भास १०.२५ : पी०सी०, जे०सी०, आणि आउट

रामदास यांची थरारक अफरातफर-कथा

Thu Oct 02

“भटा, इथे बस.” मी खुर्चीवर बसलो.

विरकरनी पट्टा हातात घेतला. पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा तुकडा. फटका जोरात बसतो. अट्टल खिलाडीपण तीन फटक्यांत संपतात.

महाडिक पाठीकडून पुढे आला. माझं कोपर हातात घट्ट पकडून ठेवलं.

विरकरनी पट्टा जोरात हाणला. डाव्या डोळ्यातून घळकन पाणी आलं.

“बोल, तुझ्या खात्यात चेक वटला कसा?”

माझा तळहात बधिर झाला होता.

दुसरा फटका. परत तोच प्रश्न. महाडिकनी खुर्चीला लाथ मारली.

मी तोंडघशी. टेबलाच्या कडेवर. दातातून रक्त टपकायला सुरुवात झाली. मी टेबलाखाली वाकून थुंकलो. तोंडात आंबट चव गोळा झाली.

पाठीवर एक जोरात रट्टा. पोटाचे पडदे एकदम कडक झाले. ठसका लागला. हातातून विजेचे लोळ जायला लागले. डोळ्यातलं खारं पाणी, रक्त तोंडात जाऊन मळमळायला लागलं.

“मादरचोद, चेक आला कुठून?”

“मनोरमा शेट्टीच्या खात्यातून, कर्ज घेतलं होतं.”

“त्या रांडेच्या खात्यात चेक कसा आला?”

“मला माहिती नाही.”

विरकरनी एक फायनल अ‍ॅसाल्ट केला. अंदाज चुकला. पोटात बसणारा गुद्दा छाती-पोटाच्या मध्येच बसला. वरचा श्वास वरच राहिला. डोळ्यापुढे अंधारलं. लाल-लाल चांदण्या दिसल्या.

पुढे काही कळलंच नाही.

***

डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर पंखा फिरताना दिसला.

आणि पुन्हा लाल चांदण्या.