भास १०.२५: मृत्योपनिषद

हृषीकेश गुप्ते यांची अंगावर काटा आणणारी भयकथा

Thu Oct 02

…सोजिराच्या टेकडीवर जाण्याची आमची इच्छा असणं दूर; त्या टेकडीकडे, त्या बंगलीकडे पाहण्याचीसुद्धा आमच्यात हिंमत नव्हती. पण आमच्या पायांनी आम्हांला तिथे खेचून नेलं.

आम्ही ती टेकडी ओलांडली कधी आणि सोजिराच्या बंगल्याच्या फाटकापाशी पोहोचलो कधी, आमचं आम्हांलाच कळलं नाही. जणू ती एक मंत्रमुग्ध अवस्थाच होती.

ती करकरीत तिन्हीसांजेची वेळ होती.

काळ्या चष्म्यातून पाहिल्याप्रमाणे सारा परिसर धूसर आणि धुकट दिसत होता. पडलेल्या वार्‍यामुळे वातावरण अधिकच सुनं सुनं भासत होतं. फाटकापाशी आम्ही थांबलो. क्षणभर मला वाटलं, की ते फाटक म्हणजे लक्ष्मणरेषा आहे. आम्ही आणि ईश्वर जाणे आणखी कोण, पण ती आमच्यामधली लक्ष्मणरेषा असल्यासारखं उभं होतं…