भास कशासाठी?
आपल्याला – होय, आम्हांला आणि तुम्हांलाही – या नि अशा गोष्टी वाचायला मिळाव्यात, अशा निखळ स्वार्थी हेतूनं आम्ही ‘भास’ हे अनियतकालिक सुरू करतो आहोत. वाचा, वाचायला द्या, आणि सुरसुरी आली, तर लिहादेखील.
मेघना भुस्कुटे
Fri Oct 04
असं म्हणतात, की माणसाला गोष्टींची भूक असते. ते तर खरंच, पण या गोष्टी आपल्या भाषेतून ऐकावाचायची भूक असते, हे आणखी खरं. त्यातून कुठली अनामिक गरज भागत असते, कुणास ठाऊक. जीवनाप्रतीचं सत्य, आयुष्याविषयीचं भान, जगाबद्दलची जाण… वगैरे भानगडीही घडत असतात, पण त्याहून महत्त्वाचं आणि सगळ्यांत आधीचं काम म्हणजे – मन रमत असतं. आज-आत्ताच्या मराठी साहित्यात अशा, चौफेर मन रमवणार्या, निखळ गोष्टी फारश्या वाचायला मिळत नाहीत ही आमची जुनीच खंत. चतुर चोरांच्या, डोकेबाज डिटेक्टिवांच्या, हाणामार्यांच्या आणि सुडाबिडाच्या, कोणे एके काळच्या आणि आज-आत्ताच्या, पुराणातल्या आणि इतिहासातल्या, प्रेमाच्या आणि शृंगाराच्या, गूढाच्या आणि अद्भुताच्या, विज्ञानाच्या आणि तंत्रामंत्राच्या, खिदळण्याच्या आणि खुसखुसण्याच्या, तिरक्या आणि तीक्ष्ण… गोष्टी वाचायला मिळाव्या म्हणून आम्हांला हे अनियतकालिक काढावंसं वाटलं. पण गोष्टी म्हटलं, म्हणून रंजन काही गोष्टींवरच थांबलं नाही. ते कवितेत होतं, कादंबरीत होतं, नाटकात होतं, आणि ललित निबंधांतही होतं. त्यामुळे हे सगळे कथात्म साहित्यप्रकारही ओघानंच आले.
समीक्षा, टीका, वैचारिक भूमिका आणि त्यांमधले संघर्ष, राजकीय-सामाजिक-आर्थिक मांडणी, आकडेवारी, निष्कर्ष… इत्यादी गोष्टींपासून मात्र लांब राहायचं निक्षून ठरवलं. नाही म्हटलं, तरी या सगळ्या बाबींकरता स्वतंत्र जागा आहे, आणि तिथे त्या प्रकारचं विपुल लेखन वाचायलाही मिळतं. त्या लेखनाला प्रतिष्ठा आहे हेही महत्त्वाचं.
प्रतिष्ठा नाही, ती शुद्ध रंजनाला. उघड-प्रचारकी-बटबटीत भूमिका न घेता गोष्ट उपभोगणार्याच्या मना-बुद्धीचा आदर करून चलाख-चोख गोष्ट सांगण्याला. अशा गोष्टींना हिणवण्याचा पकाऊ पंतोजीपणा आपल्याकडे फार करतात. कथात्म आणि ललित अशा दोन्ही गोष्टींना हलक्यात काढलं जातं, कमी लेखलं जातं, वरवरचं मानलं जातं.
वास्तविक या साहित्यप्रकारांच्या रचनेमध्ये तितकंच –खरं तर अधिक कौशल्य लागतं. त्यात पार्श्वभूमीदाखल येणारे तपशील अनेक गोष्टी न बोलता बोलत असतात. जीवनाचं प्रतिबिंब वगैरे जे म्हणतात, ते दाखवण्याचं काम ते तपशील, त्यांच्यातलं वैविध्य, त्यांचा अचूकपणा, त्यांची समग्रता… या सगळ्यांतूनही होत असतं. कदाचित अधिक सूक्ष्मपणे, आणि म्हणून अधिक परिणामकारकपणे होत असतं.
आपल्याला – होय, आम्हांला आणि तुम्हांलाही – या नि अशा गोष्टी वाचायला मिळाव्यात, अशा निखळ स्वार्थी हेतूनं आम्ही ‘भास’ हे अनियतकालिक सुरू करतो आहोत. वाचा, वाचायला द्या, आणि सुरसुरी आली, तर लिहादेखील.
प्रश्न आहेत? की सूचना? की शंकाकुशंका? की सल्ला द्यायचा आहे? लेखन पाठवायचं आहे वा सुचवायचं आहे? आमचा इमेल आयडी खाली दिला आहे, आम्हांला जरूर पत्र लिहा.
आपले,
‘भास’चे संपादक ([email protected])