख शि. आ. स्वामी यांनी इतर उपलब्ध साधनांवरून तयार केला असण्याची शक्यता कमी वाटते. लेखातील काही तपशील, कोष्टके, पगारांचे आणि कामांचे तपशील, छायाचित्रे इत्यादी बाबी पाहिल्या, तर नव्वद वर्षांपूर्वी (डाॅलरस्वस्ताई होती म्हणून का असेना) मराठी मासिकातील एक लेखक एखाद्या लेखासाठी थेट अमेरिकेत जाऊ शकत होता, ही गोष्टच आज अचंबित करते. 

शि. आ. स्वामी यांनी केलेले पुढील वर्णन पाहा : 

‘रीडर्स डायजेस्ट मासिकाची कचेरी प्लेजंटव्हिला नावाच्या एका उपनगरात असून मॅनहॅटनपासून तिथे जायला फारतर एक तास लागतो. स्टेशनवर उतरल्यानंतर कुठलाही माणूस तुम्हाला मासिकाच्या कचेरीची वाट दाखवील आणि कदाचित अभिमानाने म्हणेल ‘माझी बहीण तिथेच कामाला आहे.’ तुम्हाला जर बिझिनेस ऑफिसमध्ये जायचे असेल तर तो गृहस्थ कोपऱ्यावरच्या ‘फर्स्ट नॅशनल बँक बिल्डिंग’कडे बोट दाखवील आणि तुम्हाला जर संपादकीय खात्यात जावयाचे असेल, तर त्याच्या समोरच्या ‘माऊंट प्लेजंट बँक ॲण्ड कंपनी’जवळ नेऊन तुम्हाला सोडील. या इमारतीत शिरताच तुम्हाला एक पाटी दिसेल. पण तिच्यावर ‘रीडर्स डायजेस्ट’ ही अक्षरे तुम्हाला दिसावयाची नाहीत. पण त्यानंतर आणखी एक जिना चढून तुम्ही वर गेलात की ‘मेहरबानी करून दार लावून घ्या’ ही अशा अक्षराची आणखी एक पाटी तुम्हाला दिसेल. ही पाटी ओलांडून आणखी थोडे पुढे गेले की ‘डायजेस्ट’ची संपादकीय कचेरी लागते.’

शि. आ. स्वामी नुसते चित्रदर्शी वर्णन करत नाहीत, तर पुढे वाॅलेस आणि इतर कर्मचारी कुठे बसतात, काय काम करतात, ते आधी कुठे काम करत आणि त्यांचा विद्यमान पगार किती असा सगळा तपशीलही मराठी वाचकांना पुरवून थक्क करून टाकतात. १९२२ ते १९२८ या काळातले ‘डायजेस्ट’च्या खपाचे आकडे सापडत नाहीत, म्हणून १९२९ ते १९३६ या काळातले, म्हणजे लेख लिहिण्यापूर्वीच्या वर्षांपर्यंतचे आकडे कोष्टकाद्वारे सादर करतात. इतर मासिके, नियतकालिके यांच्यातून विविध विषयांवरील सर्वोत्तम लेख कसे निवडले जातात, त्यासाठीची कामे कोण व कसे करते, ‘रीडर्स डायजेस्ट’मध्ये लेखन पुन्हा छापले जाण्यासाठी मूळ मासिकांना किती मोबदला दिला जातो, हे तपशीलही स्वामी यांनी टिपले आहेत. 

केनेथ डब्ल्यू पेन यांनी सुरुवातीच्या काळात या मासिकाच्या संपादकपदाची धुरा सांभाळली होती. त्यांचा १९३४ सालचा पगार एक लाख दोन हजार चारशे सदुसष्ट डाॅलर्स इतका होता. हा  पगार शि. आ. स्वामींनी पेन यांची पे-स्लीप पाहून सांगितला की कसे याची कल्पना नाही! पण मासिकाची भरभराट पेन यांच्या संपादनकाळातच झाली. 

मूळ लेखातील आणखी एक तपशील इथे देण्याचा मोह मला होतो आहे. 

‘निरनिराळ्या मासिकातील चांगले लेख निवडायचे आणि त्यांचा सारांश काढून तो ‘रीडर्स डायजेस्ट’मधून प्रसिद्ध करायचा असा वॅलेस यांचा पहिल्यापासून क्रम. आणि आपल्या मासिकाची एक प्रकारे आयतीच जाहिरात होत असल्याने संपादक लोकही लेख छापायला आनंदाने परवानगी देत. हा क्रम सुरळीतपणे चालला. १९२९ साली मॅनहॅटनला जाऊन अशा साऱ्या संपादकांना वॅलेस यांनी जाऊन मानधनाचे चेकही दिले. ‘रीडर्स डायजेस्ट’चा हा उत्कर्ष इतर काही मासिकांना फार वेळ पाहवला नाही, आपल्या खपावर ‘रीडर्स डायजेस्ट’चा परिणाम होतो आहे, असे दिसून येताच ‘स्किबनर्स’ मासिकाने पुनर्मुद्रणाचा हक्क काढून घेतला. ‘ॲटलांटिक मन्थली’ आणि ‘फोरम’ या मासिकांनीदेखील याची री ओढली. डीविट वॅलेस काही काळ घाबरून गेले. या प्रसंगी केनेथ डब्ल्यू पेन (तेव्हा ते ‘नाॅर्थ अमेरिकन रिव्ह्यू’मध्ये होते) यांनी डीविट यांना फार मदत केली. ‘रीडर्स डायजेस्ट’मधून सारांशरूपात आपले लेख पुन्हा छापून येण्यात कोणताही तोटा नसून उलट फायदाच कसा आहे, हे अनेक प्रकाशकांना पटवून दिले. मग पुन्हा ‘रीडर्स डायजेस्ट’चे काम सुरळीत सुरू झाले. या मासिकासारखेच मासिक काढण्याचे प्रयत्न खूप झाले. मात्र ‘रीडर्स डायजेस्ट’सारखा दर्जा न सांभाळता आल्याने ती अनुकरण करणारी मासिके बंद पडली. ‘डायजेस्ट’ मात्र दर वर्षी खपाचे नवे शिखर सर करत राहिले.’

आठवड्यातून पाच दिवस सकाळी आठ वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत ‘डायजेस्ट’चे काम चाले. जवळ जवळ दोनशे साप्ताहिकांचे वाचन ‘डायजेस्ट’ची संपादक-वाचक फळी करत असे. त्याखेरीज सुमारे तीनेकशे व्यापारविषयक नियतकालिकांवर संपादकवर्ग नजर फिरवी. मिसेस लिला बेल वॅलेस यांचे वाचनमग्न छायाचित्र स्वामी यांनी लेखासाठी पैदा केले आहे. त्याला फोटोओळ दिली आहे, ‘बागेतून हिंडता फिरतांना व घरी बाहेरून आलेले लेख या वाचतात आणि उपयुक्त सूचना करतात.’ मानधनाची  काही आकडेवारीही स्वामी यांनी गोळा केली आहे. त्यात बिझिनेस मॅनेजर ग्रिफिथ यांना संपादकाइतकाच असलेला पगार - दोन हजार चारशे सदुसष्ट डाॅलर्स - दिला आहे. डीविट यांचा स्वत:चा पगार तीस हजार डॉलर्स इतका ठेवला असून त्यांना १९३५ सालात एकूण नफा २ लाख डाॅलर्स इतका झाला, असेही म्हटले आहे.

‘न्यू याॅर्कर’च्या अंकांचा, एकोणीसशे चाळीसच्या दशकातील खंड काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला. डेव्हिड रेम्निक यांनी त्याच्या संपादकीयात माहितीचा एक दुवा जोडला आहे : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ‘न्यू याॅर्कर’चा सर्वाधिक गाजलेला अंक होता, तो जपानमध्ये अमेरिकेने अणुबाॅम्ब टाकल्यानंतरच्या रिपोर्ताजचा. जॉन हर्सी या पत्रकाराचा ‘हिरोशिमा’ नावाचा हा वृत्तांत ‘न्यू याॅर्कर’ने पूर्ण अंकभर छापला. पण जॉन हर्सी याने हा लेख ‘न्यू याॅर्कर’मध्ये न छापता ‘रीडर्स डायजेस्ट’मध्ये छापावा अशी त्याची मनधरणी बराच काळ सुरू होती. ‘रीडर्स डायजेस्ट’च्या तुलनेत अगदी क्षीण खप असलेल्या ‘न्यू याॅर्कर’मधून हा रिपोर्ताज फारशा वाचकांपर्यंत पोहोचणार नाही, असे हर्सीला समजवण्याचे खूप प्रयत्न झाले. पण ‘न्यू याॅर्कर’च्या संपादकीय मंडळाने तो रिपोर्ट ‘डायजेस्ट’कडे न जात आपल्याकडेच राहावा यासाठी कंबर कसली, त्यामुळे तो लेख ‘डायजेस्ट’मध्ये येता येता राहिला.

(थोडा वैयक्तिक तपशील : २००५ ते २०१२ या कालावधीत मी मुंबई-ठाणे ते बदलापूरमधील रद्दीवाल्यांकडून भरपूर ‘डायजेस्ट’चे अंक मिळवून वाचत असे. नंतर ते फडताळात ठेवून त्यांची वर्षवार विभागणी केली, तेव्हा तीसहून अधिक वर्षांचे अंक माझ्याकडे असल्याचे लक्षात आले. ऐंशी-नव्वद साली सेलिब्रेटींची छायाचित्रे अंकांच्या मुखपृष्ठावर छापणाऱ्या ‘डायजेस्ट’चा कुठलाही अंक काढून वाचायला घेतला, तरी वेळाचा अपव्यय झाला असे वाटत नाही. काही ना काही रोचक माहिती सापडतेच. पुढे बदलापूरमधील घर सोडताना हे सर्व अंक श्याम जोशी यांच्या वाचनालयाला दत्तक दिले. निदान काही काळ तरी असलेले जागेचे दुर्भिक्ष्य हेच प्रमुख कारण.)

‘रीडर्स डायजेस्ट’ आणि त्याच्या अभ्यासू कामकाजावरचा मराठीतील दुसरा दीर्घलेख मी भानू काळे यांच्या ‘अंतर्नाद’मधे वाचला. ‘निवडक अंतर्नाद’मध्येदेखील तो वाचायला मिळतो. ‘रीडर्स डायजेस्ट’ची भारतीय आवृत्ती बंद पडलेली नसून ती सध्याही सुरू आहे. 

नव्वद वर्षांपूर्वी मात्र ‘रीडर्स डायजेस्ट’ भारतात येण्याचे चिन्ह दिसत नसताना शि. आ. स्वामी यांनी त्याचा परिचय मराठी वाचकांना करून दिला. मात्र मराठी वाचकांची देशी डायजेस्टी मासिकांची परंपरा अशा प्रकारच्या ‘ज्ञानकुतूहल’दर्शक मासिकांपासून सुरू झाली नाही. तिची वाट पडली, ती ‘कामकुतूहल’दर्शक मासिकांतून. त्याचे अर्वाचीन पुरावे थेट १९४१ सालापर्यंत खोदत जाता येते. 

०२ ‘चले जाव’ चळवळीच्या आधीच्या वर्षांतील वळवळ, अर्थात आद्य कामसाहित्योत्सव

भारतात मुद्रणकला आल्यानंतर लगेचच हौशी गुलछबूंनी अश्लील साहित्याचा आणि स्त्रीनग्नछायाचित्रांचा व्यवहार जोरात सुरू केला. एक सांगोवांगीचा ऐतिहासिक तपशील म्हणजे जर्मनांनी म्हणे सव्वाशे वर्षांपूर्वी नग्न छायाचित्रांचा अगदी पुस्तकांसारखाच जगभर व्यापार केला. त्याला प्रतिक्रिया म्हणून युरोपातील गोऱ्या अनावृत स्त्रियांचे शरीर असते ते बघण्याची चूष इतरांना वाटू लागली. त्यातून हा उद्योग फोफावला. आपल्यावर राज्य करणाऱ्यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्याची वाट कोणती, तर ‘त्यांच्या’ स्त्रियांची शरीरे बघणे, ही. सामान्य लोकांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारा हा तपशील आहे. सामाजिक वा आर्थिक दृष्ट्या वरच्या गटातल्या स्त्रियांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्राप्त करून घेण्याची इच्छा वैश्विक असावी. फिलिप रॉथसारख्या ज्यूइश अमेरिकी लेखकाने त्याच्या कादंबर्‍यांमध्ये बुद्धिजीवी संवेदनशील ज्यूइश नायकांना अमेरिकेतील गोर्‍या अ‍ॅँग्लोसॅक्सन प्रोटेस्टंट बायकांविषयी वाटणार्‍या परस्परविरोधी आकर्षणभावनेविषयी लिहिले आहे. त्या प्रकारचेच हे उदाहरण असावे.

‘बाउण्ड टू एक्साईल : ए व्हिक्टोरिअन इन इंडिया’ या मायकेल एडवर्डच्या ग्रंथात इसवी सन १८५० ते १८६० या कालावधीपासून भारतात नग्न छायाचित्रांचा व्यापार होत असल्याचा उल्लेख आहे. अमेरिकेतून ही छायाचित्रे जहाजाद्वारे ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून भारतात आयात केली जात. पण ती ब्रिटिशांच्या नयनसुखासाठी की इथल्या नेटिव्हांच्या, त्याची ठळक नोंद नाही. अनेक विदेशी आयात वस्तूंची होळी करण्याचा उपक्रम जरी एत्तदेशीय नागरिकांनी केला असला आणि शालेय इतिहासातून आपल्यावर तसेच बिंबवले गेले असले, तरी त्यात अनावृृत छायाचित्रांचा ‘विदेशी माल’ जळून राख झाला असेल याची शक्यता कमी वाटते! 

जुलै १९२७ मध्ये र. धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’चा पहिला अंक निघाला. 

‘व्यक्तींच्या आणि समाजाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख इतर पत्रकार छापत नाहीत असे विषय कितीही महत्त्वाचे असले, तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते. ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात तत्त्वज्ञानाचा खल न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल.’ हे कर्वे यांचे निवेदन. मात्र १९२७ सालापूर्वीच्या महाराष्ट्रात कर्वे यांच्याआधी समाजाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची चिंता करणारे असे कुणीच नव्हते, हे आश्चर्यकारक आहे. एका बाजूला सुधारणांची घंटा समाजात जोरकसपणे बडवण्यात अनेक धुरीण मश्गुल होते. स्त्रीशिक्षणाचा, तसेच एकूणच शिक्षणाचा उपयोग पटवून देत होते. दुसऱ्या बाजूला साक्षर होणारा नववर्ग ‘नको त्या’ तत्कालीन आकर्षणात रमत होता. 

ती आकर्षणे नक्की कोणती असतील? 

मराठी सामाजिक इतिहासाचा अभ्यासक असलेल्या चिन्मय दामले या पुण्यातील मित्राच्या पोतडीतून १९१९ सालातील नियतकालिकांतली एक जाहिरात मला पाहायला मिळाली. काम-आसनांच्या रंगीत फोटोंसह असलेल्या ‘मराठी कोकशास्त्र’ या ग्रंथाची ती जाहिरात होती. स्त्री-पुरुषांमधील जातिभेद, लक्षणे, गर्भधारणेेचे नियम, मनाप्रमाणे संततिप्राप्तीचे उपाय, आणि सुमारे ८० कामासनांची नोंद असलेले हे पुस्तक. वट्ट बारा आण्यांना मिळणारे. या पुस्तकाच्या जाहिरातीबरोबर वशीकरण आणि तत्सम निषिद्ध मानल्या जाणाऱ्या इतर विषयांतील ग्रंथनामेही त्यांच्या किंमतीसह मांडली आहेत. 

या जाहिरातीतून मिळणाऱ्या तपशिलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती पुस्तके महाराष्ट्रात छापली गेलेली नाहीत. ‘मराठी कोकशास्त्र’ हा ग्रंथराज ‘अलिगड सिटी’मधून छापण्यात आला असून पुस्तक मागविण्याचा पत्ता ‘एल. आर. जैसवाल, ५ अलिगड सिटी’ असा आहे. याचा अर्थ या ग्रंथाच्या अवलोकनासाठी मराठी पुरुषांना उत्तर प्रदेशातील पत्त्यावर आळवणी करावी लागत असे! (स्वातंत्र्योत्तर काळापासून आजतागायत शाबूत असलेले ‘भय्यावलंबित्व’ हे त्याहीपूर्वीपासूनचे - म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे असल्याचा हा आणखी एक पुरावा!) 

याच काळातील आणखी एक जाहिरात आहे ‘काश्मिरी कोकशास्त्र’ या आणखी एका उपयोजित ग्रंथाची. जाहिरातीची काॅपी अगदी सविस्तर आणि सुरस प्रकारे लिहिण्यात आलेली आहे. 

‘सदगृहस्थहो, जर आपणास चांगली संतती व्हावयास पाहिजे असेल, गृहस्थाश्रमांतील सर्व सुखांचा उपयोग घ्यावयाचा असेल, वशीकरण मंत्र व त्याचे उपयोग समजून घेणे असेल, सुंदर, मनोहर व दिलखुष अशा रंगीत चित्रांसह ८४ आसनांची माहिती करून घेणे असेल, तर आमचेकडून पंडित महामंत्री , महाराजा काश्मीर विरचित सुप्रसिद्ध ‘कोकशास्त्र’ ताबडतोब मागवून ते वाचा. या ग्रंथात गर्भात मुलगा अगर मुलगी होणार, हे समजते. वांझपणावर इलाज, आपली स्त्री आज्ञाधारक व रूपवती देखील होईल, असे उपाय. नामर्दीवर उपाय, स्त्री-पुरुषांचे सर्व प्रकारचे गुप्तरोग व त्यांवरील रामबाण इलाज इत्यादी. याशिवाय अनेक प्रकारची उपयुक्त व सुंदर माहिती यांत दिलेली आहे. तिचे वर्णन करता येत नाही. एक प्रतीची किंमत फक्त तीन रुपये. पसंत न झाल्यास किंमत परत मिळेल. पत्रव्यवहार, निदान आपला व आमचा पत्ता तरी इंग्रजीत लिहावा.’

- रिसैण्ट बुकडेपो, ९५, लुधियाना (पंजाब)

घुुमान येथे २०१५ साली साहित्य संमेलन भरवून मराठी-पंजाबी संबंध दृढ करण्याचा घाट घालणाऱ्या आणि या संबंधांचे दृढीकरण आपल्यामुळेच झाल्याच्या भ्रमात वावरणाऱ्या आयोजकांना मराठी-पंजाबी संबंध अशा प्रकारे शंभरेक वर्षांपूर्वीपासून सुरू होता, याची माहिती खचितच नसावी! थोडक्यात, ही मोलाची माहिती इतर राज्यांतून येणार्‍या जाहिरातीद्वारे आणि पोस्टखात्याच्या प्रामाणिक कारभारामुळे मराठी जनतेपर्यंत पोहोचत होती.

काश्मीरी कोकशास्त्र म्हणजे उत्तर प्रदेशात छापल्या गेलेल्या ‘मराठी कोकशास्त्रा’ची वाढीव आवृत्ती असावी. कारण त्यात ८४ आसने असल्याची नोंद आहे. म्हणजे चार आसने अधिक. ही संभोगासने आचरणात आणण्यासाठी महिन्याभराच्या अचूक वेळापत्रकाची जबाबदारी दाम्पत्यांना पार पाडावी लागत असे. एकदा ते जमले म्हणजे सुखी जीवनासाठी मामला एकदम ‘चोख’. 

त्या काळातील ऐतिहासिक आणि पौराणिक नाटके, ऐतिहासिक विषयांच्या कथा-कादंबऱ्यांची नावे पाहिली तरी आजच्याप्रमाणेच शिवकाळाचे शोषण-पोषण समाजात जोरकसपणे चालले होते. अशा वातावरणात ‘उपयोजित विषया’चे भंडार असलेली पुस्तके छापण्याचे धाडस मराठी समुदायात होत नसावे आणि त्यामुळेच ती परराज्यांतून छापून राज्यात आणणे सोयीस्कर ठरत असावे. 

‘ललित’ मासिकाच्या मे २०११च्या अंकात शरद गोगटे यांनी ग्रंथगप्पा या आपल्या सदरात ‘अश्लील मार्तंडांची भूमिका’ हा कृष्णराव मराठे यांच्यावरील लेख लिहिला आहे. सप्टेंबर १९३१च्या ‘समाजस्वास्थ्य’च्या अंकात र.धों. कर्वे यांच्या ‘व्यभिचाराचा प्रश्न’ या लेखाने या मराठ्यांना पछाडले. तेव्हा मराठ्यांनी अश्लील साहित्याच्या विरोधात जे दंड थोपटले, ते त्यांच्या मरणापर्यंत. 

आता ‘समाजस्वास्थ्य’चे अंक सहजी पाहता येत असल्याने त्यांतला उत्तम आणि त्या काळासाठी अतिशय कुतूहलपूर्ण मजकूर पडताळता येतो. वात्स्यायनापासून काही ग्रंथांचे संदर्भ देत व्यभिचार हे पाप नव्हे या मतांचा रधोंनी प्रसार केला आहे. नवरा-बायकोतील शारीरिक संबंध हे परिपूर्ण सुखाचे असतीलच असे नाही, त्यापेक्षा वेश्यागमनात संगनमताने समागम होत असल्याने अधिक सुख मिळू शकते; पत्नीला नवऱ्याच्या तंबाखूपासून इतर अनेक व्यसनांच्या गलिच्छपणासह अनेक गोष्टी समागमात सहन कराव्या लागतात असेही लिहिले आहे. व्यभिचारातून होणारी मुलेदेखील इतर मुलांसारखीच होतात, त्यांच्यात कोणताही रक्तदोष नसतो. पुष्कळ वेळा अनौरस मुले अधिक चांगली ठरतात, असे मतप्रदर्शनही आहे. या सार्‍याचा परिणाम मराठ्यांनी ‘समाजस्वास्थ्या’वर थेट खटला भरण्यात झाला. 

(‘समाजस्वास्थ्य’चा शेवटचा अंक)

खटल्याची परिणिती १०० रुपये दंडात झाल्याची नोंद ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या ६ एप्रिल १९३२ सालच्या बातमीत सापडते. त्या बातमीचा मजकूर पुढे देत आहे : 

र.धों. कर्वे यांना दंड…मुंबई, ता. ६ : ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचे संपादक श्री र. धों. कर्वे यांना अश्लील लिखाणाबद्दल गिरगाव कोर्टात रुपये १०० दंड करण्यात आला. हा सर्व लेख वाचल्यास तो सार्वजनिक नीतितत्वांना अनिष्ट आहे. प्रस्तुत लेखात ‘व्यभिचार म्हणजे पाप नव्हे’ ही मध्यवर्ती कल्पना आहे व या तत्त्वाचे समर्थनासाठी आरोपीने लग्न ही भटांंचे मेंदूतील कल्पना आहे, असे सांगून विवाह संस्थेवर हल्ला चढवला आहे. सबंध लेख व त्यातील पॅरे सामाजिक नीतिबंधनापलीकडचे असून, त्यामुळे ज्यांच्या हातात ते पुस्तक पडेल त्यांच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणून आरोपीस दोषी ठरविण्यात येत आहे व एकंदर परिस्थितीचा विचार करून १०० रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. (सकाळ, ६.४.३२) 

(९० वर्षांनंतर या लेखाचा वाचणार्‍याच्या मनावर काय परिणाम होतो, होतो का हे तपासण्यासाठी ‘मेलडी खाव खुद जान जाव’ तत्त्वानुसार लेखाची ही लिंक.) 

लैंगिकतेवर शास्त्रीय आणि अभ्यासपूर्ण माहिती देणाऱ्या मासिकाबाबत आत्ता इतक्या विस्ताराने सांगण्याचा खटाटोप कशासाठी? सांगण्याचे कारण असे, की ती सारी मासिके थेट ‘डायजेस्ट’च्या आकाराची होती. 

कृष्णराव मराठे रधोंवर एकहाती हल्ले करत राहिले. मराठ्यांभोवती संस्कृतिरक्षकांचे एक मंडळच तयार झाले. आणि पुढील काळात खटले भरणे आणि ते जिंकणे हा अश्लीलमार्तंडांचा आनंदी जगण्याचा दिनक्रम बनला. 

शरद गोगटे यांच्या लेखात या विषयाबाबत काही महत्त्वाचे संदर्भ सापडतात. ते साधारणत: असे :  

१. १९३६ साली कवी मनमोहन यांनी माणिक दादरकर या टोपणनावाने लिहिलेल्या ‘झपुर्झा’ या कादंबरीवर खटला भरण्यात आला. 

२ ‘ब्रॅण्डीची बाटली’ या सिनेमातील स्वप्नदृश्याबद्दल केलेल्या तक्रारीनंतर कृष्णराव प्रकाशझोतात आले. त्यांच्या तक्रारीमुळे सिनेमातील १०४ फूट भाग कापावा लागला. 

३ आर. बी. राव या टोपणनावाने सुरेंद्र बारलिंगे यांनी लिहिलेल्या ‘क्रांतिपूजा’ या कादंबरीबद्दल आणि मर्ढेकरांच्या ‘काही कवितां’बद्दल तक्रार झाली. परिणामी या लेखनाच्या लेखक, मुद्रक, व प्रकाशक यांवर खटले भरले केले. मुद्रक-प्रकाशकांनी गुन्हा मान्य करून दंड भरले. मर्ढेकरही सुटले. आर. बी. राव हेच सुरेंद्र बारलिंगे असल्याचे मात्र सरकारला सिद्ध करता आले नाही. 

पुढे दोन दशके कृष्णराव मराठ्यांनी अश्लीलमार्तंड म्हणून राज्यभर हैदोस घातला. पण तरीही त्यांना चकवून एकापेक्षा एक शृंगारवस्ताद मासिके निघतच होती. त्यांच्यावर खटले भरले जात होते, तरीही त्यांच्या खपावर अजिबात परिणाम होत नसे. खप प्रचंड होत राहिला. 

गेल्या दोन-चार वर्षांपासून, म्हणजे रहस्यकथांचा प्रकल्प पूर्ण झाल्यापासून, मी ‘अश्लील’ साहित्य अथवा शृंगारसाहित्य देणाऱ्या मासिकांच्या जुन्या प्रती भरपूर किंमत मोजून जमवतो आहे. कारण ती गेल्या शतकभरातील समाजाची प्रकृती आणि विकृती समजून घेण्याची सर्वार्थांनी परिपूर्ण अशी साधने आहेत. अभिजन आणि बहुजन काय प्रकारचे शृंगारविचार करत होते, ते या मासिकांमधून समजते. 

नव्वदीच्या दशकापूर्वीपर्यंत या मासिकांचे अजब असे अर्थशास्त्र होते. सुभाष शहांच्या बेळगावी मासिकांनी यशस्वीरीत्या अश्लीलतेचा उद्योग लोकप्रिय केला असे मला पूर्वी वाटत असे. पण त्याआधी दशकभरापूर्वीच कोल्हापूरच्या ‘वैजयंती’ नावाच्या मासिकाने क्राऊन साईजमध्ये नग्नकथांचा उत्सव केल्याचा पुरावा सापडला. त्या मासिकावर १९६३ साली एक खटला होऊन संपादकांना ३०० रुपयांचा दंड आणि कारावासाची शिक्षाही झाली होती. त्याआधी १९४९पासून निघणाऱ्या ‘उन्माद’, ‘मस्ती’, आणि ‘रति’ या वासू मेहेंदळे यांच्या शृंगारमासिकांच्या भट्टीत चंद्रकांत काकोडकर नावाचा वाचकप्रिय लेखक उदयास आला. तरी ही १९४९ सालापासूनची, म्हणजे स्वातंत्र्यानंतरची गोष्ट. भारतात शृंगारमासिकांचा किंवा ‘अश्लील’ नियतकालिकांचा सुळसुळाट स्वातंत्र्यानंतर झाला असेल, असा माझा होरा होता. तोही चुकीचा असल्याचे काही महिन्यांपूर्वी कळले. पुण्यातील रस्ता-पुस्तकदालनातील धनंजय आठवले यांना पुण्यातील एका शतायुषी व्यक्तीच्या निधनानंतर त्या व्यक्तीने सुस्थितीत ठेवलेल्या मासिकांचे गठ्ठे मिळाले. त्यात ‘मस्ती’ आणि ‘उन्माद’ या वासू मेहेंदळे यांच्या मासिकांचे डायजेस्टी अंक होतेच. पण ‘सवाई जीवन’, ‘जीवन’, ‘यौवन’ या अंकांचादेखील खजिना होता. तो हाती लागल्यानंतर धनंजय आठवले यांनी सर्वांत आधी माझ्याशी संपर्क साधला. “तुमच्यासाठी सगळ्यात भारी साठा सापडलाय!” हा त्यांचा आनंद फोनवरूनही जाणवत होता. 

या ड़ायजेस्टी अंकांपैकी काही शुभ्र कागदावर तर काही लगदा कागदावर छापलेले असत. त्यांच्यावर स्वतंत्र पोस्ट करण्याचा इरादा आहे. त्यामुळे मी आत्ता अधिक तपशिलात जात नाही. पण थोडी त्रोटक माहिती देतो. 

१. लैंगिक विषयांची शास्त्रीय चर्चा करणारे मासिक ‘जीवन’ हे जानेवारी १९४१ साली सुरू झाले. ‘जगात परमेश्वर आणि लैंगिक भावनाच फक्त अमर आहेत.’ हे या मासिकाच्या उद्देशवाक्याचे उपघोषवाक्य आहे. जीवन-ज्योत प्रकाशन, मुंबई-४, खटाववाडी गिरगाव, हा त्याचा पत्ता आहे. र. य. वेलदे हे या मासिकाचे मालक आहेत; तर अनंत बाळकृष्ण भिडे हे संपादक, मुद्रक, आणि प्रकाशकदेखील. या मासिकाच्या नोव्हेंबर, १९४१च्या अंकात पुरुषांना नपुसंकत्व काय येते, उतारवयात लिंगशिथिलता का येते इत्यादी विषयांची मांडणी शरीरविज्ञानाच्या आधारे करणारे सचित्र लेख आहेत. संसारसुख अनुुभवायचे असल्यास एफ. एल, चेक पेसरीज, भोवऱ्याची पिचकारी (समागमानंतर लगेचच योनिमार्ग धुण्यासाठी), डुशसाठी वापरण्याचे औषध, रिंग पेसरी, हाॅडिस पेसरी जेलीज इत्यादी विकणाऱ्या, ‘व्ही. ए. पटेल आणि कंपनी, भरुचा बिल्डिंग, प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई २’ यांची उत्पादनांची पानभर जाहिरात आहे. एका नग्न ब्रिटिश तरुणीचे पाठमोरे आणि ‘पुढमोरे’ अनावृत छायाचित्र आहे. पण याच मासिकाच्या आधीच्या काही अंकांत मासिकाचा पत्ता ‘जीवनज्योत प्रकाशन, पुणे, सरितातरंग, जंगली महाराज रोड, पुणे, ५’ असा आहे. म्हणजे सुरू झाल्यापासून चारेक महिन्यांतच या मासिकाचा खप इतका वाढला, की कार्यालय मुंबईला हलवण्यात आले. मासिकाचे जाहिरात-दर पुढीलप्रमाणे - पूर्ण पानाला ३० रुपये, अर्धे पान १५ रुपये, आणि पाव पान ८ रुपये. सर्व प्रकारच्या जाहिराती अंकात असल्याने मासिक श्रीमंत होते. ‘कृष्णरावांची चुंबनकबुली’ या शीर्षकाचा एक लेख आहे. चुंबनाच्या भल्या-बुऱ्या परिणामांबद्दलचा. त्यात कृष्णरावांच्या एका भाषणातील उतारा दिला आहे  :

‘सौ. स्नेहप्रभा प्रधान (या मासिकांतून कृष्णरावांवर टीका करणाऱ्या असाव्यात) यांना वाटते, आम्हा सनातन्यांचा चुंबनावर कटाक्ष आहे. पण ती गोष्ट साफ खोटी आहे. सुधारकांप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षाही अधिक उत्साहाने आम्ही सनातनी चुंबनविलास करीत असतो. सनातन्यांना चुंबने नकोत असे मुळीच नाही. आमचा कटाक्ष चुंबनाचे प्रदर्शन चित्रपटांत करण्यावर आहे.’

२. ‘सवाई जीवन’ हे मासिक ‘जीवन’च्या वरताण किंवा खरोखरीच ‘सवाई’ आहे. याही मासिकाच्या अंकांच्या मुखपृष्ठांवर नग्न ब्रिटिश बायकांची छायाचित्रे आहेत. अनेक पृष्ठांमध्ये गोऱ्या नग्नलतिकांच्या ‘कॅण्डिड’ वगैरे फोटोग्राफीचा वापर केला आहे. मालकीहक्काबाबतचा तपशील देताना ‘हे मासिक संपादक, मुद्रक, व प्रकाशक पंडित जनार्दन कुलकर्णी यांनी श्रीशिवाजी प्रिंटिंग वर्क्स ४९५-९६ शनिवार, पुणे, २ येथे छापून ५६८, पुणे-२ येथे प्रसिद्ध केले.’, असे म्हटले आहे. या मासिकाचा पत्रव्यवहाराचा पत्ता बार्शीचा आहे. मासिकात जगातील लोकांच्या कामजीवनाविषयी माहिती आहे. तरणतलावाजवळच्या आणि बागेतल्या अनावृत ललनांचे आनंदी फोटो आहेत. वार्षिक तीन रुपये वर्गणी असलेल्या या अंकाच्या सरुवातीलाच म्हटले आहे, की ‘जगांत शालेय शिक्षणाइतकेच लैंगिक शिक्षणाला महत्त्व आहे.’ १९४२ साली हे मासिक ऐन भरात असल्याची खात्री त्यांच्या मजकुरावरून आणि छायाचित्रांवरून पटते. 

३ ‘यौैवन’ या याच काळातील मासिकाचा एकच अंक मला एका गठ्ठ्यात सापडला. कुमारी विलासिनी या अंकाच्या संपादक असल्याचे म्हटले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने काढली असावीत असे वाटायला लावणारी नग्न स्त्रियांची चित्रे अंकात आहेत. ‘विलासिनीची डायरी’ हे लैंगिक विषयांवर चर्चा करणारे दीर्घ सदर आहे. ‘कोर्टाच्या आवारात तरुणीवर बलात्कार’ असा बनावट बलात्कारांची माहिती देणारा लेखांक संपादिकेनेच लिहिला आहे. मलमूत्र सुरळीत करणारी औषधे, द्राक्षासवे, आणि तंदुरुस्तीकचे संरक्षण करणारे पाक इत्यादींच्या जाहिराती अंकात पान-पान भरून आहेत. या अंकाच्या मालकीहक्काचा तपशील इंग्रजीत छापण्यात आला आहे. ‘प्रभाकर आर्ट प्रिंटरी, ३७ काऊ लेन, गिरगाव, मुंबई, ४’ यांच्यासाठी व्ही. आर. प्रभू यांनी हे मासिक छापल्याचा तो तपशील आहे. अनेक महिने दोन फाॅर्मवर, म्हणजे ३२ पानांत, छापून येणाऱ्या अंकाचा पुढील महिन्यापासून लोकाग्रहास्तव विस्तार करत असल्याची छोटी जाहिरातदेखील आहे. ४८ पानांचा तो पुढला अंक मात्र मला त्या गठ्ठ्यात सापडला नाही. 

‘चले जाव’ चळवळ ऐन भरात असताना ही दोनहाती छापली जाणारी आणि एकहाती वाचली जाणारी मासिके गोऱ्या कपडेविरहित मडमांचे फोटो दाखवून मुक्तपणे लैंगिक शिक्षण देण्याचा आभास निर्माण करत होती. ‘चले जाव! कारण आम्ही तुमच्या बायका नग्नावस्थेत पाहतो.’ असला अघोरी आनंद यांच्या वाचकांना मिळत असेल काय? याची माहिती शतायुषी असलेला आणि जणू काही माझ्या अभ्यासासाठीच ही मासिके निगुतीने जपून ठेवणारा माणूसच देऊ शकला असता. 

ही मासिकेदेखील अभ्यासाच्या नावाखाली असलेले ‘पॉर्न साहित्य’च होते. ते गुप्तपणे बाळगणारे लोक आजच्या इंटरनेटवर पोर्न पाहणाऱ्या माणसांसारखेच लोक. मराठी अश्लील साहित्याचा माग काढायला गेलो, तर महाराष्ट्राच्या दांभिकतेचाच इतिहास समोर येत राहतो. ‘चले जाव’च्या काळाआधी ही लैंगिक वळवळ सुरू झाली, ती ‘डायजेस्टी’ आकाराच्या मासिकांमुळे. साऱ्यांच्या प्रेरणा या ‘समाजस्वास्थ्य’च्याच. पण आचरण मात्र त्यापुढले - नग्नता आणि कामवैचित्र्य विकण्याचे. ‘समाजस्वास्थ्य’चा  छोट्या पुस्तकासारखाच डायजेस्टी किंवा पाॅकेटबुकी आकार या मासिकांनी धारण केला. बंडी किंवा विजारीच्या खिशात सहज ठेवता येणे हे या आकाराचे वैशिष्ट्य. त्यामुळे ‘दांडग्या’ वाचनोत्सुकांना घरा-दारच्या माणसांपासून लपवून किंवा मोठ्या पुस्तकाच्या आत ठेवून त्याचे अवलोकन करणे सहजशक्य होत असावे. त्यामुळेच शृंगारमासिकांच्या संपादक-मालकांसह वाचकांनीदेखील या बुटक्या रचनेला मान्यता दिली असावी. पण पुढल्या दहाएक वर्षांत मात्र या डायजेस्टी मासिकांत पुष्कळ बदल झाले. ते तपासताना आणखी रंजक बाबी समोर आल्या. एका हौैशी संपादकाने त्याच्या मृत्यूपर्यंत उभारलेले यशस्वी मासिकांचे शिखर दिसले. 

३ सुप्रजननवेडकाळ अर्थात मासिकांचेही सुप्रजनन

जर्मनीतील हिटलरच्या वंशद्वेष्ट्या विचारसरणीचा आपल्या मराठी सुशिक्षित समाजावर किती पगडा होता, हे त्या काळातील मुख्यधारेसह डायजेस्टी मासिकांतून डोकावणार्‍या जाहिरातींवरून उमजू शकते. पंजाब आणि लुधियानामधून छापून आणून मराठी लोकांना रतिज्ञान पुरवण्याचे उद्योग यशस्वी होत होते. तेच काम करणाऱ्या दिल्लीतील एका प्रकाशनाने समागमाच्या ८४ आसनांच्या रंगीत पुस्तकखरेदीवर जपानी दुर्बीण किंवा टाॅर्च मोफत अशा अतिलोकोपयोगी वस्तूंच्या भेटीचे आकर्षण ठेवले होते. साधारणत: १९४० ते १९७०पर्यंत या सुप्रजननाच्या हिटलरी कल्पनांचा पगडा समाजावर होता. १९७०नंतरच्या युगात मात्र हिंदी चित्रपटगीतांनी वाटलेल्या ‘प्यार’युक्त संकल्पनांमुळे अधिकाधिक आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन मिळत गेले. नंतरच्या तीनेक दशकांत सुप्रजननाच्या सर्व कल्पना ‘गर्भसंस्कार’ नामे संमोहनाद्वारे समाजाला अंकित करत गेल्या, ती गोष्ट वेगळीच. 

साधारणत: १९५० ते १९८७ या कालावधीत मात्र मराठीत एका संपादकाने मासिकांचे सुप्रजनन करण्याचा आणि वाचकांना हर प्रकारे घडवण्याचा विडाच उचलला. तळागाळातील वाचकांना वाचते करण्याचा, त्यांना ज्ञानी बनविण्याचा, त्यांना माहितीपुष्ट बनवण्याचा उद्योग किती मोठा होता, याची कल्पना तो संपादक हयात असताना कुणालाच आली नाही हे आपले दुर्दैव.

‘विचित्र विश्व’ या मासिकाचे संपादक वासू मेहेंदळे (मेंधळे, मेंदळे असे काहीही संपादक या नावाखाली छापून येई.) यांनी राज्यभरातील वाचक आपल्या डायजेस्टी मासिकांच्या माध्यमातून घडवले. त्या प्रक्रियेचा आढावा घेण्याचे कुणाच्या मनात का आले नसावे? मराठीतील अस्सल ‘रीडर्स डायजेस्ट’ असलेले हे मासिक शहर आणि शहरगावांतील लोकांसाठी जणू तत्कालीन गूगल किंवा विकीपिडीया होते. जगभरातील माहिती आणून देणारे आणि तीही रंगवून, खुसखुशीतपणे मांडणारे हे मासिक कमीतकमी मुद्रणचुकांसह वाचायला मिळे. कारण संपादनाचा हात अर्थात एकट्या वासू मेहेंदळे यांचा असे. 

(वासू मेहेंदळे)

त्यांच्या ‘रम्यकथा’ या प्रकाशनाचे मराठीतील ‘पल्पी आणि गल्पी’ साहित्यातील योगदान हा खरोखरच एखाद्या संशोधनाचा विषय होऊ शकेल. १९५० ते १९६०च्या दशकात जेव्हा अश्लीलमार्तंड मराठे पुण्यात मासिकांवर खटल्यांवर खटले भरत होते, तेव्हा मेहेंदळेंनी ‘उन्माद’, ‘मस्ती’ आणि ‘रती’ अशी तीन शृंगार मासिके काढली. बाबूराव अर्नाळकर या सर्वाधिक खपाच्या रहस्यकथालेखकाची (अगदी सुरुवातीची काही पुस्तके वगळता इतर) सगळी पुस्तके याच प्रकाशनाने बाजारात जोरदारपणे खपवली. त्यांनी गडकरींचे संपूर्ण साहित्य छापले. ह. ना. आपटे, ना. ह. आपटे यांचे साहित्य जिवंत ठेवण्यामागे त्यांचीच संस्था होती. वि. वा. हडप यांची ऐतिहासिक कादंबरीमाला त्यांनीच प्रकाशित केली. ‘टारझन’ या जंगलनायकाच्या कथांचे अनुवाददेखील यांनीच छापले. 

या प्रकाशनाच्या लेखकफॅक्टरीतील गाजलेली आणखी नावे म्हणजे उद्धव शेळके आणि सदानंद भिडे. एका बैठकीत वाचून होतील अशा, एका वितीत मावणाऱ्या, लघु-आकाराच्या पाॅकिटबुक-साइज कादंबरीमालांमधून उद्धव शेळके सुरुवातीला लिहीत असत, ते ‘रम्यकथा’ प्रकाशनासाठी.

अशा डझनभर लेखकांचा मेहेंदळ्यांकडे राबता होता. जनसामान्यांसाठी नवलकथा, लहान मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी, आणि तरुण-तरुणींच्या भोगक्षमवयीन आनंदाकरता वेगळा लेखनसंसार. लहान मुलांची पुस्तके छापण्यासाठी सुंदर प्रकाशन, प्रौढांची शृंगार पुस्तके व लैंगिक शिक्षणावरची पुस्तके नवजीवन प्रकाशनाच्या माध्यमातून, तर कथा-कादंबऱ्या-रहस्यमाला-प्रणयकथामाला आणि इतर सारे रंजनपर साहित्य आणि मासिके रम्यकथा प्रकाशनाच्या मांडवाखालून, इतका प्रकाशनाचा अभूतपूर्व आवाका. सगळा खूपविक्या पुस्तकांचा मामला. या व्यवसायात मेहेंदळे काही दिवसांतच रुळले आणि दररोज एक कादंबरी वा पुस्तक आपल्या छापखान्यातून निघेल, अशी तजवीज करून ठेवली. 

१९५० ते १९७० या कालावधीमधील, आधी उल्लेखलेल्या लोकप्रिय पुस्तकांनाही विक्रीत मागे टाकणारी कोणती पुस्तके असावीत, याचा अंदाज मी लढवत होतो. पण त्याबद्दलचा एक तपशील मला त्यांच्या वीस वर्षांत प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधल्या जाहिरातींमधून कळला. 

त्या खूपविक्या डायजेस्टी-आकाराच्या पुस्तकांची माहिती पुढीलप्रमाणे :

१. जीवन-संयोग : लग्न कोणी करावे? केव्हा करावे? कसे करावे? वैवाहिक सुखाचा अत्त्युच्च क्षण कसा मिळवावा? वैवाहिक प्रेम अखंड कसे टिकवावे? कोणी कोणास पसंत करावे? कोणी कोणास नाकारावे? लैंगिक सौख्य कसे मिळवावे व दु:ख कसे टाळावे? थोडक्यात म्हणजे विवाह करू इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणीने १० वेळा अभ्यासावा असा, प्रेमकलेचा जणू ज्ञानकोशच असलेला हा संग्रह आपल्या संग्रही अवश्य ठेवा. अनेक आकृत्या आणि आकर्षक चित्रांसह. या पुस्तकाची पृष्ठसंख्या २००च्या वर असून किंमत ५ रुपये आणि टपाल खर्च आठ आणे आहे. लेखकाचे नाव जाहिरातीत सूक्ष्माक्षरांमध्ये ‘वामन राधाकृष्ण, बी. ए.’ असे लिहिलेले असून ते ‘मस्ती’ या मासिकाचे भूतपूर्व संपादक असल्याचे आणखी सूक्ष्म कंसात लिहिलेले आहे.

२. रंगेल रतिशास्त्र : कोकापंडिताच्या कोकशास्त्राचा हा सचित्र मराठी अनुवाद. लुधियाना आणि उत्तर प्रदेशातील छापखान्यांत छापून गब्बर बनलेल्यांवर कडी करनारा हा  हा खटाटोप असावा. यातदेखील ८४ चित्रे आहेत. साडेआठ रुपयांत घरपोच असा दावा रम्यकथा प्रकाशनाने १९७४ साली केला आहे. १९७४ साली या पुस्तकाची पाचवी आवृत्ती आली होती. म्हणजे साधारण पन्नास-साठच्या दरम्यान ‘रम्यकथा’ची पहिली लोकोपयोगी आवृत्ती आली असणार.

३. प्रेमात यशस्वी कसे व्हावे : प्रेमात पडलेल्यांना मार्गदर्शन करणारे एकमेव सचित्र सुंदर पुस्तक म्हणून याची जाहिरात देण्यात आलेली आहे. लेखकाचे नाव गुलदस्त्यातच. १९७४ साली हे पुस्तक दुसऱ्या आवृत्तीत विकले जात होते. त्या वेळी अमिताभ बच्चन या अभिनेत्याचा भारतीय चित्रपटसृष्टीत शिरकाव झाला होता. पण तोवर त्याचा ‘बच्चनसाब’ होणे बाकी होते. ‘प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?’ या नायकाने गाण्यातून्ह विचारलेल्या प्रश्नांना दोन दशके तरी उलटली होती. त्यामुळे मुलीदेखील मुलांच्या खांद्या खांदा लावून ‘दम मारो दम’ म्हणण्यासाठी सज्ज झाल्या होत्या.

४. विवाहितांचा वाटाड्या : अवीट गोडीच्या अजोड ग्रंथाची सातवी आवृत्ती सत्तरच्या दशकात सुरू होती. म्हणजे या सचित्र ग्रंथांनी चित्ररूपी पॉर्नचे काम अनेक वर्षे केले असणार.  शिवाय पुस्तकावर लेखिकेचे नाव सौ. भाग्यवती भारतकर असे आहे. (हे टोपणनाव असल्याचे तत्काळ कळते.) त्यामुळे ताई-माई-आक्का यांंनीही खुशाल हे पुस्तक वाचून आपला ज्ञानसाठा वाढवला असेल. सात रुपये (टपाल खर्च अधिक एक रुपया) अशी पुस्तकाची किंमत. नवविवाहितांना भेटी देण्यासाठी या पुस्तकाचा भरपूर वापर झाला असावा. 

५. प्रश्नोत्तररूप कामशास्त्र : आपल्या दांपत्यजीवनासंबंधीच्या अडचणी दूर करणारे एकमेव मार्गदर्शक असे या पुस्तकाचे स्वरूप असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आकर्षक दुर्मीळ चित्रे. म्हणजे हे त्या काळातील कामज्ञानवंतांचे ‘ओन्ली फाॅर फॅन्स’ प्रकरण असावे, अशी माझी खात्री आहे. साठ आणि सत्तरच्या दशकात वट्ट साडेआठ रुपये मोजून ‘रम्यकथा’चे चाहते या पुस्तकांवर उड्या मारत होते.

६. प्रणयाची कला : ‘सेक्सच विकले जाते’ हा फाॅर्म्युला मेहेंदळेंना उत्तम लक्षात आला होता. लैंगिक शिक्षणाचा मुलामा देऊन ते लोकांच्या पसंतीचा माल देऊ करत होते. आपण कामजीवनाचा अवीट आनंद चाहत असाल तर हे पुस्तक जरूर मागवा, असे जाहिरातील लिहिलेले आढळते. सुयोग्य चित्रांनी युक्त असलेल्या या ग्रंथराजाच्यादेखील आवृ्त्त्यांवर आवृत्त्या निघत होत्या. त्यादेखील केव्हा? तर मराठीतील उच्चभ्रू आणि अभिरुचीखोर थोडक्यांनी थोडक्यांसाठी काढलेले ‘सत्यकथा’ नावाचे, मासिक मुख्यधारेत मिरवले जात असताना.

७ विवाहितांचे कामशास्त्र : ‘विवाहितांचा वाटाड्या’च्या फार आधीचा हा ग्रंथ दिसत आहे. लेखक म्हणून ‘आर. एस. नाईक, एल. एल. बी’ असा उल्लेख असल्याने भाग्यवती भरतकर यांच्या पुस्तकापेक्षा हा ग्रंथ वेगळा असावा. १७६ पृष्ठे, एक डझनाहून अधिक चित्रे असणाऱ्या या पुस्तकाची किंमत १९५१ साली साडेपाच रुपये आहे.

या प्रकाशनाने आणखी कोणकोणत्या प्रकारचे ‘बेस्ट सेलर’ उद्योग केले, ते ‘रम्यकथे’चे मालक, संपादक आणि सर्वेसर्वा वासू मेहेंदळे यांनाच ठाऊक. ‘सिंदबादच्या सफरीं’चे ‘रम्यकथा’चे पुस्तक अनेकांनी लहानपणी वाचलेले असते. पण ते पुस्तक ‘श्यामा’ कादंबरीच्या खटल्यात अडकलेले असतानाच्या काळात चंद्रकांत काकोडकरांनी बालवाचकांसाठी लिहिले होते, याचा तपशील मात्र अनेकांच्या स्मृतीतून हरविलेला असतो. 

वासू मेहेंदळे या माणसावर विजय तरवडे यांनी काही वर्षांपूर्वी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये छोटेखानी आकाराचा एक लेख लिहिला आहे. त्या लेखावरून थोडासा तपशील आपल्याला उपलब्ध होतो. त्यापूर्वी इतकाही मजकूर कुणी लिहिला नव्हता, त्यामुळे या लेखाचे मोल अधिक. तरवडे यांच्या २०१८ सालच्या लेखातील तपशील पुढीलप्रमाणे : 

‘विचित्र विश्व हे माझे विशेष आवडते मासिक होते. त्याचे संपादक वासू मेहेंदळे होते. पण अंकाच्या मुखपृष्ठावर त्या नावाचा किंचित निराळा अपभ्रंश छापलेला असे. अंकाची कचेरी आणि मुद्रणालय माझ्या घराजवळच बुधवार पेठेतील तपकीर गल्लीमध्ये होते. मित्रवर्य श्री. श्याम घोमण यांनी मला एकदा ‘विचित्र विश्व’च्या संपादकांकडे नेले. मेहेंदळेसाहेब कामात ठार बुडालेले होते. बनियन आणि स्वच्छ तुमान या अनौपचारिक पोशाखात ते होते. चारी बाजूंना छपाई, बांधणी वगैरे कामे जोरात चालू होती. श्री घोमण यांनी ओळख करून दिल्यावर मानदेखील वर न करता म्हणाले, “सुवाच्च अक्षरात कागदाच्या एकाच बाजूला मजकूर लिहून आणा. मजकूर वाचनीय पाहिजे. आवडला तर छापतो. पर पेज दोन रुपये मानधन मिळेल.” शेजारच्या भिंतीवर त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक कादंबऱ्या होत्या. किमती अतिशय कमी. एक रुपयापासून तीन ते चार रुपये. खिशातले पैसे चाचपत ह. ना. आपटे आणि बाबूराव अर्नाळकरांच्या काही कादंबऱ्या मी उचलल्या. त्यांना पैसे विचारले तेव्हा ते उत्तरले, “मोफत घेऊन जा. लेखकांकडून पहिल्या वेळेस मी पैसे घेत नाही.” त्यांनीच प्रकाशित केलेले, विवाहितांना मार्गदर्शन करणारे एक पुस्तक तेव्हा सुपरहिट होते. फूटपाथवरचे विक्रेते ते पुस्तक पिवळ्या कव्हरमध्ये गुंडाळून छापील किमतीपेक्षा जास्त किंमत लावून विकत. आत्ता पुस्तकाचे साक्षात प्रकाशक समोर होते. पण त्यांना ते पुस्तक मागण्याचे धैर्य काही झाले नाही. अनेक वर्षांनी ते पुस्तक लकडी पुलावर दिसले. उचलून चाळले. त्यावर लेखकाचे नाव नव्हते. आता ते पुस्तक अगदीच निरुपद्रवी वाटले. मात्र डॉ. विठ्ठल प्रभू यांची निरामय कामजीवनावर लिहिलेली शास्त्रशुद्ध पुस्तके येण्याआधी मराठीत हा विषय हाताळण्याचा थोडा भाबडा प्रयत्न झाला होता इतकेच इथे सांगायचे आहे. मेहेंदळे यांच्यासाठी लेखन करण्याचा योग काही आला नाही. पुढे अनेक वर्षांनी त्यांचे चिरंजीव उमेश मेहेंदळे याने माझे एक पुस्तक प्रकाशित केले. श्री. मेहेंदळे फटकळ असले तरी दिलदारदेखील होते. मैत्रीला जागणारे असा त्यांचा लौकिक होता. अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या एका मित्राला मुंबईच्या आकाशवाणीवर नोकरीसाठी बोलावणे आले होते. पण त्याच्याकडे मुंबईला जाण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा मेहेंदळे यांनी त्याला सर्व सामानानिशी टांग्यात बसवून स्टेशनवर धाडले. नंतर स्वतःची सायकल एका सायकल-दुकानदाराला पंचवीस रुपयांना विकली. तिथूनच भाड्याची सायकल घेऊन ते पॅडल मारत स्टेशनवर गेले आणि मित्राला पंचवीस रुपये देऊन पायी-पायी घरी आले. पुढे तो मित्र राष्ट्रीय पातळीवरचा खूप मोठा कलाकार बनला, पण मेहेंदळ्यांची मैत्री विसरला. त्याने ते पंचवीस रुपयेदेखील परत केले नाहीत. हा सर्व अनुभव श्री. मेहेंदळे यांनी कटू भाषा न वापरता एका दिवाळी अंकात लिहिला आहे.’ 

तरवडे यांनी उल्लेख केलेला मेहेंदळे यांचा लेख ‘जगाच्या पाठीवर’ शोधून काढलात तरी मिळायचा नाही. ‘जगाच्या पाठीवर’ हे शब्द वापरण्याचे कारण? आकाशवाणीवर गेलेल्या आणि पुढे मोठा कलाकार झालेल्या, पण सायकल विकून आपल्यासाठी पैसे उभारणार्‍या मित्राला ‘जगाच्या पाठीवर’च्या लेखकाने अनुल्लेखाने मारले आहे. त्याचा अंदाज करता यावा म्हणून ते शब्द वापरले. असो. 

माहितीच्या शोधात मी वासुदेव मेहेंदळे यांच्या मुलापर्यंत पहिल्यांदा पोहोचलो, तो तरवडे यांच्या आधारेच. करोनाकाळानंतर आनंद साने या तरवडे यांच्या मित्राशी झाली, तेव्हा मी वासुदेव मेहेंदळे उर्फ वासू मेहेंदळे (मेंदळे) यांच्याबाबत आणखी माहिती करून घेतली. १९३८ ते १९४० या काळात एस. एस. सी. (अकरावी) करून वासू मेहेंदळे यांनी शनिपाराजवळ एक वाचनालय चालवायला घेतले होते. ते चालवता चालवता आपली वर्षभर केलेली नोकरी सोडून दिली. पुस्तकवाचनामुळे त्यांना स्वतःची पुस्तकेदेखील असावीत, अशी इच्छा झाली. एकाच वेळी ‘उन्माद’, ‘रति’ आणि ‘मस्ती’ अशी तीन मासिके त्यांनी काढली, पण पैकी एकावरही संपादक म्हणून त्यांचे नाव नव्हते. 

१९५१ सालचा ‘उन्माद’चा दिवाळी अंक हा मला पुण्याच्या धनंजय आठवले या दुर्मीळ पुस्तकांच्या विक्रेत्याकडून प्राप्त झालेला वासुदेव मेहेंदळे यांचा पहिला ऐवज. संपादक म्हणून त्यात ‘अकिंचन’ हे टोपणनाव दिले आहे. ‘विशुद्ध प्रणयकथांचे अंतर्बाह्य ढंगदार मासिक’ असे त्यावर मासिकाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. या घोषवाक्यात विशुद्ध जरी म्हटले असले, तरी त्याबद्दल लोकप्रतिक्रिया कशी असेल याची शाश्वती नसल्याने संपादक म्हणून टोपणनाव वापरण्यात आले असावे. मुद्रक आणि प्रकाशक व्ही. एस. मेहेंदळे म्हणून उल्लेख आहे. ‘अंधारी रात्र’ अशी वि. वि. बोकील यांची कथा आणि ‘जीवनाची ओढ’ ही काकोडकरांची कादंबरी ही या अंकाची खास वैशिष्ट्ये. ‘मस्ती’चे माजी संपादक असा उल्लेख एका बेस्टसेलर पुस्तकाविषयीच्या नोंदीत आपण ज्यांच्याविषयी पाहिला, त्या वामन राधाकृष्ण यांची ‘बद्रुद्दीनचे दुकान’ नावाची एक कथादेखील आहे. 

यातच मला ‘स्रियांचे गुप्तभेद’ या पुस्तकाची एकपानी जाहिरात सापडली. त्या काळातील ते सुपरहिट पुस्तक असावे. त्यात म्हटले आहे की, ‘कामशास्त्रात अगदी तज्ज्ञ आणि हुषारांतील अगदी हुषार पतीलाही माहिती नसतील अशा गोष्टी या पुस्तकात वाचा. आजवर आपण अनेक कोकशास्त्रे आणि कामशास्त्रे वाचली असतील, पण हे पुस्तक वाचल्याशिवाय आपल्याला यौवनाचा खरा आनंद कधीच प्राप्त होणार नाही. सुहागरात, ८४ आसनांची चित्रे, स्त्री पुरुषांतील संबंधांवर युरोप, आशिया आणि भारतातील बड्या बड्या पुरुषांचे अनुभव, प्राचीन काळापासून चालत आलेले भेद इतर अनेक गोष्टी सांगता येतील. वर्णन सर्व करणे सभ्यतेला सोडून होईल.’ १९५१ साली या पुस्तकाची किमत दोन रुपये बारा आणे आहे. दिल्ली, ६ या पत्त्यावरील फुलबंगश परिसरातील अमेरिकन ट्रेडिंग काॅर्पोरेशन ही कंपनी या पुस्तकाची प्रकाशक आहे. १९५२ सालच्या डिसेंबर महिन्यापर्यंत या पुस्तकाची किंमत चार रुपये चौदा आणे इथपर्यंत पोचली आहे. म्हणजे ते पुस्तक किती चांगले खपत असावे त्याचा अंदाज करता येईल. या चार रुपये चौदा आण्यांत जपानी दुर्बीण किंवा टाॅर्च पुस्तकासह मोफत मिळत होता. म्हणजेच त्या काळी ‘लंपन-फास्टर फेणे-बुकलवार’ जमातीची जी पोरे जपानी दुर्बीण अथवा टाॅर्च घेऊन भवतालात मिरवत होती, ती दर्दी वाचक आईवडिलांची पोरे होती, यात संशय नसावा! 

‘मस्ती’ नावाचे मासिक १९४९ सालापासून निघत होते. पहिल्या वर्षात याचे संपादक म्हणून व्यं. बा. पोतदार आणि कुमारी श्यामा अशी नावे दिली आहेत. मुद्रक-प्रकाशकांची नावे गैरहजर आहेत. कारण अर्थात अंकामध्ये आज अगदीच अतिसौम्य वाटावीत अशी काही अर्धनग्न स्त्रियांची चित्रे आहेत. सगळ्या माॅडेल्स नुसत्याच देशी नाहीत, तर अस्सल महाराष्ट्रीय आणि तगड्या सौंदर्याने लगडलेल्या. या मासिकाचे घोषवाक्य सुंदर आहे. ‘जीवनाच्या अत्यंत महत्वाच्या अंगाचे शास्त्रीय पद्धतीने तद्वतच हंसत खेळत ज्ञान देणारे नव्या महाराष्ट्राचे पुरोगामी मासिक’. 

उमेश मेहेंदळे यांच्याकडूनच व्यं. बा. पोतदार आणि कुमारी श्यामा यांचा तपशील कळला. व्यं. बा. पोतदार हे मेहेंदळे यांचे साडू, उमेश मेहेंदळे यांचे मामा. कुमारी श्यामा हे टोपणनाव. बाकी मजकुराच्या संपादनापासून मासिकाच्या बाळंतपणाची जबाबदारी वासू मेहेंदळे यांचीच. 

१९५२ ते १९५४च्या काळातच ‘रति’ या मासिकाचा जन्म झाला असावा. स्त्रीप्रश्नांवर, लैंगिक समस्यांवर चर्चा करणे या मासिकाचा उद्देश होता. स्नेहलता मेहेंदळे या वासुदेव यांच्या पत्नीचे नाव संपादक म्हणून त्या मासिकावर आहे. 

‘मस्ती’ हा डायजेस्ट आकारातून मोठ्या क्राऊन आकारातदेखील निघायला लागला. कारण अश्लीलतेविषयक जितका आरडाओरडा होत होता, तितक्या-तितक्या मोठ्या आकारातील सचित्र शृंगारमासिके बाजारात दाखल होत होती. मुंबई-पुणेच नाही, तर कोल्हापूर, बेळगाव येथील कामोद्योगी वर्ग त्यात श्रीमंत होत होता. त्यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली होती. मोरारजी देसाई मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री (१९५२ ते १९५६) असताना आणि त्यानंतरही पुढल्या दहा वर्षांत या साऱ्या मासिकांच्या विरोधात राहिले. १९६० ते १९६९ या संपूर्ण कालावधीत अश्लीलतेविरोधातील प्रकरणे न्यायालयात वाढत गेली. रिकामटेकड्या खटलेबाज मंडळींनी शृंगारमासिकांचा लैंगिक शिक्षण देण्याचा सरळ आणि आडमार्गाचा प्रवाह बंद करून टाकला. यात मेहेंदळे यांना आपल्या तीन मासिकांचा उद्योग थांबवावा लागला. पण त्यानंतर त्यांच्या ‘रम्यकथा’ प्रकाशनाने कात टाकली आणि ‘विचित्र विश्व’, ‘रम्यकथा’ आणि ‘ अजब विश्व ’ (भूत -अद्भुत गोष्टींचे मासिक) अशा तीन नव्या ज्ञानपौष्टिक मासिकांचा डोलारा त्यांनी उभारला, पैकी ‘विचित्र विश्व’ आणि ‘रम्यकथा’ ही मासिके अनेकांना परिचित असतील. ‘अजब विश्व’चा एकही अंक माझ्या हाती जुन्या बाजारातूनदेखील लागू शकलेला नाही.

४ विचित्र संपादकाचे विश्व अर्थात गूगलपूर्व जगाची खिडकी

‘सत्यकथा’ या उच्चभ्रू आणि प्रयोगशील मासिकाची अतिशय परमोच्च अवस्थेला असतानाची वर्गणीदार-संख्या होती १२६८. ऑगस्ट १९८२मध्ये त्या मासिकाचा मृत्यू झाला, तेव्हा एका महिन्यात विकल्या गेलेल्या प्रती होत्या १८७५. ‘सत्यकथे’मध्ये काही प्रमाणात जाहिरात येत असत. पण बंडखोर लेखकांनी, ‘सत्यकथे’ने नाकारलेल्या लेखकांनी आणि क्षमता नसलेल्या पण खार खाण्यात वाकबगार लेखकांनी ते मासिक निकालात काढले. नंतर प्रयोगशील कथा-कविता (स्त्री-टोपणनावे घेऊन लिहिलेल्या) आणि पाश्चात्य समीक्षापद्धती यांवर पोसलेल्या अतिअवजड धुरीणांनी त्या मासिकाची वाट लावली. अशा प्रकृतीच्या मासिकाचे जे व्हायचे होते तेच झाले, त्याकरता ऑगस्ट ८२चा कुमुहूर्त तेवढा शिल्लक राहिला. 

या काळात सामान्य आणि अतितळागाळातील वाचकांच्या ‘विचित्र विश्व’ मासिकाची वर्गणीदारसंख्या दोनेक हजार होती आणि दरमहा तीन ते चार हजारांच्या संख्येने तो खपत होता. शून्य जाहिराती आणि पानोपानी फक्त वाचकस्नेही मजकूर देऊन. आडगावातील शिक्षित, शहरांतील सुशिक्षित, आणि दुर्गम भागातील अर्धशिक्षित जगातही या मासिकाची थोरवी पोहोचली होती. खेड्यापाड्यांत पुरवून पुरवून मासिके वाचण्याच्या काळात एसटी स्टॅण्ड आणि रेल्वे स्थानकांवर ‘विचित्र विश्व’सह ‘रम्यकथा’ची इतर पुस्तकेही हमखास विकली जात. ‘विचित्र विश्व’ला कुणाचीच स्पर्धा नव्हती. देत असलेल्या मजकुराची वाचनीयता वासू मेहेंदळे यांंनी ठाकून-ठोकून घडवलेली असे. 

आधारित, रूपांतरित, नवीन लेखनाचा ओघवता स्रोत त्यांच्याकडे येत होता. त्यांचे लेखक हे खरे आधी वाचक असत. इंग्रजीतून व इतर भाषांतून सतत काहीबाही उत्तम वाचणारे, त्यावर रवंथ करून मग लिहिणारे असे ते लोक असत. त्यामुळे ‘रीडर्स डायजेस्ट’प्रमाणे वासू मेहेंदळे यांना लेखकांची फौज पगारावर बाळगावी लागली नाही. दोन रुपये छापील पानाला असा त्यांनी राज्यभरातील उत्तम लिहू शकणाऱ्या पण प्रसिद्ध नसलेल्या लेखकांसाठीच्या मानधनाचा आकडा ठरवून ठेवला. मग त्यांनी ‘इलेस्ट्रेटेड विकली’मधला मजकूर मराठी वाचकांसाठी संक्षिप्तात आणावा किंवा आणखी देशी-विदेशी मासिकांच्या वाचनातून तो उचलावा. मराठीत आल्यानंतर तो वाचकांच्या बु्द्धीला खाद्य देणारा हवा आणि मासिकाच्या नावाला शोभणारा असा त्याचा दर्जा असावा, हेच त्यांचे संपादकीय धोरण. ‘विचित्र विश्व’च्या आधीच्या आणि नंतरच्या सर्वच ‘डायजेस्टी’ मासिकांनी हाच फाॅर्म्युला वापरला. पण निव्वळ नग्न स्त्रियांची छायाचित्रे न छापताही तो लोकप्रिय करण्याचा हातखंडा फक्त वासू मेहेंदळे यांच्याकडेच होता. त्यांनी कधीच एखाद्या विषयाला वाहिलेला विशेषांक काढला नाही. ‘जे जे वाचायला उत्तम तेच’ मासिकात कोंबण्याचे कार्य जोमाने पार पाडले. या मासिकाच्या वाचकांनाही तेच हवे होते. एका चॅनलवरून दुसऱ्या भलत्याच विषयावरच्या चॅनलवर सर्फ करण्यासारखा हा प्रकार मेहेंदळे यांनी टीव्हीवरील उपग्रह वाहिन्यापूर्व काळात त्यांच्या मासिकातून मराठी वाचकांना दिला.

ऑक्टोबर १९७४चा ‘विचित्र विश्व’चा अंक माझ्याकडे आहे. त्यात श. के. सहस्रबुद्धे यांचा अद्ययावत माहितीने भरलेला पानभर लेख आहे ‘कृत्रिम मांस’ या विषयावरचा. त्यातले काही परिच्छेद इथे देतो : 

‘गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. एके वर्षी अमेरिकेत सोयाबीनचे खूप पीक आले. त्यामुळे सोयाबीनचे भाव उतरून छोट्या शेतकऱ्यांचे खूप हाल होऊ लागले. या अमाप सोयाबीनचे करायचे काय? एका शास्त्रज्ञाला या गरीब शेतकऱ्यांची कीव आली आणि त्याने सोयाबीनपासून कृत्रिम मांस करण्याचे प्रयत्न केले. महायुद्धात दारूगोळा बनविण्यासाठी सेल्यूलोज वनस्पतीजन्य तंतूची फार चणचण भासू लागली म्हणून शास्त्रज्ञांनी सोयाबीनपासून कृत्रिम तंतू बनविले. सोयाबीन स्वच्छ करून, वाटून, पाण्यांत कालवून, शेवयाच्या यंत्रातून त्याच्या लांब लांब तंतूमय शेवया बनवण्यात आल्या. याच शेवयांना चिवटपणा, रंग, चव, गोडी देऊन त्यापासून संशोधकांनी कृत्रिम मांस बनविले.’

नव्वदच्या दशकात भारतात ‘सोया चंक्स’चा घरगुती वापर वाढला. पूर्वी गव्हाच्या पिठात सोयाबीन मिसळून केल्या जाणाऱ्या चपात्या शरीरास उपकारक मानल्या जात. श. के, सहस्रबुद्धे यांनादेखील भारतात येत्या दोनच दशकांत सोया चंक्स लोकप्रिय होतील याचा अंदाज नसावा. पण आज आपल्या बऱ्याचशा अमेरिकी बनलेल्या खाद्यसंस्कृतीत खानावळप्रिय पण खानावळीत जेवणाऱ्यांच्या डोक्यात जाणारे खाद्य म्हणून सोयाबीन या कृत्रिम मांसाची नोंद झालेली आहे. 

त्या काळात चमत्कृतिपूर्ण वाटणाऱ्या या कृत्रिम मांसाच्या बातमीनंतर याच अंकात ‘रम्यकथा’ प्रकाशनाच्या आघाडीच्या एका लेखकाची कथाही आहे. ‘काळ आला होता, पण-’ असे तिचे नाव. सदानंद भिडे या लेखकाची ही भूतकथा आहे. (मेहेंदळे यांना वाटेल तेव्हा फिक्शन आणि वाटेल तेव्हा नाॅन फिक्शन. पण मजकुराचा प्रवाहीपणा इतका की वाचक फिक्शनही नाॅनफिक्शनप्रमाणे वाचेल आणि नाॅनफिक्शनही फिक्शनसारखेच. अगदी तंतोतंत.) या कथेत दोन भटकबहाद्दर मित्र एका मुर्दाड गावात येतात. खेडकर आणि बेडेकर ही त्यांची आडनावे. एका खानावळीत ते राहतात आणि गावात एका ओसाड हवेलीत भूत असल्याचा तपशील त्यांना कळतो. ते भूत एका सावकाराचे असते. दिवसा सोनाजी चांगभले आणि रात्री लाल्या लांडगे अशी नावे धारण करून गावागावांत लूट करणारा तो डाकू असतो. पोलिसांच्या हाती पडू नये म्हणून हा डाकू आत्महत्या करतो. त्यानंतर त्याच्या वाड्यात कुणालाही प्रवेश निषिद्धच. त्याच्या मृत्यूच्या क्षणापासून तो पोलिसांना त्रास देतो. कथानायक असलेल्या दोन मित्रांपैकी धीट मित्र रात्री गायाब होतो. तो हवेलीतच गेला असल्याचा ग्रह करून भित्रा तेथे पोहोचतो. तिकडे तो भूताच्या तावडीतून कसा बचावतो, त्याची ही कथा. आश्चर्य म्हणजे ‘शोले’ या चित्रपटातील जय-वीरूशी या नायकांचे साधर्म्य असले, तरी या कथानकात बसंती-ठाकूर नाही, प्रेमरस आणि विनोदरसही नाही. गब्बरसदृश लाल्या लांडगे आहे. पण वातावरणनिर्मिती मात्र पूर्णतः भयकारक आहे. ‘शोले’ १९७५ साली आला असला, तरी भिडे यांची सिनेमाच्या सहा-आठ महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेली कथा रंजकतेच्या बाबतीत ‘शोले’च्या जवळ जाताना दिसते. याच कथेखाली पानपूरक म्हणून एक मजकूर दिला आहे. ‘सगळेच आंधळे’ या शीर्षकाचा. प्रशांत महासागरात ‘टिल्टपक’ नावाचे एक बेट आहे. त्या बेटात राहणारे सर्वच लोक आंधळे आहेत. शेतीवाडी आणि पशुपालन करून ते आपला उदरनिर्वाह करतात. नव्याने जन्माला येणाऱ्या बालकांना सुरुवातीला डोळे असतात. पण हळूहळू त्यांना अंधत्व येत जाते. इतके असले, तरी येथे राहणारा एकही अंध माणूस हे बेट सोडून दुसरीकडे राहायला जाण्यास तयार होत नाही. प्राप्त स्थितीत ते खूप आनंदात आहेत.’ या लेखानंतर ‘बारा दिवसांत बांगलादेश मुक्त कसा झाला’ म्हणजेच ‘१९७१ सालचे भारत-पाक युद्ध’ यावर दि. बा. डोंगरे यांचा स्फूर्तिदायक लेख. या लेखानंतर लगेचच विचित्र विश्व मासिकातले महत्त्वाचे आणि सातत्याने सदर लिहिणाऱ्या प्राध्यापक रतनलाल डी. शहा नावाच्या लेखकाचे ‘दृष्टिआडची सृष्टी’ हे सदर आहे. ‘कैद्यांनी सांगितलेल्या गोष्टी’ आणि ‘न दिसणारे जग’ अशा अद्भुतरसाने भरलेल्या लेखणीतून निघालेली ही सदरे प्रचंड वाचकप्रिय होती. या लेखानंतर ‘मोहविद्येचा (हिप्नाॅटिझम) सैतानी उपयोग’ या शीर्षकाचा शरद विठ्ठल चेके या लेखकाचा लेख आहे. हिप्नाॅटिझमचा मानसविद्येसाठी वापर तेव्हा भारतात बहुधा होत नसावा, कारण चेके यांनी सारे तपशील परदेशातील दिले आहेत. यानंतरचा विषय ‘पाण्यातील प्रतिबिंब आणि भविष्यवाणी’ अशा विचित्र शीर्षकाचा. पुरुषोत्तम भन्साळी यांनी लिहिलेला. लेखाला आधार वाॅल्टर पिडगन या प्रसिद्ध अमेरिकी भविष्यकर्त्याचा. त्यांच्याच शब्दांत त्यांनी केलेले अनुभवकथन भन्साळी यांनी ‘विचित्र विश्व’च्या वाचकांसाठी मराठीत आणले आहे. या लेखाचा आकार मोठा होता. त्यामुळे पानपूरकाला जागा कमी. मग ‘एस्किमो लोकांना रक्तदाबाचा विकार होत नाही. कारण त्यांच्या जेवणात ते मिठाचा अजिबात वापर करीत नाहीत.’ इतकाच दीड वाक्याचा माहिती-ऐवज देण्यात आला आहे. 

शि. शं. कार्लेकर यांची ‘कथा ही सर्कस बहादरांची’ मालिका या मासिकात दोन वर्षे चालली आणि याचे पुस्तकही झाले. या मालिकेतील पुढला लेख हा ‘भालाबहाद्दर भीमसिंह राठोड’ याच्यावरचा. आठ-दहा पाने चालणारा असा. ‘दृष्टिआडची सृष्टी’ या सदरात गतजन्माच्या स्मृतीत अडकलेल्या माणसांच्या गोष्टी आहेत. अतर्क्य आणि विज्ञानाला चकवणाऱ्या कहाण्या. या लेखाच्या खाली उतिशय उल्लेखनीय पानपूरक वसंत डोळस यांनी दिला आहे. आजच्या १९७४ सालातील तुलनेने अतिशय कंटाळवाण्या स्थितीत आयुष्य जगणाऱ्या माणसाविषयीचा :

‘तुम्ही ७० वर्षे जगलात तर त्यांपैकी २० वर्षे झोपेत गेलेली आढळतील. दर वर्षी आरशात बघण्यात तुमचे ३० तास व तोंड पुसण्यात चार तास खर्च होतात. दररोज २३०४० वेळा श्वासोच्छवास करून ४३८ घनफूट हवा आपण शरीरात घेत असतो. ४० वर्षे वयाची उलटल्यावर दर दहा वर्षांत पाच इंचाने मनुष्याची उंची कमी होत जाते.’ 

२००० ते २०२५ सालापर्यंत माणसांनी मोबाइलवर फुकट घालवलेल्या वेळेचे मोजमाप या डोळसांनी केले असते, तर बेरजा करताना त्यांना बहुधा अंधत्व आले असते. वसंत डोळस यांच्या या लेखानंतरचे पानपूरक अमेरिकेतील ॲस्पिरीन या गोळ्यांचा खप दरसाल ६००० टन इतका असल्याचे सांगणारे आहे.

वि. के. फडके हे तेव्हाचे आणखी एक बेस्टसेलर लेखक. व्रतवैकल्यांच्या त्यांच्या एका पुस्तकाची चोविसावी आवृत्ती बाजारात विकली जात आहे. प्रत्येक आवृत्ती किमान पाच हजार प्रतींची. पुण्यात सरकारी अधिकारी असलेल्या या व्यक्तीला लेखनाची हौस. अद्भुतरम्य, भूतयोनीशी संबंधित अनुभवांची पोतडी असलेल्या लोकांना बोलते करून, त्यांच्याकडील माहितीचा अभ्यास करून फडके यांनी लेखन केले. त्यांचा लेखनारंभ ‘विचित्र विश्व’मधूनच झाला

‘पशुपक्ष्यांची स्मरणशक्ती’ हा डाॅ .एस. के. कल्याणसुूंदरम या लेखकाचा अंबादास सी. बागूल यांनी अनुवादित केलेला लेख आहे. पुढे बी. प्रमोदकुमार या लेखकाचा अतिशय माहितीपूर्ण असा ‘तो दिवस जगाच्या प्रलयाचा होता काय?’ हा लेख आहे. १९ मे १७८० रोजी अमेरिकेतील कनेक्टिकट प्रांतात दिवसा अचानक अंधार पडला. दुपार अंधारातच गेली आणि लोक भेदरले. प्रार्थनामंदिरात बसून राहिले. त्या दिवशी नक्की काय घडले याचे कोडे पुढली दोन-तीन शतके संशोधक, शास्त्रज्ञांना सोडवता आले नाही, याची ती कहाणी. मी तातडीने गुगल करून या ऐतिहासिक घटनेचा मागोवा घेतला. त्या दिवसाविषयीच्या चित्रफितीमध्ये जे वर्ण आज सापडते, त्याच्या कैक पटींनी आकर्षक वर्णन बी. प्रमोद यांनी ‘विचित्र विश्व’च्या वाचकांना १९७४ साली करून दिले होते. ही क्लिप १९२३ सालातल्या घटनेविषयीची आहे. ती पाहिल्यानंतर ‘विचित्र विश्व’मधल्या अशा आंतरराष्ट्रीय घटनांचे तथ्य तपासण्याचा नाद मला काही काळ लागला होता. जेव्हा इंटरनेट नव्हते, तेव्हा हा मजकूर वाचून लोक किती थक्क झाले असतील? (ही ती फीत.)

यानंतर जागतिक फुटबाॅल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणार्‍या पश्चिम जर्मनी संघाच्या कामगिरीचा संस्मरणीय वृत्तान्त अनिल दांडेकर या लेखकाने दिला आहे. हा इतका विस्तृत वृत्तान्त आहे की अंतिम सामन्यासाठी हजार रुपयांच्या तिकिटाचा काळाबाजार कसा करण्यात आला, त्याचेही बारीकसारीक तपशील आहेत. ‘अद्भुत भारत’ या पुढील एका सदरात अनंत हरोलीकर यांनी त्र्यंबकेश्वरची अ-चित्र माहिती दिली आहे. या तीन पानांच्या लेखाला पानपूरक मजकूर आहे, ‘कबूतर एका खेपेस दोन अंडी देते. त्यात हमखास एक नर आणि एक मादी निघते.’ असा. यानंतर मनोहर दातार यांच्या ‘हंटरच्या शिकारकथा’ या सदरातील सतरावा लेखांक आहे. त्याचेही पुस्तक झाल्याचे आठवते. या लेखानंतर ‘विचित्र वसुंधरा’ या सदरात तीन-चार पानांत जगभरात घडलेल्या विचित्र बातम्यांच्या नोंदी आहेत. त्या पानपूरकांपेक्षा मोठ्या आहेत. त्यांतले वैचित्र्यदेखील अजब-गजबच आहे. पैसा-अनर्थाचे मूळ, इस्पितळ तुटवडा, सुस्थितीतील प्राचीन प्रेते, पिकासोची कलाकृती, झटपट तंबू, केवळ दातांसाठी… अशी काही त्यांची शीर्षके आठवतात. 

एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी संबंध नाही असा प्रकार पूर्ण अंकात केलेला. बहुदा दिवाळी सोडून कधीच कुठल्याही विषयाला वाहिलेला अंक नाही, असा वासू मेहेंदळ्यांचा शिरस्ता असावा. भूतयोनीचे अस्तित्व, पळालेले कैदी, तुळशीचे महत्त्व, टक्कल कसे पडते, विशिष्ट काच घासून केस उगवण्याचा प्रयोग अमेरिकेत कसा यशस्वी झाला, एचएमव्हीचा नशीबवान नीपर कुत्रा त्याच्या मुद्राचिन्हात कसा काय आला…  अशा अनंत विषयांवर फक्त वाचून ज्ञान कसे मिळवाल, हे मराठी वाचकांना यशस्वीपणे सांगणारा मेहेंदळे यांचा संपादनप्रयोग म्हणजे हे मासिक आहे. 

महिन्याच्या महिन्याला लेखक तिथे लेख पाठवत होते, मेहेंदळे मजकूर तपासत होते आणि छपाईला सोडत होते. पानाला दोन रुपये मानधन लेखकांना पाठवले जात होते. या मासिकाला संपादकीय विभाग, उपसंपादक, मुद्रितशोधक अशी पारंपरिक कर्मचारी साखळी नव्हती. एकखांबी, एकतंबू म्हणजे वासुदेव मेहेंदळे. तोच संपादक, तोच उपसंपादक, तोच मुद्रितशोधक. छपाईनंतर गठ्ठे बांधायला व पार्सले रवाना करायलाही मेहेंदळेच. हेही त्यांच्या आर्थिक यशाचे रहस्य असेल काय? 

इतक्या हौैशीने निघालेली मासिके फार तर चार-पाच वर्षे टिकतात. ती आर्थिक खपाची ठरत नाहीत. ‘विचित्र विश्व’चा दिवाळी अंक मात्र सात ते आठ हजार प्रतींचा निघत असे, ही मेहेंदळे यांच्या मुलाने दिलेली माहितीदेखील मला थोर वाटली हा अंक चोवीस-पंचवीस वर्षे - म्हणजे वासू मेहेंदळे यांना १९८७ साली पक्षाघाताने मृत्यू येईपर्यंत सुरळीत चालत होता. १९८८ साली तो बंद झाला. तेव्हाही त्याचे वाचक गावोगाव होते, वर्गणीदारांची संख्याही कमी नव्हती. पण एकहाती अंक चालवणारा खंदा संपादक मात्र उरला नाही, हेच ‘विचित्र विश्व’ बंद होण्यामागचे एकमेव कारण होते. पुण्यातील साहित्यवर्तुळामध्ये कदाचित वासू मेहेंदळे यांचा दबदबा असेलही. पण आपल्या हयातीत त्यांनी स्वत:च्या छबीची आणि वैयक्तिक तपशिलांची अंकातून कदापि जाहिरात केली नाही. 

त्यांच्या मुलाकडून मला आणखी एक अद्भुत गोष्ट कळली. ती म्हणजे त्यांच्या देशप्रेमाची. 

१९७१ सालामधील भारत-पाक युद्धात लढलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांकरता ‘रम्यकथा’ प्रकाशनाने दोन लाख पुस्तके सीमेवर पाठवली होती. त्यावर लष्कराने आभाराचे जे पत्र त्यांना पाठवले होते, ते उमेश मेहेंदळे यांनी मला दाखवले. मराठीतल्याच काय, पण भारतातीलदेखील कोणत्याही प्रकाशकाला दोन लाख पुस्तके सैन्यासाठी पाठवण्याचे सुचले होते? असे दुसरे उदाहरण देता येईल काय? समजा १९७१ साली दोन रुपयांना एक पुस्तक पडत असेल, असे धरले, तर सुमारे तीन ते चार लाख रुपयांची पुस्तके दान करण्याचे औदार्य तेव्हा कुठल्या संपादकाने दाखवले होते?

लगदा कागदावर मासिके काढणाऱ्या, दररोज एक नवे पुस्तक आपल्या प्रेसमधून छपाई होऊन निघावे असा आग्रह धरणाऱ्या, आणि तळागाळात वाचनसंस्कृती रुजवू पाहणाऱ्या या संपादकाचे कार्य खरेच मोठे होते.

‘विक्रम-वेताळा’तील वेताळाची कथा, सावंतवाडीचा ढाण्या वाघ, अमेरिकेतील दंतवैद्य, पावशा आणि खाटिक, राजस्थानची शीतळामाता, भूतांची वसतिस्थाने, विमानातील इंधन संपण्याचा ब्रह्मघोटाळा, फुटबाॅलचा जादूगार पेले, तबालानवाज तिरखवा, बुल फायटिंग एक प्राणघातक कला, सॅव्होचे नरभक्षक सिंह, अत्यंविधी-अंत्यसंस्कार असे एकमेकांशी विसंगत पण कमालीच्या वाचनीय मजकुरांचे लेखच्या लेख माझ्या डोक्यात गोंदले गेले आहेत. रमेश भारताल आणि श्रीनिवास वैद्य यांची सुंदर मुखपृष्ठेदेखील. 

भारतातील पहिल्या महिला मल्ल हमीदा बानू यांच्यावरचा एक लेख या मासिकात वाचला. या हमीदा बानू यांची आज गुगलवर मिळणार नाही इतकी माहिती त्या लेखात होती. या बानू आपल्या आयुष्याच्या उतारवयात कल्याणमध्ये वास्तव्यास होत्या. ‘विचित्र विश्व’साठी कल्याणमधील माणसानेच आठ ते दहा पानांचे सछायाचित्र असे रिपोर्ताजरूपी लेखन केले होते. फोटोंचा दर्जा लगदा कागदावर फारच वाईट दिसत होता, पण लेख खणखणीत होता. या हमीदा बानूंवर गुगलने ४ मे २०२४ रोजी डुडल केले होते. पण त्यांच्या तपशिलात खरोखरीच ‘विचित्र विश्व’मधील लेखात होती, त्याच्या निम्मीदेखील माहिती नव्हती. तो लेख इंग्रजीत अनुवादित करावा इतकी त्या आठ-दहा पानांची गुणवत्ता होती. असे ‘विचित्र विश्व’मधील कित्येक लेखांबद्दल म्हणता येईल.

(हमीदा बानू यांचे छायाचित्र, इंटरनेटवरून)

या मासिकाला संपादकीय मंडळ नव्हते, संदर्भ विभाग नव्हता. ते मासिक जतन करून ठेवण्याची कुणाला कधी गरज पडली नाही. गेल्या दहा वर्षांत दुर्मीळ पुस्तकांच्या बाजारातच मला त्याचे अंक भरपूर पैसे टाकून मिळवावे लागले. (या मजकुराच्या प्रसिद्धीनंतर माझ्यासाठी ते अधिक अप्राप्यदेखील होऊ शकतील!‍) 

५ इतर डायजेस्ट अर्थात वाचकांनी नाकारलेली फौज

साधारणतः १९६०नंतरच मराठी माहितीपूर्ण डायजेस्टांची निर्मिती झाली. प्रत्येकाची प्रेरणा ‘रीडर्स डायजेस्ट’ हे मासिक, त्याचा खप आणि त्यातून मिळणारा नफा आदी गोष्टी असल्या तरीही संपादकांना-लेखकांना असलेली चूषदेखील या उद्योगाला कारणीभूत ठरली असावी.

१९६० सालाच्या दरम्यान मुंबईतून ‘संजय’ हे डायजेस्ट निघत असे. ‘उच्च अभिरुचीच्या सुसंस्कृत वाचकांचे आवडते मासिक’ असे त्यांनी स्वत:चे घोषवाक्य तयार केले. मा. पा. शिखरे या मासिकाचे संपादक होते. मुद्रक प्रकाशक दि. मु. नाडकर्णी, बी. ए. यांनी पुरुषोत्तम बिल्डिंग ऑपेरा हाऊस, मुंबई, ४ येथून हे डायजेस्ट सुरू केले होते. अंकात बऱ्यापैकी जाहिराती होत्या. मजकुराचे स्वरूप सेमी’विचित्र विश्व’ असल्यासारखे. उमर खय्यामवरील सुमती क्षेत्रमाडे यांच्या लेखापासून नोव्हेंबर १९६०च्या अंकाला सुरुवात झाली आहे. भर्तृहरीच्या शृंगारनायिका, काश्मिरी स्त्रिया आणि मुले यांच्यावर सचित्र रिपोर्ताज, फलज्योतिषाची कार्यकारणमीमांसा, संस्कृत साहित्यातील विरहिणी, दुनियेतील विचित्र व्यक्ती, उद्बोधक चित्रकथा, जिगर मुरादाबादी या शायरावर शब्दबंबाळ मृत्युलेख, आणि पानपूरके नसलेला काही बोजड तर काही विद्वत्ताप्रचुर लेखनाचा या अंकात समावेश आहे. या ‘संजय’चा आणखी एक अंक मिळाला. त्याचेदेखील स्वरूप तसेच. पण ‘मुंबईतील जुनी ठाणी व लेणी’ ही म. भा. नाडकर्णी यांची उत्तम लेखमाला सापडली. त्यात त्यांनी माझगाववर लिहिले आहे आणि म्हातारपाखाडी या बऱ्याचशा मुंबईकरांनादेखील अज्ञात असलेल्या भागाविषयीही लिहिले आहे. दि. पु. चित्रे आणि भाऊ पाध्ये यांच्या कथनात्मक साहित्यात या म्हातारपाखाडीचा उल्लेख आहे. वालपाखाडीनंतर मी या म्हातारपाखाडीचा शोध घेत होतो. माझगाव डाॅक स्टेशनापासून जवळ असलेल्या या भागाने आपले जुनेपण अद्याप जपलेले आहे. त्याविषयीचा तपशील या लेखातून मिळाला. ‘ना तुला ना मला’ नावाची एक रोमहर्षक रहस्यपूर्ण कथा दिली आहे द. ज. परांजपे यांची.

यातील व्यंगचित्रांतूनदेखील सरकारी धोरणांचा आणि सरकारनिष्ठेचा भाग जाणवतो.

‘आपले स्वातंत्र्य धोक्यात आहे, सर्व शक्तीनिशी त्याचे रक्षण करा- जवाहरलाल नेहरू’

या चौकटीपुढे एक अनाकलनीय चित्र आहे. त्या खाली चौकटीत माहिती आहे.

उत्पादन वाढवा, व्यय कमी करा

विकासकार्यापासून मिळणाऱ्या फळांवर पहिला हक्क देशरक्षणाचा पोहोचतो. आपण उत्पादन वाढवून व व्यय कमी करून जास्तीत जास्त साधनसामुग्री संरक्षणकार्यासाठी उपलब्ध करावी. त्यामुळे किमतीही काबूत ठेवता येतील. उधळपट्टी व अपव्यय कटाक्षाने टाळा.

आता ही जाहिरात आहे, व्यंगचित्र आहे, की जनहितार्थ संदेश आहे, याची कल्पना येत नाही, पण दुसरी एक सरकारी जाहिरात मला सापडली. १ ऑक्टोबर १९६०पासून मेट्रिक वजनेच कशी वापरली पाहिजेत आणि देशभरात कुठल्या राज्यात कुठल्या जिल्ह्यांत त्याची अंमलबजावणी व्हावी याचे सरकारी पत्रकच ‘संजय’ डायजेस्टमध्ये छापून आले आहे. स्वत:ला ‘उच्च अभिरूचीच्या सुसंस्कृत वाचकांचे आवडते मासिक’ ठरवल्यामुळे असेल किंवा आणखी काही कारणे असतील, पण हे मासिक काही फार काळ तगू शकले नसावे.

नाशिकमधील वर्टी काॅलनी येथून १९६१ सालापासून विनोदी लेखक अ. वा. वर्टी यांचे ‘श्रीयुत’ हे मासिक निघत असे, हे त्याचे दोन-चार अंक पाहिल्यानंतर मला उमजले. कोल्हापूरच्या चाँद बुकस्टोर्सच्या इक्बाल लाड यांनी ही मासिके माझ्या संग्रहासाठी खास राखून ठेवली होती. ‘ज्ञान आणि विनोद’ हे या डायजेस्ट मासिकाचे उद्दिष्ट मुखपृष्ठावरच पाहायला मिळते. पुढे वर्टी हे ‘अमृत’ मासिकासाठी ओळखले जाऊ लागले असले, तरी दोन-तीन वर्षेतरी हे मासिक त्यांनी निष्ठेने चालवल्याचे संदर्भ हाती लागतात. वार्षिक वर्गणीचे दर भारतासाठी १० रुपये, तर परदेशासाठी १२ रुपये २५ पैसे इतके आहेत. याचा अर्थ ‘श्रीयुत’चे अंक हे काही प्रमाणात तरी परदेशात जात असावेत. हलकाफुलका विनोद, चुटके, माहितीपूर्ण लेखांचा मारा, अमेरिकेतील बादशाही, संगीत आणि गवई, भुताटकी, नटनट्या आणि फूटपट्ट्या, आपले मुके मित्र - टाॅम, विठू, काळ्या, बंड्या… अशी या मासिकाची, आबालवृद्धांना आवडेलशी कौटुंबिक रचना आहे. कुठलाच लेख अग्रेसर नाही, संस्कारी आणि संयत वाटांवरून दिलेली माहिती अंकात आहे. शेवटी ‘सानेगुरुजींच्या आठवणी’ असाही एक लेख आहे, यावरून मासिकाच्या एकंदर सुराची कल्पना यावी. ‘अमृत’, ‘नवनीत’ या मासिकांचे स्वरूपही नंतर बरेचसे असेच राहिले. पण ‘अमृत’ विषयांबाबत आणि लेखांबाबत ‘विचित्र विश्व’च्या जवळ जाणारा मजकूर देत होते.

पण ज्ञानपोया असलेल्या सगळ्याच -डायजेस्टी व मोठ्या आकारातीलही - मासिकांचा डोलारा उपग्रह वाहिन्या आल्यानंतर कोसळला. पुण्यातील आनंद साने या लेखकाने ‘सर्वज्ञानी’ नावाचे डायजेस्टी मासिक काढले. त्यात निरंजन घाटे आपल्या बायलाईनसह तीन-चार टोपणनावांनी लिहीत. आनंद सानेदेखील दोन-तीन टोपणनावांनी लिहीत. हे दोघेही लिहिते आणि वाचते लेखक असल्याने दर्जेदार मजकुराची जमवाजमव अवघड नसे. पहिल्यांदा दहा-पंधरा वर्षे, मग पुन्हा एका दशकाचा विश्राम घेऊन हे ‘सर्वज्ञानी’ मासिक आनंद साने यांनी बंद केले. त्यातून घाटे आणि वि. के. फडके यांची बरीच पुस्तकेदेखील झाली. मृत्यूपर्यंत फडके ‘सर्वज्ञानी’ मासिकात वैविध्यपूर्ण विषयांवर मजकूर देत राहिले.

किर्लोस्कर प्रकाशनाचे ‘अपू्र्व’ हे मासिक अगदी वर्षाच्या आत कोसळले. त्यानंतर नाव असलेल्या-नसलेल्या, वाचकांपर्यंत पोहोचलेल्या किंवा बिलकुल न पोहोचलेल्या प्रकाशकांकडून अनेक ‘डायजेस्ट’ मासिके येऊन पुढे बंद पडत राहिली. १९९० सालानंतर काही पॉर्नोद्योगी डायजेस्टदेखील सुरू झाली. अंधेरीवरून निघणारे ‘लाॅलीपाॅप’ हे त्यातलेच. ते किती काळ चालले आणि कधी बंद झाले याचा तपशील मात्र नाही. 

‘रीडर्स डायजेस्ट’ने काही महिन्यांसाठी मराठी आवृत्ती काढून पाहिली. मराठी वाचकांना अल्पावधीत ओळखून त्यांनी ते खूळ बंद केले असावे. पण त्यांची ती चूष आज पुराव्यासाठीदेखील उपलब्ध नाही.

एकट्या ‘विचित्र विश्व’ने जितके वैविध्य दिले, तितके वैविध्य नंतर कुणालाच न देता आल्याने, वाचक कमी होत गेल्याने, आर्थिक तोटे वाढत गेल्याने, किंवा इतर कारणांचे निमित्त होऊन ही ‘डायजेस्टी’ परंपरा बंद झाली. या कारणांपैकी मला ठळक जाणवणारा मुद्दा म्हणजे वैविध्याचा. ‘विचित्र विश्व’ मासिकात उजव्या, डाव्या, आणि मधल्या विचारसरणीचे लेख आणि लेखक गुण्यागोविंदाने नांदत होते. उच्चभ्रू व्यासपीठांवर वावरणार्‍या आणि पल्पमध्ये लिहिणाऱ्या लेखकांचा त्यात सारखाच राबता होता. ‘तमस’ मालिका प्रसारित केल्याबद्दल आगपाखड करत विशिष्ट विचारसरणीचा त्वेषाने प्रसार करणारा लेख ‘विचित्र विश्व’मध्ये बिनधास्त छापण्यात आला होता. त्यात लाहोरमधून पुण्यात आलेल्या माणसाने सांगितलेल्या गोष्टी होत्या. त्या वाचून खवळण्याची इच्छा लेखकालादेखील नसेल अन् संपादकालाही. पुढल्या काही पानांतच वैज्ञानिक दृष्टिकोनातून उदारमतवादी विचारांच्या प्रदेशातील लोकांची जीवनशैली कथन करण्यात आली होती. लेखकांच्या नावा-आडनावावरूनदेखील हे लक्षात येते, की वासू मेहेंदळे यांना ‘विचित्र विश्व’मध्ये चांगला मजकूर हवा होता. नाव प्रसिद्ध की अप्रसिद्ध याच्याशी देणेघेणे नव्हते. त्या मासिकाच्या यशाचे हेच रहस्य असावे काय? इतर मासिकांना ते समीकरण कळलेच नसेल काय? विचारसरणीला महत्त्व येण्याच्या आणि तिचे केवळ दोनच कप्पे तयार होण्याच्या पुढील काळात अशा प्रकारच्या वैविध्यपूर्ण मासिकांना जागा उरली नसेल काय? 

वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंतच्या सर्वसामान्य मराठी वाचकाला ‘मार्मिक’, ‘चित्रलेखा’, ‘साप्ताहिक सकाळ’, ‘लोकप्रभा’ इत्यादी साप्ताहिके सवयीची होती. ‘मार्मिक’चा वापर शिवसेनेचे मुखपत्र म्हणून झाला असला, तरी त्यांतली व्यंगचित्रे अतिशय लोकप्रिय होती. त्यांतले घणाघाती लेखनही लोक हौसेने वाचत असत. या मासिकांमधील नाटकांची परीक्षणे, सिनेमांची परीक्षणे, क्रिकेट सामन्यांचे वृत्तान्त, इतर माहितीपर लेख… यांविषयी चर्चा होत असे. त्यांचा खपही म्हणण्याजोगा होता. ‘साप्ताहिक सकाळ’ने अभ्यासपूर्ण आणि नावीन्यपूर्ण लेखनाचा पायंडा पाडला, त्यांच्या दिवाळी अंकांमधून अनेक महत्त्वाच्या मराठी लेखकांचे लेखन प्रथम प्रसिद्ध झाले, पुढे त्यांतून पुस्तकेही आले. ‘साप्ताहिक सकाळ’मधून येणारे ‘अशी ही इंग्रजी’ हे वा. गो. आपटे यांचे सदर अत्यंत लोकप्रिय आणि माहितीपूर्ण होते. ते पुढे ‘लोकप्रभा’मधूनही येत होते. ही साप्ताहिके मराठीतील ‘डायजेस्टी’ प्रकारच्या नियतकालिकांची अखेरची वंशज म्हणावी लागतील. सर्व कुटुंबाने वाचण्याजोगा मजकूर त्यात असे. शृंगारविषयक मजकूर गायब होत गेला. पण अंक कुठल्याही एका विषयाला वाहिलेले नसणे, वाचकप्रिय ठरतील असे अनेक विषय एकाच वेळी हाताळून वाचकांची मर्जी सांभाळणे, सोपेपणा - ताजेपणा - रंजकपणा ही त्रिसूत्री सांभाळणे - हीच त्यांचीही वैशिष्ट्ये होती. काही काळ या साप्ताहिकांनीही इंटरनेट वापरून माहिती देण्याचा प्रयोग केला. पण इंटरनेट जसजसे सार्वत्रिक होत गेले आणि मोबाइलमार्गे माणसागणिक सहजगत्या पोचत गेले, तसतशी कागदी साप्ताहिके फिकी पडत गेली. 

आता विचारसरणींचे वैविध्यही उरले नाही आणि डायजेस्टहून अधिक वेगात हव्या त्या प्रकारचे ज्ञान एक कळ दाबताच देणाऱ्या गुगलच्या खिडक्या-दरवाजेही सताड उघडले गेले आहेत. हिरोशीमा-नागासाकीहून मोठा माहितीचा स्फोट झाला आहे. माहितीच्या त्या ओघापुढे आणि वेगापुढे काहीही टिकणे शक्यच नाही. कोणे एके काळी मराठीत ‘रीडर्स डायजेस्ट’च्या धर्तीवर मासिके निघत होती, या आता नुसत्या आठवणीच राहिलेल्या आहेत. आणि जगण्यात इतका बेदखलपणा आला आहे, की भारतात अजूनही इंग्रजी रिडर्स डायजेस्ट निघते या जाणिवेपासूनही आपण दूर निघून गेलो आहोत.

पंकज भोसले