‘सायबरपंक’चे आईस-बापूस
पंक चळवळीतून आलेल्या सायबरपंक साहित्यामध्ये टोकाच्या व्यक्तिवादी विचारसरणीतून आलेला एकटेपणा, विरलेली सामाजिक वीण, आणि पात्रांनी कुणाचीतरी सोबत नि प्रेमाचा ओलावा मिळवण्यासाठी केलेली धडपड ही महत्त्वाची सूत्रे आहेत.

जितेंद्र (जितेन) वैद्य
Thu Feb 27
सायबरपंक या शब्दाशी माझी ओळख बहुतेक १९९३ साली झाली असावी. मी विल्यम गिब्सनची पुस्तके तेव्हा प्रथमच वाचू लागलो होतो. त्या वेळेला गिब्सनने वर्णन केलेले, भांडवलशाहीची परिसीमा असलेले (hyper-capitalistic), पर्यावरणाची वाताहत झालेले, तंत्रज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमध्ये खूप प्रगती केलेले, परंतु समाजातील टोकाच्या विषमतेमुळे दुःखी आणि असमाधानी असणारे, असे जग मला प्रथम दिसले. या जगाने मोडलेली, एकटी करून टाकलेली, समाजाच्या परिघाबाहेर फेकली गेलेली, पण मनात खोल कुठेतरी माणुसकी जपून असलेली, प्रेम आणि ओलावा शोधणारी पात्रेही दिसली. हे जग आणि अशी पात्रे म्हणजे सायबरपंक असे समीकरण माझ्या डोक्यात तेव्हा तयार झाले.
०१ बर्निंग क्रोम
विल्यम गिब्सनच्या ‘बर्निंग क्रोम’ या गोष्टीने मला झपाटून टाकले.
१९८१ साली प्रकाशित झालेली ती गोष्ट नजीकच्या भविष्यकाळामध्ये घडते. पण किती पुढच्या भविष्यकाळात? तर साधारण ३० ते ६० वर्षे पुढचे भविष्य, त्यापुढचे नाही. हॅकर असलेला बॉबी, त्याची मैत्रीण रिकी, हात गमावून कुठल्याशा युद्धातून परतलेला ऑटोमॅटिक जॅक हा बॉबीचा सहकारी, ही त्या कथेतली पात्रे. त्या कथेत ‘सिमस्टिम’ अशा एका तंत्रज्ञानाची कल्पना केली आहे. एखाद्याचे ऐंद्रिय अनुभव या तंत्रज्ञानाद्वारे प्रक्षेपित करता येतात. जिचे अनुभव लोकप्रिय ठरतील अशी व्यक्ती त्यातून ‘स्टार’ होते. रिकीला ‘सिमस्टिम-स्टार’ होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. क्रोम ही गोष्टीतली खलनायिका आहे. क्रोम पडद्यामागेच वावरते, पण ती फारच भीतिदायक आहे. तिचे वर्णन करणारे हे वाक्य मी पहिल्यांदा वाचले, तेव्हा मी ते पुढे कित्येक दिवस विसरू शकलो नव्हतो.
“Chrome: her pretty childface smooth as steel, with eyes that would have been at home on the bottom of some deep Atlantic trench, cold gray eyes that lived under terrible pressure. They said she cooked her own cancers for people who crossed her, rococo custom variations that took years to kill you.” (क्रोम : एखाद्या सुंदर बाळासारखा तिचा चेहरा पोलादाप्रमाणे गुळगुळीत होता. अटलांटिक समुद्राच्या पोटात असलेल्या एखाद्या विवराच्या तळाशी शोभून दिसतील असे तिचे थंडगार राखी डोळे. तिच्याशी वैर घेणार्या लोकांना वर्षानुवर्षे खितपत ठेवून ठार मारण्याकरता ती स्वतः जातीने कर्करोगाच्या खास आवृत्या तयार करवून घेते, असे बोलले जाई.)
क्रोमच्या संगणक अवकाशातल्या (cyberspace) बालेकिल्ल्यावर हल्ला करून तिची तिजोरी चोरली जाते आणि तिला जाळले जाते - ‘बर्न’ केले जाते, असे ‘बर्निंग क्रोम’चे कथानक.
०२ तेव्हा जगात काय चालले होते?
‘बर्निंग क्रोम’ १९८१ साली, तर ‘न्यूरोमान्सर’ ही गिब्सनची कादंबरी १९८४ साली प्रकाशित झाली. त्या वेळी जगात काय चालले होते? १९८० साली “गव्हर्नमेंट इज नॉट द सोल्युशन टू आवर प्रॉब्लेम्, गव्हर्नमेंट इज द प्रॉब्लेम.” असे म्हणत रोनाल्ड रीगन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला होता. अमेरिकेत आणि त्या अनुषंगाने जगातही नियंत्रणमुक्त बाजार (deregulation), श्रीमंतांच्या वाढलेल्या श्रीमंतीचा फायदा हळूहळू आपोआप गरिबांना होईल अशी विचारधारणा (trickle down effect), पुरवठ्याच्या बाजूचे अर्थशास्त्र (म्हणजे भांडवली गुंतवणूक आणि सेवा-उत्पादनांवर कमीत कमी नियंत्रण ठेवून विकास घडवून आणण्याकडे असलेले झुकते माप, supply-side economics) या आणि असल्या विचारांचा पगडा वाढत होता. १९८७ साली आलेल्या ‘वॉल स्ट्रीट’ या सिनेमातील गॉर्डन गेको या पात्राच्या तोंडचे “ग्रीड इज गुड.” हे आपल्या सर्वांच्या नागड्या स्वार्थाला आवाहन करणारे वाक्य हे या युगाचे जणू प्रतीकच होते.
विल्यम गिब्सन आणि इतर काही द्रष्ट्या लेखकांना हे सर्व आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे हे बरोबर दिसले असावे. त्यातूनच ‘सायबरपंक’चा जन्म झाला असावा.
‘सायबरपंक’चा उदय होण्याआधी लिहिल्या जाणाऱ्या विज्ञानकथा कशा होत्या?
विज्ञानावर आधारित, विज्ञानाचे अभ्यासक नसलेल्या सर्वसामान्य वाचकाला विज्ञान समजावून सांगणाऱ्या, मनुष्य व मनुष्याने निर्माण केलेल्या व्यवस्था या कायम शांती आणि समता यांकडेच प्रवास करतील असे गृहीतक असलेल्या, अशा तत्कालीन विज्ञानकथा असत.
त्या वेळेला लोकप्रिय असलेली ‘स्टार ट्रेक’ ही टीव्ही मालिका पाहा. ‘स्टार ट्रेक’मध्ये पृथ्वीवरची सारी राष्ट्रे ‘युनायटेड नेशन्स’च्या आधिपत्याखाली गुण्यागोविंदाने नांदत असतात. गरिबी, विषमता, रोगराई, किंबहुना अस्वच्छताही या साऱ्यांचे त्या जगातून उच्चाटन झालेले असते. अमेरिकी टीव्हीवरचे पहिले आंतरवंशीय (interracial) चुंबन त्या मालिकेत घडले.
अशा प्रकारच्या, खऱ्या जगापासून फारकत घेतलेल्या, विज्ञान किंवा तंत्रज्ञान यांना महत्त्व असलेल्या विज्ञानकथांचा तो काळ होता. १९८० आणि १९७९ साली विज्ञानकथांच्या जगात प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘ह्युगो’ आणि ‘नेब्युला’ ही पारितोषिके कोणत्या कादंबऱ्यांना मिळाली ते बघितले तर मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल. आर्थर सी क्लार्क यांची ‘फाउंटन्स ऑफ पॅरडाइस’ (पृथ्वीच्या दृष्टिकोनातून अंतराळात स्थिर असलेल्या (geostatic) उपग्रहापर्यंत जाणाऱ्या लिफ्टचे बांधकाम), ग्रेगरी बेनफोर्ड यांची ‘टाइमस्केप’ (भूतकाळात संदेश पाठवून पृथ्वीला पर्यावरणीय आपत्तीपासून वाचवण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न), आणि व्होंडा मॅकइंटायर यांची ‘ड्रीमस्नेक’ (खूप खूप पुढच्या भविष्यकाळात, बहुतांश मानवजातीचा नाश ओढवलेला असतानाच्या पृथ्वीवर, स्नेक नामक एक स्त्री आणि तिचा सहकारी आजारी-जखमी लोकांची शुश्रूषा करत प्रवास करत असतात. त्यांची गोष्ट.) ही काही उदाहरणे. अर्थातच याला फिलिप के डिक (फिलिप के डिकची ‘डू अँड्रॉइडस ड्रीम ऑफ इलेक्ट्रिक शीप?’ ही कादंबरी साठीच्या दशकाच्या शेवटी लिहिली गेलेली असली, तरी त्यावर आधारित असलेला १९८२ सालचा ‘ब्लेड रनर’ हा सिनेमा मात्र ‘सायबरपंक’चाच भाग आहे), उर्सुला लेग्विन (‘लेफ्ट हॅँड ऑफ डार्कनेस’मध्ये कल्पलेले, लिंगभाव नसलेले परग्रहवासी) आणि इतर सन्माननीय अपवाद होते. पण ते नियम सिद्ध करणारे अपवाद होते. वाचकाला अज्ञानी समजून त्याला सुलभीकृत स्पष्टीकरणे देणार्या,’ दुष्टाचा पराभव-सुष्टांचा विजय’ हा ठरीव साचा असलेल्या त्या वेळच्या विज्ञानकथांचा वाचकांना कंटाळा आला असावा. येणार्या काळात तंत्रज्ञानाची प्रगती समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था या दोन्हींवर कोणत्या प्रकारचे परिणाम घडवून आणेल, याबाबत त्या विज्ञानकथांनी बांधलेले अंदाज आणि ते अंदाज बांधण्यासाठी वापरलेली प्रारूपे असे सगळेच काहीसे भाबडे होते. त्यावरची प्रतिक्रिया उमटणे हे ‘सायबरपंक’च्या जन्मामागचे दुसरे कारण असावे.
ही सगळी परिस्थिती म्हणजे सायबरपंकची जन्मवेळा - अर्थात ‘सायबरपंक’ या जॉन्राची ‘आईस’!
०३ सायबरपंक म्हणजे काय?
सायबरपंक या शब्दामधला ‘पंक’ हा शब्द सत्तरीच्या दशकाच्या मध्यात सुरू झालेल्या ‘पंक’ या सांस्कृतिक बंडसदृश लाटेमधून आला. सत्तरीच्या दशकामधले तरुण व्यवस्थेला विरोध करू पाहत होते. टोकाचा व्यक्तिवाद हेही त्यांचे एक वैशिष्ट्य. बारीकसारीक गोष्टींकरता व्यावसायिक मदत न घेता सगळ्या गोष्टी स्वतःच करण्याचीही (do it yourself किंवा DIY) तरुणांमध्ये लाट होती. कपडे, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इत्यादी गोष्टी ते स्वतःच तयार करू पाहत असत. ही सगळी वैशिष्ट्ये असलेली सांस्कृतिक चळवळ म्हणजे ‘पंक’. या चळवळीचे स्वतःचे असे संगीत (punk rock) होते. त्यांची स्वतःची स्वतंत्र सौंदर्यदृष्टी घडत गेली होती आणि ती तत्कालीन मुख्यधारेतल्या सौंदर्यदृष्टीपासून फटकून होती. स्टड (बारीक चुका आणि धातूच्या रिंगा) आणि सुळे यांचा वापर केलेली चामड्याची जाकिटे, फाटक्या जीन्स पँट्स, नेटिव-अमेरिकी लोकांसारखी मोहॉक केशरचना हा या सौंदर्यदृष्टीचा भाग होता. तुम्ही जर १९८७ साली आलेला ‘मॅट्रिक्स’ हा सिनेमा बघितला असेल, तर त्यातल्या त्रिनिटी, सायफर, टँक, मॉर्फियस अशा काही पात्रांची वेशभूषा आणि केशभूषा बघून तुम्हांला पंक एस्थेटिकबद्दल चांगली कल्पना येईल.
पण ‘सायबरपंक’ या पंक-चळवळीतून उसनवारी करत असले, तरी त्याचे उदात्तीकरण मात्र करत नाही. टोकाच्या व्यक्तिवादी विचारसरणीतून आलेला एकटेपणा, विरलेली सामाजिक वीण, आणि ‘सायबरपंक’ साहित्यातल्या पात्रांनी कुणाचीतरी सोबत नि प्रेमाचा ओलावा मिळवण्यासाठीची केलेली धडपड हीदेखील ‘सायबरपंक’मधली महत्त्वाची सूत्रे आहेत.
०४ सायबरकथेचा ‘बापूस’ विल्यम गिब्सन आणि ‘सायबरस्पेस’
१९८१ साली अमेरिकेच्या टेक्सास राज्यात ऑस्टिन या शहरात दर वर्षीप्रमाणे अरमाडिलॉ-कॉन हा विज्ञानकथा मेळावा भरला होता. तिथे विल्यम गिब्सनने त्याची ‘बर्निंग क्रोम’ ही कथा ब्रूस स्टर्लिंग आणि इतर काही लेखकांना वाचून दाखवली. ब्रूस स्टर्लिंग या कथेने झपाटून गेला. त्याने त्या कथेबद्दल आणि सायबरपंक या संकल्पनेबद्दल बऱ्याच ठिकाणी अतिशय कौतुक करणारे लेख लिहिले. त्यामुळे अनेक लेखक प्रभावित झाले. पुढच्या वर्षी १९८२ सालच्या अरमाडिलॉ-कॉनमध्ये ‘बिहाइंड मिरर शेड्स’ या शीर्षकाचे एक सत्र सायबरपंक या विषयावर झाले. आरशासारखा पृष्ठभाग असलेला काळा चष्मा आणि तो घालणाऱ्याचे डोळे झाकले जाऊन काळ्या चष्म्याच्या आरशात समोरच्या गोष्टीचे वा व्यक्तीचे प्रतिबिंब या प्रतिमेला सायबरपंक सौंदर्यदृष्टीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्याकडे शीर्षकाचा रोख होता. त्यातही विल्यम गिब्सन आणि ब्रूस स्टर्लिंग यांनी भाग घेतला. हे सत्रही बरेच गाजले. हीच सायबरपंकची सुरुवात. (१९८६ साली ‘मिररशेड्स’ या नावाचा सायबरपंक कथांचा कथासंग्रह ब्रूस स्टर्लिंगने संपादित केला. तोही वाचण्यासारखा आहे.)
जर तुम्ही रूक्ष आणि पुस्तकी विद्वानांनी लिहिलेला सायबरपंकबद्दलचा विकिपीडियावरचा लेख वाचलात, तर तुम्हांला त्यात ‘पण अमुक याने या प्रकारचे ‘बर्निंग क्रोम’ लिहिली जाण्याआधीच लिहिले होते.’, ‘तमुक याने या सूत्रावर आधारित चित्रपट याआधीच काढला होता.’ वगैरे गोष्टींच्या नोंदी दिसतील. या नोंदींतील काही लेखकांचे लेखन मी कुतुहूल म्हणून वाचले आहे, पण माझ्या मते तरी त्यांच्यापैकी कुणाचीच तुलना विल्यम गिब्सनच्या प्रतिभेशी होऊ शकत नाही. एखादी कल्पना एखाद्या विशिष्ट कालखंडात फक्त कुणा एका व्यक्तीच्याच मनात असते असे नाही, तर ती तत्कालीन आसमंतात अनेकांच्या जाणिवेत कमीअधिक स्पष्टतेनिशी असू शकते आणि तिचा वापर करून अनेक लोक साधारण एकाच कालखंडात, पण थोडे मागेपुढे, आपापल्या कुवतीनुसार कलाकृती निर्माण करतात वा शोध लावतात, असेही मी मानतो. काही काळ गेला की या कलावंतांमधले वा संशोधकांमधले वा विचारवंतांमधले खरे उंच आणि थोर लोक कोण होते आणि त्या मानाने लहान लोक कोण होते हे नीट समजते. सायबरपंक विज्ञानकथा लिहिणार्या लेखकांपैकी विल्यम गिब्सन वादातीतपणे थोर होता. त्यामुळे रूक्ष विद्वानांनी दाखवलेला काटेकोरपणा बाजूला ठेवून मी तरी मला अभिप्रेत असलेल्या सायबरपंक विज्ञानकथेचा पाळणा १९८१ साली झालेल्या अरमाडिलॉ-कॉनमध्ये हलला असेच मानतो.
विल्यम गिब्सनची ‘बर्निंग क्रोम’ ही कथा आहेही त्याच तोलामोलाची. सुरुवातीला तिचे कथासूत्र दिलेच आहे. त्या कथेत एक सूत्र आहे संगणक-अवकाशात (सायबरस्पेस) क्रोमच्या बालेकिल्ल्यावर होत असलेल्या हल्ल्याचे, तर दुसरे सूत्र तेव्हाच्या नजीकच्या भूतकाळातल्या, गेल्या काही महिन्यांच्या फ्लॅशबॅकचे.
या गोष्टीबद्दल पुढे सांगायच्या आधी ‘सायबरस्पेस’ किंवा ‘संगणक-अवकाश’ या शब्दांबद्दल जरा बोलणे आवश्यक आहे. आता सायन्स फिक्शनच्या बाहेरही रूढ झालेला ‘सायबरस्पेस’ हा शब्द विल्यम गिब्सनने १९८२ साली तयार केला आणि त्याच्या सगळ्याच सायबरपंक गोष्टींमध्ये त्याचा वापर केला. गिब्सनने जेव्हा हा शब्द तयार केला तेव्हा आपल्याला आता माहीत असलेले इंटरनेट अगदीच बाल्यावस्थेत होते. फक्त काही अमेरिकी विद्यापीठांमधील संगणक एकमेकांशी जोडलेले होते. आपले इंटरनेट आता सगळ्या जगभर पसरले आहे आणि जवळजवळ सगळ्या देशातल्या बँका, धंदे, शासकीय संस्था, एवढेच काय सगळी माणसेसुद्धा त्यांच्या मोबाईल फोनमुळे या जाळ्याशी जोडलेली आहेत. ही सगळी माणसे, या सगळ्या संस्था या जाळ्यावरून एकमेकांशी संवाद साधू शकतात. मुख्यतः वेबसाईटवरचे फॉर्म आणि इ-मेल यांनी हे संवाद साधले जातात.
गिब्सनने कल्पलेला संगणक अवकाश म्हणजे संगणकांना जोडणारे असेच एक जाळे आहे. परंतु एकमेकांशी संवाद साधण्यासाठी जो इंटरफेस वापरला जातो, तो मात्र आपल्यापेक्षा फारच जास्ती पुढारलेला आहे. आभासी जग दाखवणारे गॉगल्स (virtual reality goggles) घालून सगळे जण स्वेच्छेने एका आभासी जगात सहभागी होतात. त्या आभासी जगात निरनिराळ्या कंपन्यांची माहिती निरनिराळ्या आकाराच्या आणि रंगाच्या भौमितिक आकारांनी सचित्र दाखवली जाते. निरनिराळ्या कंपन्या शासकीय संस्था आणि ग्राहक या अवकाशामध्ये एकमेकांशी संवाद आणि इतर कामे करू शकतात. गिब्सनच्या ‘न्यूरोमान्सर’ या कादंबरीतला हा परिच्छेद पाहा :
Cyberspace. A consensual hallucination experienced daily by billions of legitimate operators, in every nation, by children being taught mathematical concepts… A graphic representation of data abstracted from the banks of every computer in the human system. Unthinkable complexity. Lines of light ranged in the nonspace of the mind, clusters and constellations of data. Like city lights, receding. (संगणक अवकाश - एक आभास, ज्यात देशोदेशीचे करोडो यूजर्स स्वेच्छेने सहभागी होतात, गणित शिकणारी लहान मुले… मानवी संगणक-जाळ्यातल्या प्रत्येक संगणकातली माहिती दर्शवणार्या द्विमित वा त्रिमित आकृत्या. अकल्पनीय गुंतागुंत. मनाच्या विश्वात पसरलेल्या प्रकाशरेखा, माहितीच्या गुच्छांची नक्षत्रे. मागे पडत जाणार्या झगमगत्या शहरातील दिव्यांसारख्या विझत जाणार्या प्रकाशरेखा.)
नंतर एका मुलाखतीत बोलताना संगणक अवकाशाबद्दलबद्दल गिब्सन म्हणतो :
All I knew about the word “cyberspace” when I coined it, was that it seemed like an effective buzzword. It seemed evocative and essentially meaningless. It was suggestive of something, but had no real semantic meaning, even for me, as I saw it emerge on the page.(मी जेव्हा ‘सायबरस्पेस’ (संगणक-अवकाश) हा शब्द तयार केला, तेव्हा माझ्या मनात हा एक चांगला ‘बझवर्ड’ आहे एवढाच विचार होता. जेव्हा मी तो पहिल्यांदा कागदावर उतरवला तेव्हा त्याला माझ्यासाठीसुद्धा स्वतःचा असा काहीच अर्थ नव्ह्ता. पण त्यातून अनेक संकल्पनांचं मोहोळ उठल्यासारखं होत होतं. त्यातून कसलीतरी अगम्य जाणीव होत होती.)
बर्निंग क्रोम ज्या स्प्रॉलमधे घडते त्यातच घडणाऱ्या ‘स्प्रॉल त्रयी’मधल्या ‘न्युरोमान्सर’ (Neuromancer), ‘काउंट झीरो’ (Count Zero), आणि ‘मोना लिसा ओव्हरड्राईव्ह’ (Mona Lisa Overdrive) आणि ‘ब्रिज त्रयी’तल्या ‘व्हर्चुअल लाइट’ (Virtual Light), ‘इडोरू’ (Idoru) आणि ‘ऑल टुमॉरोज पार्टीज’ (All Tomorrow’s Parties) अशा सहा कादंबऱ्या विल्यम गिब्सनच्या सायबरपंक कादंबऱ्या म्हणता येतील.
१९८२ साली व्हर्नर व्हिन्जी याने लिहिलेली ‘ट्रू नेम्स’ ही लघुकादंबरी ‘सायबरस्पेस’ कल्पनेवर आधारित होती. ‘डंजन्स अँड ड्रॅगन्स’ या खेळावर आधारित असलेल्या संगणकविश्वाचे वर्णन त्या कादंबरीत आहे. १९९२ साली लिहिलेली नील स्टीफनसन यांची ‘स्नो क्रॅश’ ही कादंबरी संगणक अवकाशासारख्याच एका कल्पनेला ‘मेटाव्हर्स’ (Metaverse) असे नाव देते.
आपण परत ‘बर्निंग क्रोम’कडे परतू.
कादंबरीतल्या आधी उल्लेखलेल्या दोन्ही सूत्रांचा निवेदक आहे ऑटोमॅटिक जॅक. पहिल्या सूत्रात क्रोमच्या संगणक-अवकाशातली तटबंदी भेदून तिच्या बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचण्यातला थरार आहे, तर दुसऱ्या सूत्रात ह्या हल्ल्याची तयारी कशी केली गेली, बॉबी आणि रिकी यांचे अर्धस्फुट असे नाते, बॉबीचा अप्पलपोटेपणा आणि स्वतःच्या कामगिरीच्या नादात त्याने रिकीला नीटसे ओळखलेलेच नसणे, ऑटोमॅटिक जॅकची त्या दोघांवर असलेली माया आणि ‘हाऊस ऑफ द ब्लू लाइट्स’मध्ये रिकी काय करते त्याचे भयंकर वास्तव अशा गोष्टी फ्लॅशबॅकच्या धाग्यातून उलगडतात.
आपल्या आयुष्यात येणार्या मुली हा एखादा शकुन असावा, अशा दृष्टीने बॉबी त्याच्या आयुष्यात येणाऱ्या मुलींकडे पाहतो. या मुलींबरोबरच्या नात्यातून मिळणारी ऊर्जा त्याला हवी असते. पण त्याचे खरे लक्ष असते ते पुढच्या हॅकिंगच्या कामाकडे, त्या कामाच्या यशाकडे, आणि त्यातून मिळणार्या थरारक आनंदाकडे. क्रोमच्या बालेकिल्ल्यावर धाड घालणे हे असेच एक काम. त्या कामापूर्वी रिकी त्याच्या आयुष्यात येते. बॉबीचा सहकारी असलेला आणि या गोष्टीचा निवेदक असलेला ऑटोमॅटिक जॅक या सगळ्याकडे काहीशा स्थितप्रज्ञपणे पाहतो.
ऑटोमॅटिक जॅकचे हे बॉबी आणि रिकीबद्दलचे वाक्य पहा :
“… Rikki got set up higher and further away than any of the others ever had, even though - and I felt like screaming it at him - she was right there, alive, totally real, human, hungry, resilient, bored, beautiful, excited, all the things she was…” (“… माझ्या मनातलं रिकीचं स्थान इतर मैत्रिणींपेक्षा आणखीनच उंच आणि दूरवरचं भासू लागलं, पण ती तिथेच, त्याच्या अगदी समोर होती. मला त्याला हे गदागदा हलवून सांगावसं वाटत होतं - ती तिथेच होती, त्याच्यासमोर. जिवंत, खरीखुरी, हाडामांसाची, आयुष्याला आसुसलेली, एखाद्या फिनिक्स पक्ष्यासारखी न हरता लढत राहणारी, मधूनच काहीशी कंटाळलेली, सुंदर, उत्साहानं रसरसलेली - अशी सगळी सगळी…”)
हे वाक्य ऐन पंचविशीतल्या मला फारच डोळे उघडवणारे आणि सर्वार्थांनी उपयुक्त वाटले होते! आजही वाटते.
०५ गिब्सनच्या खासियती
सायबरपंकपूर्वकाळात लिहिल्या गेलेल्या विज्ञानकथा जरी भविष्यात घडत असल्या, तरी त्या मुळात तत्कालीन वाचकांसाठी लिहिल्या गेल्या होत्या. कथांमध्ये वापरल्या जात असलेल्या तंत्रज्ञानाबद्दल, किंवा लोकांच्या व्यवसायांबद्दल, किंवा त्या काल्पनिक भविष्यातील सामाजिक वातावरणाबद्दल तत्कालीन वर्तमानकाळातल्या वाचकांसाठी लिहिलेली स्पष्टीकरणे हा या कथांचा मोठा भाग असे. याउलट गिब्सनच्या गोष्टी या काल्पनिक भविष्यात राहणाऱ्या वाचकांसाठी लिहिलेल्या असाव्यात अशा होत्या. वर्तमानकालीन वाचकांसाठी त्यात कोणतीही स्पष्टीकरणे दिलेली नसत. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बोस्टन आणि अटलांटा या शहरांमध्ये एक हजार मैल पसरलेला उपनगरांचा ‘स्प्रॉल’ (या भागाला गिब्सन BAMA किंवा बोस्टन अटलांटा मेट्रोपॉलिटन एरिया असेही म्हणतो); ईस्टर्न सीबोर्ड फिशन अथॉरिटी, ओनो सेंडाई, होसाका, झीस आयकॉन या कंपन्या; सायबर डेक काउबॉइज… यांच्या गिब्सननिर्मित जगात गिब्सन वाचकाला काहीही स्पष्टीकरण न देता अक्षरशः बुडवून टाकतो. श्वास घ्यायला वर येईपर्यंत तुम्ही त्या जगाच्या आणि त्यातल्या पात्रांच्या प्रेमात पडलेले असता.
उदाहरणार्थ ही तीन उद्धृते पाहा :
‘“What happened to your arm?” she asked me one night in the Gentleman Loser, the three of us drinking at a small table in a corner.”Hang-gliding,” I said, “accident.""Hang-gliding over a wheatfield,” said Bobby, “place called Kiev. Our Jack’s just hanging there in the dark, under a Nightwing parafoil, with fifty kilos of radar jammer between his legs, and some Russian asshole accidentally burns his arm off with a laser.”I don’t remember how I changed the subject, but I did.”’ (“तुझ्या हाताला काय झालं?” एका रात्री जेंटलमन लूझर बारमध्ये आम्ही तिघं कोपर्यातल्या एका टेबलवर पीत बसलो असताना तिनं मला विचारलं.“हॅंग ग्लायडिंग,” मी म्हणालो, “अपघात.” “गव्हाच्या शेतावरून हॅंग ग्लायडिंग,” बॉबी म्हणाला, “कीयेव्ह नावाची जागा होती. आपला जॅक पन्नास किलोंचा रडारचा ऐवज त्याच्या मांड्यांमध्ये पकडून तिथे अंधारात नाइटविंग पॅराफॉईलखाली तरंगत होता आणि कुठल्यातरी रशियन हरामजाद्यानं त्याचा हात लेझरनं उडवला. चुकून.”मी विषय कसा बदलला ते मला आठवत नाही, पण बदलला खरा.)
जॅक कोणत्या देशाच्या सैन्यात आहे, हे युद्ध कोण विरुद्ध कोण असे चालू आहे, रशियन लोक मित्र आहेत की शत्रू या कशा-कशाबद्दल काहीही सांगितले जात नाही. या गोष्टीत नाईटविंग नावाची हेँग ग्लायडर तयार करणारी कंपनी आहे आणि युद्धात वापरण्यासारखे लेझर्सही त्या गोष्टीच्या जगात आहेत हे आपल्याला समजते. पण याबद्दलही पुढे काही नाही. अगदी सहजपणे एका बारमध्ये होणाऱ्या या संवादातून आपल्याला या जगाबद्दल ही माहिती कळते.
“I went out and looked for Rikki, found her in a café with a boy with Sendai eyes, half-healed suture lines radiating from his bruised sockets. She had a glossy brochure spread open on the table, Tally Isham smiling up from a dozen photographs, the Girl with the Zeiss Ikon Eyes.” (मी रिकीला शोधायला बाहेर पडलो. ती एका सेंडाई डोळ्यांच्या पोराबरोबर एका कॅफेमध्ये बसली होती. त्याच्या खरचटलेल्या डोळ्यांच्या खोबणींतून अर्धवट सुकलेल्या टाक्यांच्या रेषा सूर्यकिरणांसारख्या फाकल्या होत्या. तिच्यासमोर गुळगुळीत कागदावर छापलेलं एक ब्रोशर पडलेलं होतं. त्यावरच्या दहा-बारा फोटोंमधून टॅली इशाम हसर्या चेहर्यानं डोकावत होती. टॅली इशाम - झीस आयकॉन डोळ्यांची मुलगी.)
या परिच्छेदातही तेच होते. सेंडाई आणि झीस आयकॉन म्हणजे काय? तर डोळ्यांना दिसणारी दृश्ये मुद्रित करतील असे कृत्रिम ‘डोळे’ विकणाऱ्या या कंपन्या. ज्यांना ‘सिमस्टिम’ या नवीन प्रकारच्या माध्यमात कलाकार म्हणून काम करायचे असेल, त्या सर्वांना तसले डोळे विकत घ्यावे लागतात. सर्व प्रकारच्या ऐंद्रिय अनुभवांमध्ये बुडवून टाकणारा अनुभव ‘सिमस्टिम’ माध्यम देऊ करते. ही सगळी माहिती आपल्याला या आणि अशा अनेक प्रसंगांतून अगदी सहज, डोळ्यांच्या कोपर्यातून दिसत राहावी, तशा प्रकारे दिली जाते.
“… and she touched me, touched my shoulder, the half-inch border of taut pink scar that the arm doesn’t cover. Anybody else ever touched me there, they went on to the shoulder, the neck… But she didn’t do that. … her hand went down the arm, black nails tracing a weld in the laminate, down to the black anodized elbow joint, out to the wrist, her hand soft-knuckled as a child’s, fingers spreading to lock over mine, her palm against the perforated Duralumin.” (आणि तिनं मला स्पर्श केला. माझ्या खांद्यावरच्या लालसर ताणलेल्या त्वचेवरचा अर्ध्या इंचाचा व्रण. कृत्रिम हात जोडल्यानंतरही जो दिसतच राहतो, तो व्रण. तिथे तिनं मला स्पर्श केला… जर मला कुणी तिथे स्पर्श केलाच तर ते तिथे न थांबता पुढे वर जातात - खांदे, मान… पण तिनं तसं केलं नाही. तिचा हात खाली गेला - माझ्या हाताकडे. हाताच्या लॅमिनेटमधल्या एका सांध्याची रेष तिनं तिच्या काळ्या नखांनी कुरवाळली. तिथून आधी माझ्या कोपराच्या काळ्याशार अॅनोडाइज्ड सांध्यावर, तिथून मनगटाकडे. लहान मुलाच्या हातासारखा मऊ पेरांच्या बोटांचा तिचा हात. बोटं पसरून तिनं माझ्या बोटांत गुंफली. माझ्या चाळणीसारख्या, भोकाभोकांच्या ड्युराल्युमिन पंजावर तिचा पंजा.)
पुन्हा एकदा, जॅकच्या कृत्रिम (prosthetic) हातात संवेदना असतात वगैरे सगळे तपशील सांगण्याच्या भानगडीत न पडता गिब्सन आपल्याला फक्त जॅक आणि रिकी यांच्यामधला हा हळुवार प्रसंग सांगतो.
नजर ठेवण्याकरता आणि आपण योग्य माणसांच्या नजरेत भरावे म्हणूनही या गोष्टीतली हॅकर्स मंडळी ज्या बारमध्ये पडीक असतात, त्या बारचे नाव असते ‘जेंटलमन लूजर’. मला हे नाव फार इंटरेस्टिंग वाटते. ब्रिटनमध्ये सरंजामशाही असताना ज्या लोकांना वाडवडिलांकडून आलेल्या जमिनी, पैसा यांमुळे पोटापाण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी काहीच काम करावे लागत नसे, त्यांना उद्देशून ‘जेंटलमन’ ही संज्ञा वापरली जायची. असे लोक निव्वळ आवड आणि रस असल्यामुळे शास्त्रज्ञ वा डिटेक्टिव्ह म्हणून काम करू लागले, तर त्यांना ‘जेंटलमन सायंटिस्ट’ किंवा ‘जेंटलमन डिटेक्टिव्ह’ असे संबोधले जायचे. या संबोधनांमध्ये एक प्रकारचे विशिष्ट सूचन असे. ही माणसे हे काम त्यांच्या हौशीखातर, कामातल्या आनंदाखातर करताहेत. जिंकणे हे काही तितकेसे महत्त्वाचे नाही, असे त्यातून सुचवले जात असे. ‘हॅकर संस्कृती’मध्येही हाच भाव असतो. खुद्द गिब्सनच्या या गोष्टीतही चोरीतली नव्वद टक्के लूट निरनिराळ्या परोपकारी संस्थांना दिली जाते! तर - त्या ब्रिटिश सरंजामशाहीतून आलेला ‘जेंटलमन’ हा शब्द आणि जिथे जिंकणे हेच सर्व काही असते अशा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये ‘लूजर’ हा सर्वसमावेशक पराभव व्यक्त करणारा शब्द - असे दोन शब्द एकत्र करून गिब्सनने या बारचे नाव घडवले आहे. टोकाच्या भांडवलशाहीमध्ये तुम्ही सद्गृहस्थ - म्हणजे जेंटलमन - असाल, तर तुम्ही जिंकूच शकत नाही, असा अर्थ गिब्सनला त्यातून सूचित करायचा असावा. तीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा मी ही गोष्ट वाचली, तेव्हापासून आजतागायत हे नाव मला फार आवडत आलेले आहे. अलीकडे तर फारच!
‘बर्निंग क्रोम’च्या गोष्टीत ‘Porsche watch’ या काल्पनिक उत्पादनाचा संदर्भ येतो. उत्तम दर्ज्याच्या आणि निर्दोष तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या मोटारगाड्या विकणारी आपल्या वास्तव जगातली एक कंपनी भविष्यात अतिप्रगत तंत्रज्ञानाने घडवलेली घड्याळे विकू लागते, अशी ही कल्पना आहे. या प्रकारचे आज आपल्याला दिसणारे ब्रँड्स किंवा कंपन्या भविष्यात काय करू शकतील किंवा एकमेकांशी हातमिळवणी करून कोणत्या नव्या कंपन्या तयार करतील, त्यांबद्दल कल्पना करून कल्पक नावे वापरणे आणि त्यातून एकंदरीत अर्थव्यवहारात काय चालले असेल याची चुणूक दाखवणे यात गिब्सनचा हातखंडा आहे.
गिब्सनच्या शैलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतःला फार सीरियसली घेत नाही. तिरकसपणे एक भिवई वर करून एखाद्या प्रसंगातला सूक्ष्म विनोद अगदी नर्मप्रकारे तुम्हांला दाखवून द्यायला तो नेहमीच तयार असतो. ही एक-दोन उदाहरणे पाहा. चिचुंद्रीसारख्या दिसणाऱ्या माणसासाठी इंग्रजीत ‘फेरेट-फेस्ड’ (ferret-faced) असा शब्द आहे. मात्र हा शब्द नं वापरता गिब्सन लिहितो, “He looks like a recombo DNA project aimed at tailoring people for high-speed burrowing”. (तो विद्युतगतीने बिळे पोखरण्यासाठी लागणारी माणसे डिजाइन करणाऱ्या रीकॉम्बीनंट डीएनए यंत्रणेसारखा दिसतो.) किंवा माकाओमधल्या अडत्यांच्या आणि आर्थिक गुन्हेगारांच्या ‘लाँग हम’ या गटाशी सौदा करत असताना ऑटोमॅटिक जॅक काय म्हणतो पाहा, “The Long Hum people were so oblique that they made my idea of a subtle approach look like a tactical nuke-out”. (‘लाँग हम’वाले लोक इतके सावध आणि संशयी होते, की त्यांच्यासमोर माझा सावधपणा म्हणजे एखाद्या छोट्याश्या अणुबॉम्बच्या स्फोटासारखा वाटू लागला.)
‘बर्निंग क्रोम’बद्दल लिहिणे थांबवण्याआधी मला त्यातला हा परिच्छेद उद्धृत केल्याशिवाय राहवत नाही :
“I tried not to imagine her in the House of Blue Lights, working three-hour shifts in an approximation of REM sleep, while her body and a bundle of conditioned reflexes took care of business. The customers never got to complain that she was faking it, because those were real orgasms. But she felt them, if she felt them at all, as faint silver flares somewhere out on the edge of sleep. Yeah, it’s so popular, it’s almost legal. The customers are torn between needing someone and wanting to be alone at the same time, which has probably always been the name of that particular game, even before we had the neuroelectronics to enable them to have it both ways.” (प्रयत्न करूनही ‘हाऊस ऑफ ब्लू लाइट्स’मधल्या तिच्या कामाबद्दलचा विचार मला थांबवता आला नाही. तीन-तीन तासांच्या पाळ्या, तंत्रज्ञानाच्या मदतीनं गाढ झोपेत असलेलं शरीर आणि त्या शरीरानं प्रतिक्षिप्त क्रियांच्या साहाय्यानं केलेला धंदा. गिऱ्हाइकांना तक्रारसुद्धा करायला जागा नसायची, कारण तिचे ऑरगॅजम्स खरे होते. पण ते तिला कधी जाणवलेच, तर झोपेच्या किनाऱ्यावर कुठेतरी पुसट चंदेरी भुईनळे उडावेत, तसे. धंदा बाकी लोकप्रिय. इतका लोकप्रिय, की त्यामुळे जवळजवळ कायदेशीरच झालेला. गिऱ्हाइकांना कुणाचीतरी सोबत तर हवी असते, पण त्याच वेळी एकट्यानं राहावंसंही वाटतं. न्यूरोइलेक्ट्रॉनिक्सने या दोन्ही गोष्टी लोकांना एकाच वेळी मिळतील अशी सोय करायच्या आधीच्या काळापासून त्या विशिष्ट खेळाचं नाव तेच तर होतं.)
हा या गोष्टीच्या शेवटाकडचा परिच्छेद. हादरवून टाकणारा. टोकाची भांडवलशाही आणि न्यूरोइलेक्ट्रॉनिक्समधली प्रगती या दोहोंच्या संबंधांतून जन्माला आलेला, नव्या वेश्याव्यवसायाचा भीषण चेहरा.
०६ गेल्या चाळीस वर्षांत काय-काय घडले?
विल्यम गिब्सनने सायबरपंक ही संकल्पना जन्माला घातल्याला आता जवळजवळ चाळीस वर्षे होऊन गेली. एका बाजूला जगातल्या गरिबातल्या गरीब लोकांपर्यंत पोचलेले मोबाईल फोन्स आणि इंटरनेट, झपाट्याने प्रगती करणारे जैविक तंत्रज्ञान, संगणक तंत्रज्ञान, स्वयंचलित चारचाकी गाड्या, अनेक वेळेला पुन्हा पुन्हा वापरता येणारी रॉकेट्स आणि त्यामुळे स्वस्त झालेले उपग्रह आणि अंतराळ - ही तंत्रज्ञानातली प्रगती आहे. आणि दुसरीकडे २००१मध्ये इंटरनेटमध्ये झालेल्या अति-गुंतवणुकीचा फुगा फुटल्याने आलेली मंदी आहे; इराक युद्ध आहे; २००८मध्ये बॅंकिंगचा फुटलेला फुगा आणि त्यामुळे आलेले जागतिक वित्तीय संकट आहे; अरब स्प्रिंग आहे; युक्रेनवरचा हल्ला; आणि डोनाल्ड ट्रम्प आहे; नरेंद्र मोदी, रुसेप एर्डोवन अशा राष्ट्रवादी, धर्मवादी नेत्यांचा उदय आहे… गेल्या चाळीस वर्षांत घडलेल्या या काही महत्त्वाच्या घटना. त्याबरोबरच वाढत जाणारी आर्थिक विषमता, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा ऱ्हास, समाजमाध्यमांचा मनःस्वास्थ्यावर होणारा परिणाम, आणि लोकशाही राष्ट्रांच्या तुलनेत वाढणारी बहुराष्ट्रीय कंपन्यांची शक्ती हे या दोहोंच्या युतीचे काही ठळक परिणाम.
या काळात विल्यम गिब्सनशिवाय निल स्टीफन्सन (Neal Stephenson), रामेझ नाम (Ramez Naam) , ब्रूस स्टर्लिंग (Bruce Sterling), चार्ल्स स्ट्रॉस (Charles Stross), कोरी डॉक्टरोव (Cory Doctorow), हानू रायानियेमी (Hannu Rajaniemi) इत्यादी लेखकांनीही ‘सायबरपंक’ म्हणाव्यात अश्या कादंबऱ्या आणि लघुकथा लिहिल्या. ज्या प्रकारच्या डिस्टोपियाबद्दल सायबरपंक सावधगिरीचा इशारा देत होती, त्या प्रकारच्या डिस्टोपियन जगात आपण या चाळीस वर्षांत कळत नकळत येऊन ठेपलो. “Cyberpunk was a warning, not a business plan” अशा प्रकारच्या मीम्स दिसू लागल्या.
साधारण २००० सालापासून विल्यम गिब्सनच्या गोष्टीही काल्पनिक भविष्यात न घडता आपल्या सध्याच्याच काळात किंवा अगदी नजीकच्या भविष्यकाळात घडताना दिसू लागल्या.
गिब्सनने ऐंशीच्या दशकाच्या मध्यात त्याच्या गोष्टींमधून दाखवलेले भविष्य इंटरनेट बूमनंतरच्या काळात जसजसे प्रत्यक्षात येऊ लागले, तसतशी गिब्सनने एक नवी मालिका लिहायला सुरुवात केली. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ले, खोटी कारणे दाखवून अमेरिकेने सुरू केलेले इराकमधले युद्ध, त्यातला भ्रष्टाचार आणि त्याच वेळेला इंटरनेटमधील अति-गुंतवणुकीतून निर्माण झालेले विरोधाभास या सगळ्या घटनांवर भाष्य करणाऱ्या तीन कादंबऱ्यांची ‘ब्लू अँट’ मालिका त्याने लिहिली. या तीनही कादंबर्यांतल्या (पॅटर्न रेकग्निशन, स्पूक कंट्री, झीरो हिस्ट्री) (Pattern Recognition, Spook Country, Zero History) गोष्टी व पात्रे निरनिराळी असली तरी त्या तिन्हींत ‘ब्लू अँट’ नावाची होल्डिंग कंपनी आणि या कंपनीचा ह्युबर्टस बायजेंड (Huebertus Bigend, काय नाव आहे!) नावाचा मालक आहे. या तीनही कादंबऱ्यांना रूढार्थाने सायबरपंक म्हणता येणार नाही. या कादंबऱ्या आपल्या सध्याच्याच जगात घडतात. पण ‘सायबरपंक’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू लागली असावी, असा काहीसा भाव या कादंबऱ्यांमध्ये आहे.
डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या चार वर्षांच्या कारकिर्दीत गिब्सनने ‘द पेरिफेरल’ (The Peripheral) आणि ‘द एजन्सी’ (The Agency) अशा दोन सुरेख कादंबऱ्या लिहिल्या. सायन्स फिक्शनमध्ये काळ-प्रवास हा एक उपप्रकार मानला जातो. गिब्सनने काल-प्रवासातून होणारे विरोधाभास छान हाताळले आहेत आणि नेहमीप्रमाणे कादंबऱ्यांच्या माध्यमातून वर्तमानकाळावर भाष्य केले आहे. या कादंबऱ्या दोन काळांत घडतात. एक काळ साधारण वीस-पंचवीस वर्षे पुढच्या भविष्यात, तर दुसरा काळ पहिल्या काळापासून साधारण सत्तर-पंचाहत्तर वर्षे आणखीन पुढे.
पहिले (पंचवीस वर्षे पुढच्या भविष्यातले) जग पर्यावरणीय आणि राजकीय कोसळणीच्या काठावर आहे. या कोसळणीला गिब्सनने उपरोधाने ‘द जॅकपॉट’ असे नाव दिले आहे. त्यानंतरच्या (सत्तर वर्षांनंतरच्या) जगात मानवांची संख्या खूपच रोडावली आहे. प्राणी, पक्षी, इतर प्रजाती यांचा जवळजवळ निर्वंश झालेला आहे, पण तंत्रज्ञानाचा प्रसार मात्र तरीही चाललाच आहे. जुनी माफिया घराणी आणि आपल्या जगातले काही हुकूमशहा यांनी मिळून ‘चोरांचे राज्य’ (Kleptocracy) चालवले आहे, असे भीषण भविष्य या कादंबऱ्यांमध्ये वर्तवलेले आहे. अॅमेझॉन प्राइमने यावर मालिका तयार केली, तीही बघण्यासारखी आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यामुळे येऊ घातलेली बेकारी, आणि डोनाल्ड ट्रम्पची दुसरी कारकीर्द या गोष्टी आता आपल्याला अधिकच वेगाने विल्यम गिब्सनने कल्पनेत रंगवलेल्या सायबरपंक भविष्याकडे घेऊन चालल्या आहेत. विल्यम गिब्सन या सगळ्याबद्दल काय लिहितो हे बघायला मी उत्सुक आहे.
०७ ताजा कलम
ज्या प्रकारच्या जुन्या विज्ञानकथांना प्रतिक्रिया म्हणून सायबरपंक उदयास आली, त्यांना सन्माननीय अपवाद म्हणून मी उर्सुला के लेग्विनचा उल्लेख केला. तिने सत्तरीच्या दशकात विज्ञानकथा लिहिताना लिंगभाव, वंशवाद या गोष्टी मध्यवर्ती ठिकाणी ठेवल्या होत्या. ट्रम्पच्या नव्या कारकिर्दीत जरी यासंदर्भात उलटी गंगा वाहताना दिसत असली, तरीही गेल्या चाळीस वर्षांत समाजात आणि विज्ञानकथेमध्येही तिने लावलेल्या रोपाला फळे आली आहेतच. एका प्रकारे तिने ती नवी वाट पाडली, असेच म्हणावे लागेल. तिच्या त्या वाटेबद्दल आणि तिच्या वाटेवरच्या इतर लेखकांबद्दल या मालिकेतच एक नवीन लेख घेऊन येऊ.