भास घोषणा - भास आणि बिरबलाचा उंट
भास आणि बिरबलाचा उंट
मेघना भुस्कुटे
Sat Oct 12
बिरबलाच्या अठराव्या उंटाची गोष्ट ठाऊक आहे? सतरा उंटांच्या वाटणीवरून भांडणार्या कुणा तिघांचं भांडण सोडवायला बिरबलाकडे येतं. वाटणीही साधी, प्रत्येकाला सारखी अशी नसते - एकाला एक द्वितीयांश, एकाला एक तृतीयांश, एकाला एक नवमांश. बिरबल हातचा एक अधिक उंट घेतो, तिघांनाही समाधानकारक ठरेल अशा प्रकारे एकूण उंटांची तिघांत चतुर वाटणी करून देतो, मग आपला हातचा उंट काढून घेतो. सगळे चकित होतात, पण खूशही होतात. ही अठराव्या उंटाची कमाल. गोष्टी अठराव्या उंटासारख्याच असतात. आपल्या गद्य, रूक्ष, तर्ककर्कश आणि डिमांडिंग वास्तवात थोड्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी मिसळल्या की तापलेली मनं शांत होतात, मनाजोगी उत्तरं गवसतात, ओठावर हसू येतं, आणि गोष्टींच्या रूपानं अद्भुताचा अठरावा उंट तसाच्या तसा अभंग उरतो!
बरेचदा गोष्टी आपल्या भाषेतून ऐकाव्याश्या-वाचाव्याश्या वाटतात. त्या न मिळाल्या, तर काहीतरी कमी असल्याचा भास होतो. आम्हांला ही उणीव इतक्यात जास्तच भासत होती, म्हणून ‘भास’ नामक अनियतकालिकाची आणि प्रकाशनाची संकल्पना प्रत्यक्षात आणायचं आम्ही ठरवलं.
मराठीतलं कल्पितविश्व चांगलंच सशक्त आहे. त्याबद्दल वादच नाही. पण पाश्चात्त्य साहित्यविश्वात ज्याला जॉन्र फिक्शन म्हणतात, तशा प्रकारच्या कथांना आपल्याकडे फारशी प्रतिष्ठा नाही, आणि त्यामुळे तशा कथांचं फारसं पीकही नाही. आम्हांला मनापासून असं वाटतं, की भूतकथा, गूढकथा, नवलकथा, रहस्यकथा, अद्भुतिका, विज्ञानकथा, शृंगारकथा, चातुर्यकथा, तपासकथा… या सगळ्या जॉन्रांमध्ये जितकं उत्तमोत्तम आणि बहुविध लिहिलं जाईल, तितके समकालीन वास्तवाचे - वास्तवाच्याही पलीकडे जाणारा पूल बांधणारे – झळझळीत, अर्थपूर्ण, सशक्त रंग कथेत उमटतील; वाचकाला आकर्षून घेतील, कल्पिताची आणि रंजनाची वाट अधिकाधिक प्रशस्त करतील.
कविता आणि ललितगद्य या दोन्ही साहित्यप्रकारांचंही मराठीत एका प्रकारे अवमूल्यन झालं आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॅपसदृश माध्यमांमध्ये संपादनाचा संस्कार करण्याची अजिबात गरज उरलेली नाही. कितीही आणि काहीही प्रकाशित करण्यासाठी मोकळी वाट आहे. हे लोकशाहीकरण आहे आणि त्याचे फायदे अर्थातच आहेत. पण त्याचे तोटेही आपल्याला आता जाणवू लागले आहेत. भाषेविषयीची, शैलीविषयीची, घाटाविषयीची, तपशिलाच्या निर्दोषपणाविषयीची जागरुकता अंतर्धान पावू लागली आहे. हे आपल्या सर्वांच्या अभिरुचीला मारक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषांतरं. अलीकडच्या काळात मराठीत विपुल भाषांतरं येताहेत. पण त्याही बाबतीत निवड आणि संस्कार, या दोन गोष्टींवर काम करायला पुष्कळ वाव आहे. आणि शेवटची त्रुटी जी आम्हांला जाणवते, ती म्हणजे उत्तम दर्जाच्या इ-पुस्तकांची. कितीतरी पुस्तकांच्या पीडीएफ फायली समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या दिसतात. लोक त्या हावरेपणी जमवतातही. पण त्या खरोखर वाचल्या जातात का? त्यांतल्या परिच्छेदांची रचना, त्यांतले फॉन्ट्स, ह्यांमुळे वाचताना मजा येते का? हातात घेऊन वाचण्याच्या कागदी पुस्तकातून मिळणारा सघन अनुभव त्यात नसेलही, तरीही हा अनुभव आपण अधिक वाचकाभिमुख, अधिक सुकर, आर्थिकदृष्ट्या अधिक किफायतशीर करू शकतो, व्यापकपणे उपलब्ध असलेल्या जागतिक व्यासपीठांवरही उपलब्ध करून देऊ शकतो असं वाटलं.
मुख्यतः आमच्या वाचनाच्या आवडीनिवडींमुळे आणि धारणांमुळे - या सगळ्या बाबींवर कुणीतरी काम करण्याची निकड भासत होती. म्हणून ‘भास’ हे अनियतकालिक आणि ‘भास प्रकाशन’ या दोन्ही दीर्घकालीन प्रकल्पांची सुरुवात करतो आहोत.
‘भास’ हे अनियतकालिक यंदा दिवाळीच्या सुमारास प्रकाशित करत असलो, तरी त्याचं भौतिक स्वरूप दिवाळी अंकासारखं नाही. एखाद्या पुस्तकासारखं देखणं दर्शनी रूप; त्याचं आयुष्य वाढावं अशा दृष्टीनं केलेली कागदाची, बांधणीची, आणि मांडणीची जाणीवपूर्वक निवड; आणि जाहिरातींचा पूर्ण अभाव असलेलं, रंजनाला रद्दबातल न ठरवता त्याला प्राधान्यच देणारं कथा-ललित-भाषांतर साहित्याचं संकलन – ही आमच्या डोळ्यासमोर असलेली छापील अनियतकालिकाची कल्पना आहे. ब्रिटनमधल्या ‘ग्रॅन्टा, द मॅगेझीन ऑफ न्यू रायटिंग’ या साहित्यिक नियतकालिकाचा आदर्श आमच्यासमोर आहे. अनियतकालिक छापील स्वरूपात, तर प्रकाशनाचं काम इ-पुस्तक आणि छापील अशा दोन्ही स्वरूपात – अशी सुरुवातीची विभागणी आहे.
आमच्या प्रयोगातून आनंद मिळवण्याची असोशी आम्हांला आहेच, पण आमच्याबरोबर तुम्हांलाही तो मिळाला, तर आपला सर्वांचा आनंद द्विगुणित होईल. त्याकरताच हा खटाटोप.
आपले,
‘भास’चे संपादक ([email protected])