भास १०.२५ : जान निछावर करून टाकावी असं जग

जितेंद्र वैद्य आणि मेघना भुस्कुटे यांनी अनुवादित केलेली टोबियस बकुल यांची विज्ञानकथा

Thu Oct 02

…एके काळी शेतजमीन असलेले आणि आता खारट धुळीचे माळच माळ. अनेकदा जुगाड करून कशाबशाच चालत्या ठेवलेल्या विजेवरच्या गाड्या. त्याही कोसळणीच्या आधीच्या काळातल्या. त्या गाड्यांवर स्वार होऊन तुमची गँग माळावरून दौडत चाललेली. गँगच्या कडेनी चाललेल्या संरक्षकस्वारांंच्या मोटरसायकली माळावरच्या हरेक घळीत आणि खड्ड्यात घसरतात, पुन्हा सरळ होतात. दर वेळी धुळीचे लोटच्या लोट उडतात. मोटरसायकलींंवरची आणि ट्रकांवरची निशाणं फडफडत राहतात.

तुम्ही स्वतः मात्र सस्पेन्शन शाबूत असलेल्या एका पिकअप ट्रकमध्ये. बूड कसंबसं सीटशी बांधलेलं, आणि पाय पिकअप ट्रकच्या मागच्या बाजूला बसवलेल्या मशीनगनच्या तळाशी रोवलेले. तुम्हीसुद्धा कधी काळी संरक्षकस्वार म्हणून काम केलं आहे, मोटरसायकलवर तोल सावरत हँडलवरची शॉटगन पेलायची आणि न पडता पुढे जात राहायचं. ती कसरत आठवून तुमच्या पोटात गोळा येतो. पिकअप ट्रकमध्ये बरं वाटतं…